पॉलिटिंगल भाग ७ - रंगवलेला कुट्ट काळा पैसा

पॉलिटिंगल - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६
पंतप्रधान कार्यालयातल्या एका कोपऱ्यात काम करणारे शर्माजी आजकाल सक्काळी पावणेआठलाच ऑफिसात जांभया आवरत पोहचत. त्यांच्या गाडीतून त्यांची कामवाली येई आणि ऑफिसमधल्या सगळ्यांचेच कप वगैरे आवरून ठेवत असे. मोदीमहोदयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना जी नीटनेटकेपणाची जरब घातली होती त्यामुळे काम काही झालं नाही तरी चालेल पण पसारा दिसता कामा नये, हे ते शिकले होते. एरवी ते आल्या आल्या एक झोप काढायचे. तसं त्यांचं शेजारच्या वर्माजींबरोबर सेटिंग होतं. आळीपाळीने एकाने झोपायचं आणि दुसऱ्याने पहारा द्यायचा. 'छ्या: अच्छे दिन म्हणे! पूर्वी कसं केव्हाही कोणीही झोपता यायचं. गेले ते दिवस म्हाराजा...' आज शर्मा आणि वर्मा दोघांनाही खुद्द पंतप्रधानांकडून बोलावणं येण्याची शक्यता होती. तेव्हा आज झोप कटाप.

शर्माजींच्या मनातला हा विचार त्यांच्या शरीराला बिलकुल पसंत पडलेला नाही हे त्याने एक अवाढव्य जांभई बाहेर काढून स्पष्ट केलं.

सकाळभर न झोपता काम केल्यानंतर दुपारी जेवणाच्या वेळी पोटात कावळे कोकलत असताना नेमका ऑफिसमधून निरोप आला की 'आता हलू नका, केव्हाही बोलवतील, तयार रहा.' पाउण तास तयार राहण्यात गेला. आणि मग दारासमोर वीस मिनिटं उभं राहावं लागलं. पोटातल्या कावळ्यांचा कोलाहल आता वाढून चरमसीमेला पोचला होता. दार उघडून आत गेल्यावर मोदीजींचा नुकतंच जिलबीफाफडा आणि डाळढोकळी खाल्ल्यासारखा प्रसन्न चेहरा दिसला. अमित शहाजी मात्र कितीही जेवले असले तरी त्यांचा चेहरा नेहमीसारखाच दिसला. त्यांच्याकडे बघून शर्माजींना नेहमीच पोटात कोणीतरी चिमटा घेतल्यासारखं वाटत असे. हा चिमटा आणि कावळ्यांच्या टोची एकदमच बोचल्यामुळे शर्माजींची अवस्था पारच बिकट झाली.

मोदीजी : बोला...
शर्मा : सर आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्या स्विस बॅंकांना फोन केले सर.
मोदीजी : आणि?
शर्मा : त्याचं काय आहे सर..
मोदीजी : काय आहे?
शर्मा : त्याचं असं आहे की सर ते आपल्याला नावं सांगू शकत नाहीत.
मोदीजी : नावं सांगू शकत नाहीत?
शर्मा : नाही सर.
मोदीजी : आणि रकमा?
शर्मा : त्याचंही असं आहे सर...
मोदीजी : पटकन सांगा. बुलेट पॉइंट्स. मला अशी चालढकल आवडत नाही. पंतप्रधानाच्या कार्यालयात कशी कॉर्पोरेट लेव्हल एफिशियन्सी हवी.
शर्मा : (घाम पुसत, शहाजींकडे बघणं टाळत) रकमाही सांगता येत नाहीत सर.
मोदीजी : मग आता काय करायचं? पंधराशे अब्ज डॉलर्स आणायचे तरी कुठून? (शर्माजी वर्मांकडे बघतात)
वर्मा : सर तुमचे काही मित्र असतील... आणि त्यांच्याकडे काही वरकड पैसे असतील... तर...
मोदीजी : (डोळे रोखून बघतात. शर्मा आणि वर्मा दोघेही थरथरतात. कावळ्यांच्या टोच्या, चिमटे, आणि थरथर) मूरखों... माझ्या सगळ्या मित्रांना विकलं तरी शंभर अब्ज डॉलर निघणार नाहीत. पंधराशे कुठून आणू?
शर्मा : सर, वर्माजींकडे एक आयडिया आहे.
वर्माजी आपल्या पाठीमागे लपवलेलं एक पोतं पुढे करतात. आणि पंतप्रधानांच्या टेबलावर ओततात.
मोदीजी : हे काळे कागद कसले आहेत?
वर्मा : कागद नाही सर, त्या नोटा आहेत.
मोदीजी : काळ्या नोटा?
वर्मा : हो सर. काळा पैसा!!
मोदीजी : (त्यातली एक नोट उचलून, उलटीपालटी करत बघत. विचारमग्न) हम्म्म... काळे आहेत खरे.
वर्मा : तेच तर सर. दीड लाख रुपये आहेत. शंभर शंभरच्या पंधराशे नोटा.
मोदीजी : हे कुठून मिळाले तुम्हाला?
वर्मा : सर, आमच्या दोघांचे पर्सनल पैसे आहेत. आम्ही एक रंगाचा डबा घेतला आणि नोटा रंगवून काढल्या.
शर्मा : (रंगाचा डबा बाहेर काढून दाखवत)'रंग गेला तर पैसा परत!' (स्वतःच्या जोकवर माफक हसण्याचा प्रयत्न करतात. पण अमित शहांच्या करड्या नजरेकडे पाहून आवरतात. दाबलेलं हसू, थरथर, चिमटे आणि पोटातले कावळे यांची तयार झालेली एक मस्त काकोफोनी एंजॉय कशी करावी याचा विचार करतात.)
मोदीजी : (चेहरा निर्विकार ठेवत) तुम्ही छान प्रोअॅक्टिव्हिटी दाखवली आहे. (शर्माजींच्या पोटात मात्र क्रोअॅक्टिव्हिटी चालू) त्याबद्दल तुम्हाला दोन लाख मिळतील याची व्यवस्था होईल. आता तुम्ही जाऊ शकता. (ते जातात)
मोदीजी : अमितभाय, घणी सरस आयडिया छे.
अमित शहाजी : पण केटलो सारो पैसो लागसे... (आता यापुढचं सगळं गुजराती मी मराठीतच लिहितो, कारण मारी गुजराती शब्दसंपदा पती गई.)
मोदीजी : अरे बाबा, यांनी शंभर रुपयाच्या नोटा वापरल्या, पण आपण त्या हजाराच्या नोटा आहेत म्हणून सांगायच्या. तेही हजार डॉलरच्या.
अमित शहाजी : पण हजार डॉलरच्या नोटा असतात का?
मोदीजी : असल्या नसल्याने फरक काय पडतो? ओबामाने नाकारलं तर बघूनच घेईन त्याला. व्हिसा नाही झक मारत दिला?
अमित शहाजी : म्हणजे हे पंधरा लाख डॉलर. अशा किती बॅगा लागतील?
मोदीजी : हजार देऊ.
अमित शहाजी : पण त्याचे एकशे पन्नास कोटीच होतील. पंधराशे अब्ज म्हणजे ... त्यावर आणखीन तीनचार शून्यं.
मोदीजी : या पत्रकारांना कोटी, अब्ज, मिलियन, रुपये, डॉलर वगैरेंचा काही फरक कळत नाही. आणि आपले बातमीदार तीनचार शून्यं देतातच. आता कैलाशनाथला अपघात झाला होता तेव्हा नव्हते का एकदम पंधरा हजार का पंधरा लाख गुजरात्यांना आपण तिथे वाचवलं होतं? तसंच. बोलवून टाका पत्रकार परिषद आणि ओता त्यांच्यासमोर पोती.
----
शर्मा : चला, आपले दीड लाखाचे दोन लाख झाले!
वर्मा : दीड लाख? अरे येडा का खुळा तू! ते पैसे नव्हते.
शर्मा : मग?
वर्मा : अरे, मागच्या वेळी स्वच्छता अभियान झालं होतं नाही का! त्यावेळी काढण्यासाठी म्हणून ऑफिसमधल्या फाइल्समधले जुने कागद, व्यवस्थित कापून टाकलेले होते. खुद्द पंतप्रधानांनी झाडलेले कागद होते ते! लावून टाकला त्यांना काळा रंग. आता कोणाला कळतंय त्या कागदांवर काय लिहिलं होतं ते! पंतप्रधानांसाठी योग्य त्या फायली साफ, स्वच्छता अभियानात फोटो, आपल्यासाठी दोन लाख, आणि देशाचा काळ्या पैशांचा प्रश्न पण सुटला! एका दगडात चार पक्षी. दे टाळी

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

Smile

ROFL

===
Amazing Amy (◣_◢)

हा हा हा!
द्दे टाळी!

मोठा पंच छान जमलाय, लहान चिमटे अजून हवे होते मात्र.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी अस्सेच म्हणते.

Smile

सळसळ पानांची होती बागेत पिंपळाच्या
असे भेटलो आम्ही छायेत पिंपळाच्या
सनसननन् सांय सांय हो रही थी बाग मे
हम दोनो अैसे मिले पिप्पल की छांव मे.