नवे संस्थळः पाहावे मनाचे!
मराठीत अनेक प्रकारच्या लेखनाला वाहिलेली काही संस्थळे अस्तित्वात आहेत. त्यावर उत्तमोत्तम ललित लेखन, माहितीपूर्ण लेखन, चर्चा, पाककृती, कथा, कविता इत्यादी अनेक गोष्टींची रेलचेल असते. मात्र एखाद्या विशिष्ट चौकटीत किंवा विषयाला धरून लिहिले जाणारे लेखन, ब्लॉग्जच्या स्वरूपात विखुरलेले आहे.
याच दरम्यान, गेल्या महिन्यात आम्ही काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन आमच्या आवडत्या विषयाला वाहिलेले संस्थळ काढायचे ठरवले - आणि लगोलग बनवले देखील. आम्हाला घोषित करायला अत्यंत आनंद होतोय की दृकश्राव्य कलाकृतींसंबंधित लेखनाला वाहिलेले "पाहावे मनाचे" हे संस्थळ चालू करत आहोत. या संस्थळावर आता कोणत्याही भाषेतल्या चित्रपटांशी, टीव्ही मालिकांशी व नाटकांशी संबंधीत, मराठीतून लिहिलेले लेखन - मुख्यतः परीक्षणे - प्रसिद्ध होतील. या नव्या जमान्यात मराठी प्रेक्षकाची दृकश्राव्य मनोरंजनाची भूक, इतर कोणत्याही प्रेक्षकाइतकीच, विस्तारलेली आहे. नुकताच झालेल्या 'पिफ' (पुणे फिल्म फेस्टिवल) असो किंवा मग नवा वा जुना चित्रपट असो किंवा बॉलीवूड, हॉलिवूड, टॉलिवूड असो, किंवा मराठी चित्रपट असो किंवा अन्य भाषिक जागतिक चित्रपट असो, त्यांच्या विषयी तसेच प्रसंगी नाटक, टीव्ही मालिका यांच्याविषयी मराठीतून केलेले लेखन वाचकांना नक्की आवडेल याची खात्री आम्हाला आहे.
विविध माध्यमांतून असे लेखन बरेच वाचायला मिळते हे खरे असले, तरी ते फक्त व्यावसायिक व प्रसिद्ध चित्रपटांचे असते. कधी अश्या लेखनाचा दर्जा आणि मत हे अनेकदा "मिडिया पार्टनर"च्या चष्म्यातूनही बदललेले आहे का? अशीही शंका येऊ लागते. शिवाय चित्रपट परीक्षण हे निव्वळ कथेच्या परीक्षणांपेक्षा बाहेर जाऊन तांत्रिक अंगांसकट पूर्ण चित्रपटाचे परीक्षण असावे अशीही इच्छा असते. यातूनच मनातून थेट उतरलेले आणि चांदण्यांच्या औपचारिकतेपेक्षा दिलखुलास व प्रांजळ मत मांडणारे हे संस्थळ काढत आहोत. या संस्थळावर सध्या लेखक मोजके व निवडक असले, तरी भविष्यात पाहुणे बोलावून अधिकाधिक चित्रपट व नाटकांचा परिचय मराठी प्रेक्षक-वाचकांना करून देण्याचा मानस आम्ही बाळगून आहोत. वेगवेगळ्या लेखकांनी, वेगवेगळ्या शैलीत नि वेगवेगळ्या घाटांमध्ये लिहिलेली परीक्षणं, सर्च व्यवस्था आणि शक्य त्या त्या प्रकारे सिनेमाबद्दल लिहिण्याची खुजली - असा सगळा मासला असेल. वाचकांना त्यांचा काही सोशल नेटवर्किंगचा आयडी वापरून प्रतिक्रिया द्यायची सोय देखील आहेच.
तर या नव्या संस्थळावर तुमचे स्वागत करण्यासाठी, तुम्हाला हार्दिक आमंत्रण देण्यासाठी हा धागा काढत आहोत. त्याच बरोबर जर तुम्ही एखादा चित्रपट व/वा नाटक पाहिलेत व त्याचे दीर्घ परीक्षण (किमान २०० शब्द) लिहायचे असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. आमचा पत्ता आहे pahawemanache@gmail.com.
एखाद्या जुन्या परंतू तुमच्या आवडत्या/नावडत्या चित्रपट/नाटकांविषयी लेखन देखील तुम्ही इथे पाठवू शकता.
तोवर या आमच्या नव्या प्रयोगाला सर्वाधिक गरज तुमच्या शुभेच्छांची आणि प्रतिसादांची आहे. त्याच बरोबर या संस्थळाच्या फेसबुक / ट्विटर पानाला तुमच्याशी लाईक करून जोडल्यास इथे प्रसिद्ध झालेल्या लेखनाची सुचनाही तुमच्यापर्यंत पोचेलच. आशा आहे हा नवा अ-व्यावसायिक प्रयोग तुम्हाला आवडेल व दर आठवड्याला नवनवीन लेखनासाठी "पाहावे मनाचे" हा तुमच्या चित्र-जगताशी जोडणारा दुवा ठरेल!
मते सर्वथा माध्यमांच्या भरोसे
चोखंदळा कौतुक क्रिटीकाचे
फसवता न येई रे ऐशा रसिका
ऐकूनी जनांचे ठरवितो मनाचे
तया पाहू वाटे सिनेमा झकास
पहाया न मिळता वाटे भकास
सकाळचा शो? बहु द्रव्य वाचे!
तेही न जमता, टोरेण्टच खास
नसे वावडे रे तयाला कशाचे
मनी पाडिले ना कसलेही साचे
शाहरुख अपुला तसा ब्रॅड पिटही
तयाच्या मनी प्रेम ते अस्सलाचे
फिल्मी चक्चकाटास भुलणार नाही
रिव्ह्यूची तयाला तमा फार नाही
अश्या रसिकाचे असे घोषवाक्य
ऐकूनि जनांचे पाहावे मनाचे!
पुनश्च स्वागत!
बातमीचा प्रकार निवडा
अजून काही-
https://moifightclub.wordpress.com/
हा माझा एक आवडता ब्लॉग आहे. ह्यात सर्व प्रकारच्या चित्रपटांबद्दल लिहिलेलं आढळतं. "परिक्षण" हा त्यातला निव्वळ एक प्रकार. इथे परिक्षणाबरोबरच आवडलेल्या चित्रपटांबद्दल झायराती, विवेचन, काही दिग्दर्शकांच्या मुलाखती, स्क्रिप्ट्स आणि सर्वात मुख्य- अतिशय परखड मतं. बरेचदा त्यात अनुराग कश्यप आणि गँगची बाजू घेतलेली असते, पण "लूटेरा"मध्ये केलेल्या संगीतचौर्याबद्दल त्यांचीही चड्डी काढली होती.
शिवाय गंभीरतेचा कुठलाही आव न आणता गॉसिपमधून निव्वळ टिंगलटवाळीही केलेली आहे.
(मराठी चित्रपटांविषयी असलेलं ममत्त्व हे अजून एक खास कारण! विहीर आणि फँड्रीची ह्या लोकांनी प्रचंड वाहवा केली होती)
सांगण्याचा मुद्दा असा- की असे काही प्रयोग "पहावे मनाचे" मधून पहायला आवडतील.
कात्रेजी, आक्ष्व्पार्ह म्हणजे
कात्रेजी,
आक्ष्व्पार्ह म्हणजे आक्षेपार्ह असे आपणास म्हणावयाचे आहे असे गृहित धरतो.
(अन्यत्र लिहिल्या प्रमाणे,) ते परिक्षण सिनेमाचे, त्याच्या पैसे कमाऊ डायरेक्टरचे व त्यातील नटांचे आहे. लोकमान्यांचे नाही, हे ध्यानी घेणार काय आपण?
गल्लाभरू सिनेमे काढून अशा विनोदी पध्दतीने लोकमान्यांना पेश करणे आक्षेपार्ह आहे, असे आपणास म्हणायचे असेल, तर मीही सहमत आहे.
"लोकमान्य" चित्रपटाचे परीक्षण
लोकमान्य हा सिनेमा पाहिला नाही पण या निमित्ताने २२ जून १८९७ ची आठवण आली. २२ जून यूट्यूबवर पाहिला. १९७९ साली बनलेल्या चित्रपटातली तांत्रिक अंगं आताच्या काळाच्या मानाने तोकडी आहेत परंतु प्रस्तुत लेखामधे जे कलादिग्दर्शन म्हणून प्रकरण आलेलं आहे त्याच्याशी इमान राखलं गेलेलं आहे असं मला माझ्या माफक समजुतीप्रमाणे वाटलं.
लोकमान्य या सिनेमाची चेष्टा उडवण्याचा हा लेख आहे हे स्पष्ट दिसतंय. त्यातला विनोद मला विशेष पचनी पडला नाही. व्यंगात्म लिखाणामधे असलेल्या सूक्ष्म प्रमाणाला तिलांजली देऊन आक्रस्ताळेपणा असलेला विनोद लेखात आला अशी माझी भावना आहे. थोडक्यात ज्या कलाकृतीची चेष्टा उडवायची आहे त्या चेष्टा उडवण्याच्या कृतीमधेही मूळ कलाकृतीत असलेला भडकपणाचा दोष आला असं वाटलं. आता हे सर्व वाटण्यात माझी विनोदबुद्धी तोकडी आहे हे झालंच.
पण एकंदर प्रस्तुत लेखामधला विनोद जमला आहे किंवा नाही हा मुद्दा गौण आहे. लोकमान्य हा सिनेमा चेष्टा उडवण्यासारखा होतो आणि २२ जून सारखा तांत्रिक बाबतीत आजच्यापेक्षा ३६ वर्षं मागचा सिनेमा खोलवरचा परिणाम साधतो या मधे काही विसंगती आहे काय , असल्यास ती काय आहे , धंद्याचं गणित साधण्याची कंपल्शन्स आणि दुसरीकडे ऐतिहासिक/सामाजिक सत्याच्या जवळ पोचण्याची, चित्रपटकलेतलं श्रेयस/प्रेयस गोष्टीच्या भानाशी इमान राखण्याची क्षमता या दोन गोष्टी इतक्या व्यस्त प्रमाणातच का असल्या पाहिजेत या आणि अशा प्रश्नांचा धांडोळा प्रस्तुत वेबसाईट वरून घेतला गेला तर बरं अशा माझ्या अपेक्षा आहेत. अर्थातच अशा अपेक्षा बाळगणं हेदेखील काहीतरी मुळापासून हुकलेलंच आहे ही देखील एक मोठीच शक्यता आहे आणि ती मी नाकारीत नाही.
वेबसाईट आवडली. शुभेच्छा.
मुसंशी सहमत
मुसुंशी बहुतेक मुद्द्यांबाबत सहमत.
थोडा आणखी विस्तार करतो. संस्थळाचे एकुण रुपडे पाहता वेगळ्या संस्थळाचा हेतू मराठीतून चित्रपट समीक्षेचा अगदी आयमडीबी इतका व्यापक नाही तरी बर्यापैकी चांगला डेटाबेस होऊ शकेल असा हेतू दिसला नि जरा आनंदलो. पण लेखकांची नावे वाचली नि उत्साह मावळला. हा लेख वाचून तर तो रसातळाला गेला असे म्हणावे लागेल.
इथे मला प्रथम स्पष्ट करायला हवे की लोकमान्य चित्रपट मी पाहिलेला नाही तेव्हा तो मला आवडला नि या कुण्या लेखिकेने त्याची टवाळी केली म्हणून मी हे लिहितो आहे असे नाही. मुद्दा आहे तो स्वतंत्र संस्थळाचा हेतू नक्की काय. असे खिल्ली उडवणारे, थिल्लरपणा करणारे (भले मूळ चित्रपट थिल्लर असो) रिव्यू लिहिणार असू तर ते तर इथेही लिहिता येतात नि थोडी गंमत करता येते. स्वतंत्र संस्थळावरची समीक्षा चित्रपट फालतू असला तरी गंभीरपणेच लिहायला हवी. याचा अर्थ हलका फुलका सूर लावू नये असाही नाही. पण निव्वळ टिंगलटवाळी करणारी नसावी अशी निदान माझी अपेक्षा होती.
आता लेखकाच्या नावांबद्दल. माझ्या मते (जे सहमत नाहीत त्यांच्या मताचा आदर आहे हे आधीच स्पष्ट करतो) इतरांच्या लेखनाची, कलेची, सादरीकरणाची जेव्हा आपण समीक्षा करतो तेव्हा ती मूळ नावानेच सादर करायला हवी. ज्याच्यावर आपण - कदाचित - टीका करतो आहोत त्याला ती टीका करणारा कोण हे समजायला हवे. (याच मुद्द्यावर काही काळापूर्वी टोपणनावाने वृत्तपत्रात लिहून ब्लॉगर्सची टवाळी करणार्या एका महाभागावरून मी वाद घातला होता.) आपण जर त्या कलाकृतीबाबत आपले मत मांडतो आहोत तर त्याची जबाबदारी घेण्याची, त्यावरील टीका वा प्रतिवाद सहन करण्याची आपली तयारी असायला हवी. टोपणनावाच्या बुरख्याआड लपून चार लोकांत ठामपणे उभे राहून मोडकेतोडके का होईना काही सादर करणार्यांची टवाळी करणे हा अगोचरपणा आहे असे मी मानतो.
तरीही मराठी संस्थळांसारख्या जेनेरिक फोरमवर तरीही ठीक आहे, कारण तेथील लेखन हे अजूनतरी अनभ्यस्तांचे मानले जाते, त्याला साहित्य म्हणून मूल्य नाही, ते गंभीरपणे घेतले जात नाही. (म्हणूनच तर काही नियमित चांगले लिहिणारे एकतर स्वतंत्र विषयाला लिहिलेला ब्लॉग लिहितात वा ते मुद्रित माध्यमातून प्रकाशित करून घेण्याचा प्रयत्न करतात. ) परंतु अशा विशिष्ट विषयाला वाहिलेल्या संस्थळावर असे लेखन त्या सार्या संस्थळाचे गांभीर्य हरवून टाकतो, त्या संस्थळाला भेट देणार्या पाहुण्यांचे संस्थळाबद्दलचे मत अपेक्षेहून वेगळेच करून जातो. शेवटी मग ती ही इतर मराठी संस्थळांप्रमाणे एक साईट होऊन बसते. संस्थळ चालक/मालकांनी आपल्या हेतूशी हे कितपत सुसंगत होते आहे हे तपासून पहायला हवे असे वाटते.
शेवटी पुन्हा एकदा हे स्पष्ट करतो की हे माझे मत आहे. इतरांचे वेगळे असेल याची जाणीव आहेच. तेव्हा चर्चेत पडण्याची फारशी इच्छा नाही हे आधीच नोंदवून ठेवतो.
टोपणनावाबद्दल
प्रकाशित केलेल्या लेखांवर प्रतिक्रिया देण्याची सोय आहे, लेखनकर्त्यांचे इमेल्स दिलेले आहेत. मराठी आंजावर टोपणनावांनी लिहिलं तरीही काही काळात लेखनातून व्यक्ती कोण हे समजतं; त्यामुळे असे आक्षेप मला अर्धपक्के वाटतात.
मराठीतला आयएमडीबी डेटाबेस ही कल्पना रोमँटिक आहे; पण 'पाहावे मनाचे'च्या प्रवर्तकांच्या कल्पना वेगळ्या असाव्यात असं दिसतंय.
टिंगल पटली नाही हे मतही व्यक्तिगत मत म्हणून मान्य आहे, पण पटलं नाही. ज्या शैलीचा वापर करून काही गोष्ट गांभीर्याने करण्याचा प्रयत्न करतात पण ते फसतं त्याच शैलीत टिंगल करणं यात एक निराळा विनोद आहे. हेही व्यक्तिगत मतच. पटावं असा आग्रह नाही.
. टोपणनावाच्या बुरख्याआड लपून
. टोपणनावाच्या बुरख्याआड लपून चार लोकांत ठामपणे उभे राहून मोडकेतोडके का होईना काही सादर करणार्यांची टवाळी करणे हा अगोचरपणा आहे असे मी मानतो.
हे वाचल्यानंतर घाईघाईने प्रतिसादाच्या खाली रमताराम यांची खर्या नावातली सही दिसेल म्हणून पाहिलं. निराशा झाली..
आभार!
सर्व ऐसीकरांच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार.
लवकर अधिक चित्रपटांची परिक्षणे येत रहातील. विविध प्रकारची, शैलीतील, लेखकांची नानातर्हेची नी हरतर्हेची परिक्षणे, चित्रपट/नाट्य/टिव्ही मालिका यांसबंधित प्रांजळ व थेट मनातून आलेले लेखन वाचकांना मराठीतून वाचायला मिळावे या भुमिकेतुन आमचे प्रयत्न चालु रहातीलच.
या निमित्ताने हे ही सांगणे अगत्याचे आहे की ऐसीअक्षरे (व मिसळपाव) या संस्थळांवरील "पाहावे मनाचे" हा आयडी केवळ या संस्थळासंबंधीत लेखनासाठी घेतलेला आयडी आहे. आम्हाला तसा आयडी घेऊ दिल्याबद्दल व या धाग्याद्वारे नव्या मराठी संस्थळाची घोषणा येथे ठेवल्याबद्दल ऐसीअक्षरेच्या मालक व संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार!
सर्व ऐसीकरांचा असाच लोभ असावा, किमान क्षोभ नसावा :) ही विनंती!
प्रोत्साहन, सुचना व शुभेच्छांबद्दल पुनश्च आभार!
रामदास
ताजे चित्रपट, काही क्लासिक्स, प्रायोगिक नाटके ते AIB रोस्टिंगसारखे व्हिडीयोज इत्यादी दृक-श्राव्य कलांशी निगडीत आणि वेगवेगळ्या जातकुळीचे, शैलीतील लेखन 'पाहावे मनाचे'वर आजवर देण्याचा प्रयत्न राहिला आहे.
आता मराठी आंतरजालावरील अनेकांचे आवडते लेखक 'रामदास' यांचे लेखन आता पाहावे मनाचे वर प्रकाशित करण्यास सुरूवात करत आहोत. (रामदास यांचा लेख). रामदास एक ऐसीकरही आहेत म्हणून ही माहिती इथेही देत आहोत.
आशा आहे की वाचकांचा स्नेह असाच वाढत राहिल.
'पाहावे मनाचे'वर नवी प्रतिसाद प्रणाली
येणार्या परीक्षणांवर, लेखनावर वाचकांना सहज प्रतिसाद देता यावा म्हणून 'पाहावे मनाचे'वर नवी प्रतिसाद-प्रणाली सुरू केली आहे.
याआधी केवळ फेसबुक व गूगलद्वारे लॉग-इन करून प्रतिसाद देता येत होते. आता फेसबुक/गूगलवर लॉग-इन न करताही केवळ नाव व ईमेल अॅड्रेस देऊन प्रतिसाद देता येतील.
आशा आहे ही सुविधा वाचकांच्या पसंतीस उतरेल व वाचक त्यांचे लेखावरील अधिकाधिक अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवतील.
सबस्क्राईब टु नोटिफिकेशन्स
आता 'पाहावे मनाचे'वर नवा लेख आलेला समजण्यासाठी केवळ सोशल मिडीयावर अवलंबून रहाण्याची गरज नाही. नवा लेख आला की थेट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप/डेस्कटॉपवर नोटिफिकेशन द्वारे समजु शकेल.
त्यासाठी फक्त तुम्हाला 'पाहावे मनाचे' वर जायचे आहे, कोणताही रिव्ह्यू उघडायचा आणि उजवीकडे 'सबस्क्राईब टु नोटिफिकेशन्स' नावाचा (लाल गोलातील बेल) आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचे.
छान वाटतय रुपडं संस्थळाचं.
छान वाटतय रुपडं संस्थळाचं. अभिनंदन! लोकमान्यचा लेख वाचला. छान लिहिलाय...