समर्थ रामदास लिखीत धवल गीताच्या अनुवादात साहाय्य हवे, आणि सुद्धा धवळे धवले आडनावांची माहिती हवी

धवले/धवळे/ धवलगीत हि प्राचीन महाराष्ट्रातील विवाहप्रसंगी गायल्या जाणार्‍या लोकगीतांची लूप्त होत गेलेली एक परंपरा होती. या परंपरेचे अवशेष आता आगरी समाज आणि इतर काही छोट्या समाजगटातून शिल्लक असावेत.

धवळे गीत प्रकारात संतांनी सुद्धा लेखन केले त्यात समर्थ रामदास लिखीत एक काव्य दिसते आहे. त्याची सुरवात

आतां राहो द्या गलबला । महादेव लग्नासि चालिला ।
पार्वतीचा विवाह जाला । कोणेपरी ॥१॥

वरील प्रमाणे आहे. ह्या काव्यातून समर्थ रामदास काही विशेष सांगू पाहात असावेत असा अंदाजा आहे पण पूर्ण काव्य समजत नाहीए तेव्हा समर्थ लिखीत या काव्याचा अनुवादकरून हवा आहे. (विकिसाठी असल्यामुळे या धाग्यास प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.)

हे काव्य ट्रांसलिटरल डॉट ऑर्ग (पुर्वाश्रमीचे खाप्रे डॉट ऑर्ग) वर उपलब्ध आहे. समर्थ लिखीत मूळ स्वरूपातील लिखीत दस्तएवज कॉपीराइट फ्री असावयास हवेत. मूळ दस्तएवजात कुणी काना-मात्रा शुद्धलेखनाचे बदल केले तरी नवीन कॉपीराईटची निर्मीती होते. त्यामुळे ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवरून पूर्ण काव्य येथे कॉपीपेस्टवणे शक्य नाही. ट्रांसलिटरल डॉट ऑर्गने काना-मात्रा शुद्धलेखनापलिकडे मूळकाव्यात काही बदल केले असण्याची शक्यता नाही त्यामुळे अनुवादावर ट्रांसलिटरल डॉट ऑर्गच्या कॉपीराइटचा प्रश्न उद्भवणार नाही.

जर कुणाच्या संग्रही समर्थ लिखीत या काव्याची मूळाबर हुकूम प्रत उपलब्ध असल्यास या धाग्यासाठी (मूळाबर हुकूम) टंकून मिळाल्यास ते सुद्धा हवे आहे.

आगरी समाजाप्रमाणे एखाद्या समाजाचे अजूनही धवळे उपलब्ध असल्यास हवे आहेत, अर्थात छोट्या छोट्या समाजांच मराठी संस्थळांवर प्रतिनिधीत्व फारस नाही त्यामुळे ते या धाग्यावरून कितपत उपलब्ध होतील या बाबत साशंकता आहे. प्राचीन गुजराथ मध्ये ढोल गीते होती आणि राजस्थान मध्ये धवले आडनावाची मंडळी काही लोकगीतांचे गायन करत असावीत असे आंतरजालावरील माहिती वरून अंदाजा येतो या संबंधानेही काही अधीक माहिती मिळाल्यास हवी आहे.

राजस्थानातील लोकगीत गायनात धवले आडनावाचे (एक की अनेक ?) दिसतात. आगरी समाजात धवले म्हणण्याचे काम मुख्यत्वे स्त्रीया करतात त्यांना धवलारनी म्हणतात. तेव्हा धवले आणि धवळे आडनावाचा धवले लोकगीत परंपरेशी काही सरळ संबंध असल्याचा कोणताही संदर्भ तुर्तास उपलब्ध नाही पण धवले आणि धवळे आडनावांबद्दल काही अधिक माहिती मिळाल्यास स्वागत असेल.

धवले लोकगीतांबद्दल सध्या आंतरजालावर उपलब्ध माहितीची दखल मराठी विकिपीडियातील धवळे या लेखात घेतलेली आहे.

*हा धागालेख विकिप्रकल्पांसाठी असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
*अनुषंगिक नसलेले आवांतर टाळण्यासाठी आभार

field_vote: 
0
No votes yet