स्मशान शांततेची शिकवण

अरे, वर्गात कितीरेही गडबड
सगळे शांत बसा बघू
प्रश्न विचारु नका
उत्तरे शोधू नका
चर्चा करु नका
सगळे पास होणार आहात तुम्ही
आपो‌आप परिक्षेशिवाय
पुढच्या वर्गात जाणार आहात

काय म्हणता?
विचार स्वातंत्र्य
उच्चार स्वातंत्र्य
ढोल ताशे
किती गोंगाट करताय तुम्ही
एका गोळीने बंद करता येतात
सारे शब्द
हो, आणि आजकाल पिस्तुलांनाही बसवले असतात सायलेन्सर
एका सेकंदात सारे खल्लास
सगळी भाषणे बंद
मोर्चे बंद
सभा बंद
चर्चा बंद
संघटन बंद
शूऽऽऽ शांतता
चौकशी चालू आहे

काय म्हणता?
सरकार तपास करेल
कोर्ट न्याय करेल
होतर,
तुम्ही शांत राहा
चौकशी चालू आहे

काय म्हणता?
ही तर माफियांची भाषा झाली
वाह राव
आज कळते काय तुम्हाला
राज्य तर आमचेच होते
आजही आमचेच आहे
उद्याही आमचेच असेल
सत्ता आमची, पोलीस आमचे, कोर्टही आमचेच

आम्हाला माहित आहे
बुळचट मध्यमवर्गीय तुम्ही
तुमच्या बुडाखाली जळाले
तरि तुम्ही लढणार नाही

एखादा गांधीबाबा,
एखादा दाभोलकर,
एखादा पानसरे,
अशी बेण
अनेक दशकांत
एखादीच उगवायची
ती उपटून टाकली
की सार कस शांत, शांत, शांत

तर म्हणा मुलांनो एक स्वरात
ॐ शांती, शांती, शांती

- देवदत्त परुळेकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!