पंख असलेल्या माणसाची गोष्ट

मी ही घटना फक्त एकदाच सांगितली, तेव्हा त्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही. सगळ्यांना ती कथाच वाटली. मग ही कथा कुणालाच सांगायची नाही असं मी ठरवलं.
मी समोर ठेवलेला रेकॉर्डर पॉझ केला. सांगणं रेकॉर्ड करावं का नाही, या संभ्रमात पडलो - क्षणभरच. आणि लगेचंच रेकॉर्डरचं बटण दाबलं...
पहिल्यांदा मी जेव्हा त्याला पाहिलं, तेव्हाच मला जाणवलं की, या माणसात काहीतरी वेगळं, निराळं आहे, जे आपल्यात नाही.
मला ऑफिसमधून घरी जायला दोन रस्त्यांचे पर्याय उपलब्ध होते. पण कुठल्याही रस्त्याने गेलं तरी एका चौकातून जावंच लागायचं. हा चौक खूप मोठा होता, शहरातल्या सर्वांत मोठ्या आणि सर्वांत जास्त रहदारी असलेल्या चौकांपैकी एक. त्या चौकात चारही दिशांना चार सिग्नल होते आणि चौकाच्या मधोमध मोठ्ठा चौथरा होता. त्या चौथर्या तून एक खांब आकाशाच्या दिशेने झेपावलेला होता आणि त्या खाबांच्या टोकावर पिवळा प्रकाश पाडणारे दिवे होते. या चौथर्‍यावरच तो बसायचा. थोराड चेहर्‍याचा, वर्णाने काळा, खरंतर रापलेला. बसकट बुटका. चेहर्‍यावर दाढीचे खुंट वाढलेले. डोक्यावर टक्कल. चौकड्या-चौकड्यांचा मळकट शर्ट, इन न केलेला आणि खाली गुडघ्यापर्यंतची खाकी रंगाची बर्म्युडा पँट. एकूणच अजागळ वाटावा असा किंवा त्याच्या चेहर्यापवरचे भाव पाहताच कुणालाही वाटावं की, याचा जरा एक रुपया पडला असावा असा. लोकांना तो वेडाच वाटायचा. दीड मिनिटांच्या सिग्नलच्या वेळेत लोक त्याची ज्याम मजा घ्यायचे, टर उडवायचे. तेवढाच त्यांच्या धकाधकीच्या फास्ट लाइफमध्ये विरंगुळा, एन्टरटेनमेंट! तो मात्र या सगळ्यांवर निश्चल असायचा आणि विलक्षण निरागस हसायचा. ते हास्य कधीच कुत्सित किंवा लाचारही नसायचं, त्यात बेफिकीरीची झाकही नसायची. ते निर्हेतुक असायचं, पहिल्यांदा जेव्हा केव्हा माणूस हसला असेल तेव्हा तो असंच हसला असेल असं वाटायचं.
तो नेहमी एक पेटी घेऊन त्या चौथर्‍यावर बसायचा. ती पेटी लाकडी होती आणि त्यावर नाजूकपणे वेली-फुलांचं नक्षीकाम केलेलं होतं. त्याच्यासोबत नेहमी एक कुत्र्याचं पिल्लू असायचं – सोनेरी रंगाचं. छोट्या लांबुडक्या कानांचं, मऊशार, केसाळ आणि करुण पाणीदार डोळ्याचं. ते सतत उड्या मारायचं, त्याचे लाड करावेत म्हणून कू-कू आवाज काढत त्याच्या पायापाशी घोटाळत बसायचं. कित्येकदा तो त्या पिलाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करायचा. मी आधीही अनेकांना आपल्या पाळीव कुत्र्याचे लाड करताना पाहिलं होतं – कुत्र्याचे कान खाजवायचे, मग त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायचा, त्याच्या नाकाला नाक घासायचं, त्याच्याशी लाडे-लाडे बोलायचं... इतरांसारखे असे सगळे प्रकार तोही करायचा; पण एक गोष्ट त्याच्या लाड करण्यात होती, जी इतरांच्यात नव्हती. इतर जण लाड करतात तेव्हा जाणवयाचं की, ते मालक आहेत, पोसणारे आहेत. देणारा आणि घेणारा – श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भाव त्यात जाणवायचा. पण तो त्या पिलाचे असे लाड करायचा की, जणू ते पिलू नसून तो स्वतःच आहे! तो स्वतःचेच लाड करतोय आणि पिलूही तसाच प्रतिसाद द्यायचं. जणूकाही ते वेगळे नसायचेच मुळी, दोघंही पिलू व्हायचे, मग तो क्षणात माणूस!
आत्ताही माझ्या डोळ्यांसमोर ते दृश्य जसंच्या तसं उभं राहतं –
संध्याकाळ. संधिप्रकाश. पूर्ण अंधार पडलेला नाहीये, ना पूर्ण प्रकाश. ऑफिसेस सुटलेली असल्याने ट्रॅफिक. एखादं धरण फुटावं तसं रस्ते गर्दीने तुडुंब भरलेले. मिनिटा-सेकंदाला एकेका बाजूचा एकेक सिग्नल सुटतोय. लाल.... हिरवा.... घरी जाण्यासाठी बेभान झालेली माणसं सुसाटाहेत, पळताहेत... हॉर्न वाजवाहेत....
कॅमेर्यातत चौथरा. चौथर्या्वर तो बसलेला. त्याच्या मांडीवर कुत्र्याचं पिलू. त्यांचा लाड करण्याचा सोहळा सुरू असलेला आणि त्यावर स्ट्रीट लाइटचा मंद पिवळा प्रकाश पडलेला.
एकाएकी तो आपली लाकडी पेटी उघडतो आणि त्यातून एक निळा गोळा बाहेर काढतो. निळाशार, खरबुजाएवढा गोळा – त्याच्या अंतरंगात गोटीसारखी डिझाइन. भविष्य सांगणार्या् चेटकिणींकडे असतो तसा.
गोळा बाहेर काढल्यावर कुत्रा आणि तो खटका दाबल्यासारखे, शांत आणि स्तब्ध होतात. तो पद्मासनात बसतो आणि पिलू त्याच्या मांडीच्या खळग्यात बसतं. तो डोळे मिटतो आणि गोळ्याच्या वरून एक हात आणि खालून दुसरा हात अशा स्थितीत गोळा धरून ठेवतो. खालून कुत्रा त्याच्या हाताला चाटू लागतो, जणू ‘मम’ म्हणत असावा.
दोघेही क्षण, दोन क्षण डोळे बंद करून घेतात. एकीकडे अव्याहत माणसांचा कोलाहल, पीपीपॉपॉ, हॉर्न्सचा, गाड्यांचा आवाज असा विराट जनसागर ओसंडत असतो. तर दुसरीकडे – पिलू, तो आणि निळाशार गोळा. स्तब्धता; शांतता. आणि निळ्या गोळ्याभोवती एक वलय उमटतं. तो आपले दोन्ही हात काढून घेतो आणि तो गोल स्वतःभोवती मंदपणे गिरक्या घेत हवेतल्या हवेत तरंगत राहतो. जणूकाही त्या निळ्या गोलामधून मंद, शांत आणि अद्भुत अशा लाटा उसळताहेत. त्या बाहेर येऊन त्या दोघांमध्येही झिरपताहेत. त्यातून एक शांतवणारा नाद उमटतोय – नदीच्या पाण्याचा असतो तसा, वार्याझचा असतो तसा, झाडांचा असतो तसा. एक आवाज, एक सूर, एक नाद – या सगळ्या सृष्टीतला एक ताल. त्या तालाला तो बरोबर धरतो, आणि त्यावर डुलू लागतो, त्याचे डोळे बंदच असतात, पण त्यावर एक निरलस हास्य उमटतं, तो एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे डोलू लागतो. जणू त्याच्या अस्तित्वामधून एक समाधान ओसंडत असावं. या तालावर त्याच्या जिवलग पिलाचे कानही वर-खाली होतात. तो टकामका त्या अद्भुत गोळ्याकडे पाहत असतो...
मी चांगला फोटोग्राफर किंवा दिग्दर्शक असतो तर ते दृश्यं शूट केलं असतं. चौथरा म्हणजे जणू त्याचा रंगमंच आणि स्ट्रीट लाइटचा प्रकाश म्हणजे जणू त्याचा स्पॉट लाइट. निळा गोल, कुत्र्याचं पिल्लू, तो आणि अद्भुत नादमय संगीत. त्यांचं त्यावरचं नृत्य आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, जलद, वाहणारी गर्दी, धावणार्‍या गाड्या – ब्लर्ड-धूसर, डि-फोकस. पण असा विचार करताना वाटायचं, हे अद्भुत खरंच आपल्याला चौकटबंद करता येऊ शकेल?
हे सारं जवळपास रोजच घडायचं आणि मी ते जवळपास रोज पाहायचो, पण लांबून. मी रोज पाहायचो की, गर्दी येतेय आणि जातेय, पण कोणाचंच त्या विलक्षण अद्भुताकडे लक्ष जायचं नाही. कोणालाही ते संगीत एेकून स्तब्ध व्हावसं का वाटत नसावं? का इतर पाहून न पाहिल्यासारखं करायचे का ते फक्त मलाच दिसत होतं?...
हे पाहताना मला प्रश्न पडायचे, या भणंगाकडे हे सगळं कुठून आलं असेल? त्याला हा गोळा कोणी दिला असेल? हे संगीत त्याला कोणी शिकवलं असेल? तो खरंच माणूस आहे की दिसतोय माणसासारखा आणि आहे दुसरीकडचाच कुणीतरी?
पण माझ्यातलं वास्तववादी मन शेवटचा प्रश्न खोडून काढायचं. दुसरीकडचा? म्हणजे कुठूनचा? काहीही... पण माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली; काही दिवसांतच.
एके दिवशी ऑफिसमध्ये मला खूप उशीर झाला. मध्यरात्रीचा ठोका पडला, तसं मी बॉसला म्हणालो की, आता मी निघतो, असंही अजून बरंच काम बाकी आहे. त्यामुळे ते उद्यावरच जाणार आहे.
आज चौथर्याऑवरचं नाट्य पाहायला मिळालं नसल्याने थोडी रुखरुख लागली. गाडी स्टार्ट केल्यावर मनात विचार आला की, आपण त्या माणासाला पाहतो ते केवळ संध्याकाळीच. एरवी हा काय करत असेल? रस्त्यावर फारसं ट्रॅफिक नव्हतं. त्यामुळे गाडीने वेग पकडला. तसं आपण एक-दोनदा त्याला त्या चौथर्यायच्या आसपास खाताना पाहिलंय. एकदा एक बाई त्याला जेवणही देत होती. पण रोज कोण देणार खायला? हा पोटापाण्यासाठी काय करत असेल?
गाडी आता चौथर्यापच्या चौकात येत होती. तो आत्ता काय करत असेल? चौथर्याहवर बसला असेल, झोपला असेल की जागा असेल? की आत्ता तिथे कोणीच नसेल? जर तो असेल तिथे तर बोलू या त्याच्याशी आज? मी चौकात आलो. चौथर्यालपाशी मला एक पांढरी आकृती पाठमोरी दिसली. तितक्यात एक ट्रक प्रचंड वेगाने विजेसारखा क्षणात गेला. त्या मागोमाग एक अस्फुट किंकाळी आली. काही क्षण काय घडलं ते कळेना. मी वेगाने जाणार्या ट्रकचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला. पण मला तो दिसला नाही. तो काही क्षणांत वार्याासारखा खूपच पुढे गेला होता. मग मी किंकाळीच्या दिशेने पाहिलं, आणि आश्चर्यचकित झालो –
पेटारा चेचला गेला होता. त्यातला गोळा फुटला होता. त्याचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते आणि त्याच्या शेजारी एक माणूस, पालथा पडला होता. मी नीट पाहिलं. त्याच्या खांद्याखालच्या भागातून काहीतरी निघून येऊन ते पोटर्यांहपर्यंत आलं होतं. मी नीट निरखून पाहिलं, ते पंख होते! त्या पांढर्या,शुभ्र पंखांवर ट्रकच्या टायरच्या मातकट खुणा उमटल्या होत्या. कुत्रा शेजारी की-की असा करुण आवाजा काढत भिरभिरत होता. हा तोच कुत्रा! म्हणजे...
मी क्षणभर थांबलो. काय करावं ते मला सुचेना. मी समोरच्या दृश्यातले तुकडे जुळवले – पेटारा-गोळा-कुत्रा! पण हे पांढरेशुभ्र देवदूतांसारखे पंख?
मी त्वरित तिथे जाऊन उताणं केलं, तेव्हा त्याच्या पंखांच्या मऊ पिसांचा स्पर्श झाला. त्यावर पक्ष्यांच्या पिसांप्रमाणेच मेणचट थर होता. तो तोच माणूस होता, फक्त पंख असलेला! तो बेशुद्धीत होता. त्याच्या पाठीला जिथे त्याचे पंख जोडले गेले होते, तिथून रक्त येत होतं. पांढर्यातशुभ्र पंखांवरून जिथून ट्रक गेला तो भाग काळानिळा पडला होता. त्याच्या तोंडातूनही रक्त येत होतं. कपाळावर आपटल्याने कपाळाला रस्त्यावरचे छोटे छोटे खडे बोचले होते. त्याच्या विचित्र काळसर त्वचेत ते दोन मिनिटं रुतल्याचे कळलंच नाही. मी ते खडे काढले. तिथे लालसर खरचटल्यासारख्या जखमा दिसू लागल्या. कपाळाला सूज आली होती. रक्त वाहत असल्याने त्याच्याखाली रक्ताचं चिकट थारोळं जमा होऊ लागलं होतं.
तो केविलवाणा दिसत होता. अर्धीचड्डी घातलेला, दाढीचे खुंट, डोक्यावरचे विरळ केस, चौकड्यांचा जुना रया गेलेला हाफशर्ट आणि त्यातून बाहेर आलेले मोठे पंख. ठिबकणारं रक्त. टायरच्या खुणा.
गर्दी नसल्याने मी गाडी त्याच्याजवळच नेली होती. गाडीतल्या बाटलीतलं पाणी त्याच्या तोंडावर टाकलं. गालावर दोन-तीन थपडा दिल्या. मला तो शुद्धीवर यायला हवा होता. मला त्याच्याशी बोलायचं होतं. खूप. जे आजवर आम्ही कधीच बोललो नव्हतो, ते सगळं.
तो शुद्धीवर आल्यावर माझ्याकडे मंद हसत म्हणाला, “आलास तू!” जणू तो माझ्याकडे पाहून बोलत असला तरी तो माझ्याशी बोलत नव्हता. कुणा वेगळ्याशीच बोलत असावा असं वाटलं. काय म्हणायचं असेल त्याला? कोणाशी बोलत असेल तो? मी म्हणालो, “मला कळलं नाही...” तो हसतच म्हणाला, “तू आलास म्हणजे माझे दिवस भरले.”
मी म्हणालो, “काय, काय बोलतोएस?”
तो म्हणाला, “कळेलच तुला लवकर.”
मला वाटलं की, अपघाच्या आघाताने तो बरळत असावा. म्हणून मी त्याला अलगद चौथर्याहवर बसवण्यास मदत केली. त्याच्या गुडघ्यांनाही जखमा झाल्या होत्या. मी त्याच्याजवळ त्याचा कुत्रा दिला आणि चेचलेला पेटाराही ठेवला. फुटलेल्या गोळ्याचे अस्ताव्यस्त पसरलेले तुकडे निस्तेज दिसत होते, जणू आता माझ्यातून सूर उमटणार नाहीत, असंच ते सांगत असावेत.
मी गाडीतून फर्स्ट एड बॉक्स काढला आणि त्याच्या जखमांवर तात्पुरती मलमपट्टी करू लागलो. मोठ्या जखमांमधून कमीत कमी रक्तस्राव व्हावा, म्हणून त्यावर रुमालाचे तुकडे आणि बॉक्समधलं पांढरं जाळीदार कापड बांधलं.
हे सगळं करताना तो हसत होता. मी त्याला विचारलं की, हसतोएस का? त्यावर त्याचं म्हणणं होतं की, तू कितीही काहीही केलंस तरी मी आता जगणार नाही, हे मला आधीपासूनच माहिती आहे, तू जे जे काही करतोएस ते व्यर्थ आहे. मला आधीपासूनच माहिती आहे की, माझा अंत असाच होणार आहे. तू येणंच माझा अंत आहे.
पण ती वेळ त्याची असंबद्ध बडबड एेकत बसण्याची नव्हती, असं वाटल्याने मी त्याला उठवून गाडीत बसवू लागलो. तो ‘नाही’ म्हणून प्रतिकार करू लागला. पण मी त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचा निश्चय केला होता. मी त्याला थोड्या वरच्या पट्टीतच म्हणालो, “मला आत्ता इतकंच माहित्येय की, तुला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं.’’ यावर तो काहीही बोलला नाही. एकाएकी त्याचा प्रतिकार शून्य झाला.
मी ड्रायव्हरशेजारची सीट मागे केली. जेणेकरून त्याला थोडं आडवं पडता यावं. त्याला उभं राहण्यासाठी एक हात त्याच्या पाठीमागून घालून त्याला आधार दिला. तो लंगडत होता. कसंबसं त्याला गाडीत बसवलं. पंखामुळे त्याला आता नीट शिरता येत नव्हतं. आत गेल्यावरही त्याचे पंख सीटला टेकत असल्याने त्याला पाठ टेकवता येत नव्हती. विचित्र अशा अवघडलेल्या स्थितीत तो आडवा झाला होता. त्याची अवस्था दयनीय होती. त्याला पाहून मला बोदलेअरच्या एक कवितेतल्या त्या मोठ्ठ्या समुद्रपक्ष्याची आठवण झाली. तो मोठ्ठा पक्षी आकाशात भरारी घेताना मोठा डौलदार वाटतो. पण जमिनीवर चालताना तो फारच कुरूप, बोजड धुडासारखा वाटतो. जहावरचा एक कप्तान या पक्ष्याला डेकवरती जळत्या चिरुटाचे चटके देऊन जायबंदी करतो आणि त्याचं ते बोजड चालणं मोठ्या गमतीने एन्जॉय करतो. तशीच याचीही ही अवस्था कोणी एंजॉय करत असेल? कोण असेल तो?
मी गाडी सुरू केली, मग त्याला म्हणालो, “डोंट वरी, आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचू.” मी सहज हे वाक्य बोलून गेलो. त्यावर तो म्हणाला, “व्हाय शूड आय वरी? कारण काय होणारे याची मला कल्पना आहे.”
मी त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागलो. हा माणूस अजबच होता. तो जादूई गोळा काय, हे पंख काय... हा आहे तरी कोण, याचा ठावठिकाणा काय आहे...
जणू माझ्या मनातले सगळे प्रश्न त्याला एेकू जात असल्यासारखा तो सांगू लागला -
“मला माहित्येय तू मला रोज पाहायचास ते, कारण मीही तुला रोज पाहायचो. तुझी वाट पाहायचो की, एक दिवस तू येशील... आणि आज तो दिवस उजाडला. आज मी तुला माझी सगळी गोष्ट सांगणार आहे.
माझं नाव आहे स्वसंवेद्य. मी पृथ्वीवरचा नाहीये. मी तिथे वर वसलेल्या आकाशनगरीतून इथे आलोय, म्हणजे मला पाठवण्यात आलंय, शाप देऊन!”
अजून एक धक्का!
“आकाशनगरी वसली आहे, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर, जिथे अवकाशाचाशी सुरुवात होते तिथे – एका छोट्याशा उपग्रहावर. तो पृथ्वीवासीयांना म्हणजे मनुष्य गणांना कधीच सापडणार नाही, कारण तो इतरांना अदृश्य दिसावा, यासाठी त्याभोवती एक वलय निर्माण करण्यात आलंय.
आकाशनगरीत माझा जन्म झाला, तो बेवारस म्हणून. म्हणजे वारसाहीन म्हणून.
आकाशनगरीत दोन प्रमुख गण आहेत. एक देव गण आणि दुसरा दैत्य गण. या गणांमध्येही आणखी उपगण आणि त्यातही छोटे छोटे पोटगण आहेत. पण मुख्य गणांमध्ये आहे छत्तीसचा आकडा. कारण हे दोन्ही गण पूर्णतः भिन्न प्रकृतीचे, स्वभावाचे आणि वेगवेगळ्या जीवनपद्धती जगणारे असल्यामुळे त्यांची संस्कृती-भाषा-समाज भिन्न आहे. या दोन गणांत रोटीबेटीसारखे कोणतेही व्यवहार होत नाहीत, आणि कोण श्रेष्ठ हे सिद्ध करण्यासाठी दोघांमध्ये नेहमी अहमअहमिका सुरू असते. कधीकधी तर ती इतकी वाढते की, घनघोर युद्ध होतात, अनेक जण मारले जातात.
माझ्या जन्माच्या आधीही असंच झालं, देव आणि दैत्यांमध्ये महाभयंकर, प्रचंड संहार करणारं युद्ध झालं. इतकं प्रचंड की, तुमची सगळी महायुद्ध त्याच्या तुलनेत व्यर्थ ठरावीत. सलग एक तप हे युद्ध सुरू होतं. सरतेशेवटी देवांचा विजय झाला. आकाशनगरीची सत्ता देवांच्या हाती आली. पण युद्धाच्या शेवटी दैत्यांनी आपला पराभव जवळ आला आहे हे ओळखून एक अस्त्र सोडलं. या अस्त्रामुळे देवांच्या बायकांची गर्भाशयच नष्ट झाली. गर्भाशयच नष्ट झाल्यास विजय मिळवून काय फायदा, कारण वंश वाढलाच नाही तर पिढ्यान् पिढ्या राज्य करणार तरी कोण, असा धूर्त विचार दैत्यांच्या अस्त्रचालीमागे होता.
पण देवही काही कमी नव्हते. ते कितीही सोवळंओवळं, शुद्धअशुद्ध करत असले तरी आता प्रश्न त्यांच्या अस्तित्वाचा होता. मग त्यांनी गुपचुप दैत्यांच्या माद्या पळवून आणल्या आणि आपली गुप्त आंतरिक शक्ती वापरून त्यांच्यात बीजफलन घडवून आणलं. तयार केलेला गर्भ वाढवण्यासाठी जमिनीखाली मोठ्ठं कृत्रिम गर्भाशयासारखंच गर्भालय तयार केलं. तिथे हे गर्भ वाढवले गेले आणि तयार झालेल्या मुलावरचे दैत्यांचे सगळे संस्कार पुसून टाकले जावेत म्हणून देवांच्या ‘निकामी’ झालेल्या बायकांकडे सांभाळायला दिले. तुमच्याकडे कसं सरोगेट मदर असतात ना अगदी तसंच.
मी असाच जन्माला आलो, संकारतून. मी दिसायला वेगळा होतो, ना दैत्यांसारखा ना देवांसारखा. मधलाच. सावळा, न काळा; न गोरा. माझं भाग्य म्हणजे, मी जिथे वाढलो ते घर वेगळं होतं. ते घर देवच श्रेष्ठ त्यांचे संस्कारच श्रेष्ठ असं मानणारं नव्हतं. माझे आईवडील देव-दैत्यांनी युद्ध न करता मिळूनमिसळून राहावं, रोटीबेटी व्यवहार करून अधिक सशक्त वीण जन्माला घालावी असं मानणार्याळतले होते. त्यामुळे मी देव घरात राहिलो तरी कधीच माझ्यावर ‘श्रेष्ठ दैवी’ संस्कार झाले नाहीत.
मी अभ्यास करू लागलो, मोठा होऊ लागलो तसं माझ्या लक्षात आलं की, खरंतर आकाशनगरीवर इतकी वर्षं देवांचं राज्य असल्यानेच, दैत्यांना दैत्य म्हणून हिणकस, गौण ठरवलं जातंय. कारण सगळी व्यवस्था ही देवांच्या दृष्टिकोनातूनच उभारण्यात किंवा रचण्यात आली आहे. आणि याच्या उलट परिस्थिती असती, म्हणजे दैत्याचं राज्य असतं तर ‘देव’ हा शब्द दैत्य या अर्थाने रूढ झाला असता. मग मी ठरवलं की, आपण शिक्षक व्हायचं आणि देव आणि दैत्यांच्या येणार्यार पिढीला या देव-दैत्य द्वंद्वातून मुक्त करण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना अधिकाधिक खुलं आणि मोकळं आयुष्य जगण्यासाठी प्रवृत्त करायचं.
म्हणूनच शिक्षण घेताना मी माझा खास विषय म्हणून ‘देव-दैत्य संस्कृती : तौलनिक अभ्यास’ असा घेतला. हा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आली की, देव-दैत्य यांच्या संस्कृती भिन्न आहेत, पण दोन्हींमध्ये काही समान धागेही आहेत. काही गोष्टी सापेक्षपणे एकमेकांना चांगल्या-वाईट वाटतात. म्हणजे खुली लैंगिक पद्धत, मांसाहार, मद्यपान, उपभोगी वृत्ती ही दैत्यांची जीवनशैली देवांना ‘अपवित्र’ वाटते, तर यज्ञ करणं, एकच एक पतिधर्म पाळणं, पण पतीने अनेक पत्नी करणं, जीवनाचा उपभोग घेण्याएवजी चिंतन-मनन करून त्याचा उद्देश शोधणं या सगळ्या गोष्टी दैत्यांना भंपक, गुळमुळीत आणि दुटप्पी वृत्तीच्या द्योतक वाटतात.
दोघांच्या राहणीतही बराच फरक होता. देव सुतापासून तयार केलेलं उत्तरीय, धोतर घालायचे, लैंगिक अवयवांसाठी वेगळं वस्त्र वापरायचे. तर दैत्य कातड्यापासून, प्राण्यांच्या फरपासून तयार केलेली वल्कलं घालायचे, दाढीमिशा वाढवायचे. एक गोष्ट मात्र त्यांच्यात समान होती. दोघंही एका अज्ञाताची, माहीत नसलेल्या शक्तीची करुणा भाकायचे. ज्याला तुम्ही परमेश्वर म्हणता ना त्याची. आकाशनगरीत एक महिन्याआड पाऊस पडायचा, चंद्र सहा महिन्यांनी आणि सूर्य सहा महिन्यांनी उगवायचा-मावळायचा. दोन्ही गणांना हे सगळं कसं होतं, कोण करतं हा प्रश्न पडायचा, पण त्याचं नेमकं उत्तर न मिळाल्याने ते या अज्ञाताची करुणा भाकायचे, आळवणी करायचे. दोन्ही संस्कृतींचं साहित्य त्याच्या आळवणीने, कल्पनेवर आधारित वर्णनाने ओतप्रोत भरलेलं होतं. ते या शक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या, युक्त्या करायचे. जेणेकरून काहीतरी शक्ती प्राप्त होऊन त्या गटाचं पारडं जड होईल.
या सगळ्याचा अभ्यास केल्यावर मी ठरवलं की, आपण एक खुली पाठशाळा काढायची. जिथे देव आणि दैत्य यांपैकी कोणालाही प्रवेश असेल. तिथे दोन्ही संस्कृतींचा अभ्यास शिकवला जाईल. प्रत्येक जण जन्माने कोण आहे यावरून ती जन्माने मिळालेली जीवनपद्धती जगणार नाही, तर स्वतः विचार करून आपली स्वतःची जीवनपद्धती शोधायचा प्रयत्न करेल, ती विकसित करण्याचा प्रयत्न करेल, स्वतःची वाट स्वतःच निवडेल. यासाठी या शाळेत त्याला उद्युक्त केलं जाईल.
माझा संभाळ करणार्याे कुटुंबातल्या ओळखीच्यांनी माझ्या मुक्त पाठशाळेच्या कल्पनेला भक्कम पाठिंबा दिला आणि हवी ती मदत करायची तयारी दर्शवली. त्यामुळे पाठशाळा सुरू झाली. या ओळखीच्यांमुळेच शाळेला विद्यार्थीही मिळाले. पण जसजशी या नव्या शाळेची माहिती लोकांना मिळू लागली, तशी संख्या वाढू लागली. त्यामध्ये काही जण उत्सुकतेपोटी आले होते, काही खरंच मनापासून पटल्याने आले होते, तर काही माझी जिरवायच्या हेतूने. पण मी माझं काम शांतपणे करत राहिलो.
देवांच्या किंवा दैत्यांच्या पाठशाळेत विरुद्ध संस्कृती कशी वाईट आहे किंवा सपक आहे हे लहानपणापासूनच रुजवलं जायचं. लहापणी द्वेषाचं बी पेरलं की, आपोआपच त्यातून हिंसा, क्रौर्याचं पीक आयुष्यभर येत राहायचं. पण मी माझ्या पाठशाळेत दोन्ही संस्कृती कशा आहेत हे वस्तुनिष्ठपणे सांगायचो. त्याच्यातले साहित्य समजावायचो. मर्मस्थळं उलगडून सांगायचो. त्यावर चर्चा घडवून आणायचो. सगळ्यांना त्यांना जे काही वाटेल ते मुक्तपणे बोलायला लावायचो.
माझ्या पाठशाळेची लोकप्रियता वाढू लागली, विद्यार्थिसंख्येत वाढ झालीच, पण वेगवेगळ्या गावांमधूनही अशीच शाळा सुरू करावी अशी मागणी होऊ लागली. मग मात्र दोन्ही गणांना ही शाळा अवघड जागेचं दुखणं झाली. कारण त्यामुळे देवांच्या सत्तेला, अधिकाराला तडे जाऊ जाणार होते. आणि दैत्यांनाही सत्ता हवी होतीच. कोणालातरी सत्तेवरून पदच्यूत केल्याशिवाय, खाली पाडल्याशिवाय, हरवल्याशिवाय सत्ता काबीज करता येतंच नाही. त्यामुळे त्यांनाही कोणीतरी विरोधी गट हवा होताच.
मी माझं काम कोणावरही टीका न करता शांतपणे करत होतो. त्यामुळेही मी लोकप्रिय होत होतो. हळूहळू का होईना, पण मला लोकांचा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे कोणत्याही गटाला माझा सहजासहजी काटा काढणं शक्य नव्हतं. आणि आकाशनगरी ही काही या पृथ्वीएवढी मोठी नसल्याने तिथे घडलेली छोटीशी घटनादेखील सर्वांपर्यंत वार्याीसारखी पोहोचायची. त्यामुळे माझा काटा काढला असता, तर लोकांचा संताप ओढवून घेणं कोणत्याही गणाला परवडलं नसतं. शिवाय मला आणि पर्यायाने माझ्या कामालाही विनाकारण प्रसिद्धी मिळाली असती. म्हणून मग मला फितवण्यासाठी त्यांनी मोहाचं अस्त्र वापरलं.
एकेदिवशी देव गणाचे प्रमुख आचार्य परमेशदास शाळेत आले. नेहमीच्या हवापाण्याच्या गप्पा, चौकश्या झाल्यावर त्यांनी थेट मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले, “अरे स्वसंवेद्य, तू इतका बुद्धिमान तरुण आपल्या आकाशनगरीतला प्रकांडपंडित, आणि काय त्या दैत्यांना मास्तुरकी करण्याचं काम करतोस? मास्तुरकी करणं तुझ्यासारख्याला शोभत नाही, तुझं आयुष्य व्यर्थ जाईल यात. तुझी गरज आहे आकाशनगरीवर राज्य करणार्याा देवांच्या महान राज्याला, श्रेष्ठ कुलीन देवप्रजेला. देवांच्या महान संस्कृतीत तू जन्मला, वाढला आणि पंडित झाला आहेस. मग ही कसली पाठशाळेची काम करतोएस. मी तुला वचन देतो की, तुला देवराज्याचा मुख्य सांस्कृतिक सचिव करण्यासाठी मी शब्द टाकेन. आणि तुला माहितीच आहे की, माझा शब्द म्हणजे अखेरचा शब्द असतो. मास्तुरकीपेक्षा तू आपल्या महान संस्कृतीवर एक ग्रंथ सिद्ध कर. सगळ्या सोयीसुविधा, निवासाची सोय होईल तुझी. तू फक्त संशोधनाचं काम करायचं आणि त्या रासवट दैत्यांचं खंडन करायचं. अरे, तुझा ग्रंथ आपण असा प्रसिद्ध करू की, त्रिखंडात तुझं नाव होईल, तुझीच चर्चा होईल ग्रहाग्रहावर!”
मी त्यांच्या बोलण्याने भारावून जाईन, त्यांची पायी लोळण घेईन असं परमेशदासांना वाटलं, पण मी शांतपणे म्हणालो, “कुठली महान संस्कृती महोदय? जेव्हा देवकुळाचा नाश होईल असं वाटलं तेव्हा दैत्यमादींच्या पोटात त्यांच्या त्यांच्या नकळत, परवानगीशिवाय बीजफलन करणारी संस्कृती महान?” पुढे म्हणालो, “आचार्य, आत्ताही काही देवांच्या रक्तामध्ये ‘ते अपवित्र’ रक्त वाहतंय, असं मी लिहिलं ग्रंथात तर चालेल? मग मी तयार आहे...”
परमेशदासांचा चेहरा रागाने लाल झाला. रागाने ते थरथरू लागले. आता त्यांनी शेवटचं अस्त्र काढायचं ठरवलं. त्यांनी डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला आणि मग धीरगंभीर आवाजात म्हणाले, “स्वसंवेद्या, मी तुला समजवायला आणि तुझं भलं करायला म्हणून आलो होतो, पण तू करंटा निघालास. आता नीट एेक, एका महान कुळात जन्मूनही संस्कृती अशुद्ध करण्याचं हीन कृत्य केल्याबद्दल आणि त्यासाठी इतरांनाही प्रवृत्त केल्याबद्दल, मी तुला शाप देतो की, देव तर नाहीच, पण दैत्यही नाही, तर त्याहीपेक्षा हीन गणात म्हणजे, मनुष्य गणात तू जाशील. पृथ्वीतलावर तू अत्यंत हीन आणि दैत्यांच्याही खालच्या दर्जाचं आयुष्य कंठशील. तुला कोणीही विचारणार नाही. तुला दिलेल्या, फेकलेल्या उकिरड्याच्या अन्नावर गुजराण करावी लागेल!”
वीज कोसळावी तसे ते शब्द होते. पण मी ते एेकले आणि पचवले. या शापवाणीने मी घाबरून गयावया करेन, असं आचार्यांना वाटलं असावं. पण मी निश्चल उभा होतो, इमारतीवर अर्थिंगची तार असते तसा. मी म्हणालो, “आचार्य, मला जे काम करायचं होतं ते आता सुरू झालं आहे. त्यासाठी मी काही भोगायला तयार आहे.”
असा मी या पृथ्वीवर आलो.
आमच्या नगरीतल्या देव आणि दैत्य गणांच्या दृष्टीने तर पृथ्वीवरचं जीवन अधिकच हीन दर्जाचं, दुःख अवहेलना यांनी भरलेलं असतं असं वाटतं. मानव संसाराच्या चिखलात लोळणारा प्राणी आहे असं तिकडच्यांना वाटत असल्याने या इथल्या माणसांना कमी लेखतात. देवांच्या मते मानवापेक्षा दैत्य बरे आणि दैत्यांच्या मते देव बरे. पण मला असं कधीच वाटलं नाही. जीवन हे बहुआयामी आणि विविधांगी असल्याने त्याला अशा श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या साचात न बसवता त्याच्या विविध अंगांचा शोध घ्यावा असं मला वाटतं. त्यामुळे पृथ्वीवरही मी स्थिरावलो. आजूबाजूचे लोक काहीतरी खायला द्यायचे, त्याबदल्यात मी त्यांचं अंगण झाडून दे, कचरा साफ कर असली कामं करू लागलो.
मला पृथ्वीवर येऊन आठवडाभर झाला असेल, तो एके दिवशी रात्री दैत्यप्रमुख दुदंती माझ्याकडे आले. मला म्हणाले, “स्वसंवेद्य, भलेबहाद्दर तुम्ही. त्या देवांची कसली मस्त जिरवलीत. बरं झालं त्या गुळमुळीत आणि मिळमिळीत देवांच्या स्वयघोषित महान गटात नाही गेलात ते.”
मी म्हणालो, “हो, पण त्याची फळंही भोगावी लागत आहेत. शाप दिलाय त्यांनी मला...”
माझं वाक्या मध्येच तोडत दैत्यप्रमुख म्हणालो, “माहित्येय, म्हणूनच तर आलोय तुम्हाला भेटायला. देवांनी दिलेला शाप काही मी निष्क्रिय करू शकत नाही, पण तो त्याविरोधात वर देऊ शकतो” पुढे म्हणाले, “नीट एेका, तुम्हाला रोज रात्री पंख फुटतील आणि त्यांच्या साहाय्याने तुम्ही अवकाशात संचार करू शकाल. आकाशनगरीत येऊ शकाल.” क्षणात माझ्या खांद्याना दोन पांढरे कोंब फुटले आणि पाहता पाहता त्याचे पंख झाले. पांढरेशुभ्र.
मग माझ्या हाती एक पेटारा देत म्हणाले, “या पेटार्या्त एक जादुई नीलगोलक आहे. हा गोळा हाती धरून तुम्ही जे काही स्मरण कराल, तेच या गोळ्यातून आवर्तित होईल, परावर्तित होईल. पृथ्वीवरचं असह्य जगणं थोडंतरी सुसह्य होईल याने.” असं म्हणून खी-खी करत हसू लागले.
मग माझा अंदाज घेत ते सूचकपणे म्हणाले, “आता तुम्ही आकाशनगरीत - म्हणजे, आमच्या पाताळ गढ्यांमध्ये येऊ शकता! देवांनी तुम्हाला हद्दपार केलं तरी आमची दारं मात्र तुमच्यासाठी सदैव खुली आहेत. तुम्हाला हवा तो अभ्यास तुम्ही करू शकता तिथे. हां, फक्त विषय दैत्यांशीच संबंधित हवा.” मग ते उत्सुकतेने माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहत माझ्याकडे पाहू लागले.
मी त्यांना शांतपणे म्हणालो, “दैत्यप्रमुख, मी तुमचा आभारी आहे. पण मला कोणतंही जीवन तुच्छ नाही आणि मला मिळालेल्या शापाबद्दल मला जराही खेद किंवा खंत नाही. कारण मी जे काम सुरू केलं आहे ते योग्यच आहे असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मला कोणत्याही एका गटात येणं मान्य नाही. आणि दैत्यसंस्कृती धुतल्या तांदळासारखी थोडीच आहे, गर्भसंहारासाठी सोडलेल्या अस्त्राबद्दल ग्रंथ लिहायची परवानगी असल्यास मी तयार आहे अभ्यास करायला...”
कोपिष्ट दैत्यप्रमुखांना माझं शेवटचं वाक्य चांगलंच झोबलं. ते फणकार्या ने म्हणाले, “मूर्ख रे, मूर्ख स्वसंवेद्या. अरे तुझ्या हातची शेवटी संधीही गमावलीस तू. आमच्यात आला असतास तर चैनीत, मजा करत राहिला असतास. आता तू ना इकडचा ना तिकडचा झालास. दैत्यसंस्कृती धुतल्या तांदळाची नाहीये म्हणतोस, दाखवतोच तुला आता या संस्कृतीचा इंगा. नीट एेक –
एकदा दिलेला वर परत घेता येत नाही, पण मी दिलेल्या वरापेक्षाही भयंकर शाप मी तुला देणार आहे आता – कोणताही मानवप्राणी तुझ्याकडे लक्ष देणार नाही. सगळेजण तुला वेडा समजतील, हीन लेखतील. आणि एक दिवस तुझा दुर्दैवी अंत होईल, तेव्हा तुझ्या जवळ फक्त एकच माणूसप्राणी असेल. तू त्याला तुझी सगळी कहाणी सांगशील, पण कहाणीवर कोणाचाही विश्वास बसणार नाही. नवा इतिहास घडवायला निघालेला तू इतिहासातलं एक न आठवणारं, अविश्वनीय पान होऊन जाशील...”
मी गाडी थांबवली. आम्ही हॉस्पिटलपाशी आलो होतो. त्याची कहाणी विलक्षण दुःखद होती. त्याच्या डोळ्यांत करुण भाव होते, एक वेदना होती आणि त्याच वेळी स्थितप्रज्ञतेची एक चमकही होती. त्याचे पंख निस्तेज झाले होते. तो क्षीणपणे म्हणाला, “आणि तूच तो माणूस आहेस, आता अंत जवळ आला आहे!”
मला त्याला सर्वप्रथम हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. त्यामुळे मी त्याच्या गोष्टीवर काही प्रतिक्रिया न देता गाडीतून बाहेर पडण्यासा आधार दिला. त्याची कहाणी सांगण्यापुरतंच बळ त्याच्याकडे असावं, कारण आता तो एकाएकी शक्तिहीन झाला होता, जणू कोणीतरी त्याची सगळी शक्ती, चैतन्य शोषून घेतलं असावं. त्याला हॉस्पिटलपर्यंत जाईस्तोवर धाप लागली. डोळे निस्तेज झाले. पंख मलूल होऊन पडले. मी काही झालं तरी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा असं ठरवलं, मग तो कोणत्याही नगरीचा का असेना किंवा शापित का असेना.
हॉस्पिटलच्या दारातून आत गेल्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी असलेल्या खुर्च्यांमधल्या एकीत मी त्याला बसवलं आणि ती थोडी कलती केली, जेणेकरून त्याला थोडं आडवं होता यावं. पण पंखामुळे ते जमत नव्हतं. तो डोळे मिटून घेत ओठ आवळत होता. मग पुन्हा छताकडे एकटक पाहत होता. जणू वेदना सहन करण्यासाठी सहनशक्ती देण्याची करुणा त्या अज्ञाताकडे भाकत असावा.
मी त्वरित आत गेलो. काउंटवर असलेल्या बसलेल्या बाईंना सांगितलं, “अर्जंट केस आहे अक्सिडंटची.” काउंटरमागे असलेल्या भिंतीवरच्या घडाळ्यात अडीच वाजत आले होते.
तिने विचारलं, “काय झालं, आणि पेशंट कुठेय?”
पेशंट बाहेर आहे आणि सिरीयस आहे. झालं असं की, एक ट्रक भरधाव येऊन पेशंटला उडवून गेला. त्याला बराच मार लागलाय – डोक्याला, पायाला आणि पंखांमधूनही बरंच रक्त वाहतंय.
तिने माझ्याकडे दचकून पाहिलं. “पंखांमधून?” मग घडाळ्याकडे पाहत शेजारच्या मुलीच्या कानात कुजबुजली, “ही मस्ट बी ड्रंकन.”
मला म्हणाली, “अहो मिस्टर, तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आला आहात. पावलं चुकली असतील तुमची इथे!” मग शेजारच्या मुलीकडे पाहून खुसुखुसु हसू लागली.
“खरंच. तुम्ही पहा हवं तर बाहेर येऊन.” मी समजावून सांगू लागलो. पण तिच्यावर फार काही परिणाम झाला नाही, ती हसतच होती. मी धावत बाहेर आलो. त्याच्याजवळ गेल्यावर त्याने माझा हात घट्ट धरला. खुणेनेच मला शेजारी बसायला सांगितलं. त्याची पकड इतकी घट्ट होती की, हातून काहीतरी सुटत असावं आणि ते घट्ट पकडून ठेवायचा शेवटचा प्रयत्न तो करत असावा. तो क्षीण झाला होता, अर्धग्लानीत होता. मला म्हणाला, “नाही ना कोणी आलं... मला माहितेय, माझी वेळ भरलीये मित्रा. आता एक एक अवयव नष्ट होईल. इतिहासाचं न आठवणारं पान...”
आणि तो सांगत होता तसंच होऊ लागलं. त्याचा एक एक अवयव हळूहळू हवेत विरू लागला. केस, मग भुवया, मग नखं, मग पंखांवरची पिसं, मग पंख... त्याची शुद्ध हरपली.
शेवटचा प्रयत्न करण्यासाठी मी आत गेलो. मला त्याला असं जाऊ द्यायचं नव्हतं. मी असहाय होतो, पण मी ते मान्य करू शकत नव्हतो. मी त्या बाईंना सांगू लागलो, “तो गायब होतोय, तुम्ही बाहेर या प्लीज.” माझा आवाज चढला होता. पण त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांच्यासाठी मी एक बरळणारा बेवडा, वेडा माणूस होतो - करमणुकीचं साधन. त्या हसत होत्या. पण आमचा आवाज डॉक्टरांना एेकू आला असावा. ते खाली येऊन म्हणाले, “काय गडबड आहे? काय चाल्लंय?” तशा मुली शांत झाल्या. म्हणाल्या, “सर, पहा हा माणूस काय बरळतोय ते, पंख काय, गायब काय...” मी डॉक्टरांना सगळं सांगू लागलो. मी दारूडा नसल्याचं त्यांना कळलं असावं. पण माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला नसल्याचं त्यांच्या चेहर्या वर दिसत होतं. मी त्यांना बाहेर येऊन पाहण्याची विनंती केली. एक-दोन क्षण थांबले आणि मग म्हणाले, “चला – ”
आम्ही बाहेर आलो. तिथे नुस्तीच एक कलती केलेली खुर्ची होती. तो तिथे होता याची एक खूण. खुर्चीवर फक्त हवा होती. मी डॉक्टरांकडे पाहत म्हणालो, “खरंच तो इथे होता. मी खुर्ची कलतीपण केली होती – ही बघा. तो इथे होता, हाफचड्डी आणि चौकड्यांचा शर्ट घातलेला, पंख असलेला माणूस... खरंच होता. खरंच.”
डॉक्टर अविश्वासाने माझ्याकडे पाहत राहिले. मी त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करत होतो. पण मला शब्द सापडत नव्हते, आणि तो गेला निसटून गेला होता.
डॉक्टर थंडपणे म्हणाले, “आय थिंक, मिस्टर तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. असं करा तुम्ही इथल्याच एखाद्या खोलीत उजाडेस्तोवर आराम करा. मग आपण बोलू... हं...”
डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर थोपटलं.
मी स्तब्धपणे त्यांच्याकडे पाहिलं, मग खुर्चीकडे. मला त्याचे शब्द एेकू आले – “इतिहासातलं न आठवणारं पान.”
हे सगळं फक्त मला आणि त्या कुत्र्याच्या पिल्लालाच ठाऊक होतं. पण त्या दिवसानंतर ते पिल्लूही मला कुठे दिसलं नाही. कदाचित तेही विरून गेलं असेल. म्हणून मी ठरवलंय की, ही कथा कोणालाच नाही सांगायची यापुढे.
खटक्.

- प्रणव
(पूर्वप्रकाशित : कालनिर्णय दिवाळी अंक 2014)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

रोचक कथानक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सहमत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडली, सुंदर वर्णन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोल.
मला तर रोज हापिसात अचानक कुठूनसा बिनमाणसाचा हात शेकहॅण्ड करतो.
कसा प्रकटतो नि गायबतो काय ठाउक.
मग मी भोजनाला पाच सात हत्ती आणि आठ दहा सूर्य वाढून घेतो.
मग शेजारी कधी अचानक एक हवेत तरंगणारे मुंडके प्रकटून ढेक्कर देते.
पण मी कुण्णालाच सांगत नै.
नैतर लोक मला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा छुपा रुस्तुम है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

छान

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही कथा ठिक वाटली. संस्कार वगैरे जाणवल्याने बहुतेक...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिवाळी अंकात वाचलेली. आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0