वैचारिक दहशदवाद

प्रा. शेषराव मोरे यांचे वादग्रस्त वक्तव्य
एक दोन नव्हे तर तीन पुरोगाम्यांचे खून करून देखील पुरोगामी विचार मरत नाहीत, हिंदुधर्मातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, इत्यादीवर पुरोगाम्यांचे हल्ले चालूच आहेत हे पाहून व्यथित झालेल्या प्रतिगाम्यांनी पुरोगामी विचार कायमचा संपविण्याचे ठरविले. चौथ्या विश्वमराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदाची सुपारी देऊन डॉक्टर शेषराव मोरे यांना अंदमानला पाठवले व सांगितले बोला. मोरेसाहेब बोलले. म्हणाले," हिंदुधर्मावरील टीका म्हणजे वैचारिक दहशतवाद. स्वतःला पुरोगामी ठरवण्याची एक युक्ती. "
एखाद्याला संपवायचे असेल तर त्याला कुत्रा म्हणा आणि गोळी मारा. त्याला दहशतवादी म्हणा आणि गोळी घाला. असे साधे धोरण आहे. डॉक्टर कुमार सप्तर्षी म्हणतात की असे काही नसून हे केवळ मार्केटवर डोळा ठेऊन केलेले मार्केटिंग आहे. २०१४ च्या निवडणुकीतील विजयानंतर परिवारातील लोकांची संख्या व उत्साह वाढला व हिंदुत्ववादी विचारावर आधारलेले मार्केट वाढले. गोदातटीच्या नरहरऋषीचे शिष्य शेषराव मोरे यांच्यावर कुरुंदकरांचे शिष्य म्हणून ‘पुरोगामी’ असा शिक्का बसला होता. म्हणून त्यांची पुस्तके परिवारातील लोक वाचत नसत. तसेच सावरकरवादी असल्याने शेषराव मोरे यांच्यावर हिंदुत्ववादी असल्याचाही शिक्का बसला होता. त्यामुळे त्यांचे मार्केट कमी झाले. थोडक्यात मोरे यांची अवस्था ‘न घर का न घाट का’ अशी झाली होती. कुरुंदकरांचे शिष्य म्हणून परिवारातील लोक त्यांना त्यांच्यात घेत नसत व मोरे हे सावरकरवादी असल्याने पुरोगाम्यांनी त्यांना वाळीत टाकले होते. चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मोरे यांना मोठी संधी मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. घाट कायमचा सोडला आणि घर मिळाले.
‘वैचारिक दहशतवाद’ ही संकल्पना मांडून मोरे यांनी दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या खुनांचे वैचारिक समर्थनच केले आहे. त्यांच्या भाषणाने परिवारातील लोक जरी जाम खुश झाले असले तरी कुरुंदकरांचे शिष्य म्हणून, तसेच सावरकारांच्या वैज्ञानिक दृष्टीकोणावर आधारित विचारांचा प्रसार करणारे एक संशोधक विद्वान म्हणून आमच्या मनातील त्यांचा बद्दलचा आदर त्यांनी दोन शब्दात धुळीस मिळवला आहे. बाळासाहेब देवरस म्हणाले होते कि भूतकाळातील लढाया वर्तमानकाळात खेळून आपण आपले भविष्य नासवू नये. हा खरा पुरोगामी विचार आहे. परिवारातील कितीलोकांना हो मान्य होईल? गाईला उपयुक्त पशु म्हणणारे सावरकर जिथे स्वत:ला सावरकरवादी म्हणवणारे लोक पचवू शकले नाहीत तिथे आपण सावरकरांचे नाव देखील घेऊ नये.

संपादकः एकच धागा दोनदा प्रकाशित झाल्याने हा धागा वाचनमात्र करत आहोत

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet