दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५

नमस्कार,

गेल्या तीन वर्षांची परंपरा पाळत यंदाही ’ऐसी अक्षरे’च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी ’ऐसी अक्षरे’च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.

इथे दर्जेदार लेखन प्रकाशित व्हावं, नवीन वाचक-लेखकांना संस्थळाबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा, त्यातून लेखन-वाचन संस्कृतीमध्ये, लहानशी का होईना, भर पडावी असा प्रयत्न नेहेमीच केला जातो. दिवाळी अंक हा या प्रयत्नांचाच एक वैशिष्ट्यपूर्ण भाग. गेल्या अंकांत सरस लिखाण आलं, तसंच - किंबहुना त्याहूनही सरस - लिखाण यंदाच्या दिवाळी अंकात यावं अशी आमची इच्छा आहे. उत्कृष्ट दर्जाचं लिखाण करणं सोपं नाही, त्यासाठी लेखकांना कष्ट करावे लागतात. वाचकांच्या केवळ प्रतिसादांतूनच त्या कष्टाचं चीज करण्याची या माध्यमाची शक्ती आहे खरी. पण आमच्या मते तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे याही दिवाळी अंकातल्या लेखनासाठी काहीतरी मानधन देण्याची इच्छा आहे.

दिवाळी अंकासाठी येणाऱ्या लेखनापैकी सगळंच्या सगळं अंकात समाविष्ट करणं दुर्दैवानं शक्य नसतं. एखादा लेख घ्यायचा की नाही हा निर्णय लिखाणाच्या दर्जावर तर अवलंबून असतोच. पण त्या प्रकारचं आलेलं इतर लेखन, एकंदरीत अंकासाठी आलेल्या लेखांची संख्या, अंकाचं आर्थिक अंदाजपत्रक हेही निर्णायक घटक असतात. लिखाण आमच्या हाती कधी येतं हेही महत्त्वाचं ठरतं. या सगळ्या गोष्टींमुळे काही चांगलं लेखनही नाकारलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राग मानू नये ही विनंती. काही लेख काही कारणानं ’ऐसी’च्या दिवाळी अंकात घेणं शक्य नसेल, तर लेखकापाशी तो लेख दुसऱ्या अंकात पाठवण्याचा रस्ता खुला असला पाहिजे, तितका वेळ त्याच्यापाशी उरला पाहिजे - यावरही आमचा कटाक्ष असतो. म्हणून साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१५ ठेवलेली आहे. तुमचं लिखाण आमच्या हाती जितक्या लवकर पोचेल, तितका जास्त वेळ आम्हांला मिळेल. स्वीकृतीचा निर्णय घ्यायला, संस्करण करायला, शक्य झाल्यास लेखासाठी अनुरूप रेखाचित्रं-छायाचित्रं मिळवायला हा वेळ अतिशय मोलाचा आहे. तेव्हा ही तारीख कसोशीने पाळावी ही आग्रहाची विनंती.

दिवाळी अंक अधिकाधिक वाचकांना आपलासा वाटावा असा आमचा प्रयत्न दर वर्षीच असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे अंकात नेहेमीच्या लेखनाप्रमाणेच घनगंभीर(!) माहितीपूर्ण लेखन असावंच; शिवाय उत्तम दर्जाचं ललित लेखन, विनोदी लेखन, व्यक्तिचित्रं, समीक्षा, नवीन विषयांची ओळख करून देणारं, निरनिराळ्या शैलींमधलं आणि घाटांमधलं, प्रयोगशील लेखनही असावं, असं मनापासून वाटतं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लेखनाचं, माध्यमसंबंधी - घाटासंबंधी - शैलीसंबंधी प्रयोगांचं, आणि हो, रेखाटनांचं आणि छायाचित्रांचंही स्वागत आहे. सदस्यांनी काढलेले आणि त्यांना आवडलेले फोटो, चित्रं, व्यंगचित्रं दिवाळी अंकात सामील करायला आम्ही उत्सुक आहोत. आपल्या अंकावर छापील अंकांवर असणारी पृष्ठमर्यादा नाही, हा आपल्या पथ्यावर पडणारा भाग. त्यामुळे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्या चित्रफिती, संवादफिती, संगीत, चलच्चित्रं, एकाहून अनेक शे‌वटांच्या शक्यता प्रत्यक्षात आणणारं ललित... अशा सगळ्याच प्रकारच्या साहित्याचं मन:पूर्वक स्वागत आहे.

शब्दांच्या जोडीला छायाचित्रं, रेखाचित्रं, रंगचित्रं असावीत, अशी इच्छा आहे; पण आपण चित्रकार / छायाचित्रकार नाही, म्हणून घोडं अडतं, अशी अडचण असेल तर मनमोकळेपणानं संपर्क साधा. समजा, लिखाण पूर्ण झालेलं नसलं, तरीही विषयाबाबत थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर चित्रांचा अंदाजअंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल. लेख व कथांसाठी चित्रं रेखाटण्याची ज्यांची इच्छा असेल, अशा रेखाटनकारांना, चित्रकारांना आणि छायाचित्रकारांनाही आम्ही आग्रहाचं आमंत्रण देत आहोत.

आता अंकाच्या ’विशेष संकल्पने’बद्दल. दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा प्रयत्न असतो. मात्र अंकाचा आवाका त्या संकल्पनेपुरताच मर्यादित असत नाही. अंकातील सुमारे वीस-पंचवीस टक्के भाग ह्या विषयाला दिला जाईल असा अंदाज आहे. उर्वरित अंकात सर्व प्रकारचं आणि विषयांचं साहित्य असेलच.

यंदाची विशेष संकल्पना आहे ’नव्वदोत्तरी’. त्याबद्दल खाली विस्तारानं लिहितो आहोत.

दिवाळी अंकासाठी भरपूर आणि विविध लेखन पाठवा. खास संकल्पनेबद्दल लिहा, पण संकल्पनाबाह्यही लिहा. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं कृपया समजू नका. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो आहोत.

कालमर्यादा - १५ सप्टेंबर २०१५
लिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे.

लेखन लवकरात लवकर पाठवावं ही विनंती.

***

विशेष संकल्पना:

प्रत्येकच कालखंड आपापली वैशिष्ट्यं घेऊन येतो. विसाव्या शतकाचा पहिला अर्धा भाग भारताची स्वातंत्र्यप्राप्तीची वाटचाल, शहरीकरणाची सुरुवात, दोन महायुद्धं यांनी भरला होता; तर साधारण दुसऱ्या अर्ध्यासमोर स्वातंत्र्य, फाळणी, नवनिर्माणाची सुरुवात, आणि त्याचबरोबर लोकसंख्यावाढ व भुकेकंगालीला तोंड देण्यासाठीची हरितक्रांती अशी आव्हानं होती.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही काही बदल झालेे आहेत. १९९१ साली भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल झाले. त्यापुढच्या बदलांमध्ये यातून आलेल्या जागतिकीकरणाचा मोठा हातभार असल्याने बदलांचा आढावा घेण्यासाठी तो एक सोयीचा सुरुवातीचा बिंदू म्हणून पाहता येतो. आजच्या घटकेला हा बसल होऊन सुमारे पंचवीस वर्षं पूर्ण झाल्यामुळे काळाचा पुरेसा मोठा आवाकाही झालेला आहे. तर प्रश्न असा आहे की नव्वदोत्तरी काळात भारतात, महाराष्ट्रात नक्की काय बदल झाले? कसे झाले? आणि त्यातून सामान्य माणसाचं आयुष्य कसं बदललं?

बदल कुठे कुठे घडले असं विचारण्यापेक्षा कुठे घडले नाहीत, असंच विचारण्यासारखी परिस्थिती आहे, इतका व्यापक फरक आपल्या आसपास दिसतो. पंचवीस वर्षांत सातत्याने वाढलेली सुबत्ता झकपक मॉल्स, आलीशान गाड्या आणि उंची हॉटेलांमधून दिसते. घरांच्या किमती प्रचंड वाढल्या तरी त्याचबरोबर त्या परवडणारेही वाढताना दिसतात. तरीही दारिद्र्यरेषेखाली जगलं जाणारं भयाण आयुष्य शिल्लक आहेच.

तंत्रज्ञानातले बदल डोळे दिपवून टाकणारे आहेत. साठ वर्षं सरकारी टेलिफोन जेमतेम दहा-वीस टक्के लोकांपर्यंत पोचला, तर मोबाईल क्रांतीमुळे अवघ्या दहाबारा वर्षांत संपूर्ण भारत फोनमय झाला. इंटरनेटही आता गावोगावी पोचतं आहे. संवाद वाढला, त्याचबरोबर कोलाहलही. माणसामाणसातले संबंध बदलले. ते सुधारले की बिघडले?

कलाकृतींमध्येदेखील या नव्वदोत्तरी बदलांचं प्रतिबिंब उमटलं असं म्हणायला जागा आहे. मासिकं संपली, दिवाळी अंक शिल्लक राहिले. वर्तमानपत्रं बदलली, टीव्हीचा राबता वाढला. सिनेमांमध्ये आधुनिक सफाईदार तंत्र आलं - याने दर्जा सुधारला किंवा कसं हा मुद्दा वेगळा. फेसबुक आणि स्वस्त कॅमेरांमुळे चित्रांचा प्रसार झाला. फक्त शब्दांऐवजी संवादात चित्रभाषेचा अधिकाधिक शिरकाव झाला.

या सर्व विषयांवर प्रबंध लिहिता येऊ शकेल इतकी त्यांची व्याप्ती आहे. 'ऐसी'च्या यंदाच्या दिवाळी अंकासाठी थीम म्हणून हा विषय निवडताना आम्हांला याची कल्पना आहे. तरीही आज थोडंसं मागे वळून आणि आसपास नजर फिरवून दिसणारी काही चित्रं वाचकांसमोर मांडण्याचा आमचा मानस आहे. तुम्हांला हे चित्र कसं दिसतं, या बदलांचे काय परिणाम घडलेले दिसतात, येत्या काही दशकांत काय घडेल, त्याचं कल्पनाचित्र आशादायक दिसतं का काळजीलायक?

प्रतिक्रिया

मला स्वतःला तरी नव्वदोत्तरी जे इलेक्ट्रीक टूथ-ब्रश आले तो शोध फार थोर वाटतो Wink
खरच!
___
डीओडस मध्येही क्रांती घडतेय जे की आश्वासक आहे Biggrin

विषय अतिशय रोचक आहे. अर्थात याची व्याप्ती बरीच विस्तृत आहे. तरीही काही ठळक बाबींवर अतिशय दर्जेदार लेखन या अंकाच्या निमित्ताने होईल (व ते आपल्याला वाचायला मिळेल) अशी आशा करतो.

(अंकाच्या प्रतिक्षेत) ऋ

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दिवाळी अंकाची थीम चांगली आहे.
शुभेच्छा !

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

काही जणांनी विचारणा केल्याने 'लिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे.' हे पुन्हा सांगत आहोत. (व या निमित्ताने आठवण असावी म्हणून धागाही वर निघेल Wink )
ज्या ऐसीबाह्य/जालबाह्य लोकांना व्यक्तिगत निरोप म्हणजे काय माहिती नसेल त्यांच्यासाठी:
व्यक्तिगत निरोप ही ऐसीवरील सर्व सदस्यांना दिली जाणारी निरोप पाठवण्याची सोय आहे. थोडक्यात ऐसीपुरते व ऐसीवरून अ‍ॅक्सेस करता येणारे इमेल आहे.
इथे सदस्यत्त्व घेतले नसेल तर ते घेताच ही सुविधा आपोआप प्राप्त होतील.

बाकी ऐसीकरांनो, डेडलाईन जवळ येतेय. आणखी भरपूर लेखन येऊ दे! प्रत्येक लेखन विषयाशी संबंधित हवे असे अजिबात नाही.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Me aisi akshare ya side vr nvin accaunt open kele ani diwali visheshank chi date geli yachi mla khup khant vatat ahe

तुम्ही आधी मराठी तर लिवायला=टायपायला शिका Wink

खंत करत बसु नका मोहीतराव, आता एक वर्ष आहे तुमच्याकडे मराठीत टाईप करायला शिकण्यासाठी.

मराठी जाऊ द्या हो, कमीत कमी इंग्लिश ची स्पेलिंग तरी बरोबर लिहा. accaunt?

आणि ऐसी अक्षरे ही कुठली side नाही.

काय राव!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

आधी लिहीणार नव्हते प्रतिसाद साबळेसाहेबांना, पण शुचि नी लिहीला म्हणल्यावर आपल्याला लिहायला हरकत नाही असे वाटले.

Smile अनु तू लिहीतेयस का एखादा लेख दिअं साठी? तुला वाटलं तरच सांग.

प्रयत्न करा. हळूहळू सरावाने जमेल. ऐसीवर लेख लिहिण्यासाठी दिवाळीअंकच पाहिजे, असे नाही. तुम्ही एरवीपण लेख लिहू शकाल.

समजा लेखन तयार असेल तर ते देवनागरीत लिहिलेले लेखन 'ऐसी अक्षरे' या आयडीवर व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवलेत तर पुढील संवाद साधता येईल

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मागील अंकांप्रमाणे या वर्षीचा दिवाळी अंक देखिल दर्जेदार होईलच.

********
इथे फुलांना म‌र‌ण‌ ज‌न्म‌ता - द‌ग‌डांना प‌ण‌ चिरंजिविता |
बोरी बाभ‌ळी उगाच‌ ज‌ग‌ती - चंद‌न‌ माथी कुठार‌ |
अज‌ब‌ तुझे स‌र‌कार‌ ...