हिरव्या मिरच्यांची भाजी

साहित्यः
हिरव्या मिरच्या (लवंगी नव्हेत) - दीड सेमीचे अर्धी वाटी तुकडे
एक (स्वयंपाकघरातील; नारळाची नव्हे) वाटी खोवलेले खोबरे
अर्धी वाटी दाण्याचे कूट
एक चमचा तूप
जिरे, मीठ

कृती:
हिरव्या मिरच्या धुऊन त्यांचे दीड सेंटिमीटरचे तुकडे कापून घ्यावेत. लांब मिरच्या असल्या तर हे कात्रीने झकास होते.
तूप कढईत तापवून जिऱ्याची फोडणी करावी. त्यात लगेच कातरलेल्या मिरच्या टाकाव्यात (ठसका सांभाळावा) व ज्योत बारीक करावी. त्यात खोवलेले खोबरे घालून चांगले एकजीव करावे व खोबऱ्या-मिरच्यांच्या ओलाव्यावर पाच-दहा मिनिटे शिजू द्यावे. खाली लागते आहे असे वाटल्यास पाण्याचा हबका मारावा. मिरच्यांवर जळकटल्याचे काळसर डाग पडायला नकोत.
मग दाण्याचे कूट आणि मीठ घालून एकजीव करावे. दोन मिनिटे हालवून ज्योत बंद करावी.

टीपा:
(१) ही मिरच्यांची 'चटणी' नसून भाजी का? तर तुपावर शिजवल्याने (आणि बरोबरच्या भारंभार खोबऱ्या-दाण्याने) मिरचीचा तिखटपणा चांगलाच ओसरतो, आणि हे जरा सढळ हाताने वाढले तरी खपते. 'तिऱ्हाईता'वर "कित्ती बाई तिखट खातो" असा भाव मारायचा असेल तर ते पोटाला न बिथरवता साध्य करण्यासाठी उत्तर प्रकार.
(२) साबुदाण्याच्या खिचडीवर हे मिश्रण दोन चमचे आणि सायीचे दही....
(३) भिजवलेल्या साबुदाण्यात हे मिश्रण सैल हाताने घालून चांगले मळावे. मग प्लॅस्टिकच्या कागदावर पाण्याचा हात लावून त्याचे तुकडे थापावेत आणि तुपावर परतावेत. सोबत चटणीची गरज नाही.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आमच्याकडे हे वजा दाण्याचे कूट + पांढरे तीळ करतात. पण कुटाची आयडियाही भारी आहे. तीळ दिसायला छान दिसतात मात्र. एखाद्या सौम्य मुख्य पदार्थासोबत तोंडीलावणं म्हणून खतरनाक पदार्थ आहे हा.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उत्कृष्टच आहे पाकृ, पण...

असलं काही बनवलं की चमचाभर चाखण्याऐवजी बचके भरभरुन खाल्लं जातंच अनेकांकडून.

मग

आजची फर्माईशः

-मुहोब्बत है मिरची
-कल हो न हो
-मनमोराचा कसा पिसारा फुलला..

उद्याची फर्माईश:

-चैन एक पल नही, और कोई हल नही..
-जुदा होकेभी तू मुझमें कहीं बाकी है
- जलके दिल खाक हुआ आपसे रोया न गया
-चैनसे हमको कभी, आपने जीने न दिया

यावर इलाज: चार चमचे खोबरेल तेल प्यावे ( पॅरशूटचं चालेल. )
खरडा करायच्या मिरचा वेगळ्या असतात.चविष्ट पण कमी तिखट.थांकू पोर्तुगिज.ते जाताना म्हणाले तुम्हाला काय पाहिजे ते घ्या -कला ( श्रीच्या सासुबै नव्हे),मिरचा,बटाटे,पाव,साबुडॅाना.कला सोडून सर्व ठेवले.

आमच्या घरी बहुदा भोपळी मिरचीच वापरली जाईल. तिखट, मसाला या गोष्टी आम्हां म्हाताऱ्यांना झेपत नाहीत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मिरच्या ओळखणे हे अगदी मुरब्बी माणसाचे काम असावे. कारण वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या मिरच्या आणून पाहिल्या. पण कधीच एक वाण दुसरीसारखे निघाले नाही. पांढर्‍या-पोपटी, गडद हिरव्या-काळ्या, बुटक्या, जाड-बुटक्या, मांसल, सडसडीत, लवलवीत, जाड्या-ढोम्या आणि लांब, फटाक्या.. एकदा बरोब्बर तिखटाच्या मिळाल्या म्हणून दुसर्‍यांदा आणायला जावं तर आकाररूप तेच पण कडकजहाल. किंवा अगदीच मुळमुळीत. ओल्या मिरच्या तळण्याचे विविध प्रकार सुगरणींनी सांगितले ते तस्सेच करून बघितले. एकदा तर मांसल मिरच्यांची साले वेगळी नि गर वेगळा असा न भूतो न भविष्यति प्रकार झाला तव्यावर. पण चला, गर तरी मिळाला(तशी सालेही मिळाली होतीच पण सालपटे काय खाणार?) 'गर तुम न होते..' अशी कृतज्ञता मानून मांसल लगदा खाऊन टाकला.
एकंदरीत मिरची लाभत नाही असे निदर्शनास आले आहे. काहीतरी पुण्यकृत्य केले पाहिजेसे दिसतेय.

एकदा तर मांसल मिरच्यांची साले वेगळी नि गर वेगळा असा न भूतो न भविष्यति प्रकार झाला तव्यावर.

हाहाहा

एकंदरीत मिरची लाभत नाही असे निदर्शनास आले आहे. काहीतरी पुण्यकृत्य केले पाहिजेसे दिसतेय.

Smile

'गर तुम न होते..' :ड

अमेरिकन न-तिखट मिरच्या गॅसवर भाजल्या की सालं आणि गर हमखास वेगळे होतात. मार्थामामी स्टुअर्ट यांनी हे असंच करा आणि त्यात काहीबाही सारण भरून खा असं सांगितलं होतं. ते सारण नक्की काय हे मात्र विसरले.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.