तो आणि आपण

काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायचं हे त्याने फार लहानपणीच ठरवलेलं. तो कोण कुठचा कोणाला माहीत नाही.कसा दिसायचा कसा वागायचा कुणाला कल्पना नाही. पण तुमची स्वप्न तुम्हाला कधी तुमची जातकुळी विचारत नाहीत. एक नक्की कि जेव्हा तो होता तेव्हा त्याला खेळायला बऱ्याचशा गोष्टी होत्या. अर्थात सगळ्याच लहान मुलांप्रमाणे त्याचा आवडीचा खेळ होता गोट्या खेळणे. आठ नऊ गोट्या असाव्या त्याच्याकडे त्यांच्यासोबत एकटाच खेळत असायचा. रांगेने सगळ्या मांडून ठेवायचा आणि मग एका मागोमाग एक सगळ्या फटाफट गलीत मारायच्या. सगळ्या रांगेने ,मांडल्या कि त्यातली एक गोटी नेहमी त्याचं लक्ष वेधून घ्यायची. म्हणायला गेलं तर त्याला ती आवडायची सुद्धा. ती दिसायलाच कित्ती छान होती. निरनिराळ्या रंगांच्या छटा स्पष्ट दिसायच्या तिच्यावर. असं वाटायचं जणू काही नुकतीच रंगपंचमी खेळून आलीये. निळा, हिरवा , पिवळा , लाल , पांढरा जणू काही इंद्रधनुष्यच. आताशा तो मोठा होऊ लागला होता. वयाने आणि विचारांनीही. नवीन स्वप्न, नवा उत्साह, नवे मार्ग शोधण्याची धडपड सगळं काही एकत्रच. अस्वस्थ असायचा सतत. मला काहीतरी करायचय, मला काहीतरी करायचंय सतत भुणभुण लावून असायचा. त्याच्या सोबतचे सगळे कसे नेहमीचे मार्ग स्वीकारून ‘सेटल’ झाले होते. याचं मात्र कुणाला कळायचंच नाही. म्हणता म्हणता हा ऐन तिशीला आला. तरीही ह्याचं काही एक ठरलेलं नव्हतं. शेवटी याला कुणीतरी म्हणालं , “अरे, तू गोट्याच खेळ. तू कुठे नवीन काहीतरी करण्याच्या आणि स्वप्न पाहण्याच्या गोष्टी करतोस”. त्याच्या डोक्यात क्षणार्धात काहीतरी चमकलं. धावतच तो घराबाहेरच्या अंगणात गेला. त्याच्या आवडत्या गोटीने त्याचं लक्ष पुन्हा वेधून घेतलं. त्याने तिला हातात घेतलं आणि कुठल्याशा निर्धाराने त्याचे डोळे चकाकले.

काय करायचं ते आता ठरलं होतं. त्याच्या आयुष्याला ध्येय मिळालं होतं. तो त्याच्या आवडत्या गोटीचा कायापालट करणार होता. त्याच्या या ध्येयावर सारेच हसले पण तो त्यापासून ढळला नाही. त्याच्या कार्याला सुरुवात झाली होती. वेगवेगळे रंग आता जिवंत होणार होते. निळाशार रंग समुद्राच्या खोलीत खोलवर उतरला. हिरव्या रंगांच्या अगणित छटांनी वृक्षवल्लींना आपलंसं केलं. त्याची कल्पनाशक्ती आणि त्याचे प्रयत्न दोन्ही मिळून त्याच्या स्वप्नाचा पाय रचत होते. उरलेल्या रिकाम्या जागा कुठे शुभ्र बर्फाच्छदीत पर्वतांनी तर कुठे वाळवंटानी भरून काढल्या. पण अर्थातच सगळंच इतकं सोप्पं नव्हतं. कधी कधी मनासारखं काही जमायचंच नाही. मग स्वताच्याच हाताने साऱ्याचा संहार करायचा. पुन्हा श्रीगणेशा आणि पुन्हा सर्वकाही. या सगळ्यात त्याच्या आयुष्याची खूप सारी वर्ष गेली. अर्थात स्वप्न्पूर्तीला काळाचं बंधन नसतंच. त्याने जे ठरवलं ते पूर्ण झालं. आयुष्यभर कष्ट करून बनवलेल्या त्या वस्तूचं नामकरण सुद्धा केलं.

आताशा तो थकला. ज्या स्वप्नाला आपण सत्यात आणलं त्याच्या भविष्याची चिंता त्याला सतवायला लागली. आपण आयुष्यभर खपून जे उभं केलं ते सांभाळायला आपल्याच तोलामोलाचा कुणीतरी लागेल याची त्याला जाणीव झाली. आणि त्याला त्यावर सुद्धा उपाय सुचला. त्याने आपला अंश जाता जाता तुम्हा आम्हांत ठेवला. तर असा तो. त्याचं नाव परमेश्वर, आणि ज्या गोटीला त्याने अजरामर केलं तिला आपण पृथ्वी म्हणतो. खरंतर हा देव, परमेश्वर, जगन्नियंता म्हणजे आपला पूर्वजच. अर्थातच त्याचाच अंश आपल्यात आहे हे जितक्या लवकर आपल्याला समजेल तितक्या लवकर त्याला मूर्त्यांमध्ये शोधण्याची हौस सुद्धा थांबेल आणि त्याला पूर्णपणेच नाकारण्याचा करंटेपणासुद्धा.

-अभिषेक राऊत.

field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ह्म्म! ही ठीक वाटली. मात्र कल्पनाशक्तीची भरारी आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down