Skip to main content

वेड

दोन शहाणे वेडे झाले
वेड्यांनाही हसू लागले
असे रेटुनि गाऊ लागले
की वेड्यांचेही वेड निमाले ||

इतिहासाचे अवजड ओझे
ना त्यांनी डोक्यावरि पेलले
नच पायतळी चेचले
तर खांद्यावरुनि मागे फेकले ||

सदेह भावना विदेही अस्तर
जिणे असे झाले हे दुस्तर
भूतकाळाचा कभिन्न प्रस्तर
तिरकसपणे टोलविलेला बरा ||

पदोपदी खंडीखंडीच्या बेड्या
हाती रुतल्या हातकड्या
कड्यावरुनि जरी मारिसी उड्या
तरी तयासि मुक्ती नोहे ||