ब्लॅक मिरर

संकल्पनाविषयक

ब्लॅक मिरर

लेखिका - मस्त कलंदर

साधारण प्रत्येक पिढी ही पुढच्या पिढीच्या कमनशिबाबद्दल हळहळत असते. आजोबांच्या पिढीला बाबांच्या पिढीत तालमी आणि शुद्ध हवा नाही असं वाटलं असेल, तर बाबांची पिढी 'काय ही कार्टी सतत संगणकात डोकं खुपसून बसलेली असते!' म्हणून करवादत असेल. 'विज्ञान: शाप की वरदान?'ची चर्चा तर बरीच जुनी आणि दोन्ही बाजूचे पाठीराखेही तितकेच. या सतत मोबाईल्स, टॅब्ज, गेम्स, सोशल नेटवर्किंग या गोष्टींमध्ये गुंतलेल्या आजच्या पिढीला पुढच्या पिढीच्या भविष्याबद्दलही असंच काहीसं वाटत असेल, नाही का?

भविष्यात काय घडेल यावर आजवर कुणी भाष्य केलं नाही असं नाही. साय-फाय सिनेमे तर पूर्णपणे यावर बेतलेले. पण त्यात लोकांना अशक्यप्राय गॅजेट्स, VFXच्या करामती याच्यातच रस. तो भविष्यकाळ असेलही, पण तो बराच बेगडीपणावर जाणारा. त्यात ते नेहमीचं अमेरिकेवरचं संकट आणि कुणीतरी तिथे हल्ला करायला येणार आहे, त्यांना वाचवणं असलं काही आलं म्हणजे अर्धा-एक तास नुसत्या तांत्रिक करामतीच पाहायला लागतात. खरोखरीचं भविष्यातलं जग कसं असेल, याचा वेध घेण्याचा एक प्रयत्न म्हणजे "ब्लॅक मिरर". आपल्यासारखीच हाडा-मासांची माणसं, जी प्रेम करतात, त्यांना राग येतो, चिडतात, वैतागतात आणि पुढच्या काळातल्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत समाजात राहतात. यांच्या जीवनमानाचं हे चित्रण. तर ही "ब्लॅक मिरर" २०११च्या डिसेंबरात चालू झालेली ब्रिटिश टीव्ही मालिका. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनचे मिळून सातच भाग प्रसारित झाले आहेत. प्रत्येक भाग ही एक वेगळी कथा आहे. एकुणात गाभा हा बदलतं तंत्रज्ञान, त्यानुसार बदलती जीवनशैली, मानवी स्वभाव आणि जीवनमानावर परिणाम असा आहे. राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे मानवी स्वभावात असणारच. पूर्वीही होते आणि पुढेही असतीलच. या सगळ्याला बदललेल्या तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यानंतर जे होईल ते आणखी भयावह असणार आहे. नक्की कसं ते या मालिकेच्या प्रत्येक भागात दिसतं.

मालिकेतला एक मुद्दा आहे मिडियाने आपल्या आयुष्यावर अतिक्रमण करण्याचा. खरंतर तसं व्हायला किंवा जाणवायला भविष्यात डोकावायची गरज नाहीय. आताही बातम्यांत तेच ते असतं म्हणून बातम्या जरी टाळल्या तरी सोशल नेटवर्किंग साईट्समधून जे जगात चालू आहे, ते आपल्यापर्यंत झिरपत राहतं. इतकंच काय पण आजकाल सीसीटीव्हीमधून चित्रित झालेले गुन्हेही कोणत्याही लालफितीत न अडकता आपल्यासमोर येत आहेत. मिडिया ट्रायल हे त्याचंच भावंड. "The National Anthem" भागात 'आपण नको तितके या पडद्यांना डोळे चिकटवून बसल्यामुळे आपल्या हातून किती महत्त्वाचं काही निसटून जातंय, याची लोकांना आणि शासनालाही कशी कल्पना येत नाही' हे आपलं मत एकजण सिद्ध करून दाखवतो. ते करण्यासाठी त्याने योजलेला मार्ग अनपेक्षित आणि किळसवाणा असला तरी सगळेजण तो पाहत राहतात. त्यामुळे काही आयुष्यं दुभंगतात आणि त्यातही काहीजण इतकं होऊनही "झालं ते झालं, पण आपला स्वार्थ साधला गेला ना?" यात समाधान मानतात. आता हे विधान सिद्ध करण्यात तो मनुष्य यशस्वी होतो. पण मग कदाचित त्याला स्वतःलाच हे सत्य पचवणं अवघड जातं की काय, की तो आत्महत्याच करतो. वास्तविक पाहता त्याच्या या विधानापासून आपण खूप दूर आहोत, असंही नाही. थोडं डोकं ठिकाणावर असलेले लोक आसपास आहेत, पण नसणाऱ्यांचीच संख्याही कमी नाही. पण म्हणजे विचारवंतांनाही आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अशा उपायांचा आधार घ्यावा लागत असेल अन त्यातून काही चांगलं फलित येणार नसेल, तर अशा जगाची कल्पनासुद्धा नको वाटेल. इतर गोष्टींच्या वेगाचा अंदाज काढता येतो, पण ही परिस्थिती उद्भवायला अजून किती वर्षांचा अवधी आहे हे ठरवणं अवघड आहे. इथे आश्चर्यकारकरीत्या न्यूज चॅनेल्स संतुलितपणे या प्रकरणाला सामोरं जाऊ पाहतात, पण आंतरजाल आणि सोशल मिडिया त्यांचे प्रयत्न हाणून पाडतात. खरंतर ही कथा एकुणातच सोशल मिडिया या माध्यमाचं अतिक्रमण आणि त्याची व्याप्ती दाखवते. ही तंत्रज्ञानाची माणसावर कुरघोडी असण्यापेक्षा ती सोशल मिडियाची अधिक वाटते. "The Waldo moment"मध्येही अगदीच सोशल मिडिया नाही, पण मग कार्टून्स आणि त्यांचा लोकांवरचा प्रभाव दाखवला आहे. कॉमेडी शोज फक्त दूरचित्रवाणीपुरते मर्यादित न राहता राजकारण किंवा लोकाच्या आयुष्यात जातात, तेव्हा ते निखळ विनोदी राहतीलच याची शक्यता नाही. मग ते उभं केलेलं कॅरॅक्टर श्रेष्ठ की ते साकारणारा माणूस?, हा देखील प्रश्नच.

ब्लॅक मिरर

ही मालिका जुन्या संकल्पना नवीन साच्यात कशा येऊ शकतात यावरही भाष्य करते. "Fifteen Million Merits" या भागात भविष्यातली कुठल्यातरी काळातली वेठबिगारी चित्रित केलीय. याही लोकांकडे स्वतःच्या मालकीचं काहीच नाही, शब्दशः काही नाही. अगदी नावसुद्धा. फक्त एक बिछाना मावेल इतकी लहान खोली, बस्स. दिवसरात्र मेहनत करून आभासी गुण मिळवत राहणंच यांच्या नशिबी आहे. या गुणांमधूनच त्यांची उपजीविका चालते. गरजाही माफक आहेत त्यामुळे ही मिळकत पुरी पडावी. पण त्यातही एक गोची आहे. तिथल्या धनकोंनी त्यांना सक्तीचं मनोरंजन दिलंय आणि ते न पाहण्याची मुभातर नाहीच, उलट दंड म्हणून मिळवलेले गुणच देऊन टाकावे लागतात. डोळेझाक, निघून जाणं हेदेखील मार्ग खुंटलेले. अशा वेळेस काय होतं, हे इतिहासात सांगितलंच आहे. त्यांच्यातलाच एकजण मसीहा बनून याविरुद्ध पेटून उठतो आणि होतं काय, तर तोच त्या व्यवस्थेचा भाग बनून जातो. त्याची 'नाही-रे'ची दशा बदलून तो 'आहे-रे' गटात जातो आणि रोज तशीच पेटून उठण्याची नाटकं करतो. एकीकडे गुलाम जनता त्याच्यावर प्रेम करते, आपल्याकडचे बहुमूल्य गुण देऊन त्याच्या आभासी वस्तू विकत घेते. दोन्हीकडून, भावनिकरीत्या आणि आर्थिकरीत्या चाललेली फसवणूक त्या गुलामांच्या लक्षात तर येतच नाही आणि त्यांना नायक जवळचा वाटत राहतो. माणसानं आपलं इमान विकावं यात नवीन ते काहीच नाही. भविष्यातही ते बदलेल याची शक्यता नाही. फक्त त्याच्या तऱ्हा बदलत राहतील, पण फसवणुकीला अंत नसावा. ही कथा तशी प्रातिनिधिक आणि तिची आपल्याभोवतालची उदाहरणं काही कमी नाहीत. त्या अत्यंत कृत्रिम आणि यंत्रवत जगातही वर्णव्यवस्था, नाडले जाणाऱ्यांकडून खालच्या श्रेणीच्या लोकांना लाथाडलं जाणं हेदेखील चालूच राहतं. थोडक्यात भेदाभेद, फसवणूक आणि मूल्यं या गोष्टी मात्र तितक्याच अबाधित राहू शकतील अशीच शक्यता अधिक दिसते.

काही कथा बदललेल्या तंत्रज्ञानामुळे जीवनशैली कशी बदलली जाईल, हे दाखवतात. एका भागात शरीरात स्मृती साठवण्याचं तंत्र आहे, दुसरीत डोळ्यांच्या माध्यमातून आंतरजालावर वावरायचं, तर तिसरी आपल्याच मेंदूच्या पेशी वापरून तिच्याद्वारे आपल्याच प्रतिमेकडून काही करवून घेण्याबद्दल. एका कथेत तर एखाद्या व्यक्तीची खरीखरी प्रतिकृती बनवून तिच्या अस्तित्वाचा अभाव नाकारण्याचा प्रयत्न दिसतो.

विस्मरणाचं अस्तित्वच शरीरात मेमरी चिप बसवून नाकारलं तर कदाचित घडलेली प्रत्येक गोष्ट "Re-do" करता येणं सहज शक्य आहे. पण वेळप्रसंगी त्यात लपवाछपवीची भानगड करताच यायची नाही. "The Entire history of you" या भागात ज्या प्रकारे हे "Re-do" पुन्हा पुन्हा दाखवले जातात, त्यामुळे त्या नायिकेच्या मन:स्थितीशी प्रेक्षक रिलेट करू शकतो. त्यांच्या जुन्या आठवणी दाखवताना बुब्बुळं आकुंचन पावणं इ.इ. जे चालू आहे ते फारसं सुखदायक प्रकरण नाही, हे जाणवून देण्यास पुरेसं ठरावं. आठवणी अमर्यादपणे साठवून ठेवणं आणि इतरांसोबत वाटून घेणं सहज आणि सोपं झालं तरी त्यामुळं अडचणी वाढण्याचीच शक्यता अधिक. कदाचित अशा वेळेस अशा मेमरी चिप्स शरीरात नसण्याने स्वच्छंद आयुष्य जगता येणं, या गोष्टींना 'कूल पॉईंट्स' मिळतील. कुणी सांगावं, असा अतिरेक नाकारणाऱ्या लोकांमुळे नात्यांमधला एक मानवी अंश शिल्लक राहायला मदत होईल.

"Be right Back" ही पहिल्या सीझनची शेवटची कथा. मृत पतीचं तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आभासी सानिध्य मिळवणाऱ्या पत्नीची. आताही फेसबुकवर काही लोक आपल्या सुहृदांचे प्रोफाईल चालवतातच की. तेव्हा अशी अपेक्षा असणं आणि तशी सोय निर्माण होणं हेही ठीकच. यानंतर मात्र तिला आभासी प्रतिमेतल्या मर्यादा आणि त्यातला कृतकपणा लक्षात येतो. तंत्रज्ञान खूप चांगल्या दर्जाचा आभास निर्माण करू शकतं पण एका जिवंत व्यक्तीची उणीव भरून काढू शकणार नाही. प्रतिमा तयार करणं आणि फक्त संवाद साधणं इतपत ठीक आहे; पण एखाद्या जिवंत व्यक्तीचा वावर, त्यातला सच्चेपणा आणि जिवंतपणा हे साधणं कदाचित आवाक्याबाहेरचं ठरेल. अॅडा लवलेसने एकोणिसाव्या शतकात म्हटलं होतं की पूर्णपणे स्वतंत्रपणे विचार करणारे संगणक बनवणं अशक्य आहे. इतक्या वर्षानंतरही ते विधान अजून खोटं ठरलं नाहीय. यावर अद्ययावत तंत्रज्ञानाकडेही काही उपाय असेल किंवा नाही, हे सांगता यायचं नाही.

या नव्या जगात डोळ्यांतच तंत्ररोपण करून त्याद्वारे आंतरजालावर बागडता आलं तर? एक होईल की, नको त्या लोकांना प्रतिबंधित करता येईल. "White Christmas" या कथेत दाखवल्याप्रमाणं मग डोळ्यांतूनच एखाद्या व्यक्तीला ब्लॉक केलं तर एकमेकांसाठीचं अस्तित्वच नाहीसं होईल. फक्त तुमच्या जागी तुमच्या पांढऱ्या आकृत्या दिसतील. मुले-बाळे, जुन्या फोटोंमधले अस्तित्वही एकमेकांसाठी नाहीसं होईल. खूप मोठा गुन्हा केलेल्या व्यक्तीची लाल आकृती दिसत राहते आणि परिणामी तिला सगळ्यांकडून प्रतिबंधित करण्यात येतं. थोडक्यात वाळीत टाकण्याचा प्रगत प्रकार. कदाचित सध्याच्या वाळीत टाकण्यापेक्षा दिसायला सभ्य पण खरंतर आणखी जास्त क्रूर. तुम्हाला कुणी मनुष्य दिसत नाही, जगाच्या पाठीवर तुम्ही कुणाशी संवाद साधू शकत नाही अशा परिस्थितीत जगणं अधिक दुरापास्त. हो, जर का पत्र लिहून त्यांच्या पत्त्यावर धाडायचं म्हटलं की मात्र शक्य आहे. नव्या तंत्रात हाताने पत्र लिहिणं अगदीच जरी कालबाह्य असलं तरी शेवटी तोच एक शेवटचा मार्गही असू शकतो. याच भागात ते आणखी एक प्रकरण आहे - कुकी. यंत्रात ठेवलेली आपलीच एक मेंदूपेशी. म्हणजेच मेंदूची एक डिजिटल आवृत्ती. आतलं वातावरण हवं तसं आभासी किंवा नॅनोकळफलकाचंही असू शकतं. ती आपलीच असल्यानं तिला मूळ व्यक्तीची सारी स्मृती आणि माहिती असेल, पण त्याचसोबत तिला विचारशक्तीसुद्धा असेल. साहजिकच मग कोणत्याही कारणासाठी का असेना, पण अशा कोंडवाड्यात राहायला ती तयार होणार नाही. मग हे तंत्रज्ञान विकसित करणारे त्या कुकीचा मानसिक छळ करतात. अखेरीस ती कुकी हतबल होईल आणि तुम्हाला शरण येईल. कदाचित हे एक प्रकारचे गुलामच, ज्यांचं तंत्र पैशांच्या जोरावर विकत घेतलं जाईल आणि त्यांच्या मनाचा विचार न करता मानसिक छळ करून त्यांना, आपल्याला हवे ते करण्यास भाग पाडले जाईल. यात तसं पाहता तोटा कुणाचाच नाही, पण तरी या प्रकाराचं समर्थन करावं की कसं हा प्रश्न येतोच. या कुकींकडून गुन्हेगारांचा कबुलीजबाब घेता येऊ शकतो तसेच वाईट लोकांच्या हाती पडल्यास त्यामुळे आणखीही विपरीत गोष्टी नक्कीच घडू शकतात.

ब्लॅक मिरर

यानंतरचा भाग मात्र थोडा कल्पनातीत आहे. आता फेसबुक आणि ट्विटरवर लोक न्यायनिवाडे करतात, त्या काळात कदाचित रीतसर न्यायसंस्थाच काही गुन्हेगारांना काव्यगत न्याय म्हणून लोकांच्या हाती देतील. तो न्याय कदाचित मूळ गुन्ह्याहून तितकाच किंवा अधिक अमानुष असू शकेल. लोकांना त्याचं काहीच न वाटता जर आनंद वाटत असेल, तर नक्कीच नीतिमूल्यं आणि मानवी भावनांचा काहीतरी घोळ आहे हे नक्की. या "White Bear" कथेत नक्की असं का होतंय याचा उलगडा न होणं, तो होता-होता तिचा राग येणं आणि मग पूर्ण खेळ समजल्यावर तिची कीव येणं; हे पटापट होत जातं. गुन्हेगारांचं वर्तन शिक्षेयोग्य हे मान्य. पण मग तिला सरधोपट शिक्षा न देता अशी मानसिक-शारीरिक शिक्षा देणारे हे आयोजक आणि त्या न्यायनिवाड्याच्या खेळात सामील झालेले लोक कोण? जर गुन्हेगाराला त्या प्रकारचा गुन्हा करताना पाझर फुटला नाही, तर त्याहूनही पलीकडे तशीच शिक्षा देऊन तिची अंमलबजावणी करणाऱ्यांची नैतिक पत ती काय? आणि या गोष्टीचं रंजक भांडवल करून त्यावरती पैसे मिळवणं, हे तर पशूंच्या पलीकडचं वर्तन!

संकल्पना आणि त्यांचं सुंदर चित्रण हे या मालिकेचं बलस्थान. उगीच अकारण VFXचा मारा किंवा प्रगत जगातल्या अचाट आणि अतर्क्य गोष्टी, यांना व्यवस्थित फाटा देऊन त्यांना खरेपणाशी जवळीक साधणारा इफेक्ट दिलाय. "द नॅशनल अँथम"मध्ये काही विशिष्ट वेळी वापरलेली काळी-करडी-पांढरी रंगसंगती किंवा "फिफ्टीन मिलियन पॉईंट्स"मधला काळ्या रंगाचा मुक्तहस्ते वापर, हे खूप छान साधलं गेलंय. अवतार्स, डिजिटल भिंती आणि टीव्हीवरच्या प्रतिमा असोत किंवा 'रिअॅलिटी शो'मधलं चकाकणारं मृगजळ; या सर्वांना त्यांच्या रंगांच्या वापराने वेगळाच अर्थ मिळाला आहे. "The Entire History of You"मधले "रि-डू"ज डोक्यात जातात. कदाचित ज्यांचे अप्रिय रि-डूज दाखवायला भाग पाडले गेले असेल, त्यांचीही हीच भावना असू शकेल. अर्थात हा भाग थोडा प्रेडिक्टेबल आहे. साधारण तंत्राची माहिती कळताच, 'छे:, असलं काही नसलं तरच बरं' अशी भावनाही पटकन मनात येते. "बी राईट बॅक" मध्ये सुरुवातीलाही काय चाललंय कळत नाही. प्रथम सहानुभूती, मग घडणाऱ्या असंबद्ध गोष्टींमुळे उडणारा गोंधळ, मग शेवटाकडे सगळ्याचा उलगडा आणि मग हे खरोखरी नैतिकतेच्या चौकटीत बसतं का?, असा प्रेक्षकाचा प्रवास घडत जातो. सर्वसमावेशक विचार करता, "बघा, बघा तुमचा भविष्यकाळ कसा काळाकुट्ट आहे!" असा आरडाओरडा न करता या सगळ्या कथा, त्यांना काय म्हणायचंय ते फक्त मांडून जातात. त्या प्रत्येकाचा अन्वयार्थ वेगळा असू शकतो. या साऱ्या कथा सरधोपटपणे न दाखवता बहुतेकांमध्ये त्यांची रहस्यं हळूहळू उलगडत नेली आहेत. आपण आडाखे बांधत राहतो आणि नेमक्या शेवटच्या क्षणी, आपला शेवटचा आडाखा आणि त्याची मालिकेतली उकल एकाच वेळी येते. खूप तार्किक आणि तरीही गोळीबंद कथा-पटकथा, या दोन्ही गोष्टी इथे चांगल्या जमून आल्या आहेत.

म्हटलं तर प्रगती पण आणखी विचार करता सदसद्‌विवेकबुद्धी आणि संवेदनांपासून दूर नेणारं तंत्रज्ञान. ज्याची भलावण सहजी-सोपी नाही पण ती अपरिहार्यदेखील आहे, अशा समाजाची चुणूक या मालिकेत दिसते. यातलं काही आत्ताही आसपास घडतं आहे आणि काही गोष्टी होऊ घातल्या आहेत. कदाचित त्या नवीन जगाला सामोरं जायला, विचार करायला भाग पाडणारी ही मालिका. एकंदरीत इतिहास पाहता नवीन बदलाला माणूस सहज सरावतो. "काय सतत ते मोबाईलमध्ये डोकं घालून बसायचं?" अशी विचारणारी पिढीही आताशा व्हॉटसअॅप आणि फेसबुकमय झालीय. त्यामुळे असं काही पुढे घडलंच तर तेव्हाची पिढी त्या बदलाससुद्धा आपलंसं करेल. फक्त यातून पुन्हा एकदा विचार आणि कृतींमधून हा मानव आपल्या पूर्वजांकडे वाटचाल ना करो, हीच सदिच्छा.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

सहा महिन्यापूर्वी डाऊनलोड करून ठेवली होती , नुकतीच पाहिली ही सिरीज

एपिसोड संपताना एक अनामिक अस्वस्थता मनावर गारुड करते

पहिला भाग तर अचाटच आहे .............
व्हाइट बेअर पाहू शकलो नाही , अशक्य होते पहाणे , घृणा वाटली माणसांची
बी राइट देअर चांगली वाटली.

परीक्षणाबद्दल आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

वा! बदलते जग आणि बदलती नैतिकता यांचसोबत बदलते तंत्रज्ञान आणि त्याचा माणसांवर शक्य परिणाम अशी थीम असणार्‍या या मालिकेबद्दलचे कुतुहल वाढले आहे.

परिचयाबद्दल आभार! लेख आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रचंड रोचक आहे हे! पाहायला पाहिजे. परीक्षणही आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या मालिकेबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. खूपच इंटरेस्टिंग आहे. कुठे मिळेल बघायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टॉरेन्ट बाबा की जय हो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

दुर्दैवाने अशा मालिका पाहण्याचे काही कायदेशीर मार्ग निदान भारतात तरी उपलब्ध नाहीत. तेव्हा टोरंट्स मिळवून त्या डाऊनलोड करणे हाच उपाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

पाहत आहे. सातपैंकी चार भाग बघून झाले आहेत. पण मधेच येऊन परिचयाबद्दल आभार मानणं आवश्यक वाटलं.

एका चित्रपटाची आठवण होणं क्रमप्राप्त आहे : 'हर'. तद्वत नंदा खरे यांच्या 'उद्या'ची आठवणही होणं क्रमप्राप्तच आहे.

पण त्याबद्दल नंतर, सगळं पाहून झाल्यावर. तूर्तास - फारच थंड-चपखल-योजनाबद्ध-भयानक मालिका. सॉरी, मला तशीही विशेषणं उधळण्याची खोड आहे. सध्या तर मी ऐन मालिकेच्या मधोमध - तर - असो.

यांतला सर्वांत अंगावर येणारा भाग हा की - यांतलं तंत्रज्ञान कोणत्याच प्रकारे अशक्य वाटत नाही. सगळी तांत्रिक 'प्रगती' अगदी सहजशक्य, माणसाच्या आवाक्यातली वाटते आणि समोरचं भविष्यही एकदम येऊन शेजारच्या खुर्चीत बसेल नि खांद्यावर हात ठेवून दचकवून टाकेल इतकं जिवंत, खरं वाटायला लागतं. एका अर्थी ते जिवंत आहेही. आपण आजही या गोष्टी जगतोच आहोत. फक्त, जत्रेतल्या एखाद्या विचित्र आरशांसमोर उभं राहून आपल्यातली एखादीच खोड वा लकब प्रमाणाबाहेर मोठी होताना बघावी आणि दचकायला व्हावं, तसं काहीतरी ही मालिका करते आहे.

तरी नशीब - नशीब - ही मालिका आहे. एका भागात एकच तंत्रज्ञान आणि एकच संकल्पना आणि एकच गोष्ट. आजच्या - आणि कदाचित उद्याच्या वा परवाच्याही - जगात हे सगळं एकसमयावच्छेदेकरून (असणार) आहे - आणि खेरीज लोकांचा त्या तंत्रज्ञानाला असलेला अ‍ॅक्सेसही.

***

आपल्याकडे टीव्हीवर काय बनवतात? 'अस्मिता' आणि 'होणार सून मी त्या घरची'. आपण रानटी आणि आदिमच अवस्थेत आहोत, नो डाउट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मालिकेतचा पहिलाच भाग बघितला आणि काल ग्रंथालयातून 'हर'ची डीव्हीडी आणली. असा सरळ विचार केला नव्हता, पण झालं खरं.

पण मधेच येऊन परिचयाबद्दल आभार मानणं आवश्यक वाटलं.

अगदी अगदी.

आख्ख्या मालिकेसाठी आपण देणं लागत नाही. आत्ता एकच पाहू, बाकीचे भाग पाहिलेच पाहिजेत असं नाही. निदान पहिला भाग बघण्यापूर्वी तरी आपल्याला तसं वाटतं...

याबद्दलही अगदी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कालच मालिका बघून पूर्ण केली - दोन बिंज वॉचिंगमध्ये. प्रत्येकाने जरूर बघावी अशी.

मालिकेची ओळख 'ट्वायलाइट झोन सारखी साय फाय' अशी केली होती हे पाहून मला पहिल्यांदा थोडी शंका वाटली होती. कारण ट्वायलाइट झोनमध्ये फारच बटबटीत मांडणी होती असं माझं मत आहे. पण जसजसे भाग बघत गेलो तसतसा खेचला गेलो.

यातल्या बऱ्याच भागांत सामान्य माणसाची निलाजरं विकृत कुतुहल, बायस्टॅंडर बनून अधाशाप्रमाणे जे समोर चाललंय ते बघण्याचा स्वभाव अधोरेखित केलेला आहे तो अंगावर येतो. समाजकारण हे मतपेट्यांपेक्षा अशा लाखो लोकांच्या 'मला हे असं झालेलं बघायचं आहे, रेकॉर्ड करायचं आहे, अनुभवायचं आहे' या मानसिकतेतून चालतं हे चित्र भीतीदायक आहे. आधुनिक नाकर्त्या लोकशाहीचा अर्कच. काही वेळा हे चित्र आपल्यालाही प्रत्यक्षात दिसलेलं आहे. कुठच्यातरी कॉलेजच्या आवारात कोणालातरी बडवून काढताना हजारो लोक उभे राहून तमाशा पाहात होते त्या फोटोची आठवण झाली. पूर्वी भर बाजारात गाढवावरून धिंड काढणं, चौकात फासावर टांगणं हे प्रकार व्हायचे. आजकालच्या समाजात ते कमी होतात. पण अशी जाहीर धिंड निघालेली बघण्याचं आकर्षण टिकून आहे. इंटरनेटसारख्या चेहराहीन माध्यमामुळे त्यात भाग घेणंही सोपं झालेलं आहे.

विज्ञानकथांमध्ये बहुतेक वेळा 'जर असं झालं तर?' असा कल्पनाविस्तार असतो. कल्पनेची गोष्ट सांगताना अनेक वेळा लेखक कचकड्याची पात्रं तयार करतो. मात्र इथे जिवंत माणसं या परिस्थितीत अडकताना दिसतात. त्यांच्या कथा खऱ्या वाटतात. ज्या पार्श्वभूमीच्या विळख्यात ती व्यक्ती अडकलेली असते, तिच्या गुणदोषांचं कोणी भाषण देऊन वर्णन करत नाही. त्यामुळे आपल्याला त्रयस्थ राहाण्याची सोय नसते. त्या व्यक्तीबरोबर आपणही त्या भोवऱ्यात खेचले जाताना लाटांचे आकार दिसतात तेवढेच.

एक अजून चांगली गोष्ट म्हणजे या एकेक कथा आहेत. आख्ख्या मालिकेसाठी आपण देणं लागत नाही. आत्ता एकच पाहू, बाकीचे भाग पाहिलेच पाहिजेत असं नाही. निदान पहिला भाग बघण्यापूर्वी तरी आपल्याला तसं वाटतं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परीक्षण आवडले. अतिशय मती गुंग करून टाकणारी मालिका आहे. प्रत्येक भाग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा धक्का देतो. मी एका वेळेस एकच भाग पाहू शकले. सध्या जरी या गोष्टी far fetched वाटल्या तरी भविष्यात त्या होणं अशक्य नाही याची जाणीव होते. मिडीयाचा प्रभाव/दबाव (the national anthem), प्रत्येक गोष्ट रेकोर्ड करून ठेवायच्या हौसेचा अतिरेक (the entire history of you), कोणत्याही निर्घुण घटनेकडे कोडगेपणाने पाहण्याची (तयार झालेली) दृष्टी आणि त्यातून मिळणारा आसुरी आनंद (white bear) अशा घटनांचे चित्रण खूप चांगल्या रीतीने केलंय. अवश्य बघावी अशी मालिका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मालिकेतले ५ एपिसोड्स बघुन झाले. "व्हाईट बेअर" बघितल्यावर न राहवून प्रतिसाद द्यायला आलो.

मालिकेच्या परिचयाबद्दल आभार! यातील एकेका एपिसोडवर लिहिण्यासारखे आहे.
मेघना म्हणते तसं

यांतला सर्वांत अंगावर येणारा भाग हा की - यांतलं तंत्रज्ञान कोणत्याच प्रकारे अशक्य वाटत नाही. सगळी तांत्रिक 'प्रगती' अगदी सहजशक्य, माणसाच्या आवाक्यातली वाटते आणि समोरचं भविष्यही एकदम येऊन शेजारच्या खुर्चीत बसेल नि खांद्यावर हात ठेवून दचकवून टाकेल इतकं जिवंत, खरं वाटायला लागतं.

अगदी 'Be right Back' मध्ये दाखवलेलं ही! आपण आपली किती माहिती जालावर आपणहून टाकतो याबद्दल अंतर्मुख करणारा एपिसोड आहे तो. अर्थात त्यात जी कल्प्ना "प्रायोगिक" म्हणून समोर येते ती एपिसोडमध्ये एक्सपरिमेंटल दाखवली असली तरी अधिकाधिक 'प्रगती' होत गेली की माणसाची जागा घेणंही मला अशक्य वाटलं नाही.

पुनश्च आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!