अॅश-ट्रे

उनकलत्या दुपारची वेळ असते. उजव्या बाजूच्या खिडकीतून येणारी उन्हाची तिरीप टेबलावर विखुरलेल्या कागदांशी खेळत असते. सकाळपासून काहीतरी लिहिण्याचा चाललेला प्रयत्न, विखुरलेल्या कागदांतून, थंड झालेल्या कॉफी मधून आणि भरत चाललेल्या अॅश-ट्रे मधून जाणवत राहतो. काहीच सुचत नसतं. विचारांची आवर्तनं मुक्तछंदात फिरत राहतात पण कागदावर उमटत नाहीत. वाफाळत्या कॉफीचं कधीच गोमूत्र झालेलं असतं. आता लिहायचंच या निश्चयाने एक कोरा करकरीत कागद ओढून तुम्ही सुरुवात तर करता पण विचार आणि शब्द हातात हात गुंफून येतच नाहीत. दिवसभर चाललेला त्यांचा लपाछपीचा खेळ तसाच चालू राहतो. तुम्ही वैतागता. उजव्या हातातलं पेन तसंच ठेवून डाव्या हाताने सिगरेटचं पाकीट शोधता. आज काही सुचतच नाहीये या तरमरीत तुम्ही ती शिलगवता. दोन तीन लांबलचक कश घेता. तिच्या टोकाशी आता अॅश जमा होते. अस्ताव्यस्त टेबलावर कोपऱ्यात गेलेला अॅश-ट्रे तुम्ही खेचून जवळ घेता, आणि तुमच्या लक्षात येतं, कागद रिकामे राहिलेत पण दिवसभरात अॅश-ट्रे मात्र भरून गेलाय.

अक्ख्या अॅश-ट्रे मध्ये विखुरलेली सिगारेटची थोटकं, राख आणि मगाशी विझवलेल्या सिगारेटचा धुगधुगणारा धूर. किती काय काय असतं त्या भरलेल्या अॅश-ट्रे मध्ये. काही सिगारेटी पूर्ण अगदी फिल्टरपर्यंत ओढून ओठाला चटका लागल्यावर विझवलेल्या. काही अर्धवट मध्येच खुडून टाकलेल्या. काही घाईघाईत संपवलेल्या. काही दुसऱ्या ब्रान्डच्या, न झेपलेल्या आणि म्हणून लगेचच विझवलेल्या. काही महागड्या तर काही सध्या. शेवटी धूर होऊन राखेत झोपून राहिलेल्या. विखुरलेल्या थोटकांनी भरलेल्या अॅश-ट्रे वरून निघून तुमची नजर टेबलवर स्थिरावते.

टेबलावरही विखुरलेल्या कागदांचा पसारा. एकेक कागद म्हणजे जणू एकेक विचार. काही अर्धवट सोडून चुरगाळून टाकलेले. काही अगदी शेवटपर्यंत लिहिलेले पण शेवट मनासारखा होईना म्हणून ठेवून दिलेले. काही घाईघाईत खरडायचे म्हणून खरडलेले आणि मग मनासारखे झाले नाहीत म्हणून फेकून दिलेले. काही विचार नुसते क्षणभर आलेले म्हणून कागदावर उतरवलेले आणि मग पुन्हा विस्कटून गेलेले. काही न झेपणारे विचार वेगळ्याच ब्रांडच्या सिगारेटीसारखे त्यांचाही चुराडा करून फेकलेला. बघता बघता अक्खा टेबल म्हणजे विचारांचा अॅश-ट्रे होऊन जातो. सगळे विचार शब्दांचा धूर करून कागदांच्या राखेत झोपून गेल्यागत दिसू लागतात.

विचारांच्या त्या अॅश-ट्रे वरून तुमची नजर हटते आणि डाव्या बाजूच्या हातभार उंचीच्या आरशाकडे जाते. तुमची नजर असे अनेक अॅश-ट्रे शोधत राहते. आयुष्यात येणारे लोक. असेच विखुरलेले. काही तुमच्या 'loyal' ब्रांड सारखे शेवटपर्यंत सोबत देणारे. प्रत्येक कश सोबत रंगतदार होत जाणारे. काही तुम्ही मध्येच खुडून टाकलेले. काही नुसतेच क्षणभर आलेले पण कायमची 'kick ' देऊन गेलेले. काहींसोबत जमलंच नाही तुमचं जणू काही तुमच्या ब्रान्डचे नव्हतेच ते. असे अनेक तुमच्या आयुष्यभर विखुरलेले. आयुष्याच्या भव्य अॅश-ट्रे मध्ये त्यांच्या आठवणींची राख उरलेली असते आणि तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेले क्षण कधीच धुरासारखे दूर दूर गेलेले असतात.

अजून एक दिवस संपलेला असतो आणि अजून एक अॅश-ट्रे भरून गेलेला असतो.

-अभिषेक राऊत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आयुष्यात येणारे लोक. असेच विखुरलेले. काही तुमच्या 'loyal' ब्रांड सारखे शेवटपर्यंत सोबत देणारे. प्रत्येक कश सोबत रंगतदार होत जाणारे. काही तुम्ही मध्येच खुडून टाकलेले. काही नुसतेच क्षणभर आलेले पण कायमची 'kick ' देऊन गेलेले. काहींसोबत जमलंच नाही तुमचं जणू काही तुमच्या ब्रान्डचे नव्हतेच ते. असे अनेक तुमच्या आयुष्यभर विखुरलेले. आयुष्याच्या भव्य अॅश-ट्रे मध्ये त्यांच्या आठवणींची राख उरलेली असते आणि तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेले क्षण कधीच धुरासारखे दूर दूर गेलेले असतात.

कल्पना आवडली.
मला एक ललीत लिहायचे होते पण ते पूर्ण झालेलं नाहीये. होईलसं वाटत नाही. त्याचा जर्म इथेच लिहीते - एक ७ वर्षाची चिमुरडी आहे, हिरवं जरीचं परकर पोलकं घातलेली. कुंकू मस्ट आहे अन काजळही. डोळे मोठ्ठे अन तेजस्वी आहेत. ती चिखलात्/ओल्या मातीत खेळते. खूप गोळे बनवते, थापलेले, गोल-गोल,मध्ये खळं असलेले, लांबोडे, नागासारखे विविध आकार बनवते. अन ते म्हणजे आपण आहोत अन ती मुलगी आहे आदिमाया. मग तिला कंटाळा आला तर ती सगळे मोडून निघून जाते दुसरा खेळ खेळायला, दुसरे विश्व वसवायला.
ख्रं तर घट म्हटले असते पण मग उमर खय्याम ची रुबायत आठवते.

या ललीताने त्या अपूर्ण जर्म ची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...