मुसव्वीर सब्जवारी यांच्या एका गझलेचा भावानुवाद

मुसव्वीर सब्जवारी यांची एक गझल वाचनात आली. बराच वेळ चिंतन करून मला लागलेला अर्थ खाली देते आहे. अन्य कोणास दुसरा अर्थ लागला तर तो वाचायलाही आवडेल. चिंतन करताना, सहज आणि प्रकर्षाने एक जाणवलेली गोष्ट ही की "थ्री इडिअटस" मधील "बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो" या व्यक्तॆचित्राच्या विपरीत पण तितकेच विस्ट्फ़ुल (हुरहुर लावणारे) व्यक्तीचित्र या गझलेत उतरले आहे. थ्री इडियटस मधील गाण्यात जिथे "वो बस आज का जश्न मनाता, हर लम्हें को खुलके जीता था वो" असे सकारात्मक आणि vivacious व्यक्तीमत्व डोकावते, तिथे सब्जवारी यांच्या गझलेतील तरुण अति भावूक (To the fault ) व हळवा आहे. या भावूक, हळव्या तरुणाची स्वप्ने पूर्ण झालेली नाहीत अशी पार्श्वभूमी खालील ओळींतून सामोरी येते.

लहू-लुहान था शाखा-ए-गुलाब काट के वो
हुआ हलाक चटानों के ख्वाब काट के वो|
........................हलाक = (कत्तल, मृत्यु)
- फांदीवरचे गुलाबाचे फूल तोडून स्वत: जखमी होणारा , कठीण स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात, स्वत:च्या अंतास सामोरा जाणारा असा तो होता. त्याला स्वप्नभंग सहन झाला नाही. मग पुढे काय होते-.

मै गुजरे वक्त के किसी आंसमां मी जीता हूं,
गया कभी का हवा की तनाब काट के वो
........................तनाब = तंबूची दोर
-मला जरी वास्तव सहन झाले नाही तरी गतकाळच्या स्मृतींमध्ये मन रमवून मी स्वत: तगलो परंतु माझ्या मित्राचे तेवढेही भाग्य नव्हते, त्याला ती तडजोडही मान्य नव्हती. त्याने वास्तवाचा सामना करण्याऐवजी वर्तमानाची दोरी कापून वाऱ्यावर निघून जाणे स्वीकारले.
थ्री इडियटसमधॆल ओळी 'सुलगती धूप में छाँव के जैसा, रेगिस्तान में गाँव के जैसा, मन के घाव पे मरहम जैसा था वो" या ओळी त्या तरुणाच्या आनंददायक अस्तित्वाचे पडसाद जिथे साजरे करतात तिथे विरुद्ध भाव दर्शविणाऱ्या अशा सब्जवारी यांच्या ओळी येतात

इसी उम्मीद पे जलती ही दश्त दश्त आंखे
कभी तो आएगा उमर-ए-खराब काट के वो|
........................दश्त = जंगल
- माझ्या मित्राच्या पश्चात या रखरखीत वाळवट झालेल्या आयुष्यात त्याची, वाट पाहून पाहून आता डोळ्यांची आग आग होते आहे. कधी तरी त्याची शिक्षा पूर्ण होउन कोणत्या तरी रुपात तो सामोरा येईल ही वेडी आशा काही सुटत नाही.

हुए खुश्क भरी दोपहर कई दरिया
इस आरजू मॆ कि रख दे सराब काट के वो|
........................सराब = मृगजळ, दरिया = नदी
भर दुपारच्या उन्हात ज्याप्रमाण नदीचे पात्र ज्याप्रमाणे कोरडे थक्क पडते त्याप्रमाणे आमच्या हृदयातील आशेचा झरा आता कोरडा पडत चालला आहे, त्याने यावे व हे मृगजळ , illusion अर्थात तो गेल्याचा जणू हा जो क्रूर भास आहे तो दूर करावा.
थ्री इडियटस च्या गाण्यामधील तरुण कसा आहे - "हम सहमे से रहते कुए में,वो नदियाँ में गोते लगाता, उल्टी धारा चीर के तैरता था वो" तर नदीच्या पाण्यात उड्या घेणारा कलंदर, डेअरा-डेव्हिल आहे. याउलट सब्जवारी यांच्या गझलेतील युवक चितारताना, नदीचाच उल्लेख येतो परंतु तो मनाला चटका लावून निघून गेला आहे- अशा स्वरुपाचा येतो.

गुजीश्ता शब से जजीरे मॆ वारदात नाही
भँवर को ले गया युं जर-ए-आब काट के वो|
........................गुजीश्ता = च्या पश्चात, जजीरा = बेट, वारदात = हालचाल, घटना, जर-ए-आब = पाण्याच्या तळाशी
जेव्हापासून नदीतील भोवरा त्याच्याबरोबर पाण्याच्या तळाशी घेउन गेला, तेव्हापासून बेटावर सर्व चिडीचूप झालेले आहे, त्या संध्याकाळपासून बेटावर चिटपाखरुही बोलत नाही, कुठे जाग नाही. मग मनात विचार येतो कवीच्या मित्राने नदीत त्याच्या जीवनाचा अंत केलेला असेल का? नदीतील भोवरा हे त्या तरुणाचे क्लिष्ट व्यक्तिमत्त्वाचे प्रतीकच आहे का?
___
खरं तर ही गझल वाचल्यानंतर कुतूहलाने त्यांच्या अधिक गझला रेख्ता वरती वाचल्या पैकी ही खालील गझलही चटका लावणारी निघाली. एकंदर शोकपूर्ण गझला या कविने लिहील्या असाव्यात या निष्कर्षाप्रत मी आले आहे. खालील गझल स्वयंस्पष्ट आहे.-

जाने मै कौन से पतझड मे हुआ था बर्बाद,
गिरते हुए पत्तोंकी इक आवाज है हर जा मुझ मे
.
कोई महकार है फूलोंकी न रंगों की लकीर
एक सहरा हूं कहीं से भी गुजर जा मुझ मे
.
टूटते जिस्म के महताब बिखर जा मुझ मे
मै चढी रात का दर्या हूं उतर जा मुझ मे
.
- मुसव्विर सब्जवारी

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

तुम्ही ह्या गज़लेतील "वो"ला मित्र मानून शेरांचा अर्थ लावला आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही केलेले रसग्रहण योग्यच आहे. परंतु उर्दू शायरीत प्रेयसीला पुल्लिंगी संबोधण्याची रीत आहे. ती अनेक गज़लांमध्ये 'ती" नव्हे तर "तो" बनून येते. सब्ज़वारी ह्यांनी त्या प्रकारे शेर रचलेत असे मानल्यास थोडा वेगळा अर्थ काढता येतो.

लहू-लुहान था शाखा-ए-गुलाब काट के वो
हुआ हलाक चटानों के ख्वाब काट के वो|

माझी (गुलाबरूपी) प्रेयसी माझ्यापर्यंत येण्याच्या प्रयत्नात फांद्यांच्या काट्यांनी (घरच्यांच्या विरोधाने) रक्तबंबाळ झाली. समाजाने तिच्यासाठी फार वेगळी स्वप्ने पाहिली होती. त्यात मी कोठेही नव्हतो. आम्हा दोघांच्या मध्ये त्या सर्वांनी उभ्या केलेल्या डोंगराएवढ्या अडचणी व अडथळ्यांना पार करण्याच्या प्रयत्नात तिचा जीव गेला.

मै गुजरे वक्त के किस आंसमां में जीता हूं?
गया कभी का हवा की तनाब काट के वो

पहिल्या ओळीत "...किसी आसमाँ..." नसून "...किस आसमाँ..." आहे. ती ओळ म्हणजे एक र्‍हेटॉरिकल प्रश्न आहे. मी गतस्मृतींच्या कोणत्या आकाशात उडू पाहतोय, जगू पाहतोय? भरारी घेणार्‍या माझ्या स्वप्नपतंगाला हवेची रसद पुरवणारी, बळ देणारी, आधार देणारी आणि तरी मला बांधून ठेवणारी दोरी ती कधीच कापून निघून गेली आहे.

हुए खुश्क भरी दोपहर कई दरिया
इस आरजू मॆ कि रख दे सराब काट के वो

हिंदीत वह/वो एकवचनी आणि वे बहुवचनी असले तरी उर्दूत दोन्हीसाठी वह/वो हाच शब्द आहे. मला वाटते ह्या शेरातील "वो" प्रेयसी/मित्र नसून "दरियां"साठी योजला असावा. भर दुपारी (पक्षी ऐन तारुण्यात) तिच्यासाठी खूप रडलो, इतका की नदीरूपी डोळे कोरडे झाले. का? तर ती परत येईल हा माझा भ्रम निदान त्या अश्रुपाताने दूर व्हावा, त्या आसवांत वेड्या आशेचे मृगजळ वाहून जावे.

गुजीश्ता शब से जजीरे में वारदात नाही
भँवर को ले गया युं ज़र-ए-आब काट के वो

गेल्या रात्रीपासून माझ्या ह्या देहरूपी बेटात काहीच हालचाल नाही, काहीच घडत नाही आहे. कालपरवापर्यंत मी निदान आशेनिराशेच्या भोवर्‍यात गटांगळ्या तरी खात होतो. रात्रभर मी तिची वाट पाहत राहिलो पण ती आलीच नाही. तिने जणू त्या भोवर्‍यालाही जलसमाधी दिली. आता ह्या बेटात शांतता आहे. स्मशानशांतता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

हा अर्थदेखिल चांगला वाटतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0