नितिन कुलकर्णीच्या कविता

नव्वदोत्तरी कविता

नितिन कुलकर्णीच्या कविता

लेखक - नितिन कुलकर्णी

सकाळी डोळे उघडले

सकाळी डोळे उघडले
वाचलो
अंथरुणातून जमिनीवर पाय ठेवले
वाचलो
चहा प्यालो
वाचलो
पेपर वाचला
वाचलो
दिवस उघडले
रात्री मिटल्या
वाचलो
वार तिथ्या सुट्ट्या वर्ष रजा प्रवास जन्म
वाचलो वाचलो वाचलो वाचलो वाचलो वाचलो वाचलो

---

केसाच्या अंतरावर

केसांच्या अंतरावर कटिंगवाला
पावलाच्या अंतरावर चप्पलवाला
पिशवीच्या अंतरावर भाजीवाला
अंडीलोणीदूधगिर्णी अगदी लागुनलागुन
शाळाकॉलेजंऑफिसंफिफीस अगदी लागुनलागुन
फोनए फॅक्सए कमरेकमरेला पेजरए
कमर्‍याकमर्‍यात कॉम्पुटरए
स्वतःची वाहनं चौकात रिक्षा बस दाराशी स्टॉपए
दोन किलोमीटरवर डेक्कनए
इंटरनेट मॉस्किटोनेट
व्होल्टगार्ड अ‍ॅक्वागार्ड बिल्डिंगगार्डए
मेनडोअरला लोखंडी दार, दर खिडकीला ग्रिलए
चौकात एक चौकीए
चौकीमध्ये पोलीसए ह्याचीसुद्धा खात्रीए
म्हंजे आता, सगळं कसं अगदी, सेफैनाए ?
पूर्व- घराचा प्रवेश, आग्नेय - जळता दिवा
नैऋत्य - शयनगृह, ईशान्य - देवघर
उत्तरेकडे उत्तमांग करून कधीच झोपत नाए
उघड्या दारातून उभी चूल कधीच दिसत नाए
दक्षिणभिंतीवरती एक छिद्रसुद्धा ठेवलेलं नाए
म्हंजे आता, सगळं कसं अगदी, सेफैनाए ?
हाकेच्या अंतरावर अँब्युलन्स
बोंबलायच्या अंतरावर फायरब्रिगेड
शेजारी डोळ्यांचा डॉक्टर, खाली डेंटल
त्याच्याखाली मेंटल
मागे हार्ट समोर ओर्थो पलिकडे न्यूरो.
कालच सगळा चेकप सगळे रिपोर्ट ओक्के.
पाठए गॅस-सिलिंडरसारखी कातडी ताडपत्रीसारखी
बर्गड्या रेल्वेरुळांसारख्या कवटी स्पीडब्रेकरसारखी
लघ्वी थुंकी तर एकदमच मिनरलए
म्हणजे आता, सगळं कसं अगदी, सेफैनाए?

---

('सगळं कसं अगदी सेफैनाए?', लोकवाङ्मय प्रकाशन, २००१)

सर्व प्रताधिकार लेखकाकडे आहेत. मजकूर पूर्णत: वा अंशत: प्रकाशित वा कुठल्याही माध्यमातून प्रसारित करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच अशा कुठल्याही प्रसारित/प्रकाशित केलेल्या मजकुरासोबत प्रस्तुत लेखाचा 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील दुवा (weblink) देणे आवश्यक. ते शक्य नसल्यास ' 'ऐसी अक्षरे' - दिवाळी अंक २०१५ (http://aisiakshare.com/diwali15) मधून' असे नमूद करणे बंधनकारक राहील.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile एकदम झकास. कवितेतील दोन्ही व्यक्तीरेखा काहींना (माझ्याच एका मनाला) पॅरॅनॉइड वाटतील तर काहींना अल्पसंतुष्ट आणि साध्यासाध्या गोष्टींत समाधान वाटणार्‍या देखील वाटतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0