वचन

तसे हे लहानसेच खेडे,जेमतेम वस्ती असलेलं,आंबा-फणस,चिंच,नारळ-पोफळी यांच्या गर्दीत लपलेलं,वर्षानुवर्षे त्याच स्थितीत असलेलं,आधुनिकीकरणाचा स्पर्शही न झालेलं,गावात ठराविक पाच पन्नास घरं,सताठ दुकाने असलेला जुनाट बाजार,एक छोटी शाळा, एक ग्रामपंचायतीचे घर,त्याला लागून पोस्ट. गावाला दुभागून जाणारा लाल मातीच्या लोटाने भरलेला रस्ता.हि सडक सरळ पार तालुक्यापर्यंत जाते.याच रस्त्याने पुढे गेलं कि हळूहळू गाव मागे पडतं, आपण सड्यावर येतो,भणाणत्या वाऱ्याने बरं वाटतं.एखाद दोन किलोमीटर अजून पुढे गेलो कि दोन फाटे फुटतात. एक सरळ तालुक्याला, आणि एक छोटी सडक खाली. पूर्वी इथे एक फलक लावलेला असायचा,"वेतोबा देवस्थानाकडे" असा आताशा तो दिसत नाही.पण हि दोन रस्त्यांची खूण लक्षात राहते.खालच्या रस्त्याने उतरलो कि आपण नारळ पोफळींच्या घनदाट बागांमध्ये शिरतो. झाडांची गर्दी वाढत जाते,पावणा झाडांमध्ये हरवून जातो.पण आपण सरळ चालत राहायचं,रस्ता कधी सोडायचा नाही.काही वेळात समोर उघाड दिसायला लागतो,जीवात जीव येतो.त्या अंधारबनातून बाहेर आल्यावर एकदम हायसं वाटतं.

पण समोर जे दृश्य दिसतं, ते नवीन माणसाला एकदम आश्चर्यचकित करणारं.समोर पसरलेलं अथांग तळं,इतका मोठा जलाशय कि समोरचा काठ दिसताना मारामार. तळयाभोवती तीन ठिकाणी प्रचंड घाट.दगडी पायऱ्यांनी बांधलेले.पिवळ्या दगडांचे ते घाट मावळत्या सूर्याच्या किरणांत जणू सोन्याचेच भासतात.हा घाट मागे पेशव्यांनी कधीतरी बांधला म्हणतात,हा असा दगड कोकणात मिळत नाही, बाहेरून मागवावा लागला.

असो पुढे घाटावर दिसतं ते जुनाट जांभा दगडातलं एक भव्य मंदिर.लांबून त्याच्या फक्त कळस दिसतो, आणि वडाच्या झाडाचा शेंडा.कारण सभोवताली त्याच दगडातली प्रचंड तटबंदी. आपण तळ्याला लागून चालत देवळापर्यंत येतो. देवळासमोर तीन पुरुष उंचीच भव्य महाद्वार दिसतं.तिथूनच दोहो बाजूंनी तटबंदी सुरु होते.महाद्वार्च्या शेजारी दोन कोनाड्यात जय-विजयांच्या भग्न मूर्ती, पण चेहऱ्यावरील भाव अजूनही तसेच,त्यांच्याही कपाळावर शेंदूर माखलेला .महाद्वारातून पुढे आत गेलं कि एक भव्य दगडी फरशीच पटांगण लागतं,मग दिसतो मधोमध पसरलेला एक शेकडो वर्ष जुना वड.आणि चार बाजूंना उंचच उंच दगडी दीपमाळा.आत शिरल्यावर दोन्ही बाजूंनी बांधलेले उंच दगडी ओटे , मध्ये मध्ये त्यावर चढण्याकरता बांधलेल्या पायऱ्या.बहुतेक यात्रेकरूंच्या सोयीसाठी धर्म शाळांसारखे हे बांधकाम असावे, आता तिथे माणसेच काय साधे कुत्रेही दिसत नाही. आत वाघुळंच्या फडफडण्याचा आवाज मात्र येत राहतो. त्या दगडी ओट्यांवर प्रचंड कोरीवकाम, तसेच खांबांवर पण, लढाईतले प्रसंग,राज्याभिषेकाचे क्षण,नागरी जीवन.पण कोकणातला हा असा निर्दयी पाउस झेलून सगळेच गुळगुळीत झालेले, मुर्तींचे नाक,कान, डोळे कशाचाच पत्ता नाही ,सगळे आपले गोल गोल गोटे.वडाखाली मोठा पार,आणि पारालाच टेकून मांडलेल्या वीरगळ,त्यावरही कधीकाळी झालेली पूजा अर्चा,शेंदूर तेल.वडाच्या बुंध्याशी असलेले एक मोठे शिवलिंग.

आता आपण मुख्य देवळापाशी येतो, आणि त्याची भव्यता अजूनच जाणवते आकाशात भिडलेला अप्रतिम नक्षीकाम केलेला कळस,दहा पायऱ्या चढून आपण आत येतो.समोर अतिप्रचंड असा नंदी.आत भरपूर खांब, सगळे कोरीवकामाने नटलेले,खाली गुळगुळीत दगडांची थंडगार फरशी.वर पितळी धातूच्या दोन मोठ्ठ्या घंटा,एकदा वाजवली कि त्या शांततेत बराच वेळ घुमत राहणारा तिचा नाद,मग पावण्यालाच घाबरल्यागत होतं आणि घंटेला हात लाऊन तो आवाज थांबवतो.गाभाऱ्यात जायचे म्हणजे परत चार पायऱ्या खाली उतरायचे,आत मध्ये मिट्ट,अनेक वर्षांचा साठलेला गूढ अंधार,मधोमध उभी असलेली वेतोबाची उंच मूर्ती.बाजूला दोन मोठ्या समया त्यात काठोकाठ भरलेले काळे झालेले तेल,त्यातच बुडालेल्या जाड जाड वाती. दोन समयांचा गाभार्यातला अंधार दूर करण्याची केविलवाणी धडपड,पण गाभाराच एवढा उंच कि समयांचा प्रकाश जेमतेम वेतोबवारच पडतो.काळोख त्याच्या सहस्त्र जिव्हांनी ज्योतीला गडप करण्याच्या बेतात,पण जोवर समईत तेल भरलेलं आहे,त्या टीचभर प्रकाशाचं तो काहीच वाकडं करू शकत नाही.मूर्ती समयांच्या प्रकाशात उजळून निघते.डूईवर दगडी मुकुट. चेहऱ्यावरचे भाव उग्र भरगोस मिशा. मोठ्ठाले बटबटीत डोळे,(जणूकाही भक्तांच्या पापांना जाळण्यासाठीच रोखलेले)भेसूर हास्य,बघताक्षणीच काळजाचा ठोका चुकवणारे.मूर्तीला चार हात, चारही हातात शस्त्र,खड्ग,पायाशी एक दैत्य,डोळ्यात पराजीताचे भाव,वेतोबाचा एक पाय त्याच्या छाताडावर.असा हा युद्धाच्या पवित्र्यातला वेतोबा म्हणजे शंकराचाच अवतार.गाभाऱ्यात दुधाचा,फुलांचा,बेलाच्या पानांचा,समयांच्या भगभगीत धुराचा,आतल्या कोंदट वातावरणाचा असा एक वेगळाच संमिश्र वास.
गाभाऱ्यातून बाहेर आलं कि अचानक मोकळं वाटत,स्वतःला तोंड देणं सर्वात कठीण,वेतोबाची उग्र नजर आठवत राहते,मनातली पापं,भूतकाळ वर नाचायला लागतात. बाहेर तळ्याकडे नजर जाते,सांज उतरू लागलेली असते,मगासचा सोनेरी प्रकाश आता लालसर रंगात बदललेला असतो.तळ्यात पाणी भरपूर,आकाशाच्याच रंगाचं,वर आभाळात रंगोत्सव झाला कि आरश्याप्रमाणे तळ्यात पण बदल होतात.मगाशी सोनेरी रंगात चमचमणारं तळं आता लाल तांबूस होऊन गेलेलं असतं.कोकणात पाउस चिक्कार आभाळ फाटून पाउस बरसायला लागला कि मग चहु बाजूंनी पाण्याचे लोट तळ्यात येउन कोसळू लागतात.सारं तळं लाल पाण्याने ओसंडून वाहू लागतं.घाटाच्या सर्व पायऱ्या पाण्यात बुडून जातात,कधी कधी तर महाद्वारापर्यंत गंगा येते.
देवळाच्या मागे दोन दगडी घरं.एकात जत्रेचा रथ,जेवणाची मोठाली भांडी,नगारे,मृदुंग आणि इतर काहीबाही सामान आणि एकात'तो'राहतो.त्याचे नाव माहित नाही.पण लोकं त्याला गुरव,भट,बामन,बाबा,महाराज अशा कित्येक नावांनी हाक मारतात.उंची चांगलीच उंच पण आता वयोमानानुसार थोडंस पोक आलेलं,खाली स्वच्छ धोतर,खांद्यावर उपरणे,पांढरी शुभ्र दाढी,भेदक नजर असा वेश,तो आहे म्हणून वेतोबाची दिवा बत्ती होते.गावकरी समाधानी आहेत.त्याचा कधीच कुणाला त्रास नसतो.अत्यंत मितभाषी,जेवढ्यास तेवढे,कित्त्येकांना तर तो मुकाच वाटतो.त्याला ओळखणारे आता बहुतेक सगळे वर गेलेले,नवीन पिढीला कोणालाच त्याचा इतिहास माहित नाही,कोणाला जाणून घ्यायची उत्सुकताही नाही.अख्या देवळाची साफसफाई एकटा करतो.दुपारचा नेवैद्य दररोज गावातून येतो.रात्री साठी देवासमोर जमलेल्या तांदळातून खिचडी किंवा खिमट,कधी कुणी दिली तर फळं,दुध.पण हा कधी एका शब्दानेही कुणाकडे काही मागत नाही.पावसाळ्यात तर पंधरा पंधरा दिवस लोक बाहेर सुद्धा पडत नाहीत,हा दुपारी बारा वाजेपर्यंत वाट बघतो,मग स्वता:च खिचडीचा नैवेद्य वेतोबाला दाखवतो.लग्न झाले,मूल झाले किंवा इतर नवस पूर्ण झाले कि लोक वेतोबाला येतात,वेतोबासोबत यालाही नमस्कार चमत्कार होतो हा आकाशाकडे बघून काहीतरी पुटपुटतो.कधी कुणी पंचांग घेऊन मुहूर्त विचारायला येतं,भविष्य पाहायला येतं,ज्याच्या त्याचा भाव,सर्व वेतोबावर सोपवा म्हणतो.
एरवी शांत असणारे देऊळ वर्षातून दोनदा गजबजते. महाशिवरात्र आणि त्रिपुरारी पोर्णिमा.महाशिवरात्रीला तर मोठ्ठी जत्रा असते. आजूबाजूच्या गावातून लोकं येतात. पूजेचा मान अर्थातच याच्याकडे. भल्या पहाटे उठून हा तळ्यावर जातो,गार पाण्यात कमरे एवढा बुडतो.पूर्वेला पाहत मोठ्याने गायत्री म्हणतो,असा खणखणीत आवाज की ऐकतच राहावे,अर्घ्य देऊन झाले कि स्नान आटोपून दोन घागऱ्या पाणी देवळात आणतो,समया सारख्या करतो, त्यांच्या उजेडात वेतोबाला खसखसून अंघोळ घालतो.बाहेर फुलझाडं बहरलेलीच असतात,भरपुर फुल काढतो,टोपलीभरुन बेल निघतो. "ओम नम: शिवाय||" गाभार्याभर याचा आवाज घुमतो.वेतोबाच्या डोक्यावरच बेलाचं पानही थरथरतं,तोवर सुर्योदय होतो,हळु हळु लोक जमायला सुरवात होते.यज्ञ,होमहवन होतात,पंगती उठतात,शेकड्याने माणसं जेउन जातात,त्या गोंधळात हा कुठेच नसतो.तो दुरवर तळ्याकाठी जाउन डोळे मिटुन शांत बसुन राहतो.रात्री भजन,किर्तन दणदणते.गार वार्यावर बाहेर हा शांतपणे किर्तन ऎकत बसतो,कधीतरी मग तिथेच डोळा लागतो.सकाळि जाग येते ती पक्षांच्या किलबिलाटाने,सार्या तळ्यावर धुक्याची चादर पसरलेली असते,कालची सगळी मंडळी परतलेली असतात,देवळाच्या आवारात हा कचरा पडलेला.तो निश्वास टाकतो आणि कोपर्यातला झाडु हातात घेउन देउळ झाडायला घेतो.
त्रिपुरारी पोर्णिमेला मात्र फक्त संध्याकाळी किर्तन आणि मग अभंगांची मॆफिल.हा तेव्हा तसा उत्साहात दिसतो,कारण त्या दिवशी विशेष अशी गर्दी नसते,ठराविक दर्दी मंडळी येतात.थंडीची नुकतीच सुरवात असते,तिन्हीसांज उलटली,चंद्रोदय झाला की हळुहळु हा हातात तेलाची कळशी घेउन दीपमाळेत एक एक दिवा लावायला सुरवात करतो,गावातली जमलेली लोकं,भजनी मंडळ प्रेमाने हा सोहळा पहात बसतं,मग एखाद दोन पोरं उठुन याच्या मदतीला धावतात,तो नाही म्हणत नाही.तासा दोन तासात चारी दिपमाळा दिव्यांनी उजळुन निघतात.स्निग्ध,सोनेरी प्रकाश पार वेतोबाच्या गाभार्यापाशी पोहोचतो,मोठाल्या डोळ्यानी तो ही सारे कॊतुक पहात असतो. कीर्तनाला सुरवात होते, सारे रंगुन जातात.किर्तन संपेस्तोवर चंद्र डोक्यावर येतो त्याच्या मोतीया प्रकाशात तळ चमचमायला लागतं,'हा' स्वतात हरवुन जातो,मग कोणितरी याला बोलावुन आणतं, म्रृदुंगावर थाप पडते आणि हा भानावर येतो.मग रात्रभर भजना अभंगाची मॆफिल उडते,हा बेभान होउन गात राहतो,एकणारे भान विसरुन ऎकत राहतात.कधितरी पहाटे सर्व मंडळी परतात,आणि हा परत अबोल,एकटा उरतो,पहाटेच्या वार्यावर दीपमाळेतला एक एक दीप विझत जातो, तसा याचाही डोळा लागतो.
दिवसांमागुन दिवस उलटतात,वर्षांमागुन वर्ष उलटतात,उन्हाळ्यात तळं आटतं,पावसाळ्यात गर्भार स्त्री सारखं सजतं,हाही पूर्वीसारखाच शांत, अबोल. एकदा मे महीन्यातल्या एका दुपारी चार च्या सुमारास एक लाल गाडी धुळ उडवत येउन थांबते,आतुन दोन माणसं,दोन बायका,एक पाच सहा वर्षाची लहान मुलगी,आणि सर्वात शेवटी एक साधारण साठीची एक स्थुल स्त्री उतरतात हळुहळु ते देवळाजवळ येतात,तसा हा सावरुन बसतो, त्याच्या कपाळावर एक बारीकशी आठी येते,पण दुसर्याच क्षणी परत चेहरा पुर्वी सारखा कोरा होतो.आता त्यांचा आवाजही ऎकु यायला लागतो

"Wow dad,such a wonderful place this is, just look at that pond, its sooooo big? N at this temple its so huge n beautiful, its just awesome... dad... thanks àaji... look at this warriors, who are they? "

लहान मुलगी बापाला प्रश्न विचारुन हॆराण करत राहते. बाप मग करवादुन त्या म्हातार्या बाइला सांगतो,आई आता तुच सांग हिला सगळा इतिहास.

" हो आई,काय अप्रतीम जागा आहे,किती सुंदर,किती गुढ" दोन्ही सूना पण पुढे सरसावतात.

"इतिहास...;.. हं..... "नि:श्वास टाकत ती वृद्धा खिन्न पणे हसते.

पण लगेच चटकन सावरुन 'अग खुप मोठा इतिहास आहे बर या जागेचा' या इकडे पायर्यांवर बसुया. सर्व मंडळी तळ्याकाठी बसतात.बराच वेळ गप्पा होतात.हा गाभार्यासमोर बसुन सगळे पहात असतो.मग त्यांची फोटोग्राफी सुरु होते.
वृद्धा हळुहळू चालत आत जाते, दर्शन घेते आणि बाहेर येते, यांची नजरानजर होते, आणि ती दचकतेच.
होय तेच डोळे, तीच ती भेदक, दुसर्याच्या काळजाचा ठाव घेणारी नजर. तिलाही तो लगेच ओळखतो ,तिचे लांब सडक केस,आता रुपेरी झाले असले तरी पण..मोठे मोठे काळे डोळे.... वसु... वसुधा.. तो नकळत बोलुन जातो, आणि ती दचकुन मागे सरकते... इतकी तपं लोटली, पण त्याच्या एका हाकेत सारे अंतर संपले.. एका खांबाचा ती आधार घेते, मन अनेक वर्ष मागे पळते.
तळ्यातली कमळे हक्काने काढुन देणारा माधव, आंबे,बोर,काजु,करवंद,चिंचा आप्पांची नजर चुकवुन देणारा माधव,आपला अभ्यास घेणारा माधव,न कळत्या वयात आपला प्रियकर बनुन आलेला माधव.तळ्यावर होणार्या गाठीभेटी,वेतोबाच्या साक्षिने घेतलेल्या सात जन्मांच्या शपथा,मग नंतर आप्पांच्या कानावर आलेली बातमी,अख्खा गावासमोर माधवाने खाल्लेला बेदम मार.मग झालेली ताटातूट,मग त्याला लिहीलेली चिठठी.
"त्रिपुरा पॊर्णिमेला देवळाबाहेर भेट, कीर्तन सुरु असेल,कोणाचचं लक्ष नसेल आपण पळुन जाउ. मी येइपर्यंत देउळ सोडुन जाउ नकोस. हीच शेवटची संधी असेल. तुला तुझ्या वेतोबाची शपथ, मी येइ पर्यंत तिथेच रहा....."
तिला हे आठवुन गरगरायला लागतं.... ती त्या पौर्णिमेला पोचुच शकत नाही. आप्पा सकाळीच तिला रत्नाग्रीला मामाकडे जबरदस्ती पाठवतात.नंतर तिथुन मुंबई, मग सगळं आयुष्यच बदलतं,तिचं लग्न होतं,काळ तिला विसरायला लावतो,मग पुढे तिच माहेर रत्नाग्रीला हलतं,आणी गावचा संबध कायमचा संपतोच. ती आज इतक्या वर्षांनी इथे येते, आणि नेमका हा समोर..

तु.... तु... इथे कसा?
मी इथेच असतो , वेतोबाची शपथ आहे मला..
वचन दिलय मी.......

त्या सरत्या संध्याकाळी ते देउळ,तो वड,ते तळं,मोठ्या डोळ्यांचा वेतोबा सगळे डोळ्यांसमोर फेर धरायला लागतात, ती चक्कर येउन कोसळते, हा आधार द्यायला पुढे धावतो. तोवर मुलही येतात.
बाईना चक्कर आली. थांबा मी पाणी घेउन येतो, म्हणत तो धावतो.

आई, उठा ना, डोळे उघडा.. सुना घाबरतात.

"तुम्हाला सांगत होते,आईना दिवसभर दगदग झालीये तरी तुम्ही ऎकाल तर,उद्या आलो असतो तरी चाललं असतं..."
"अग मी पण तेच म्हणत होतो, पण आई ऎकेल तर ना.. जाउंदे आपण घरी जाउन बोलु."

तोवर तो पाणी घेउन येतो,थोड्याच वेळात ती सावरते.मुलं त्याचे आभार मानतात. हळुहळु हाताला धरुन तीला गाडीत बसवतात. जाताना ती याच्याकडे पाहते, नजरेत माफिची विनवणी असते.. पण याला खरा प्रकार तेव्हाच समजलेला असतो,तिची झालेली फरफट तो चांगला ओळखुन असतो,तो हसुन तिला हात दाखवतो.धुरळा उडवत गाडी निघुन जाते.
हा तळ्यावर जातो, पाणी घेउन येतो,समयांच्या उजेडात वेतोबाला छान अभिषेक करतो.फुलांनी सजवतो.मग तेलाची कळशी उचलतो,आणि दीपमाळांपाशी जातो,पुढील दोनेक तासात तो सर्व दीपमाळा प्रज्वलीत करतो, सोनेरी प्रकाशात देउळ उजळुन निघतं,कृतार्तथेने तो वेतोबाला हात जोडतो, तिचा सुखी संसार पाहुन त्याचं मन भरुन येतं
आत जाउन त्याची वळकटी तो आणतो, वेतोबाला साष्टांग नमस्कार घालतो,आणि चालायला लागतो,तळ्याला वळसा घालुन तो सड्यावर पोचतो,गारठा प्रचंड असतो.

"तुझ्या वेतोबाची शपथ, मी येइ पर्यंत तिथेच रहा....." हो वसु आज वचन पुर्ण झाले

शाल पांघरलेली त्याची आकृती अंधारात दिसेनाशी होते.
दीप माळेतले दिवे वाऱ्यावर भिरभिर्तायेत
वेतोबा तसाच उभाय.. मोठ्या डोळ्यांनी समोर बघत..

समाप्त

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

जबहर्‍या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

या कथेतलं वर्णन झकास जमलंय. बरोब्बर वठलंय. त्यासाठी चार चांदण्या!


पण याच ढाच्यावर बेतलेल्या दोन तरी कथा आधी वाचल्यात. या वेळेला देउळ आहे. देवळाऐवजी एकात रेल्वे स्टेशन आणि दुसर्‍यात मला वाटतं बाग एव्हढं स्थलभिन्नत्व आणि कथेतली पात्रयोजना थोडी वेगळी सोडली तरी मूळ गाभा तोच होता.
स्पा, आय होप की तुझी लेखणी अशा उसनवार* कथा बेतण्याऐवजी वेगळ्या, नव्या कल्पनांवर झिजवशील...


* - कथावस्तू सारखी असल्यामुळे उसनवार म्हणतोय. तू त्या कथा वाचल्या नसशीलही. तसं असेल तर या लेखनाला पाच चांदण्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

छान! आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच जबरी! काय सुरेख वातावरणनीर्मिती केली आहे वा. अन मुख्य म्हणजे भयकथा नाही तर प्रेमकथा आहे. चॉकलेट बॉक्स्मध्ये एकदम आवडतं चॉकलेट गवसल्याचा आनंद झाला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा काय वाहतं लिहिलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0