Diwali to Diwali via Halloween

या दिवाळीलासुद्धा तो घरी यावा अशी त्यांची अपेक्षा नव्हतीच मुळी. त्याला तिकडे पाठवलं तेव्हा ज्या बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात त्यातलीच ही एक तडजोड होती. त्याच्या आयुष्यातले पुढचे अनेक दिवाळसण सुखात जावे म्हणून आपल्या आयुष्यातले काही दिवाळसण त्याच्याशिवाय साजरे करण्याला त्यांची हरकत नव्हतीच. शिवाय आता इतकं काही अंतर जाणवत नाही. स्काइप, whatsapp , facebook सगळं बुडाशी असतं. पूर्वी रोज गप्पा व्हायच्या आता पंधरा दिवसांनी होतात. त्याला तिकडे जाउन आत्ताशी कुठे तीन वर्षं झालीयेत. स्थिरस्थावर झाला की आपणच जायचं तिकडे. पहिल्या फेरीत अमेरिका बघून घ्यायची. मग तोच इकडे येईल तेव्हा लग्न उरकून घ्यायचं. नंतर सुनेच्या डिलीवरी ला पुन्हा काही महिने जायचं. नंतर मग दर दोन वर्षांनी इकडून तिकडे , तिकडून इकडे करत रहायचं. भविष्याचं इतकं चोख प्लानिंग त्या अमेरिकन्सना सुद्धा जमणार नाही. लोक म्हणतात एकटेपणा येतो. कशाला येईल? आपणही स्वतःला कशात तरी गुंतवून घ्यायला हवं. मुलं जवळच हवीत हा हट्ट कशाला. भले दिवाळीत जमणार नाही पण जेव्हा भेटू तेव्हा दिवाळसण करू. "चिरंजीव येती घरा तोचि दिवाळी दसरा". स्वताशीच हसता हसता अचानक भरून का आलं ते मात्र त्यांना कळलं नाही.

चला नेहमीची वेळ झाली. त्याने laptop उघडून skype सुरु केलं. आज दिवाळी म्हणजे अख्खं 'गृहदर्शन' घडणार. दारातल्या रांगोळीपासून ते गॅलरीतल्या कंदिलापर्यंत. मग आपणही इकडच्या गंमती जमती सांगायच्या. गेले तीन वर्ष दिवाळी अशीच साजरी होते.M S झालं आता Ph D करायला घेतलीये म्हणजे सवय करून घ्यावीच लागणार. सणासुदीच्या दिवसात घरी जावसं वाटलंच तरी तिकिटांच्या किंमती आणि 'Advisor' या दोन गोष्टी पाय खेचून धरतात. 'FedEx' च्या कृपेने फराळ वेळेत पोहोचतो. सोबत सगळे भारतीयच मग पणत्यांची आरास, कंदील, सजावट इतकंच काय दिवाळी पहाटचे कार्यक्रम सुद्धा होतात. सगळं निवांत मजेत असतं. तरीही काहीतरी 'missing ' वाटत राहतं. ते काही त्याला कळत नाही आणि तो समजून घेण्याच्या फंदात पडत नाही. चांगलं अर्धा तास तो मम्मी-पप्पांशी बोलतो त्यांचे आनंदी चेहरे त्याला नवीन उत्साह देउन जातात.

"This year we are celebrating halloween with granny" याला मेसेज आला. काय गंमत आहे ह्यांची 'सर्वपित्री' आणि आपली दिवाळी अशी पुढेमागे. तेवढंच अजून एक सेलिब्रेशन. विश्वाचे नागरिक असण्याचा फायदा.

ग्रॅनीचा उत्साह ओसंडून वाहत होता. शेवटचा भोपळा कोरून झाला. छोटीशी बाहुली त्याच्या बाजूला उभी राहिली. आता छोटीशी पार्टी आणि मग डिनर. अख्खा दिवस ग्रॅनीची धावपळ चाललेली. या सगळ्यांच्या बरोबरीने. ग्रॅनी म्हणजे याच्या मित्राची 'host mother '. साठीचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व. उत्साह, आस्था, प्रेम आणि आसोशी यांचं जिवंत उदाहरण.ग्रॅनीसोबत सगळ्यांनाच धमाल यायची. गोष्टी,किस्से आणि गप्पा. दोन मुलं नोकरी निमित्ताने बाहेर आणि मुलगी लग्न होऊन सासरी गेलेली. ग्रॅनी एकटी निवांत रहायची. आपल्या प्रेमळ स्वभावाने ती या सगळ्याच मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय झाली होती.

'' Yo ग्रॅनी, let's click a pic !!!" म्हणत त्याने छानशी पोझ दिली. ग्रॅनीच्या हसण्याने अख्खी फ्रेम भरून गेली. त्याने फोटो ग्रॅनीला दाखवला. ती खुश झाली. कुठल्याशा कृतार्थतेने तिने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली "such a sweet pic my boy". त्याने फोटो पुन्हा पहिला. तिचं हसणं फोटोभर पसरलेलं पण म्हणून पापणीआडचा इवलासा थेंब लपत नव्हता. त्याच्या मनात विचार आला, काय वाटत असेल ग्रॅनीला असं एकटं राहताना, मुलांसोबत निवांत गप्पा माराव्यात, नातवंडासोबत भोपळा 'carve' करावा असं तिलाही वाटत असणारच की आणि अचानक त्याला मम्मी-पप्पा आठवले. ऐन दिवाळीत उजळून गेलेलं पण तरीही रिकामं घर आठवलं. त्याने तडक घरी फोन लावला. पलीकडे मम्मी होती. "काय झालं रे, ही तर नेहमीची वेळ नाही तुझी, आज अचानक फोन?". याला काय बोलावं सुचेना. इतक्यात पप्पाने फोन घेतला हातात "काय रे काही प्रॉब्लेम?". हा अजूनही शांतच. पप्पा हसला आणि म्हणाला, " अरे आमची काळजी नको करूस. इतक्या आवेगाने फोन केला आहेस त्यातूनच कळतंय, दूरदेशी आहेस खरा पण अजून दूर नाही गेलायेस आमच्यापासून."

त्याला क्षणार्धात हायसं वाटलं. तो ग्रॅनीकडे गेला. तिला नमस्कार केला आणि म्हणाला "दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ."

- अभिषेक राऊत

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

खूपच सुंदर . आवडले. यावेळेस ललित फुलवुन, खुलवुन लिहील्याबद्दल तर खरच खूप कौतुक वाटले. कारण तुम्ही फक्त लेख पाडत नाही आहात तर अन्य लोकांनी सांगीतलेल्या कमेंटस incorporate करत आहात :).
जीवनाकडे पहाण्याची एक संवेदनशील दृष्टी आपल्याकडे आहे. ते बलस्थान लेखक म्हणून जरुर tap करत रहावेत. अन आम्हाला अधिकाधिक असे लेख वाचायला मिळावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिषेक राऊत