सागरी सुका मेवा (लेखासहीत)

डोक्यावर टोपली, हातात एक हिरवा पाला असलेली छोटीशी फांदी, पायात कधी चप्पल नाहीतर अनवाणी, कोळी पद्धतीचे काष्टी पातळ नेसलेली आणि कानात मोठ्या गाठ्या प्रमाणे म्हणा की मोठ्या कोलंबीप्रमाणे असलेले कानातले, त्याच्या वजनाने आपली करंगळी जाईल इतपत कानाच्या पाळीला पडलेले होलामुळे कानाच्या पाळीसकट लोंबणारे तिचे गाठी कानातले अशी रूप असलेली एक कोळीण आजी माझ्या आजीची मैत्रीण होती. महिना दोन महिन्याने तिची वारी आजीला भेटण्यासाठी आमच्या घरी असायचीच. उरणच्या करंजा गावातून ती आमच्या उरणच्या नागांव ह्या गावात जवळ जवळ दीड तास चालून यायची. आली की हॉलमध्ये टोपली उतरवायची मग आई चहा-पाणी वगैरे आणून द्यायची ते घेत आजी आणि ती गप्पा मारत बसायच्या. त्यांच्या गप्पा चालू असायच्या तेव्हा मात्र माझी नजर जायची ती त्या कोळीण आजीच्या टोपलीत. टोपलीत एक रास असायची व जवळ गेले की त्याला एक कुबटसा वास यायचा. त्या वासाच्या दिशेने टोपलीत डोकावले की दृष्टीस पडायचे ते सुके मासे, कधी जवळा, करंदी (अंबाड), वाकट्या कधी बोंबील, टेंगळी, बांगडे. ह्या टोपलीतील काही भाग ती आजीला चेहर्‍यावर प्रसन्न भाव आणून द्यायची. इथूनच मला सुक्या माश्यांची ओळख होऊ लागली.

ही आजीची मैत्रीण सुक्या माश्यांच्या बदल्यात काही मोबदला घ्यायची नाही. माझी आजी कधी कधी जबरदस्तीने तिला पैसे हातात द्यायची पण ती आजीच लक्ष नसताना हळूच पुन्हा आम्हाला दिलेल्या जवळ्याच्या राशीत ते पैसे लपवून ठेवायची. संध्याकाळी जेव्हा आई हा जवळा डब्यात भरायला जायची तेव्हा तिला ते पैसे जवळ्यात दिसायचे. मला मात्र हे पाहून खूप गंमत वाटायची. आपल्याला गोष्टीत ऐकल्या प्रमाणे धनलाभ झालाय किंवा खजिना सापडलाय असे वाटायचे. नंतर आजी तिला पैसे न देता मळ्यांतली वांगी, टोमॅटो वगैरे भाजी तिच्या टोपलीत देऊ लागली. पूर्वीचे मैत्रीचे व्यवहार बहुतेक अश्याच देवाण-घेवाणीवर चालायचे. अजूनही सुक्या माश्यांच्या भेटी आप्तांना देण्याची परंपरा काही प्रमाणात चालू आहे. माझ्या घरी पण सुके मासे भेट येतात. जास्त असले की आम्ही पण इतरांना भेट म्हणून देतो. स्नेहसंबंध वाढवण्यास ह्या सुक्या माश्यांचाही हातभार लागतो तर.

हे मासे कसे काय टिकून राहतात, कसे सुकवतात ह्या बद्दल नेहमीच कुतूहल वाटायचं. उरणमध्ये मोरा व करंजा येथे मोठ्या प्रमाणात मासेमारीचा धंदा होतो. करंजा गावात आजीचे नातलग राहत होते. आजीबरोबर त्यांना भेटायला जाताना करंजा जेट्टी वर व बर्‍याच कोळी बांधवांच्या दारासमोर सुके मासे वाळताना दिसायचे. तेव्हा ओल्या माश्यांना मीठ लावून ते खडखडीत वाळवले जातात हे समजू लागले. वाकट्या बोंबील तर पताका सजवल्याप्रमाणे दोरीवर एकाच आकारात व अंतरावर वाळवत असल्याने सुशोभित दिसायचे.

सुकत लावलेले बोंबील

सुकवलेले बोंबील

वाकट्या

सुक्या माशाचा कचरा म्हणजे टाकाऊ खराब झालेले मासे, त्यांचा कोंडा वगैरे झाडांसाठी खत म्हणून वापरता येतो. लहानपणी आमच्याकडे वडील खतासाठी म्हणून खास जुना झालेला जवळा किंवा टाकाऊ सुक्या माश्यांचे खत वाडीतील लागवडीसाठी मागवायचे.

सुक्या माशांमध्ये जास्त करून जवळा, करंदी (अंबाड), सोडे (सालं काढलेली कोलंबी), बोंबील, टेंगळी, बांगडे, घोळीच्या तुकड्या, वाकट्या, माकुल, पापलेट, कोलीमच्य पेंडी (वड्या) यांचा जास्त समावेश असतो. पूर्वी सोड्यांच्या पण साबुदाण्याच्या चिकवड्यांप्रमाणे वड्या मिळायच्या पण हल्ली त्या नामशेष झाल्यासारख्या वाटतात. सुटे सोडेच दिसून येतात.

बहुतेक सगळ्याच मांसाहारी लोकांच्या घरात किराणामालाच्या साठवणी प्रमाणेच सुक्या माश्यांची साठवण केलेली असते. त्यासाठी एक खास डबा केलेला असतो. ह्या डब्याला मुंग्या लागणार नाहीत अशी दक्षता घेऊन डबा ठेवावा लागतो. डब्यात भरण्यापूर्वी मासे उन्हात पुन्हा खडखडीत वाळवून ठेवले की अजून चांगले टिकतात. जवळ जवळ ४-५ महिने सुके मासे चांगल्या स्थितीत राहतात. बर्‍याचदा आणीबाणीच्या प्रसंगी म्हणजे जेव्हा भांग येते म्हणजे समुद्रात मासे कमी प्रमाणात मिळतात, मासे मारी पावसाच्या काही दिवसात बंद ठेवली जाते अशा वेळी सुके मासे उपयोगी ठरतात. तसेच बाजारात जाणे होत नाही, काहीतरी पटकन करण्यासाठी, सकाळच्या डब्यांसाठी सुक्या माश्यांचा जास्त वापर केला जातो.

बर्‍याच ठिकाणी म्हणजे जिथे समुद्र किनारे नाहीत, मासे मिळत नाहीत अशा ठिकाणच्या मांसाहारी व्यक्तींसाठीही सुके मासे हे एक चविष्ट वरदान आहे. कारण समुद्रकिनार्‍या लगतच्या भागातून मासे नेऊन ते त्यांच्याइथे साठवण करू शकतात व हवे तेव्हा त्याचे सुग्रास जेवण बनवू शकतात. भारता बाहेर जाणारे कित्येक मांसाहारी भारतवासी हे माहेरचा आहेर असल्याप्रमाणे सुके मासे पॅक करून नेतात. मांसाहारी कुटुंब लांबच्या प्रवासाला जातानाही सुक्या मच्छीची टिकाऊ चटणी वगैरे सोबत घेऊन जातात.

सुक्या माशाच्या काही जुन्या आठवणी आजही जिभेवर रुची आणतात. लहानपणी बहुतेक मला व भावाला रोजचा नाश्ता हा चुलीत भाजलेले मासे आणि भाकरी असायचा. आजी सकाळीच गरमागरम भाकर्‍या चुलीवर करायची आणि त्याच चुलीच्या निखार्‍यावर वाकटी, बोंबील, कोलीमच्या पेंडी भाजत ठेवायची. भाजताना त्यांचा खरपूस वास यायचा त्यामुळे कधी एकदा तोंडात टाकतेय असे व्हायचे. भाजून झाले की चुलीतून बाहेर काढून त्यातली राख काढण्यासाठी ते थोडे वरच्या वर ठोकायचे म्हणजे त्यातली राख निघून जायची. ह्या बोंबील किंवा वाकटीचा तुकडा कटकन तोडून गरमा गरम भाकरी बरोबर खाण्यातला आनंद काही औरच. त्यात सुका बांगडा हा प्रकार असा असायचा की तो कोणाच्या घरी भाजला आहे हे कळावे अशा प्रकारे वास यायचा. गावात जवळपास कुठे भाजला असेल तरी तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहायचे नाही व कधी एकदा आपल्या कडे तो बांगडा आई-आजी कडे भाजून मागतेय असे व्हायचे. बांगडा हा इतका खारवलेला असतो की त्याचा एक इंचाएवढा तुकडा पण आख्ख्या भाकरीला पुरतो. चिमूटभर भाजलेल्या बांगड्याचा तुकडा भाकरीला लावून खाताना सुखावून जायला होत.

त्या काळी सुके मासे इतके स्वच्छ असायचे की जवळा वगैरे न धुवता डायरेक्ट आई-आजी भाकरी केलेल्या तव्यात टाकून खरपूस भाजून द्यायचा. हा जवळा भाकरी बरोबर नुसता खाताना कुरकुरीत व चविष्ट लागायचा.

भातुकली खेळतानाही आम्ही सुक्या माश्यांचा वापर करायचो. त्यात जास्त जवळा किंवा करंदीचे कालवण असायचे. करण्याचा सराव नसल्याने बरेचदा हे कालवण जास्त पाण्यामुळे पचपचीत व्हायचे. पण चुलीवर स्वकष्टाने केलेल्या त्या कालवणाला गरमा गरम भाता बरोबर खाताना वेगळीच गोडी यायची.

सुकी करंदी/अंबाड

लग्नसमारंभात हळदीच्या दिवशी जवळा हा प्रकार पारंपारीक रित्या केला जातो. लग्नाच्या दिवसाच्या १५ दिवस आधी जवळा आणून साफ करून ठेवला जातो. हळदीच्या दिवशी जवळा करण्यासाठी मोठं पातेलं चुलीवर चढवलं जात. जवळ्या मध्ये वांग घातलं जात. ह्या जवळा वांग्याची चव मटणाच्या चवीलाही शह देणारी ठरते. काही ठिकाणी रुखवतीतही सुक्या माश्याच्या छोट्या टोपल्या पॅक करून दिलेल्याही मी पाहिल्या आहेत.

सुका जवळा

कोंकण किनार्‍या लगतच्या गावांमध्ये सुक्या माशांचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केला जातो. ओले मासे सुकवून ते वजनावर दिले जाते. जसजसे मासे जास्त सुकत जातात तसे त्यांचे वजनही कमी होत जाते. त्याचा परिणाम निश्चितच व्यवसायातील नफा-तोट्यावर पडत असतो.आजकाल लागणार्‍या बर्‍याच प्रदर्शना मध्ये खास करून कोंकण मोहोत्सव, आगरी-कोळी मोहोत्सवात सुक्या माशांचे स्टॉल्स लावलेले असतात. लघुउद्योग म्हणून काही ठिकाणी सुक्या माशांच्या पदार्थांच्या टपर्‍याही पोळी-भाजी केंद्रा प्रमाणे चालू झाल्या आहेत.

तर असा आहे सुक्या माश्यांचा महिमा. दिसायला अगदी क्षुल्लक पण अडीअडचणीत साथ देणारा, स्नेह जुळवणारा, रोजगाराचे साधन असणारा, रुचीरसाचा आनंद देणारा.

आता आपण सुक्या माशांच्या काही रेसिपीज पाहू. सुक्या माश्यांचे प्रकार करण्याची पद्धत साधारण सारखीच असते. कालवणाची चव प्रत्येक माश्यानुसार वेगवेगळी असते. सुक्या माश्यांत मीठ घालताना नेहमीपेक्षा कमीच घालावे कारण खारवलेले असल्याने ते आधीच खारट असतात.

बोंबील, वाखटी, करंदी, अंबाड, सोडे, घोळीच्या तुकड्या, माकुल, पापलेट अश्या माशांसाठी रेसिपी खालील प्रमाणे.

साहित्य
१) सुके मासे
२) दोन मध्यम कांदे बारीक चिरून
३) ५-६ पाकळ्या लसूण ठेचून.
४) पाव चमचा हिंग
५) अर्धा चमचा हळद
६) दीड ते दोन चमचे रोजच्या वापरातला मसाला किंवा आवडीनुसार लाल तिखट
७) मोठ्या लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
८) २ चमचे तांदळाचे पीठ
९) मीठ
१०) थोडी चिरलेली कोथिंबीर
११) १-२ हिरव्या मिरच्या.
१२) दोन छोट्या पळ्या तेल

पाककृती :
बोंबील, वाकट्या असतील तर त्यांचे डोके, शेपटी काढून बोटा एवढे किंवा आवडीनुसार तुकडे करून घ्या. करंदी (अंबाड असेल तर त्याचा डोक्या कडचा टोकेरी भाग व शेपूट काढा. घोळीच्या तुकड्यांना खवले असतील तर ती काढून टाका.
जो प्रकार करायचा आहे त्या साफ केलेले मासे मासे दोन-तीन पाण्यांतून धुऊन घ्या. जर माखल्या असतील तर त्या १५ मिनिटे गरम पाण्यात ठेवून त्याला लागलेले काळे वगैरे काढून टाका आणि साफ केलेले माखल्यांचे तुकडे धुऊन घ्या.

आता पातेल्यात तेलावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा. कांदा शिजला की त्यात हिंग, हळद, मसाला घाला. थोडे परतून गरजे एवढे पाणी घाला. आता जो हवा तो सुक्या माशाचा प्रकार घाला. एक उकळी आली की त्यात चिंचेचा कोळ घाला. तांदळाचे पीठ थोड्या पाण्यात मिक्स करून पातळ करून रश्शात सोडा. तांदळाचे पीठ दाटपणा येण्यासाठी घालतात. थोड्या प्रमाणात कालवण करायचे असेल तर नाही घातले तरी चालते. गरजे नुसार मीठ घाला. थोडावेळ रस्सा उकळू द्या. वरून कोथिंबीर आणि हिरवी मिरची मोडून घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा.

सुक्या घोळीच्या तुकड्या

रस्सा

माकुल शिजायला मात्र वेळ लागतो. साधारण पाऊण ते १ तास. बाकी सुके मासे १०-१५ मिनिटांत शिजतात.
कोणत्याही सुक्या माश्याच्या कालवणात वांगं, बटाटा, शेवग्याची शेंग ह्या पैकी काही घातल्यास रश्शाला अजून चव येते व पुरवठ्यालाही होते. हे घालताना सुके मासे घालतो तेव्हाच घालायचे. कैर्‍यांच्या सीझन मध्ये कैरी घालता येते. मग चिंच नाही घातली तरी चालते किंवा कमी प्रमाणात घालायची.

गरमा गरम भात आणि सुक्या माशाचा रस्सा म्हणजे मस्त मेजवानी असते.

जवळा, करंदी (अंबाड), बोंबील, सोडे, टेंगळी सुकट अशा प्रकारच्या सुक्या माश्यांचे कांद्यावरचे सुके खालील प्रमाणे.

१) वरील पैकी हवे असलेल्या सुक्या माशाचा एखादा प्रकार
२) २ कांदे चिरून
३) २ ते ३ छोट्या पळ्या तेल
४) पाव चमचा हिंग
५) अर्धा चमचा हळद
६) १ ते २ चमचे मसाला
७) चवीपुरते मीठ (कमीच घालावे कारण सुका जवळा खारट असतो)
८) १ मिरची
९) थोडी कोथिंबीर चिरून
१०) कोकम ३-४ किंवा टोमॅटो १ किंवा थोडा चिंचेचा कोळ.

प्रथम सुक्या माशाचा प्रकार चांगला २ ते ३ पाण्यांतून धुऊन घ्यावा. भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत तळावा. मग त्यात हिंग, हळद, मसाला घालून सुक्या माशाचा प्रकार घालावा. थोडे पाणी घालावे किंवा वाफेवर शिजवला तरी चालतो. मध्ये मध्ये ढवळावे. १० मिनिटांनी ढवळून त्यात मीठ, मिरची, कोकम किंवा किंवा चिंचेचा कोळ किंवा टोमॅटो घालावे. परत थोडावेळ वाफ आणावी. आता त्यात कोथिंबीर घालावी व २ मिनिटे वाफ आणून गॅस बंद करावा.

ह्या प्रकारातही वांगे खास करून जवळा वांगे, बोंबील बटाटा असे कॉम्बिनेशन चांगले लागते. तसेच शेवग्याच्या शेंगाही चविष्ट लागतात.

सुक्या माशांची चटणी एकदा खाल्ली की दुसर्‍या वेळेस नाव काढल्यानेही तोंडाला पाणी सुटते. खास करून जवळा, करंदी (अंबाड) आणि बोंबील यांची चटणी केली जाते.

साहित्य
१) वरील पैकी एक सुक्या माशाचा प्रकार १ वाटी (बोंबील असल्यास तुकडे करून)
२) गरजे नुसार मिरची किंवा मिरची पूड
३) ७-८ पाकळ्या लसूण
४) थोडेसे मीठ

सुके मासे मध्यम आचेवर तव्यावर खरपूस भाजून घ्या.थंड झाले की वरील बाकीचे जिन्नस एकत्र मिस्करमध्ये वाटून घ्या.

वरील चटणी पुन्हा कांद्या वर परतून त्याचा एक चविष्ट प्रकार करता येतो. त्यात थोडा चिंचेचा कोळ आणि चिरलेली कोथिंबीर घालायची.

निखारे करता येण्यासारखे असतील तर निखार्‍यावर बांगडा, बोंबील, वाकटी असे प्रकार भाजून वासाने घरभर भूक चाळवता येते.

मालवणी पद्धतीनेही सुक्या माश्यांचे बरेच चविष्ट प्रकार करता येतात.

वरील लेख ऑगस्ट २०१४ च्या माहेर -अन्नपूर्णा अंकात प्रकाशीत झालेला आहे.

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

मस्त आहे लेख. या लेखाचं अप्रूप अशाकरता, की खाद्यसंस्कृतीवर लिहिल्या जाणार्‍या गोष्टींमध्ये सुकी मच्छी अगदीच दुर्लक्षित आहे. लिहिणार्‍या-वाचणार्‍या लोकांच्यात उच्चवर्णीयांचं प्रमाण जास्त असल्यामुळे असेल, किंवा सुकी मच्छी म्हटल्यावर तिच्या वासाच्या कल्पनेनंच ताबडतोब नाक मुरडण्याची फ्याशन आहे, त्यामुळेही असेल. पण या गोष्टींबद्दल कुठे वाचायला मिळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अहाहा.

>> खाद्यसंस्कृतीवर लिहिल्या जाणार्‍या गोष्टींमध्ये सुकी मच्छी अगदीच दुर्लक्षित आहे. लिहिणार्‍या-वाचणार्‍या लोकांच्यात उच्चवर्णीयांचं प्रमाण जास्त असल्यामुळे असेल, किंवा सुकी मच्छी म्हटल्यावर तिच्या वासाच्या कल्पनेनंच ताबडतोब नाक मुरडण्याची फ्याशन आहे, त्यामुळेही असेल. <<

सुके मासे ही (उग्र वासामुळे) अक्वायर्ड टेस्ट आहे. माझ्या ओळखीत कुणी 'मला मासे आवडतात' असं म्हटलं की 'कितने पानी में' ओळखण्यासाठी मी विचारतो - बांगडा आवडतो का? आणि सुके मासे आवडतात का? दोन्ही परीक्षा पास झाल्या तर तो खरा मासेखाऊ. बाकी 'मी फक्त पापलेट खातो' म्हणणारे पुष्कळ असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

होय, बांगडा आवडणारे फार कमी लोक असतात. म्हणजे शाकाहारी कुटुंबातले मच्छी खायला लागलेले आणि बांगडा आवडणारे हे कॉम्बिनेशन तसं दुर्मीळ.
अवांतरः बादवे, ठाण्यात वैभव नामक एका खोपटाचा शोध लागला आहे, जिथे बांगडाही मिळतो. लवकरच जाऊन पाहण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी दोन्ही टेस्ट खूप आधी ओलांडल्या आहेत. कधी बोलावताय? Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> मी दोन्ही टेस्ट खूप आधी ओलांडल्या आहेत. कधी बोलावताय? <<

माझ्या घरी खाण्यासाठी पुढची परीक्षा पास व्हावं लागेल - नुसतं मीठ, मिरपूड आणि लिंबू लावलेला बांगडा भाजून मिळेल. खाणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओपन एण्ट्रन्स होती हे मला नव्हतं ठाऊक. च्यायला... आता पुढची कधी असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला जर नुसते मीठ, मिरपूड नि लिंबू लावलेला बांगडा भाजून खायचाच असेल, तर त्याकरिता मी झक मारायला तुमच्या घरी कशाला येऊ? माझ्याच घरी भाजून खाणार नाही???

च्यामारी, त्या परीक्षा नि ती जजमेंटे सांगितलीयेत कोणी?

(सुशीवरचा कच्चा बांगडा आवडीने खाल्लेला आहे. तो मुद्दा नाही. हल्ली सुशी खाणे परवडत नाही म्हणून फारसे सुशी खाणे होत नाही, हा भाग वेगळा.)

अवांतर: अन्नपदार्थांपैकी मला जवळपास कशाचेही वावडे नाही; गोगलगोमांसापासून ते गोमांसापर्यंत बरेच काही आवडीने खाऊ शकतो, (जमेल तसे, परवडेल तसे) आवर्जून खातो. (हं, आता एक्स्पोझरप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारांत गम्य कमीअधिक असू शकेल. ते साहजिक आहे.)

मात्र, भारतीय पारंपरिक मांसाहार्‍यांकडून (आणि त्यातही विशेषतः मत्स्याहार्‍यांकडून) (१) खाल्ल्या अन्नाचे पैसे देण्याची आणि (२) वर (किमान १५ टक्के) टिप ठेवण्याची सुविधा असल्याखेरीज अन्नग्रहण (आणि त्यातही विशेषतः मांस/मत्स्यग्रहण) करू नये, अशा विचारांकडे (बर्‍याच सटलअनुभवांअंती) मी अलीकडे झुकू लागलो आहे.

त्यापेक्षा माझ्या एकारान्त ब्राह्मण मित्राच्या घरी जाऊन (किंवा त्याने माझ्या घरी येऊन) त्याच्या (किंवा माझ्या) ग्रिलवर ष्टेके भाजणे परवडते. आम्ही आणि आमची पोरे कोणत्याही ह्यांगअपशिवाय हवी तशी ष्टेके भाजून खाऊ शकतो, शेजारीच आमच्या शाकाहारी बायका कोणत्याही ह्यांगअपशिवाय पनीर नाहीतर मक्याची कणसे नाहीतर व्हेजी बर्गर ग्रिल करून नाहीतर अन्य काही शाकाहारी बनवून खाऊ शकतात. डोक्याला टेन्शन नाही साला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मला जर नुसते मीठ, मिरपूड नि लिंबू लावलेला बांगडा भाजून खायचाच असेल, तर त्याकरिता मी झक मारायला तुमच्या घरी कशाला येऊ? माझ्याच घरी भाजून खाणार नाही??? <<

प्रिसाइजली माय पॉइंट. अपेक्षित प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हाला एक मार्मिक दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्या घरी खाण्यासाठी पुढची परीक्षा पास व्हावं लागेल - नुसतं मीठ, मिरपूड आणि लिंबू लावलेला बांगडा भाजून मिळेल. खाणार का?

माशांच्या बाबतीत माझ्या घरी इतकंही करण्यासाठी मला बर्‍याच (सत्त्व)परिक्षेतून जावे लागेल त्यापेक्षा कधी येऊ? हा प्रश्न अजूनही लागू आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चिंतातूर जंतू हे परीक्षण अगदी बरोबर आहे.

मेघना प्रतिसाद एकदम पटेश.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खडखडीत-नव्हे नव्हे-खणखणीत लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकीचं जाऊ दे, पण एकाला असह्य वाटणारी दुर्गंधी, दुसर्‍याला सुवास कशी वाटू शकते, हे मला न उलगडलेलं कोडं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> एकाला असह्य वाटणारी दुर्गंधी, दुसर्‍याला सुवास कशी वाटू शकते, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. <<

Cultural relativism?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चविष्ट आहे लेख.
भातुकली खेळताना माश्याचं कालवण?. आम्हाला तर गुळ खोबरंही मिळायचं नाही मुंग्या येतील म्हणून.
मी मासे खाते पण सुक्या मासळीचा वासाची त्याची सवय नाही त्यामुळे आवडत नाही. त्यामानाने माझा नवरा घाटी असूनही त्याने मालवणहून आणलेले सुके बांगडे चवीचवीने खाल्ले होते.
लहान असताना एका नातेवाईकांकडे बांगड्याची हातचटणी हा प्रकार नाईलाजाने खावा लागलेला. तळलेले सुके बांगडे, ओलं खोबरं,लाल तिखट, बारिक चिरलेला कांदा आणि मीठ एकत्र कालवलेलं होतं.
फोटो सुरेख आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भातुललीला आम्ही शेंगदाणा मोडून त्यात गूळ भरवून लाडू करायचो Smile
___
लेख आवडला आहे. सासूबाईंनी केलेले सुकट खाल्ले आहे. फार आवडले असेही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मागे एकदा करंदी (आंबड) आणून सुकी परतलेली भाजी केली होती.
चविष्ट पण तोंडात टोचरेपणामुळे खाववेना.
असे पदार्थ करताना सल्ला घ्यावा, हे लक्षात आले.
भाजी पाण्यासह मिक्सरमधून काढून गाळून रस्सा म्हणून वापरला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहमीप्रमाणे 'जागू' ( = तों पा सु चविष्ट) लेख. लहानपणी मला भाजलेला गरम सुका जवळा आवडत असे. मोठेपणी चवी बदलल्या. आता तो नुसता खायला उग्र वाटतो. कांदा चिंच घालून हाताने कुस्करलेली सुकटीची चटणी खाऊनही खूप वर्षे झाली. कधीतरी जागूताईच्या स्वयंपाकघरात आठवडाभर मुक्काम ठोकण्याचे स्वप्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखातले फोटो खूप आवडले. यातलं काहीही मी कधीच पाहिलं नाहीये. मराठी कथा कादंबऱ्यांमधली पात्रं कालवण, बांगडा, झिंगे असं खात असत तेव्हा त्यांचा हेवा वाटायचा. असं मस्त काहीतरी शिजवून घरी जेवायला बोलावणारे मित्र / मैत्रिणीच नाहीत. ऐसे लेख ऐसी पे और आना मंगताय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ मुळापासून
छे हो. मला तरी कधी आढळली नाहीत अशी वर्णनं.
जयवंत दळवी किंवा पु.ल.देशपांडे यांच्या विनोदी-कम-ललित लेखनातून दिसतात ही वर्णनं.
दलित साहित्यात तेही आत्मचरित्रपर, बरबाट हा शब्द वाचला आहे.
'किंवा घरात पोळी अन बाहेर नळी'असा एखादा उल्लेख चुकून माकून कुठेतरी दिसतो.बस्स तेव्हढेच.
मेघनाने म्हटलेय तसे मराठी साहित्यात महाराष्ट्राची समग्र खाद्यसंस्कृती किंबहुना समग्र संस्कृती अवतरलेलीच नाही.
कोळ्याच्या आयुष्यावर एका जिद्दी म्हातार्‍याची गोष्ट हेमिंग्वेने लिहिली. मराठीत अशा वेगळ्या वातावरणातल्या कथा-कादंबर्‍या कधी येतील? एम.टी.आयवामारु हा एक अपवाद. अनिल कुसुरकरांनीही काही लिहिलंय पण या दोन्हीतही बहुधा 'फिश' नाही.
फिश खाणारे लोक म्हणजे एकदम हाय फाय संस्कृतीतले (म्हणजे संस्कृती सोडलेले) किंवा अगदी तळागाळातले म्हणजे संस्कृतीबाहेरचे. मधले अधले लोक मराठी साहित्यात मासे खात नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयवा मारूच्या उल्लेखावरून अवांतरः

या कादंबरीबद्दल एकेकाळी-आवडली-होती-पण-तेव्हा-मी-लहान-होतो/ते-आता-चीप-वाटते असं एक हुच्चभ्रू मत बहुदा ऐसीवरच वाचण्यात आलं होतं. असं मत का आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काय की. परवाच कशावरून तरी 'आयवा मारू'ची आठवण निघाली होती, तेव्हा असं लक्षात आलं की मराठी साहित्यात पहिल्यांदा थ्रीसमचा उल्लेख वाचलो तो या कादंबरीत. मग लक्षात आलं की त्यात इन्सेस्टही आहे. तेव्हा या संकल्पनाच इतक्या ठाशीव झालेल्या नसाव्यात डोक्यात, त्यामुळे तेव्हा ते नोंदलं गेलं नसणार. पण या शारीरसंबंधांबाबतच्या वेगळेपणामुळे आणि समुद्रावरच्या जगामुळेही (मला वाटतं पानवलकरांची एखाददुसरी कथा सोडली मराठीत हे विश्व नाहीच. पानवलांच्या गोष्टींतही कस्टमशी संबंधित गोष्टी आहेत. पूर्ण खलाशी जग नाही.)'आयवा मारू' महत्त्वाची ठरेल.

पुढे कथानकातले काही तपशील असतील. ज्यांना 'मारू' वाचायचीय त्यांनी कादंबरी तर वाचाच, पण पुढचा भाग आपापल्या जबाबदारीवर वाचा.

तरी ती का आवडत नाही आता? चांगल्या-वाइटाच्या काहीतरी न बदलणार्‍या आणि पारंपरिक कल्पना आहेत त्यात बहुतेक. म्हणून? ("माझ्या मित्राची पत्नी होती ती. भाबी म्हणायचो मी परवापरवापर्यंत तिला..." म्हणे. अरे मित्रा, प्रेमात पडलास तर प्रेमात पडलो म्हण ना. पुढे नाही जाता येत काही वेळा. पण निदान स्वीकार तरी? तिथे तो नायक आता मेजर गंडलेला वाटतो.)

त्यातली लहानपणी उत्कट वाटणारी भाषा आता 'जऽरा जास्त भावोत्कट नि फिल्मी' वाटते, हेही एक. सगळ्याच गोष्टी लार्जर दॅन लाईफ करण्याचं वेड आहे सामंतांना. सूर्य - जाळता. आभाळ - रक्ताळलेलं. डोळे - समुद्रासारखे हिरवेचार. प्रेम - वादळी. ओठ - संत्र्याच्या फोडींसारखे. वगैरे वगैरे. ते नको झालं असावं कालांतरानं.

त्यातली सगळीच पात्रं कसल्यातरी विकृतीनं भारलेली आहेत, (हे काही कारण होऊ शकत नाही, मान्य आहे. या नियमानं... असो.) हेही मला कमी आवडतं आता. दीपक, रॉस, सेनगुप्ता, त्याची आई, डालिझे, चीफ... या सगळ्यांच्या भोवती निदान 'आयवा मारू'चं खळं तरी पडलेलं आहे. पण उज्ज्वलाचा बाप? तो तसा विकृत दाखवण्यामागे काय योजना आहे नक्की? ते उगाच वेगळेपणाच्या हव्यासापोटी नाही, तर कशाकरता आहे? 'शीतू'मध्ये दांडेकरांनी ज्या सोईस्करपणे शेवटी शीतूला भरतीच्या पाण्यात बुडवून मारलीय, तोच सोईस्करपणा इथेही नाहीये का?

असो. एके काळी 'आयवा मारू'नं भारलेले दिवस होते. हेही पाहा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हम्म. परत वाचून पाहिली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

समुद्रावरच्या जगामुळेही (मला वाटतं पानवलकरांची एखाददुसरी कथा सोडली मराठीत हे विश्व नाहीच.

मी लहानपणी एक पुस्तक वाचलं होतं. त्यात दोन भाऊ आणि त्यांची सागरी वाहतुक की काहीतरी शी संबंधित कंपनी असं काहीतरी होतं. गम्मत म्हणजे हे दोन भाऊ इंडोनेशिया च्या जावा - सुमात्रा बेटांवर व्यवसाय करायचे असं दाखवलंय. पुस्तकात या भावांच्या सागरी साहसकथा आहेत. त्यात जावा सुमात्रा जवळचा समुद्र कसा गूढ आहे वगैरे याचं वर्णन होतं. एकंदर गोष्टी लहान मुलांसाठी होत्या, पण तेव्हा वाचून भारी वाटायचं. पुस्तकाचा नाव / लेखक काहीच आठवत नाही. पण मराठी मध्ये इंडोनेशिया च्या समुद्रकथा सांगणारं ते एकमेव पुस्तक पाहिलंय मी. अनुवादित होतं का ते पण माहित नाही. भावांची नावं पण अजय - विजय अशी काहीतरी भारतीयच होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझी आयवा मारुवरची प्रतिक्रिया बघितली आणि उत्तर द्यायला शेवटी सभासद झालो! मीदेखील अनेक वर्षे आयवा मारूने झपाटलो होतो. ती एकदाच वाचली. तिचे वलय जाऊ नये म्हणुन पुन्हा वाचली नाही. तू उल्लेख केलेले दोष आता कादंब्री आठवल्यास लक्षात येतात. पण काही गोष्टींचे मनात स्खलन होवू नये अशी इच्छा असते त्यापैकी एक म्हणजे ही कादंब्री. त्यात या कादंब्रीच्या ताकदीचे योगदान कमी आणि वैयक्तिक आवड जास्त असे म्हणता येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझी आयवा मारुवरची प्रतिक्रिया बघितली आणि उत्तर द्यायला शेवटी सभासद झालो!

ROFL

स्वागत!

बाकी स्खलनबिलन झालं तर झालं. एवीतेवी पुन्हा वाचून स्खलन होईलशी भीती वाटतेय, यातच सगळं आलं. पुढे तपशील उरतात फक्त. एकूण फक्त आयवा मारू नाही, एकूण सामंतांच्याच बाबतीत माझा ’मृत्युंजय’ झाला. त्यांचं '... एक ड्रीम, मायला' नावाचं पुस्तक मी वाचलेलं शेवटचं. ते चांगलं होतं. पण त्यानंतर त्यांच्या लिखाणाचे विषय बघून त्या वाटेला जावंसं वाटलं नाही. त्यांच्या हृदयरोगावर आधारित त्यांनी मटात एक सदरसदृश काहीतरी लिहिलं होतं, तेही पुरेसं पाडीक होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्यातली लहानपणी उत्कट वाटणारी भाषा आता 'जऽरा जास्त भावोत्कट नि फिल्मी' वाटते, हेही एक.

+१
पण तेव्हा ती भाषा कादंबरीची युएस्पी वाटत असे.
ते वातावरण, भाषा, काथानकाचा प्रकार याचा सामंतानीच अतिरेक केल्याने नंतर आवडेनाशी झाली असावी. परत वाचून बघायला हवी. (काहिही वाचायचे असेल तर हे आंजा बंद ठेवायला हवे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकेकाळी-आवडली-होती-पण-तेव्हा-मी-लहान-होतो - सहमत… माझी हीच केस होती.
ते-आता-चीप-वाटते - अशात वाचली नाही. पण लहानपणी वाचून अनंत सामंत म्हणजे लै भारी माणूस असे वाटले होते. आता मोजकी भडक वर्णनं सोडली तर जास्त काही आठवत नाही. मीच चीप असेन कदाचित… Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीच चीप असेन कदाचित… (स्माईल)

ROFL हाहाहा नाही नाही तसं नसेल Smile पण हे वाक्य वाचून जाम हसले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मराठी खाद्यसंस्कृती जास्त दिसत नाही हे खरं आहे. पुलंचे नाव ऐसी वर घेऊ नये असा नियम आहे बहुतेक, पण जे काही थोडाफार आहे त्यात पुलंनीच "माझे खाद्यजीवन" वगैरे लेख लिहून हातभार लावलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए! ए!! ए!!! जागुतै! सकाळी सकाळी पोटात आगडोंब उसळवल्याबद्दल निषेधही करता येऊ नये असा चविष्ट लेख लिहिलायस!

मुंबई सोडल्यापासून त्या सुरमया, पापलेटं आणि फार तर कोलंब्या सोडल्या तर इतर फारसं काही मिळेनासं झालंय. तिसर्‍या वगैरे बनवायला येत नाहीत इथे कोणाला. अन् सुकट तर विचारूच नको. माझ्या घरचे सगळे गालागुची (गाढवाला गुळाची असल्याने घरी करायची सोय नाही - त्यात सरावाच्या अभावी नीटसं बनतही नाही -, पुण्यात हे असं छान छान करून देणारे मित्र (अजून तरी) मिळालेले नाहीत आणि हे फारसं विकत मिळत नाही. काय सांगु!! या पुण्यात खायचे हाल हो!

Sad Sad

फोटो बघुन पळत हुंबयच्या आमच्या आगरी मित्रांच्या घरी जाऊन "ए मावशे, तुकड्या, नैतर गेलाबाजार सोड्याची आमटीवगैरे तरी उरलं असेलचं ना गं,दुपारला नवं काही करेपर्यंत तेच दे!" असं ओरडावंसं वाटलं. नैतर अस्सल शीकेपी -म्हंजे किनारपट्टीचे -(पुण्यातले "बाटगे" शीकेपी नव्हेत हल्ली ते चक्क भाजी बाजारातही दिसतात. एक मत्स्याहारी ग्राहक-लॉबी नै बनवता येत शिंच्यांना!) मित्रमैत्रीणींच्या घरी गेल्यावर थेट किचनमध्ये घुसावे. माशाचे काहीतरी असतेच ते सरळ वाढून घ्यावे, पानात काय घेतलंय हे पाहिल्यावर त्या दिलदार लोकांनी "अरे हा घरचाच" याची कल्पना आल्यावर पुढल्यावेळी आपल्यासाठी राखून ठेवावे.

छ्या!! या पुण्यात खायचे हाल नी खायला घालणार्‍यांचा तुटवडा हो!

===

लेखाबद्दल अनेकानेक आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मासे खात नाहीत, माशांचा वास आवडतही नाही तरीही लेख आवडला आणि फोटो बघायलाही मज्जा आली. ऋषिकेशला होतो तसा त्रास होत नाही, हे आपलं मासे न आवडण्याचं लंगडं समर्थनही त्यातल्या त्यात डकवून देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घरात सुकी कोलंबी असल्याने वाचायचं धाडस केलं, अथवा धागा बघूनच राग राग केला असता Biggrin
मेजर आवडला आहे लेख. आणि चित्रं.. आय आय ग. जाऊ देत.

सुकट म्हणजे ब्याकप हे घरातलं सूत्र. एखाद्या दिवशी बाजारात काही नसेल, वेळ झाला नसेल तर मग "ती" बादली उघडली जायची.
लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना नमस्कार ह्या चालीवर लहानांना कोलंबी आणि मोठ्यांना सुके बांगडे.

धाग्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरामध्ये सुकट्,सोडे, जवळा व काड्या ह्याचा पुरा इंतजाम आहे म्हणुनच हा धागा उघडण्याचं धारीष्ट्य केलं.
सोडे, सुकट किंवा जवळा घालुन कुठलीही पचपचीत भाजी अफाट चविष्ट बनु शकते हे एकदा खाउन बघितल्याशिवाय नाही कळणार.

मस्त फोटो जागुताई. फोटो बघुनच भुक चाळवली गेली ह्यामध्ये सगळ्या घटकांना १०० पैकी १०० गुण.
ज्या दिवशी ताजा बाजार मिळणार नाही त्या दिवशी सुक्याचे प्रकार अगदी ठरलेलेचं होते.

डिलिव्हरीनंतर पाचव्या का सहाव्या दिवशी मेथीची सोडे/सुकट घालुन भाजी बाळंतिणीला खाउ घालायची असते ह्या एकमेव प्रकाराची मी त्यादिवशी जबरदस्त फॅन झाले होते.

-मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुकट पदार्थ बरे मिळणारे हाटेल कुठेशीक आहे पुण्यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"जंजिरा" ह्या शास्त्री रोडच्या हॉटेलात सुकट पदार्थ मिळतात असं त्यांच्या साईट वरच्या मेनू कार्डात आहे, पण ते चांगले असतात का ह्याबद्दल खात्री नाही अजून ट्राय केले नाही (तू ट्राय करणार असशील तर कळव, येतोच मी कंपनी द्यायला Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डन! अवश्य कळवतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त लेख आणि फोटो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरूवातीला मासे जड गेले, पण नंतर खूप आवडले. तुम्ही लिहीलेले प्रकारही चाखले आहेत...पण घरी बनवलेलं हाटेलपेक्षा जास्त आवडत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....