काही नाती काही रात्री

मागच्या एका तासात कॉफी पिता पिता त्याने तीन वेगवेगळ्या कॅटलाॅग मधल्या किमान शंभर मुलींचे फोटो नजरेसमोरून घातले होते. फोटो, त्यापुढे नाव , त्याखाली वय , खाली उंची, त्याखाली पगार. अगदी ते लहानपणी W W E चे कार्ड्स कसे यायचे त्यावर कसे ते फोटो आणि मग त्या खाली बाकी आकडेवारी अगदी तसंच. अर्थात त्या खाली ज्या आकडेवाऱ्या द्यायचे, चेस्ट, बायसेप्स वगैरे त्या इथे दिल्या तर… असा एक तद्दन अॅडल्ट विचार त्याच्या मनात आलाच. कॉफी संपली, त्याने आळस दिला आणि सुट्टा मारायला म्हणून निघाला. एकंदरच हे लग्नासाठी मुलगी शोधणे प्रकरण फारच डोक्यात जायला लागलं होतं. सिगरेटच्या धुरासोबत त्याचे विचार हलके हलके होत भूतकाळात जायला लागले. आपले क्रश, प्रेम , आकर्षण असे वेगवेगळे ‘tags’ दिलेल्या मुली त्याला आठवू लागल्या. आज इतक्या वर्षांत मुलगी निवडण्यासाठीचे आपले निकष बदललेत याची त्याला जाणीव झाली.
तो घरी आला. घरात आल्या आल्या आईने नवीन एका वधू-वर सूचक संस्थेचा फॉर्म त्याच्याकडे दिला. सवयीने त्याने फॉर्म भरायला सुरुवात केली. एका प्रश्नापाशी येउन तो थांबला. “Did you have any past relationship?” “Are you virgin ?” चायला इतके प्रश्न तर जनगणनावाले, आधारवाले , गेला बाजार रेशन कार्डवाले सुद्धा विचारत नाहीत. बरं हे दोन्ही प्रश्न एकमेकांना लागून. म्हणजे relationship आणि virginity यांचा इतका जवळचा संबंध आहे असं वाटतं कि काय ह्यांना.
त्या प्रशानंभोवती तो फिरत राहिला. तिचे निरोपाचे काही शब्द आठवले त्याला. ती म्हणालेली “कसंय सुजय, There is a difference in liking someone, loving someone and marrying someone. तुला हे जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर आपण एकमेकांतून मोकळे होऊ.” बस्स. इतकंच बोलून आणि MS करण्यासाठी USA ला जाण्याचा निर्णय सांगून तिची आवडती कॉफी तशीच अर्धवट सोडून ती निघून गेली होती. इतक्या सहज?? इतक्या सहज निघून जावं तिने? तो एकटाच कॉफी शॉप मध्ये बसून राहिला. त्याला आठवलं बरोब्बर एक वर्षापूर्वी ह्याच मुलीसोबत त्याने आयुष्यातलं पहिलं स्मूच केलं होतं. त्याला नेहमी वाटायचं की स्मूच म्हणजे फटाक्यांच्या लडीतल्या सगळ्यात पहिल्या फटाक्यासारखं आहे. एकदा तो पेटला कि मग अक्खी लड धगधगत फुटते. ‘uncontrolled events’ सारखी. त्या रात्री ते त्याला पटलं. काही रात्रींमध्ये अख्खं नातं घडवण्याची ताकद असते. पण मग एक वर्षात सारेच अंदाज आणि प्रत्येक हिशोब चुकत गेला. एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याच्या शपथा हवेत विरल्या आणि ती US ला निघून गेली.
त्या गोष्टीलाही आता ४ वर्षं होतील. या चार वर्षांत तो सेटल झाला. २ ‘onsite’ ट्रीप, ७ आकडी पगार आणि नुकताच बुक केलेला नवीन flat. आणि आता लग्नासाठी मुली शोधायची गडबड. ती गेल्यानंतर काय बदललं काय नाही याचा धांडोळा त्याने कधी घेतला नाही. पण तिच्यासोबतच्या त्या पॅशनेट रात्रीनंतर त्या दोन प्रश्नांची उत्तरं त्याच्यासाठी कायमची बदलली होती.
“Did you have any past relationship?” – YES
“Are you virgin ?” – NO
त्याने फॉर्म पूर्ण भरून लिफाफ्यात बंद केला. लिफाफा आईला देत म्हणाला,,”हे घे, उद्या जाउन त्या वधू-वर सूचक केंद्रात देऊन ये.”
“तुम्ही वेगवेगळ्या ccd मध्ये एकाच व्यक्तीसोबत जाउन कॉफी पीत असाल तर तुम्ही प्रेमात असता पण जर तुम्ही एकाच ccd मध्ये वेगवेगळ्या व्यक्तींसोबत जाउन कॉफी पीत असाल तर नक्कीच तुम्ही लग्नाळू आहात असं समजायला हरकत नाही…” आज ज्याला पाहणार तो बाविसावा मुलगा. काहीना आपण नाकारलं काहींनी आपल्याला. ह्या सगळ्या प्रवासाचा साक्षीदार एकच. चांदणी चौकातल ccd.
संध्याकाळी ६ ची हिंजवडीहून निघालेली बस पावणेसात ला बरोब्बर ccd च्या मागच्या अंगाला सोडते. तिथून चालत ५ मिनिट बस्स. ७ ची वेळ व्यवस्थित पाळता येते. कंपनीच्या पार्किंगमधून तिने बस पकडली. कानात हेडफोन्स घातले आणि एकाच वेळी तिच्या कानात गाणं आणि डोक्यात विचार घुमू लागले.
तुमचा भूतकाळ तुमची पाठ सोडत नाही. तुम्ही त्यात गुंतून राहिलात तर वर्तमान आणि भविष्य या दोन्ही काळांचे L लागतात. हे वाक्य आयुष्याच्या व्याकरणाला अगदी योग्य दिसतं. भूतकाळातून बाहेर पडण्यासाठी तिने २ अफ़ेअर केली आणि मग वैतागून विवाह संस्थेचा अर्ज भरला आणि एकवीस लोकांना reject करून आज बाविसाव्याला भेटायला निघाली होती.
देवांग तिच्या आयुष्यातला पहिला पुरुष. चार वर्षं सोबत राहून मग ते वेगळे झाले. कारणं तशी बरीच. तिला वाटायचं त्यांचं प्रेम सगळ्याला पुरून उरेल. तसं काही झालं नाही. त्यानंतर गेल्या तीन वर्षात २ पुरुष येउन गेले. तापलेल्या जमिनीला शांत करायला पाउस येतो ना… अगदी तसेच. प्रेम, कमीटमेंट यावरचा तिचा विश्वास पाचोळ्यासारखा उडून गेला मागच्या तीन पावसाळ्यांत. इतका कि ज्या नात्यात प्रेम हा शब्द नसेल ते कुठलही नातं स्वीकारायला ती तयार होती. तिलाही तिच्यासारखाच कुणीतरी हवा होता. बस थांबली. ती उतरली आणि ccd पर्यंतच्या पाच मिनिटात सारे प्रश्न आणि उत्तरं यांची रिविजन झाली. मनातच. बाविसावा जे काही विचारेल ते “एकवीस अपेक्षित” मधूनच असणार याची तिला खात्री होती.
बरोब्बर सातच्या ठोक्याला ते समोरासमोर बसले.
” मी सुजय.”
” मी सानिका”
“वाह. सुजय सानिका शुभविवाह छान वाटेल न ऐकायला”
ती हसली आणि म्हणाली “शुभविवाह या शब्दात छान वाटेल असं काय आहे मित्रा…”
त्याने चमकून वर पाहिलं. तिच्या नजरेला नजर मिळवली. इतक्या स्पष्ट शब्दांमागच्या नजरेतली व्याकुळता त्याने सहज टिपली.
“मला म्हणायचं होतं आपली नावं छान वाटतील. शुभविवाह वगैरे बघू नंतर.”
ती हसली. हा “एकवीस अपेक्षित” वाटत नाही तिच्या मनाने हे टिपलं आणि त्यांच्या गप्पा खुलल्या. दीड तासांनी दोघेही उठले. तो म्हणाला, ” चल, तुला तुझ्या रूमपर्यंत सोडतो.
ती कारमध्ये बसली. दीड तास प्रचंड गप्पा मारणारे दोघे आता प्रचंड शांत होते. तिच्या रुमजवळ कार थांबली. ती उतरली दरवाज्याजवळ थांबली. त्याने काच खाली केली. ती म्हणाली,”Thanks.… क्षणभर थांबली आणि त्याच्या नजरेला नजर देऊन म्हणाली, “प्रेमावर विश्वास आहे तुझा? ” तो क्षणभर थांबला आणि म्हणाला,” माझा फक्त विश्वास आहे आजच्या क्षणावर. बस्स.” त्या क्षणात त्याच्या नजरेत दाटलेली व्याकुळता तिने सहजपणे टीपली. “चल येते” इतकं म्हणून ती निघाली.
रूमवर पोहोचली आणि आईला फोन केला. “आई, त्या ‘शुभमंगल’च्या ब्रोशर मधल्या आठव्या पानावरच्या खालून दुसर्या मुलाशी मी लग्न करतेय”
फोन ठेवून ती गच्चीत आली. आणि मोठ्ठ्या मोठ्ठ्या थेंबांचा पाउस तापलेल्या जमिनीवर आसुस्ल्यागत कोसळू लागला.
तिच्याकडून होकार आला तेव्हा तो जरा हडबडलाच. प्रेम, शुभविवाह या गोष्टींवर विश्वास नसलेली मुलगी एका भेटीत होकार देईल कशी अशी साधी सरळ शंका त्याच्या मनाला स्पर्शून गेलीच. त्याला वाटलं या शंकेचं निरसन करून घ्यावंच पण मग त्याला जाणवलं, अनेकदा प्रश्न विचारून, उत्तरं शोधून आणि नको इतकी 'Clarity'घेऊनही शेवटी नाती तुटतातच. त्यापेक्षा काही प्रश्नांची उत्तरं, ते न विचारताच मिळालेली चांगली. तिच्या होकारात त्याने हो मिळवला आणि दोन्ही घरं तयारीला लागली.

लग्न ही कन्सेप्ट अजूनही तिच्या पचनी पडत नव्हतीच. नाइलाज म्हणा किंवा गरज म्हणा किंवा पहिल्या भेटीत मिळालेली आश्वस्तता म्हणा तिघांपैकी काहीतरी एक असावं ज्यामुळे तिने लग्नाला होकार दिलेला. तिचं तिलाच अजूनही काळात नव्हतं कि नक्की कुठल्या कारणाने तिच्या होकाराला ठामपणा आला. ''Wedding Planner"ने सुहागरात्रीसाठी सजवलेल्या बेड वर बसून तिच्या मनात असे असंख्य विचार येत होते. आपण लग्न का केलं याचं ठोस उत्तर तिला अजूनही मिळत नव्हतं. जगरहाटी नाकारण्याची हिंमत नव्हती म्हणून? निव्वळ एक मानसिक आणि कौटुंबिक गरज म्हणून ? की फक्त "Marriage is legitimate form of sex" इतका प्रक्टिकल विचार करून. तिला प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती आणि आज न उद्या तो हे प्रश्न विचारणारच याचीही तिला खात्री होती.

विचारांचा असा खेळ तिच्या मनात चाललेला असतानाच तो आत आला. सजवलेल्या बेडवर तिच्या बाजूला येउन बसला. काही क्षण प्रचंड शांततेत गेले. त्या शांततेचा भंग करत त्याने विचारलं, "मग, आता काय ? " निर्विकार चेहऱ्याने ती म्हणाली, "पुन्हा, तेच…" तो हसला. म्हणाला, "लग्नाची सोय त्यासाठीच तर केलेली असते." तिला काही सुचेना. ती म्हणाली, "म्हणजे तू पण फक्त त्याच गरजेसाठी लग्न केलंस?" तो शांतपणे म्हणाला, "नाही. Marriage is legitimate form of sex इतकं भयंकर मत नाहीये माझं." ती जराशी चपापली आणि जराशी हसली, म्हणाली, "पण मग तू काही माझं पहिल प्रेम वगैरेसुद्धा नाहीयेस". तो जरासा गंभीर झाला आणि म्हणाला,"हो ते ही खरंच. आपण काही एकमेकांचं पहिलं प्रेम वगैरे नाही. खरंतर दुसरं किंवा तीसरही नाही. पण आपलं लग्न तर पहिलं आहे ना". ती हसली म्हणाली "ते ही खरंच." "आणि प्रत्येक नवीन गोष्ट करून बघायचीच हा अट्टाहास आपल्या दोघांमध्ये आधीपासून आहेच." या त्याच्या वाक्यावर आणि त्यातल्या गर्भितार्थावर ती मनापासून हसली.

त्या रात्री फार प्रश्न न विचारता त्या दोघानाही बरीच उत्तरं मिळाली. फारशी 'Clean' नसली तरी त्यांच्या नात्याची सुरुवात तर नक्कीच झाली होती. कारण काही रात्रींमध्ये नाती घडवण्याची ताकद असते.

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

लग्न टिकेल असे वाटले. अगदी बरोब्बर हवी तितकीच साम्ये व फरक आहेत.
.
त्याचे व्यक्तिचित्र जास्त आवडले. तिचा युटिलिटेरीअन अ‍ॅप्रोच पटला नाही. पूर्वी वाटत असे असे सेक्स चे ऑन-ऑफ (बायनरी) बटन नसतेच रादर ते एक अ‍ॅनॅलॉग (अर्थात कंटिन्युअस) फन्क्शन आहे. पण सारखं ऐकून ऐकून वाटू लागले आहे कदाचित मी चूकही असेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलंय!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0