पावसामध्ये वसन्तसेना

संस्कृत काव्यांमधील आणि नाटकामधील अनेक प्रख्यात उतार्‍यांमध्ये शूद्रकाच्या ’मृच्छकटिक’ नाटकातील वसन्तसेना चारुदत्ताकडे जात आहे आणि वाटेत मुसळधार पाऊस तिला गाठतो हा प्रसंग आहे. वसन्तसेनेबरोबर तिची छत्र धरणारी दासी आहे पण त्या छत्राचा ह्या पावसापुढे काही उपयोग नाही. ’अंगे भिजली जलधारांनी’ अशी वसन्तसेना आणि तिच्याबरोबर असलेला विट ह्या पावसाचे वर्णन काही श्लोकांनी करीत आहेत असा हा प्रसंग. अजय चक्रवर्तींनी गायलेली मेघ मल्हार रागातील ’गरजे घटा घन कारी री कारी, पावस ऋतु आई दुलहन मन भाई’ ही चीज माझी आवडती आहे आणि मी ती वारंवार ऐकतो तशीच पुनरावृत्ति ह्या प्रसंगाचीहि करतो. त्या श्लोकांचे हे भाषान्तर - मराठीची प्रकृति सांभाळण्याच्या प्रयत्नामुळे कधी कधी काहीसे स्वैर...

विट - अपद्मा श्रीरेषा प्रहरणमनङ्गस्य ललितं
कुलस्त्रीणां शोको मदनवरवृक्षस्य कुसुमम्।
सलीलं गच्छन्ती रतिसमयलज्जाप्रणयिनी
रतिक्षेत्रे रङ्गे प्रियपथिकसार्थैरनुगता॥

कमळाशिवाय असलेली जणू लक्ष्मीच, मदनाचे मार्दवयुक्त शस्त्र, घरंदाज स्त्रियांच्या शोकाचे कारण, मदनरूपी श्रेष्ठ वृक्षाचे फूल, मीलनकालाच्या लज्जेसाठी आसुसलेली, अशा लालित्यपूर्ण पावलांनी चाललेल्या ह्या वसंतसेनेमागे रतिक्षेत्रामध्ये तिची इच्छा धरणार्‍या कामुकांचे थवे चाललेले आहेत.

विट - गर्जन्ति शैलशिखरेषु विलम्बिबिम्बा:
मेघा वियुक्तवनिताहृदयानुकारा:।
येषां रवेण सहसोत्पतितैर्मयूरै:
खं वीज्यते मणिमयैरिव तालवृन्तै:॥

विरहिणी स्त्रियांच्या हृदयाचे आकार धारण केलेले असे हे मेघ पर्वतशिखरांवर आरूढ होऊन गर्जना करीत आहेत. त्यांच्या अचानक कानावर आलेल्या आवाजाने दचकून आकाशात उडलेल्या मोरांनी आकाश जणू रत्नखचित ताल वृक्षांच्या समूहाने भरल्यासारखे वाटत आहे.

विट - पङ्कक्लिन्नमुखा: पिबन्ति सलिलं धाराहता दर्दुरा:
कण्ठं मुञ्चति बर्हिण: समदनो नीप: प्रदीपायते।
संन्यास: कुलदूषणैरिवजनैर्मेघैर्वृतश्चन्द्रमा
विद्युन्नीचकुलोद्गतेव युवतिर्नैकत्र संतिष्ठते॥

चिखलाने तोंड भरलेले आणि मेघधारांनी त्रस्त झालेले बेडूक जलपान करीत आहेत, मोर कण्ठरव सोडत आहे, मोहरलेला कदम्ब फुलत आहे, कुलकलंकांनी घेरलेल्या संन्यासी व्यक्तीसारखा चंद्र मेघांनी झाकला आहे आणि नीचकुलीन तरुणीसारखी वीज एकत्र टिकून राहात नाही.

वसन्तसेना - मूढे निरन्तरपयोधरया मयैव
कान्त: सहाभिरमते यदि किं तवात्र।
मां गर्जितैरपि मुहुर्विनिवारयन्ती
मार्गं रुणद्धि कुपितेव निशा सपत्नी॥

’मूढे, मेघांनी झाकलेल्या (पक्षी - निकटवर्ती स्तनांच्या) माझ्यासह प्रियकर रमतो ह्याने तुझे काय वाईट होते’ असे विचारणार्‍या आणि ओरडून मला बाजूस करणार्‍या रागावलेल्या सवतीप्रमाणे रात्र माझा मार्ग अडवीत आहे.

वसन्तसेना - मेघा वर्षन्तु गर्जन्तु मुञ्चन्त्वशनिमेव वा।
गणयन्ति न शीतोष्णं रमणाभिमुखा: स्त्रिय:॥

मेघांना वर्षाव करू दे, गर्जना करू दे अथवा विजेचे लोळ सोडू दे. प्रियकराकडे जाणार्‍या स्त्रिया शीत आणि उष्ण ह्यांची चिंता करीत नाहीत.

विट - पवनचपलवेग: स्थूलधाराशरौघ:
स्तनितपटहनाद: स्पष्टविद्युत्पताक:।
हरति करसमूहं खे शशाङ्कस्य मेघ:
नृप इव पुरमध्ये मन्दवीर्यस्य शत्रो:॥

वार्‍यामुळे वेगवान् झालेला, जाड धारारूपी बाणांचा ओघ सोडणारा, गर्जून ढोलाचा आवाज काढणारा, चमकणारी वीज हीच ध्वजा असलेला मेघ आकाशामध्ये चंद्राचे किरणरूपी कर हिसकावून घेतो, जसा पराक्रमात मागे पडलेल्या शत्रूच्या नगरामध्ये विजेता राजा!

वसन्तसेना - एतैरेव यदा तमालमलिनैराध्मातलम्बोदरै:
गर्जद्भि: सतडिद्बलाकशबलैर्मेघै: सशब्दं मन:।
तत्किं प्रोषितभर्तृवध्यपटहो हा हा हताशो बक:
प्रावृट् प्रावृडिति ब्रवीति शठधी: क्षारं क्षते प्रक्षिपन्॥

तमालपर्णाप्रमाणे काळ्या, वारा भरल्याने पोटे फुगलेल्या, वीज आणि बगळ्यांच्या सह असलेल्या, गडगडाट करणार्‍या ह्या मेघांनी मन व्यापलेले असतांना त्याचवेळी प्रोषितभर्तृकेसाठी वधाच्या वेळी वाजणारा जणू ढोलच असा हा करंटा आणि दुष्टबुद्धि बगळा ’प्रावृट्, प्रावृट्’ (पाऊस, पाऊस) असे किंचाळत का बरे जखमेवर मीठ टाकत आहे?

विट - बलाकापाण्डुरोष्णीषं विद्युदुत्क्षिप्तचामरम्।
मत्तवारणसारूप्यं कर्तुकाममिवाम्बरम्॥

बगळे ज्याच्या अंगावरच्या झुलीप्रमाणे प्रमाणे दिसत आहेत आणि वीज ज्याच्या चवर्‍यांप्रमणे भासत आहे असे हे आकाश मदमत्त हत्तीचे रूप धारण करीत आहे.

वसन्तसेना - एतैरार्द्रतमालपत्रमलिनैरापीतसूर्यं नभो-
वल्मीका: शरताडिता इव गजा: सीदन्ति धाराहता:।
विद्युत्काञ्चनदीपिकेव रचिता प्रासादसंचारणी
ज्योत्स्ना दुर्बलभर्तृकेव वनिता प्रोत्सार्य मेघैर्हृता॥

ह्या ओल्या तमालपत्रांसारख्या काळ्या मेघांनी आकाशातील सूर्याला गिळले आहे, त्यांच्या बाणांसारख्या धारांनी हत्ती नमून जावेत तशी वारुळे खाली बसत आहेत, प्रासादाचा अन्तर्भाग उजळवणार्‍या दिव्याप्रमाणे वीज चमकत आहे आणि दुबळ्या पतीच्य़ा स्त्रीप्रमाणे मेघांनी चांदण्याचा अपहार केला आहे.

विट - एते हि विद्युद्गुणबद्धकक्षा गजा इवान्योन्यमभिद्रवन्त:।
शक्राज्ञया वारिधरा: सधारा गां रूप्यरज्ज्वेव समुद्धरन्ति॥

विजेच्या लोळांसारख्या दोर्‍यांनी बांधलेल्या आणि एकमेकांस ढकलणार्‍या हत्तींसारखे मेघ आपल्या रुपेरी धारांनी इंद्राच्या आज्ञेवरून पृथ्वीला जणू उचलत आहेत.

विट - महावाताध्मातैर्महिषकुलनीलैर्जलधरै-
श्चलैर्विद्युत्पक्षैर्जलधिभिरिवान्त: प्रचलितै:।
इयं गन्धोद्दामा नवहरितशष्पाङ्कुरवती
धरा धारापातैर्मणिमयशरैर्भिद्यत इव॥

सोसाटयाच्या वार्‍याने फुगलेल्या, रेडयांच्या कळपासारख्या काळ्या, चमकणार्‍या विजेचे पंख असलेल्या आणि पोटातील पाण्याच्या साठयामुळे ढकलल्या जाणार्‍या मेघांच्या धारांनी ही मृद्गन्धाने घमघमणारी आणि कोवळ्या हिरव्या कोंबांनी नटलेली पृथ्वी जणू रत्नखचित बाणांनी वेधल्यासारखी दिसत आहे.

वसन्तसेना - एह्येहीति शिखण्डिनां पटुतरं केकाभिराक्रन्दित:।
प्रोड्डीयेव बलाकया सरभसं सोत्कण्ठमालिङ्गित:।
हंसैरुज्झितपङ्कजैरतितरां सोद्वेगमुद्वीक्षित:।
कुर्वन्नञ्जनमेचका इव दिशो मेघ: समुत्तिष्ठति॥

मोरांनी उंच केकारवांनी ’ये, ये’ असा बोलावलेला, त्वरेने उडून बगळ्यांकडून उत्कण्ठेने आलिंगिलेला, कमळाचा सहवास सोडावयास लागलेल्या हंसांकडून उद्वेगाने पाहिलेला असा मेघ दशदिशा काजळाने माखत वर येत आहे.

विट - निष्पन्दीकृतपद्मषण्डनयनं नष्टक्षपावासरं
विद्युद्भि: क्षणनष्टदृष्टतिमिरं प्रच्छादिताशामुखम्।
निश्चेष्टं स्वपितीव संप्रति पयोधारागृहान्तर्गतं
स्फीताम्भोधरधामनेकजलदच्छत्रापिधानं जगत्॥

ज्याची कमलवने पापण्या लवविणे थांबविलेल्या नेत्रांसारखी भासतात, ज्याच्यामधले रात्र आणि दिवसामधले अंतर नष्ट झाले आहे, चमकणार्‍या विजेमुळे ज्याचा अंधकार क्षणात नष्ट होतो आणि क्षणात दिसतो, ज्याच्या सगळ्या दिशा झाकोळल्या गेल्या आहेत असे जग निश्चेष्टपणे अनेक मेघांच्या छत्रीखाली मेघांच्या निवासामधील धारागृहामध्ये पहुडले आहे.

वसन्तसेना - गता नाशं तारा उपकृतमसाधाविव जने
वियुक्ता कान्तेन स्त्रिय इव न राजन्ति ककुभ:।
प्रकामान्तस्तप्तं त्रिदशपतिशस्त्रस्य शिखिना
द्रवीभूतं मन्ये पतति जलरूपेण गगनम्॥

दुष्टावर केलेल्या उपकाराप्रमाणे तारका विनाश पावल्या आहेत, प्रियकरापासून विरह झालेल्या स्त्रियांप्रमाणे दिशा निस्तेज झाल्या आहेत, इन्द्रवज्राच्या तेजामुळे आतून तापलेले आकाश वितळून जणू जलरूपाने खाली पडत आहे.

वसन्तसेना - उन्नमति नमति वर्षति गर्जति मेघ: करोति तिमिरौघम्।
प्रथमश्रीरिव पुरुष: करोति रूपाण्यनेकानि॥

विट - विद्युद्भिर्ज्वलतीव संविहसतीवोच्चैर्बलाकाशतै-
र्माहेन्द्रेण विवल्गतीव धनुषा धाराशरोद्गारिणा।
विस्पष्टाशनिनि:स्वनेन रसतीवाघूर्णतीवानिलै
र्नीलै: सान्द्रमिवाहिभिर्जलधरैर्धूपायतीवाम्बरम्॥

वर जातो, खाली येतो, वर्षाव करतो, गर्जना करतो, अंधकार निर्माण करतो ... हा मेघ एखाद्या नवश्रीमन्तासारखा नाना नाटके करीत आहे.
तो विजांमुळे जणू जळतो, शेकडो बगळ्यांमुळे मोठयाने हसल्यासारखा भासतो, धारारूपी बाण सोडणार्‍या इंद्राच्या धनुष्याप्रमाणे आवाज करतो, मोठया गर्जनांनी गडगडतो, सोसाट्याच्या वार्‍यामुळे डोलतो, कृष्णसर्पांसारख्या आकारांनी आकाश धुपारून सोडतो.

वसन्तसेना - जलधर निर्लज्जस्त्वं यन्मां दयितस्य वेश्म गच्छन्तीं -
स्तनितेन भीषयित्वा धाराहस्तै: परामृषसि॥

हे मेघा, तू खरोखर निर्लज्ज आहेस की जो प्रियकराच्या घराकडे निघालेल्या मला गर्जनांनी घाबरवून धारारूपी हातांनी हाताळतोस.

वसन्तसेना - किं ते ह्यहं पूर्वरतिप्रसक्ता यस्त्वं नदस्यम्बुदसिंहनादै:।
न युक्तमेतत्प्रियकाङ्क्षिताया मार्गं निरोद्धुं मम वर्षपातै:॥

अरे मेघा, मी कधी ह्यापूर्वी तुझ्यावर आसक्त झाले होते काय की तू इतका गडगडाट करीत आहेस? प्रियकराची इच्छा करणार्‍या माझा रस्ता तू आपल्या धारांनी अडवावास हे योग्य नाही.

वसन्तसेना - यद्वदहल्याहेतोर्मृषा वदसि शक्र गौतमोऽस्मीति।
तद्वन्ममापि दु:खं निरपेक्ष निवार्यतां जलद॥

ज्याप्रमाणे अहल्येसाठी ’मी गौतम आहे’ असे इन्द्ररूपी तू खोटे बोललास, त्याप्रमाणे हे मेघा, माझेहि दु:ख अपेक्षा न ठेवता तू दूर करावेस.

वसन्तसेना - गर्ज वा वर्ष वा शक्र मुञ्च वा शतशोऽशनिम्।
न शक्या हि स्त्रियो रोद्धुं प्रस्थिता दयितं प्रति॥

इन्द्ररूपी मेघा, तू गर्जना कर, पाऊस पाड किंवा शेकडो विजा चमकव. प्रियकाराकडे जाणार्‍या स्त्रियांना अडविणे तुला शक्य नाही.

वसन्तसेना - यदि गर्जति वारिधरो गर्जतु तन्नाम निष्ठुरा: पुरुषा:।
अयि विद्युत्प्रमदानां त्वमपि च दु:खं न जानासि॥

मेघ गर्जना करता असला तर करो, पुरुष निष्ठुरच असतात. पण हे विद्युत्, तुलाहि प्रमदांचे दु:ख कळू नये?

(पाऊस पाडणार्‍या आणि गरजणार्‍या मेघाला आणि त्याची सहचारिणी असलेल्या विजेला वसन्तसेना नाना दूषणे देत असतानाच बरोबरच्या विटाला चारुदत्ताचा प्रासाद विजेच्या चमचममाटामध्ये दिसतो. तिने केलेले हे साहाय्य वसन्तसेनेच्या ध्यानात आणून देऊन तो म्हणतो...)

विट - ऐरावतोरसि चलेव सुवर्णरज्जु:।
शैलस्य मूर्ध्नि लिखितेव चला पताका।
आखण्डलस्य भवनोदरदीपिकेय-
माख्याति ते प्रियतमस्य हि संनिवेशम्॥

ऐरावताच्या वक्षावरील सुवर्णरज्जु, पर्वतशिखरावर लावलेली पताका, इन्द्रगृहातील दिवा अशी ही वीज तुला प्रियतमाचे निवासस्थान दर्शवीत आहे.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

कडवं अन कडवं आवडलं. अतिशय काव्यमय वर्णन आहे. पुनःपुन्हा वाचावं असं.
तद्वन्ममापि दु:खं निरपेक्ष निवार्यतां जलद इथे आपण जलद = मेघ असा अर्थ घेतला आहे. "जलद = वेगाने" असा अर्थ संस्कृतमध्ये आहे का? असल्यास, तसा दुसराही, अर्थ इथे लागतो का?
____
हां आत्ता आठवलं अष्ट्नायिका आहेत बहुतेक ८ च. त्यातली हे रुप "अभिसारीकेचे" आहे.
अर्थात कामपीडीत होऊन स्वतः प्रियकराच्या मीलनास निघालेल्या स्त्रीस "अभिसारीका" म्हणतात.
______
सापडलं -
http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-10/9228-2013-02-23...
वासकसज्जा - आज आपला पति येणार आहे अशा इच्छेनें क्रीडागृहांत अलंकारादिक घालून जी वाट पहात बसते ती.
विरहोत्कंठिता- पतीच्या संगमाचा निश्चय असतां पति लवकर न आल्यामुळें त्याच्याकरितां जी विरहव्याकुल होत्साती उत्कंठित होते ती.
स्वाधीनपतिका - जिच्यावर पति फार आसक्त असतो ती
कलहांतरिता- कांत अनुनय करीत असतांहि त्याचा अनादर करून मागून जी पश्चाताप पावते ती
खंडिता - पति अन्यसत्रीसंमुक्त पाहून जी ईर्ष्येनें कुपित होते ती
विप्रलब्धा - कांतानें संकेतस्थळी येण्याचा निश्चय केला असतां त्याप्रमाणें तो न आल्यामुळें जी अवमानित होते ती
प्रोषितभर्तृका - जिचा पति दूरदेशी गेल्यामुळें कामदु:खानें जी व्याकुळ झालेली असते ती
अभिसारिका - गुप्त रीतीनें रति करण्यास्तव जी कांताकडे संकेतस्थळी जाते किंवा त्यास बोलाविते ती
_____
http://mishraarvind.blogspot.com/2009/11/blog-post_24.html
भरत के अनुसार नायिका के आठ भेद हैं :
किसी निश्चित समय और स्थान पर प्रियतम से मिलने के लिए जाने वाली प्रेमातुर नायिका अभिसारिका है
ऐसी नायिका की हिम्मत के क्या कहने !निर्भय ,सापो से भी घिरी मगर कितना समर्पित है वह अपने प्रेम और प्रियतम के प्रति ! राकेश गुप्त ने ऐसी नायिका की तारीफ में कुछ पंक्तियाँ यूं लिखी हैं ...
.
दो उन्नत उरोज आतुर थे
आलिंगन में कस जाने को ;
फड़क रहे अधरोष्ठ पिया के
प्रियतम के चुम्बन पाने को ;
चंचल थे पद चक्र कामिनी -
अभिथल तक पहुचाने को ;
तन से आगे भाग रहा मन
मनमोहन में रम जाने को

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

जलद - जलं ददाति - पाणी देतो तो (मेघ). (तसेच सुखद -सुखं ददाति). जलद = वेगाने हा अरबी अथवा फारसी शब्द आहे (मोल्सवर्थ.)

प्रतिक्रियेमध्ये थोडी सुधारणा. वासकज्जा नाही, वासकसज्जा. वासक = वस्त्र. ते लेऊन प्रियकरासाठी सज्ज आहे ती वासकसज्जा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद :). संपादन केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

’मृच्छकटिक’ नाटकाच्या आधारावर उत्सव हा सिनेमा गाजला होता. सिनेमा ही नाटका सारखा अप्रतिम होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१ होय सिनेमा छान होता
.
पण शेखर सुमन मला फार नाजूक वाटतो. तो काही मला रेखापुढे तितकासा आवडला नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. उपमा कालिदासस्य हे म्हटलं जातं खरं, पण शूद्रकही त्यात वाकबगार होता हे दिसून येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0