मसाला खिचडी (डाळ-तांदूळ)

जिन्नसः
तांदूळ सव्वा वाटी
मुगाची/मसुराची डाळ पाव वाटी
कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी
सोललेली लसूण २५ मध्यम पाकळ्या
हिरव्या मिरच्या चार
तेल दोन डाव
फोडणीचे साहित्य
मीठ

कृती:
शेंगदाणे बुडून वर दोन बोटे पाणी राहील असे भिजत घालावेत. पाच पाच मिनिटांनी पाणी बदलावे.
डाळ-तांदूळ धुऊन कोरडे करायला ठेवावेत.
लसूण सोलून घ्यावी. मिरच्या पेराच्या आकाराच्या कापून घ्याव्यात.
हे सर्व होईस्तोवर वीस मिनिटे होतील.
तीन वाट्या पाणी मंद आचेवर ठेवावे.
कुकरमध्ये तेल घालून ज्योत मोठी करावी. धुरावल्यावर ज्योत बारीक करून (स्टेनलेस स्टीलचा कुकर असल्यास शेगडीवरून बाजूला काढावा आणि पाच सेकंद थांबावे, नाहीतर फोडणी जळते) मोहरी, हळद, (स्टेनलेस स्टीलचा कुकर असल्यास आता परत बारीक ज्योतीवर ठेवावा) मिरचीचे तुकडे आणि ठेचलेली लसूण टाकावी. ज्योत मोठी करून चटाचट हलवावे. लसूण जराशी जळकटल्याचा वास आल्याबरोबर ज्योत बारीक करावी आणि भिजलेले शेंगदाणे टाकावेत. ज्योत मोठी करून हलवत राहावे.
दाणे खमंग व्हायला लागले की ज्योत बारीक करावी. त्यात भिजवून कोरडे केलेले डाळ-तांदूळ टाकावेत. परत ज्योत मोठी करून हलवत राहावे. तेल-मसाला सगळ्या डाळ-तांदळाला लागेलसे पटापट हलवावे.
पाणी एव्हाना उकळायला आले असेल. ते घालून पटकन झाकण लावावे आणि दोन शिट्ट्या होऊ द्याव्यात.
वाढताना गरजेप्रमाणे मीठ भुरभुरावे.

टीपः
यासोबत म्हणून बटाट्याची कोशिंबीर आणि पोह्याचा भाजलेला पापड घ्यावा.
बटाट्याच्या कोशिंबिरीसाठी चार (मध्यम) बटाटे कुकरमध्ये एक शिटी काढून घ्यावेत. सोलून एका (मध्यम) बटाट्याचे चार काप करावेत आणि निर्लेपच्या तव्यावर ठिपकाभर तेल घालून बाहेरचे आवरण कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्यावेत. ते कुस्करावेत. त्यात दाण्याचे कूट घालावे. जिऱ्याची तुपात फोडणी करून या कुस्करणावर घालावी. त्यावर दोन वाट्या सायीचे घट्ट दही घालावे आणि चिमटीभर मीठ घालून सारखे करावे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पण २५ पाकळ्या लसूण ?
आणि तांदूळ-मुगाच्या मऊमऊ स्पर्शात मध्येच जिभेवर शेंगदाणे कचकचीत नाही लागत? शिजलेले असले म्हणून काय झालं?
आम्हांला बुवा पोह्यांतही शेंगदाणे आवडत नाहीत. आता काय करावं.
एक बरं दिसतंय, इतर मसाले वगैरे काही नाही. म्हणजे गरम मसाला, गोडा मसाला, धने-जिरे पूड वगैरे. आणि कोथिंबीर वगैरे धू-चीरची भानगड नाही. सोपंय.
आणि ते शेंगदाणे भिजवलेलं पाणी पाचपाच मिनिटांनी का बरं बदलायचं?

मला तर पोहे, सांजा, खिचडी, पालक, अळू कशातही शेंगदाणे आवडतात Smile
___
ती बटाट्याची चटणी काय मस्त दिसतेय. सायीचं दही .... आई ग.

कुठे दिसतेय गं तुला बटाट्याची चटणी? मला नाही दिसतेय फक्त वाचता येतेय Wink

शेंगदाण्यातले पाणी पाच पाच मिनिटांनी किती वेळा बदलायचे? :-S

हाहाहा Smile कधी नव्हे ते रेशिप्या वाचताना अंतःचक्षु कमालीचे वटारले गेले आहेत अर्थात हायपरॅक्टिव्ह झाले आहेत ROFL

हाच प्रश्न पडला आहे.
मला वाटतं पाणी न बदलल्यास, शेंगदाणे पिठुळ होत असतील.

शेंगदाणे धुवूनबिवूनसकट सगळ्या तयारीला वीस मिनिटं लागतात. आता पाच मिनिटांनी एकदा पाणी बदलायचं तर वीस मिनिटांत कितीदा?
काय रे देवा. साध्या खिचडीतही किती आकडेमोड करावी लागतेय.

पाकृ वाचून मजा आली. माझ्याकडे 'हजार पाकक्रिया : लक्ष्मीबाई धुरंदर' हे पुस्तक आहे. त्यातल्या पाककृती वाचतांना अशीच मजा येते. भाषा अशीच. ज्योत मोठी- ज्योत बारीक हे आवडलं Smile .

अगदी अगदी... ज्योत, आच, धुरावणे... हे शब्द फक्त चौकस यांच्या पाकृतच वाचायला मिळतात!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त सुटसुटीत रेसिपी. बटाट्याची कोशिंबीरपण दिल्याबद्दल धन्यवाद.

इतालियन पदार्थांमध्ये लसूण ठेचून घालतात आणि खातेवेळी ती काढून टाकतात असं बघितलं आहे. खिचडीत लसूण ठेवायची का काढायची?

मायक्रोवेव्हात उकडलेले बटाटे काही वेगळे लागतात का? (मला फरक समजत नाही.) वाडग्यात बटाट्याचे तुकडे आणि पाणी घालायचं. साधारण दोन मिनीटांत एक बटाटा शिजतो, पण बटाट्याचा आकार, तुकड्यांचा आकार यावर हे अवलंबून आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेंगदाण्यांचे पाणी बदलण्याचे कारण ते पिठूळ होऊ नयेत हे आहेच. शिवाय शेंगदाण्यांना एक प्रकारचा राप असतो तो पाणी बदलल्याने जातो.
लसूण इतकी जास्त आहे कारण की पाककृतीच तशी आहे. लसूण जास्त आवडणार्‍या मंडळींसाठी.
बटाटे मायक्रोवेव्हमध्ये मी कधी उकडून पाहिले नाहीत. पण चूल-स्टोव्ह-गॅस-मायक्रोवेव्ह यात काही फरक पडत असेल असे वाटत नाही. सोलर कुकरमधे उकडलेले वेगळे लागतात.