Skip to main content

वाल्मिकी रामायण - रामसेतुचे पूर्ण सत्य

[रामसेतु बाबत अनेक भ्रम पसरलेले आहे. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे वर्णन].

वाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.

आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही. रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे. आपल्या इतिहासाला भाकड कथा मानणारे, डोळ्यांवर विशिष्ट चष्मा लावलेले तथाकथित विद्वान, ज्यांच्या मते धनुषकोडी ते तलाईमन्नार (श्रीलंका) यांच्या मध्ये असणार १८ मैल लांबीच्या समुद्रात लाखो वर्षांपूर्वी प्रकृती निर्मित एक भोगोलिक संरचना आहे. या संरचनेला अडम ब्रिज किंवा रामसेतु असे ही म्हणतात. या अतिविद्वानांच्या अनुसार श्रीरामाने कुठला हि पूल समुद्रावर बांधला नव्हता. दुसरी कडे धुर सनातनी लोक म्हणतात. हाच तो सेतु आहे जो श्रीरामानी समुद्रावर बांधला होता.

रामसेतु

दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्ट हि केले नसावे. रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसाला हि सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजहि समुद्र पातळीच्या वर आहे. ५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती, त्यावेळी हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेहि भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील. काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आज पेक्षा निदान २० फूट आणिक खाली असेल. त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.

आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल. एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry) रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.

नौका मार्ग

आपल्या देशात आज हि दुर्गम भागातले ग्रामीण, पावसाळ्यात नदी किंवा नाल्यावरचा पूल वाहून गेल्यास, नदी नाल्यांवर, लाकडाचे ओंडके टाकून कामचलाऊ पूल तैयार करतात. त्याच प्रकारे श्रीरामांनीहि जंगलातील वृक्ष, लता, गवत, दगड-धोंडे वापरून एक कामचलाऊ पूल बांधण्याचा निश्चय केला. जेणे करून सैन्य समुद्र पार करू शकेल. अश्या प्रकारचे पूल बनविण्याचे तंत्र अवगत असलेल्या नील नावाच्या वानराने हे कार्य पूर्ण करण्याचा बीडा उचलला.

वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३ या वीस श्लोकांत समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले. अर्जुन, बेल, अशोक, साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून समुद्र किनार्यावर घेऊन आले. या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा. बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर घेऊन आले. किनार्यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला. श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.

वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारच्या सैन्येला उथळ समुद्रावर रामसेतुचा निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल. आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता. कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग रंगविले.

टीप: वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:

ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥

ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥

बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥

हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥

संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले. हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.

समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥

दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥

मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥

संक्षिप्त अर्थ: कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. ॥इति॥

Node read time
4 minutes
4 minutes

चिमणराव Thu, 15/10/2015 - 20:18

वानर सेनेने सेतू पूर्ण केला आणि सेनेला पटकन पलीकडे जाता आले.राक्षस आणि मारुती मात्र उड्या मारत आहोटी असतांना एकटे दुकटे गेले असावेत.
सीता स्वयंवराच्यावेळी रावण श्रीलंकेतून जनक नगरीत आला होता.इतक्या दूरवर आमंत्रणे गेली होती.बरेच चमत्कार रामायणात आहेत पण हे दैवी वर फक्त महावीरांनाच होते.सामान्य जनतेला त्यातले काही मिळत नव्हते बहुतेक.होडीवाले नावाडी,परीट वगैरे लोक कष्टाचेच जीवन जगत असावी.

पिवळा डांबिस Fri, 16/10/2015 - 00:12

तां सगलां खरां वो!
पन पटाईतसायेब, तुमी सध्याचो श्रीलंका देश हीच रामाची लंका होती आसां गृहित धरल्यासांत!
तेच्यावर पन संशोधकांचां एकमत नाय हो!
काही संशोधकांच्या मते, जल्ली ती रावणाची लंका, ती कायशिशी त्या मध्यप्रदेशात होती आसां म्हणतंत!!
आता काय करूंयांत?
:)

धनंजय Fri, 16/10/2015 - 03:42

In reply to by पिवळा डांबिस

+१ (आजचा) मध्यप्रदेश किंवा अगदी लगतचा महाराष्ट्र इतपत.

रावणपूजा गोंड जमातींमध्येच होते, बहुधा.

विवेक पटाईत Fri, 16/10/2015 - 20:01

In reply to by धनंजय

धनंजय साहेब किमान थोडे बहुत वाचावे. रावण हा ब्राह्मण होता. वेदांच्या ज्ञाता होता. तसे म्हणाल तर आपले सर्व राक्षस, वृत्रासुरा पासून ते हिरण्यकश्यपू, बळी, प्रल्हाद पर्यंत सर्व ब्राह्मण होते. आर्य अनार्य विवाद आंग्ल इतिहासकारांच्या सुपीक डोक्यातून निघालेला विचार आहे, 'फूट डालो राज करो' या साठी. त्यात काहीही तथ्य नाही. कारण भारतात आफ्रिकेतून मानव प्रथम दक्षिण भारतातच्या पूर्व किनारपट्टी वर उतरला होता. या शिवाय आज हि तेलगु, कन्नड, मराठी इत्यादी भाषिक उत्तर भारतातल्या लोकांपेक्षा संस्कृत अधिक चांगले बोलू शकतात.

आजच्या भाषेत महणाल तर रामाने (मंडल कमिशन - सर्व मागासलेले - निषाद, भिल्ल, शबर, वानर (कदाचित झाडावर राहणारे लोक वनवासी) या सर्वांना राक्षसांच्या अत्याचार पासून मुक्त केले. खालील लेख हि वाचा.
रामायण कथा - सीता

धनंजय Fri, 16/10/2015 - 20:40

In reply to by विवेक पटाईत

लिहिलेल्या मुद्द्यांचा मला उपप्रतिसाद म्हणून संबंध काय आहे?

गोंड रावणाची मंदिरे बांधून पूजा करत नाही म्हणता? मी खुद्द बघितलेली आहेत.
तुम्ही या मुद्द्याचा प्रतिवाद केला नाहीच आहे, म्हणा - पण कसलातरी प्रतिवाद केलेला आहे असे तुमच्या उपप्रतिसादाच्या सुरावरून जाणवते आहे. आणि हा तर माझ्या वरील संदेशातला एकुलता एक मुद्दा आहे.

विवेक पटाईत Sun, 18/10/2015 - 09:03

In reply to by धनंजय

गुलामी मध्ये राहणारे लोक, आपल्या मालकांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मंदिरे बांधून पूजा करू शकतात. त्यातलाच हा प्रकार आहे. शिवाय चार पिढ्यांपूर्वी अर्थात माझे पणजोबां पर्यंत गोंड राजांच्या इथे पुजारी होते....

पिवळा डांबिस Sun, 18/10/2015 - 09:21

In reply to by विवेक पटाईत

म्हणजे त्या गोंडांचे स्वामी रावणाचे वंशज होते असा मतितार्थ काढायचा का?
तसं असेल तर रावणाची लंका ही मध्यप्रदेशात होती असाच तर्क निघतोय...

अरविंद कोल्हटकर Sat, 17/10/2015 - 00:32

In reply to by विवेक पटाईत

पटाईतजी,

आर्य-अनार्य वाद, आर्य कोठून आले, असल्या विषयात शिरणे हे मोठे धाडसाचे काम आहे. जगभरचे ख्यातनाम विद्वान ह्या प्रश्नांच्या दोन्ही बाजूस उभे आहेत. ह्यात शिरण्यापूर्वी आपण ह्यात शिरावे काय हा विचार आधी करावा हे योग्य.

मानव भारतात प्रथम केव्हा आणि कोठे आला ह्याच्याशी आर्य-अनार्य वादाचा काही संबंध नाही असे मी - ह्या विषयांचा अभ्यास नसतांनाहि -सामान्यज्ञानाच्या जोरावर म्हणू शकतो कारण आर्य केव्हाहि आले असले तरी तो काळ ४-५ हजार वर्षांपूर्वी जात नाही. तो काळ हजाराच्या फूटपट्टीने मोजायला हवा. ह्याउलट मानवाचे भारतात येणे हे लाखाच्या फूटपटीने मोजले पाहिजे असे वाटते.

साहजिकच दाक्षिणात्य अधिक चांगले बोलू शकतात हे जर खरे असले - त्याबाबतहि माझी खात्री नाही - तर त्याचे कारण मानव आफ्रिकेमधून भारताच्या पूर्व - का पश्चिम? - किनार्‍यावर उतरला ह्याच्यापलीकडे कोठेतरी आहे.

धनंजय Sat, 17/10/2015 - 07:29

In reply to by मेघना भुस्कुटे

कार्यबाहुल्यामुळे आजकाल श्री. पटाइतांच्या उत्तमोत्तम लेखनाचे पुरेसे वाचन होत नाही, खरे. जितका मागे पडतो, तितके वाचन पूर्ण व्हायचा कार्यभार वाढत जातो, अशक्य होत जातो. पण तरीही प्रयत्न करतो आहे, त्यास प्रोत्साहन द्यावे. प्रयत्नांती विवेक होऊ नये, तरी पटाईत तर व्हावेच.

तिरशिंगराव Sat, 17/10/2015 - 09:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी पण एकदा कलाम साहेबांना म्हटले होते, " सर थोडाबहुत रीडिंग किजिये. "

अरविंद कोल्हटकर Fri, 16/10/2015 - 02:20

इ.स. १०५ च्या सुमारास ट्रेजनच्या Dacia मोहिमेतील डॅन्यूब नदीवर बांधलेल्या लाकूड आणि बांधकामाच्या ३७०० फुटांच्या पुलास दोन वर्षे लागली असे हे विकिपान सांगते. रामायणकथा लिहिली गेली त्याच्या काहीशे वर्षे पुढचीच ही घटना आहे. वानरांनी मात्र काही मैल लांबीचा रामसेतु मात्र रामाचे नाव घेत घेत आठवड्याभरातच बांधला हे श्रद्धाळूंनाच काय ते पटेल. मला तरी संपूर्ण रामायण हे स्वल्प ऐतिहासिक सत्यावर बरेचसे भरतकाम करून तयार केलेली गोधडी वाटते. त्याचाच हा एक भाग. समोर दिसणार्‍या भौगोलिक वास्तवावर कल्पनाशक्तीने चढवलेली झूल!

आजच्या दिवसापर्यंत रोम शहरामध्ये उभ्या असलेल्या ट्रेजन विजयस्तंभावर त्यांची सर्व Dacia मोहीम ब्राँझमध्ये ओतलेली कॉमिक स्ट्रिपसारखी पाहायला मिळते. त्यातील पुलाचे हे चित्र विकिपीडियावरूनः

Danube Bridge of Trajana

ऋषिकेश Fri, 16/10/2015 - 09:01

In reply to by अरविंद कोल्हटकर

इ.स. १०५ च्या सुमारास ट्रेजनच्या Dacia मोहिमेतील डॅन्यूब नदीवर बांधलेल्या लाकूड आणि बांधकामाच्या ३७०० फुटांच्या पुलास दोन वर्षे लागली असे हे विकिपान सांगते. रामायणकथा लिहिली गेली त्याच्या काहीशे वर्षे पुढचीच ही घटना आहे. वानरांनी मात्र काही मैल लांबीचा रामसेतु मात्र रामाचे नाव घेत घेत आठवड्याभरातच बांधला हे श्रद्धाळूंनाच काय ते पटेल.

हा तर्क अजिबात पटण्यासारखा नाही.
मुळात डॅन्यूबवर एक व्यवस्थित पूल बांधलाहोता, इथे रामायणात फक्त दगडांची वाट काढायची गरज असावी. दुसरे असे की नदीत खोलवर पाणीच होते, इथे प्रवाळाने जर पाच सहा फुटांवर टणप पृष्ठभाग असेल तर त्यावर अश्या खोल भागात नुसते दगड टाकूनही काम होणे शक्य आहे. पूल म्हणजे स्थापत्य शास्त्रानुसार अर्थ न घेता, लंकेपर्यंत जाता येईल असा मार्ग इतपत घेतला तर बरेच अर्थ लागून जातात. साधारण खालील प्रमाणे रचना ही पुरेशी ठरावी

bridge

आता मुळात रामायण हे काव्य होते, त्यामुळे त्यास मी अजून तरी इतिहास समजत नाही. मात्र (जर लंसा ही सद्य श्रीलंकाच असेल तरीही) त्या कवीने कल्पलेला पूल शक्यच नाही असे मात्र पटत नाही

Nile Fri, 16/10/2015 - 02:53

ह्या लोकांनी सेतू बांधायच्या आधी ही लंकेची मंडळी कशी ये जा करत होती? नाही शूर्पणखा नाक कापून घ्यायला लक्ष्मणाकडे आमच्या नाशकात कशी आली होती?

रावणाकडे टू सिटर एअरोप्लेन होतं म्हणतात. पण तो काय ट्राव्हल इंजन्सी चालवत असेल असं वाटतं नाही. शंकराची तपश्चर्या करण्यात अन पोरी पळवण्यात त्याचा पुष्कळ वेळ खर्च होत असणार!

नितिन थत्ते Fri, 16/10/2015 - 09:21

>>हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल. आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच.

म्हणजे आत्ता जे काय आहे तो वरिजनल रामसेतु नक्कीच नाही ना? मग तो तोडायला घेतल्यावर सनातन्यांचं आबजेक्शण का आहे म्हणे?

ऋषिकेश Fri, 16/10/2015 - 11:15

In reply to by नितिन थत्ते

तो तोडायला माझंही ऑब्जेक्शन आहे
ती प्रवाळ बेटे एकुणच स्थानिक इकोलॉजीसाठी अतिशय महत्त्वाची आहेत

नितिन थत्ते Fri, 16/10/2015 - 12:03

In reply to by ऋषिकेश

>>ती प्रवाळ बेटे एकुणच स्थानिक इकोलॉजीसाठी अतिशय महत्त्वाची आहेत

म्हणजे नक्की काय?

१९९७ च्या आसपास मुंबई पुणे एक्सप्रेसवेचे काम सुरू झाले तेव्हा खंडाळ्याच्या बोरघाटातील पक्षी/प्राणीजीवन बाधित होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. आता एक्सप्रेसवेला १२-१३ वर्षे झाली आहेत. एवढ्याकाळात तिथल्या प्राणीजीवनावर काय परिणाम झाले आहेत?

अनु राव Fri, 16/10/2015 - 12:25

In reply to by नितिन थत्ते

ऋषिकेश ( किंवा मी, ऋ ला वाईट वाटू नये म्हणुन ) आत्ता जिथे रहातो तिथे पण जंगल होते आणि तिथे वस्ती झाल्यामुळे जी स्थानिक इकॉलॉजी जी हानी झाली आणि तिथे जे ट्विस्टेड बीक डक वस्तीला होते त्याचे काय झाले ह्या काळजीने आज मला लंच जाणार नाही.

ऋषिकेश Fri, 16/10/2015 - 13:45

In reply to by नितिन थत्ते

हाच प्रश्न मी वेगळा विचारेन
आता एक्सप्रेसवेला १२-१३ वर्षे झाली आहेत. एवढ्याकाळात तिथल्या प्राणीजीवनावर काय परिणाम झाले आहेत ते कोणी मोजले आहेत का?

बाकी असली हानी गेली 'अबक'त आम्हाला डेव्हलपमेंट(!!) पायजेल! असे म्हणणे असल्यास मी निरुत्तर आहे.

नितिन थत्ते Sat, 17/10/2015 - 09:16

In reply to by ऋषिकेश

>>बाकी असली हानी गेली 'अबक'त आम्हाला डेव्हलपमेंट(!!) पायजेल! असे म्हणणे असल्यास मी निरुत्तर आहे.

असले काही म्हणणे नाही. पण हानी होईल असं म्हणण्याला काही (क्वाण्टिफाइड) बेसिस हवा ना? निदान हानी झाली की नाही याचा अहवाल आलाय का?

शिवाय प्रवाळ बेटे तुटल्याने होणारी हानी* आणि जहाजे लंकेला वळसा घालून गेल्याने खर्च होणार्‍या वाढीव इंधनाने होणारी पर्यावरणीय हानी यांची तुलना व्हायला हवी.

*यात पुन्हा प्रवाळ बेटे तुटल्याने होणारी डायरेक्ट हानी आणि मोठ्या जहाजांची वर्दळ सुरू झाल्याने होणारी हानी शेपरेटली पहायला हवी.

ए ए वाघमारे Fri, 16/10/2015 - 10:17

चांगली माहिती.

इतिहासाबद्दल बोलताना आपल्या नेहमी काही गफलती होत असतात.काही गृहीतं मनात धरून आपण विचार करत असतो किंबहुना उत्तर आधी ठरवून मग त्याभोवती हव्या त्या प्रश्नांची गुंफण आपण करत असतो.स्वत:ला वैज्ञानिक दृष्टीचे मानणारेही याला अपवाद नाहीत. यातील काही गृहीतके अशी:

०१. पुढची पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा नेहमी हुषार असते.
०२. तंत्रज्ञान हे नेहमी पुढे जात असते. म्हणजे मागच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत एकाच वेळी इफिशियंट आणि/किंवा वेगळे होत असते.
०३. ज्ञानाचा र्‍हास होत नाही. (जमिनीची किंमत नेहमी वाढतच जाते या चालीवर). वगैरे वगैरे

रामसेतू वगैरे खूप मोठ्या गोष्टी झाल्या. एक साधे उदाहरण पाहू.

उदा.पुरणाची पोळी हा एक पदार्थ घेऊ. कल्पना करा आज लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मेट्रोसिटीत एका विभक्त कुटंबात राहणारी एखादी नोकरदार मध्यमवयीन मराठी बाई आहे. या बाईला पुरणाची पोळी तयार करण्याची कृती माहीत असली तरी वेळेच्या अभावामुळे जरी ती तसे करू शकत नाही. गेली काही वर्षे ती नियमितपणे विकतच्या पुरणाच्या पोळ्या आणते. आता समजा या बाईला एक तरूण मुलगी आहे जिने कधीही आपल्या आईला पु.पो.बनवताना पाहिले नाही. मग शिक्षणाच्या निमित्ताने ही मुलगी हॉस्टेलला अनेक वर्षे राहिल्याने तिचा स्वयंपाकघराशी दैनंदिन संपर्क तुटला आहे. आता तिचे लग्न(समजा सासूस्वरूप ज्येष्ठ मार्गदर्शक महिला नसलेल्या) घरात झाले व ती नवर्‍यासोबत दूर परदेशी विभक्त कुटुंब करून राहते. आता तिला पु.पो.खावीशी वाटली तरी ती स्वत: तयार करू शकत नाही. कारण ते करण्याचे तंत्रज्ञाना(म्हणजे कृती)तिला माहितीच नाही. बाहेर ही माहीती उपलब्ध असेलही पण म्हणजेच तिच्यापुरता तरी या तंत्रज्ञानाचा र्‍हास झाला. हे उदाहरण अनेक पदार्थांना लागू करता येईल जसे सांजोर्‍या,साटोर्‍या,अनारसे असे अनेक स्पेशलाइज्ड पदार्थ. आपण आपल्या एका आयुष्यकाळातच इतक्या तंत्रज्ञानाचा र्‍हास पाहू शकतो तर मग रामायण-महाभारताची काय कथा?

दुसरे उदाहरण: आजच मोठ्या शहरांमध्ये योग्य रितीने तिरडी बांधण्याचे तंत्र माहीत असलेली माणसे दुर्मिळ होत चालली आहेत.

हा धागा व त्यावरील चर्चा वाचताना मला अमिताभच्या 'डॉन' सिनेमाची आठवण होत राहिली. त्यात अमिताभ हेलनला म्हणतो-'इस पिस्तौल मे गोलींया नही ये तुम्हे मालूम है-मुझे मालूम है लेकिन पुलिस को नही !'.

आपण सगळे पुलिस आहोत.आपल्याला काहीच माहीत नाही.असो.

बाळ सप्रे Fri, 16/10/2015 - 11:57

In reply to by ए ए वाघमारे

काळाच्या ओघात तंत्रज्ञान नष्ट झाले.. पण इतिहासमात्र जशास तसा ओरीजिनल वाल्मिकीने लिहिलेल्या रामायणाच्या रूपात उपलब्ध आहे. नाही का?
आणि तंत्र नष्ट झाले पण माकडाचे उडणे, मनुष्यांबरोबर बोलणेचालणे एवढेच नव्हे तर युद्धही करणे, एक बाइ ही जमिनीची मुलगी असणे, एक माकड हे वार्‍याचा मुलगा असणे यात कशा प्रकारचे तंत्रज्ञान असेल असे तुम्हाल वाटते?? मग इसापनीती हा देखिल इतिहासच असेल ना?? फक्त तंत्र्ज्ञान नष्ट झालं प्राण्यांच्या बोलण्याचे.. बिचारे आजच्या युगातले प्राणी !!

विवेक पटाईत Fri, 16/10/2015 - 20:05

In reply to by बाळ सप्रे

बाळ सप्रे साहेब काव्यातून सत्य समजावे लागते. कवी भूषण यांच्या कविता वाचा. (३५० वर्ष जुन्या आहेत). त्यातून हि सत्य शोधता येते.

राही Sat, 17/10/2015 - 18:29

In reply to by ए ए वाघमारे

तंत्रज्ञान नष्ट झाले असे नसून ते प्रगत झाले. गारगोटी आणि चकमकीतून ठिणगी पाडण्याचे कौशल्य आता कशासाठी शिकायचे? बैलगाड्या रथ बनवण्यात कशासाठी पारंगत व्हायचे? ट्रान्ज़िस्टर आणि वॉल्व्स च्या जमान्यात का घुसायचे? या सर्व क्रिया-प्रक्रियांमागची तत्त्वे लिखित आहेत. गरज वाटल्यास त्या क्रिया पुनरुज्जीवित करता येतील. पण संस्कृती बदलत असते. नवीन काही शोधत असते आणि जुन्याला कालबाह्य करीत असते. ज्याची जरूर नाही ते नष्ट होणे निसर्गनियमांना धरून आहे. शेपटी गेली, लांब नखे गेली, दाट लव गेली, तिसरे आतडे गेले.
काही नुकसान नाही झाले.

प्रसन्ना१६११ Fri, 16/10/2015 - 14:15

१. धनुष्यकोडीचा कस्टम पॉईंट- आपले वाहन (कार/ जीप वगैरे) इथपर्यंतच जातं.
customs pt

२. त्यापुढे स्थानिक लोकांच्या खास वाळूवर पळविण्यासाठीच्या मॉडीफाईड गाड्यांतून या जमिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत (समुद्रात घुसलेल्या तलवारीसारख्या आकाराच्या भूभागाच्या) जाता येतं.
spl veh
३. जमिनीचा शेवटचा भाग.
lands end
४. समुद्रात थोड्या दूरवर दगडांची भिंतीसारखं कांही दिसतं..(लाटांची रांग) तो रामसेतू असं सांगितलं. प्रत्यक्ष तिथंवर जाता येत नाही.
ram setu

उपाशी बोका Sat, 17/10/2015 - 06:40

हा धागा बघून मला खरंच आज अजोंची कमतरता खूप जाणवली.

अरविंद कोल्हटकर Sat, 17/10/2015 - 08:44

पटाईतजी दुसरे 'सर' होण्याकडे वाटचाल करत आहेत काय?

तसे झाले तर ते पहिल्या 'सरां'च्या बरोबर १८० अंश विरोधात असतील.

विवेक पटाईत Tue, 20/10/2015 - 19:56

प्रतिसादाबाबत सर्वांना धन्यवाद. बाकी राही ताई, सर्व जगच नश्वर आहे. रामायणानुसार पूल कसा बांधला गेला हा विषय होता. उथळ पाण्यात तसा पूल बांधणे शक्य होते. समुद्रात खोली असती तर श्रीरामांनी नौकांची निर्मिती केली असती. ते तंत्र त्या काळी अवगत होते. कथा काल्पनिक आहे कि खरी याचाशी काहीही संबंध लेखाचा नव्हता. बाकी रावणाच्या जाती आणि गोत्र या संबंधी वाल्मिकी ऋषीपेक्षा जास्त माहित कुणाला असणे शक्यच नाही. (कथा खरी आणि काल्पनिक असली तरी).