चिंतामणरावांच्या आठवणी.

चिंतामणराव कोल्हटकर हे माझे चुलत आजोबा - माझ्या आजोबांचे - हरि गणेश (तात्या) ह्यांचे धाकटे भाऊ. १९५९ साली चिंतामणराव वारले तेव्हा मी १६ वर्षांचा होतो. त्या काळापर्यंतच्या त्यांच्याविषयीच्या माझ्या वैयक्तिक आठवणी येथे नोंदवत आहे. ’बहुरूपी’ ह्या चिंतामणरावांच्या आत्मचरित्राच्या चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने लिहिला गेलेला डॉ. प्रतिभा कणेकरांचा ’ललित’च्या फेब्रुअरी २०१५ च्या अंकातील लेख माझ्या वाचनात आला. ’लेख उत्तम आहे’ असा त्याबद्दलचा माझा अभिप्राय त्यांना फोनवर कळविला असता त्यांनी अशी सूचना केली की माझ्या लहानपणच्या चिंतामणरावांच्या आठवणी मी लिहून ’ललित’कडे पाठवाव्यात.

चिंतामणराव हे माझ्या वडिलांचे काका आणि माझ्या आजोबांचे धाकटे बंधु. त्यामुळे आम्ही घरात त्यांना ’काका’ म्हणत असू कारण त्यांचे हेच घरगुती नाव सर्वत्र - त्यांच्या स्वत:च्या मुलांतहि - वापरात होते. काकांच्या मला असलेल्या सर्व आठवणी माझ्या लहानपणच्या असल्याने त्यांमध्ये त्यांच्या नाटयविषयक कार्याविषयी विशेष काही नाही कारण मला त्यातले काही कळण्याचे माझे वय नव्हते. ह्या सर्व आठवणी घरगुती वातावरणाशी संबंधित आहेत.

माझी सर्वात पहिली आणि अतिशय अंधुक आठवण म्हणजे माझ्या हातात काठी देऊन आमच्या सातार्‍यामधील घराच्या पडवीत काका मला चालायला शिकवीत होते अशी आहे. (ही आठवण असलीच तर माझ्या वयाच्या पहिल्या-दुसर्‍या वर्षाचीच असणार. इतक्या लहान वयातील आठवणी शिल्लक उरतात काय ह्याविषयी माझ्या मनात शंका आहे. अशीहि शक्यता आहे की ही आठवण माझ्या स्वत:च्या आयुष्यातील नसून कोणा अन्य धाकटया भावंडाला चिंतामणराव चालायला शिकवीत आहेत असे मी पाहिले आणि ती माझीच आठवण आहे असे मला आता वाटत आहे. चिंतामणराव कोणाला तरी असे चालायला शिकवीत होते हे निश्चित.) त्यानंतर ३० जानेवारी १९४८ च्या घटनांमुळे जे जळित प्रकरण झाले त्यात आमचेहि घर जळाले. त्यावेळी काका माझ्या आजोबांबरोबर घरासमोरच्या एका दगडावर बसून चाललेला विध्वंस पहात होते हेहि मला आठवते. (ह्या सर्व दिवसाचे मला आठवते ते वर्णन मी http://dadinani.com/capture-memories/read-contributions/major-events-pre... येथे लिहिले आहे. ज्यांना औत्सुक्य असेल त्यांनी ते अवश्य वाचावे.)

आमच्या घराजवळील आनंद सिनेमा थिएटरात काकांनी काम केलेला कोणतातरी चित्रपट लागला होता आणि तो पहायला आम्ही घरातील लोक गेलो होतो. (विश्राम बेडेकरांचा ’वासुदेव बळवंत’ निश्चित नाही, त्यात काकांनी वासुदेव बळवंतांचे आजोबा, जे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते, ह्यांचे काम केले होते.) पडद्यावर काका दिसताच मी मोठयाने ’काका, काका’ अशी हाक मारली असे माझ्या ऐकिवात आहे!

काकांची वर्षदोन वर्षांनी सातार्‍याला चक्कर असे. ते आले म्हणजे आमच्या पेठेतील गुरवांच्या मावशी, तसेच गंगूबाई शिंदे अशा म्हातार्‍या, ज्या काकांना लहानपणापासून ओळखत, आमच्या घरी येऊन जुन्या आठवणी काढत. एकदा काकांनी लहानपणची आठवण म्हणून गुरवांच्या पत्र्यावर दगड मारले. त्यामुळे गुरवांच्या मावशी ’चिंतामणि, इतका मोठा झालास तरी लहानपणच्या सवयी काही तुझ्या सुटत नाहीत’ असा खोटा ओरडा करीत आमच्या अंगणात आल्या.

सुरुवातीच्या काळात काकांनी लांब केस राखले होते असे आठवते. त्यांना जेवणात उडदाचे घुटे, वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी फार आवडायची आणि ते आले म्हणजे ह्या गोष्टी घरात हमखास व्हायच्या. १९५६ किंवा १९५७ साली सातार्‍यात नाटयसंमेलन झाले. वि.स.खांडेकर अध्यक्ष आणि काका स्वागताध्यक्ष होते. त्या प्रसंगाने खांडेकरांना काकांनी आमच्या घरी संध्याकाळी जेवण्यास बोलावले होते तेव्हा हाच बेत केला होता. त्यावेळी केशवराव दाते आणि के.नारायण काळे (बहुधा) उपस्थित असल्याचे स्मरते.

माझे आजोबा आणि काका दोघेहि विडया ओढत पण एकमेकासमोर विडी न ओढण्याचे जुने पथ्य दोघेहि पाळत. काकांची एक खास डनलोपिलो मऊ उशी होती. ती प्रवासातहि त्यांच्याबरोबर असे. ती उशी मांडीवर घेतलेले काका आणि माझे आजोबा समोरासमोर गादीवर बसून गप्पा मारत आणि आम्ही मंडळी आसपास बसून त्या गप्पा ऐकत असू. अशाच गप्पा काका आणि त्यांचे मित्र मामा वरेरकर ह्यांच्या ६४ कृष्णनिवास, १ली गल्ली, हिंदु कॉलनी ह्या काकांच्या राहत्या जागेत चालत असत. उशीवरून आठवले. माझी एक आतेबहीण उषा लहान असतांना एकदा काका तिला ’उशा, गाद्या, गिर्द्या, तक्के, लोड’ असे म्हणत खेळवत होते.

काका आणि बाबूराव पेंढारकर हे दोघे मिळून ५०च्या दशकात काही नाटके आयोजित करत असत. त्यामध्ये ’झुंझारराव’हि होते. त्यात झुंझारराव - स्वत: बाबूराव आणि कमळजा - स्नेहप्रभा प्रधान अशी पात्रयोजना होती. स्नेहप्रभाबाईंचा आणि आयोजकांचा काही वाद असावा असे वाटते. सातार्‍यात एका रात्री हत्तीखान्याजवळील चित्रा टॉकीजमध्ये हा प्रयोग चालू असतांना रात्रीचे १२ वाजले. स्नेहप्रभाबाईंच्या कराराचा तो शेवटचा दिवस होता. कराराची मुदत संपताच मेकअप उतरवून नाटक चालू असतांना बाई कोणास न सांगता निघून गेल्या. इकडे उरलेले नाटक शिल्लकच आणि नायिकाच गायब! मोठीच आपत्ति उभी राहिली. नाटक अर्धा-पाऊण तास खोळंबून राहिले. अखेर कमळजेचा खून झालेला आहे येथे एकदम उडी मारून आणि बिछान्यावर पांघरुणाखाली एक बाहुली ठेवून उरलेले नाटक पार पाडण्यात आले. ह्या वेळी मी वडिलांबरोबर प्रेक्षक म्हणून उपस्थित होतो म्हणून मला हा सर्व प्रसंग चांगला आठवत आहे. लगोलग उषा कर्वे (ह्यांना ’लावण्यवती’ अशी उपाधि होती) ह्यांची योजना स्नेहप्रभाबाईंच्या जागी करण्यात आली. त्यांच्या काही तालमी आमच्याच घरी मधल्या खोलीत झोपाळ्यावर बसलेले काका घेत आहेत असे चित्र मला आठवते.

काकांची पुण्यप्रभावमधली ’वृंदावन’, भावबंधनमधली ’घनश्याम’ अशी गाजलेली कामे पाहण्याची संधि आम्हाला मिळाली नाहीच कारण ही नाटके करणारी आणि कोल्हटकर-मंगेशकर-कोल्हापुरे ह्यांच्या मालकीची बलवंत मंडळी माझ्या जन्माआधीच बंद पडलेली होती आणि आर्थिक चिंता, कोर्टकचेर्‍या काकांच्या मागे लागल्या होत्या. पण १९५५-५६ च्या सुमाराला विलेपार्ल्यामध्ये एका उत्सवी प्रयोगात त्यांची गाजलेली राजसंन्यासमधील ’साबाजी’ची भूमिका पाहिल्याचे स्मरते. मंडळी बंद झाल्यावर कधीकधी काका इतरांच्या नाटकांच्या तालमी घेत असत. त्याची एक आठवण माझे काका नाटककार बाळ कोल्हटकर (बाळकाका) ह्यांनी मला अनेकदा सांगितली आहे. आपल्या उमेदवारीच्या काळात बाळकाका नाटयक्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत होता आणि कोठेतरी त्याला भावबंधनातील कामण्णा करण्याचे निमंत्रण आले. तालीम घेत होते काका. त्यांनी बाळकाकाचे बोलणे आणि अभिनय दोनतीनदा पाहिला आणि त्याला म्हणाले, "बाळ, तू माझ्या आवाजात बोलतो आहेस. तसे करू नकोस, तुझ्या स्वत:च्या आवाजात बोल!"

काकांच्या ’बहुरूपी’चे ह,वि.मोटे ह्यांनी प्रथम प्रकाशन १९५७ मध्ये केले तेव्हा समीक्षकांकडून पुस्तकाचे फार कौतुक झाले. आत्मचरित्र म्हणजे ’आपण कसे बरोबर आणि इतरांचे काय चुकले ह्याचा काथ्याकूट’ हा मार्ग काकांनी सोडला. त्यांच्याहि आयुष्यात वादाचे प्रसंग आलेच होते पण त्यातील एकाचाहि उल्लेख न करता काकांनी आपल्या नाटककारांचे स्मरण करवीत आपला नाट्यप्रवास वाचकांपुढे उभा केला ह्यामुळे पुस्तक प्रशंसेला पात्र ठरले. दि.धों.कर्वे संपादित ’The New Brahmins: Five Maharashtrian Families' हे पुस्तक University of California, Berkeley ह्यांनी प्रकाशित केले त्यात काकांच्या ’बहुरूपी’मध्ये दिसलेल्या कोल्हटकर कुटुंबाचाहि आढावा घेण्यात आला. आपल्या थोरल्या बंधूंना - म्हणजे माझ्या आजोबांना - काकांनी आपल्या स्वाक्षरीने भेट म्हणून पाठविलेली ह्या पुस्तकाची प्रत अजून माझ्या संग्रहामध्ये आहे. ह्या पुस्तकाला १९५७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यासाठी काका दिल्लीस गेले होते. त्यावेळी त्यांनी समारंभासाठी म्हणून उत्तर हिंदुस्तानी पद्धतीची घट्ट तुमान आणि लांब कुडता शिवून घेतला होता असे मला आठवते. ह्याच्या पुढच्याच वर्षी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून ललित कला अकादमीचे पदकहि राष्ट्रपति राजेन्द्रप्रसाद ह्यांच्या हस्ते मिळाले. तदनंतर काही दिवसांतच वयाच्या ६८व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

सातारा गावात जुन्या म्युनिसिपालिटीकडून शाहू रंगमंदिराकडे जाणार्‍या रस्त्याला काकांचे नाव देण्यात आले होते आणि तशी पाटीहि लावण्यात आली होती. माझ्या आठवणीनुसार ते नाव आता अडगळीतच गेल्यासारखे आहे. इतकेच नव्हे, तर ह्या गोष्टीची विस्मृति झाल्यामुळे दुसर्‍याच कोणाचे नावहि त्याच रस्त्याला दिले गेले आहे असे वाटते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

आठवणी खूप आवडल्या. ५/५ *
.

काकांच्या ’बहुरूपी’चे ह,वि.मोटे ह्यांनी प्रथम प्रकाशन १९५७ मध्ये केले तेव्हा समीक्षकांकडून पुस्तकाचे फार कौतुक झाले. आत्मचरित्र म्हणजे ’आपण कसे बरोबर आणि इतरांचे काय चुकले ह्याचा काथ्याकूट’ हा मार्ग काकांनी सोडला. त्यांच्याहि आयुष्यात वादाचे प्रसंग आलेच होते पण त्यातील एकाचाहि उल्लेख न करता काकांनी आपल्या नाटककारांचे स्मरण करवीत आपला नाट्यप्रवास वाचकांपुढे उभा केला ह्यामुळे पुस्तक प्रशंसेला पात्र ठरले. दि.धों.कर्वे संपादित ’The New Brahmins: Five Maharashtrian Families' हे पुस्तक University of California, Berkeley ह्यांनी प्रकाशित केले त्यात काकांच्या ’बहुरूपी’मध्ये दिसलेल्या कोल्हटकर कुटुंबाचाहि आढावा घेण्यात आला. आपल्या थोरल्या बंधूंना - म्हणजे माझ्या आजोबांना - काकांनी आपल्या स्वाक्षरीने भेट म्हणून पाठविलेली ह्या पुस्तकाची प्रत अजून माझ्या संग्रहामध्ये आहे. ह्या पुस्तकाला १९५७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यासाठी काका दिल्लीस गेले होते. त्यावेळी त्यांनी समारंभासाठी म्हणून उत्तर हिंदुस्तानी पद्धतीची घट्ट तुमान आणि लांब कुडता शिवून घेतला होता असे मला आठवते. ह्याच्या पुढच्याच वर्षी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून ललित कला अकादमीचे पदकहि राष्ट्रपति राजेन्द्रप्रसाद ह्यांच्या हस्ते मिळाले

वा! अतिशय भाग्यवान आहात आपण की असा बौद्धिक वारसा लाभला आहे.
.
स्वगत -
* खरं तर जिथे श्रेणी/तारका दान पद्धत अपारदर्शक (hidden) ठेवलेली आहे तिथे आपणहून "हो मी ५/५ देते" असे सांगणे थोडे "चापलुसी/मस्का पॉलिश" केल्यासारखे वाटते. पण तरी मी बरेचदा सांगते. ते एक असोच जे आवडले नाही ते मुद्दाम सांगत अजिबात नाही - कारण कॉन्फ्लिक्ट नको. Sad
पण या दोन्ही गोष्टी "Too eager to please" अ‍ॅटिट्युड दाखवितात. ते एक बदलायचे आहे. प्रयत्न करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आठवणी आवडल्या.आमच्याकडे नाटक पहाण्याची कोणास आवड नव्हती परंतू आजीचं माहेर बेळगावचं ती काही नाटक कंपन्यांचा उल्लेख करायची.नाटक कंपनी बुडाली म्हणजे काय हे मला लहानपणी फारच कुतुहल वाटायचं. इथे लेखातला नायिकेने रात्री बाराला निघून जाण्याचा प्रसंग वाचून गम्मत वाटली.करारमदारचे पालन,अगदी तोंडी पैज ठरली तरी त्याचे पालन करण्यातला काटेकोरपणा ( हा शब्द घड्याळाच्या काट्यांवरून आला का? )ब्रिटिशांकडून समजला.सिनेमा माध्यमामुळे संगीत नाटकाला उतरती कळा लागली बहुतेक..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. तटस्थपणे आणि 'जसे आहे तसे' पद्धतीने लिहिला आहे तेही आवडले. 'बहुरूपी' फार पूर्वी वाचले होते. बालवयातल्या त्या टप्प्यावर मराठी रंगभूमीविषयी कुतूहल वाटत असे (हिंदी चित्रपट्सृष्टीचा सुवर्णकाळ उलटून गेला होता तरी ती तशी तेव्हाही बहरलेलीच होती पण त्याविषयी फारसे आकर्षण तेव्हा वाटले नाही खरे. उलट हिंदी चित्रपटांच्या इतिहासात म्हणजे सहगल, काननदेवी, देविका राणी, हिमांशु रॉय, प्रमथेशचंद्र बरुआ, रायचंद बोराल, पंकज मलिक, मधुबाला, गुरुदत्त, दिलीप कुमार वगैरे इतिहासात मन रमे. आणि याला कारण म्हणजे बाबुराव पटेल यांच्या 'फिल्म इंडिया'चे अनेक जुने अंक घरी साठवलेले होते. त्या गुळगुळीत, रंगीत चित्रांचे जास्त आकर्षण वाटे.)आणि ते शमवण्यासाठी रंगभूमीसंबंधित अनेक पुस्तके वाचली गेली. 'मखमालीचा पडदा' आणि बहुरूपी आवडल्याचे आठवते. नंतर वाचनाची दिशा बदलली आणि या पुस्तकांचे वाचन पुन्हा झाले नाही.
या लेखाच्या निमित्ताने त्या काळाला उजाळा मिळाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच! ललितमधला लेख वाचायला मिळेल का आंजावर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

माझे आजोबा आणि काका दोघेहि विडया ओढत पण एकमेकासमोर विडी न ओढण्याचे जुने पथ्य दोघेहि पाळत.

त्यामध्ये ’झुंझारराव’हि होते. त्यात झुंझारराव - स्वत: बाबूराव आणि कमळजा - स्नेहप्रभा प्रधान अशी पात्रयोजना होती. स्नेहप्रभाबाईंचा आणि आयोजकांचा काही वाद असावा असे वाटते. सातार्‍यात एका रात्री हत्तीखान्याजवळील चित्रा टॉकीजमध्ये हा प्रयोग चालू असतांना रात्रीचे १२ वाजले. स्नेहप्रभाबाईंच्या कराराचा तो शेवटचा दिवस होता. कराराची मुदत संपताच मेकअप उतरवून नाटक चालू असतांना बाई कोणास न सांगता निघून गेल्या. इकडे उरलेले नाटक शिल्लकच आणि नायिकाच गायब! मोठीच आपत्ति उभी राहिली.

आत्मचरित्र म्हणजे ’आपण कसे बरोबर आणि इतरांचे काय चुकले ह्याचा काथ्याकूट’ हा मार्ग काकांनी सोडला. त्यांच्याहि आयुष्यात वादाचे प्रसंग आलेच होते पण त्यातील एकाचाहि उल्लेख न करता काकांनी आपल्या नाटककारांचे स्मरण करवीत आपला नाट्यप्रवास वाचकांपुढे उभा केला ह्यामुळे पुस्तक प्रशंसेला पात्र ठरले.

माझ्या आठवणीनुसार ते नाव आता अडगळीतच गेल्यासारखे आहे. इतकेच नव्हे, तर ह्या गोष्टीची विस्मृति झाल्यामुळे दुसर्‍याच कोणाचे नावहि त्याच रस्त्याला दिले गेले आहे असे वाटते.

एकदम रोचक माहिती. अगदी डोळ्यासमोर घडत आहे सगळे, असे वाटले. लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.
काही स्थानिक संदर्भ ओळखीचे असल्याने जास्त आवडला...

सातारा गावात जुन्या म्युनिसिपालिटीकडून शाहू रंगमंदिराकडे जाणार्‍या रस्त्याला काकांचे नाव देण्यात आले होते आणि तशी पाटीहि लावण्यात आली होती. माझ्या आठवणीनुसार ते नाव आता अडगळीतच गेल्यासारखे आहे.

तिथे मीही एक तसा उल्लेख असलेली जीर्ण झालेली पाटी माझ्या लहानपणीच पाहिल्याचे मला आठवते, आता तिथे आहे कि नाही हे पहावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0