झुम्बा हो हो हो ..............

निरामय जीवनासाठी प्रभातफेरी सारखा स्फूर्तीदायक आणि सोपा उपाय आम्ही गेली पंधरा वर्षे आनंदाने स्वीकारला आहे.हॉटेलमधले खाणे शक्यतो टाळून घरी शिजवलेले अन्नसेवन करणे आणि नियमित प्रभातफेरी या दोन साध्याश्या गोष्टींमुळे आम्ही पतीपत्नी सहसा आजारी पडत नाही. मला आधी सर्दी -सायनसचा नेहेमी त्रास होत असे तो सुद्धा आता क्वचितच होतो.
संगीताच्या ठेक्यावर व्यायाम करायच्या एरोबिक्स प्रकाराचा बोलबाला होता तेंव्हापासून ते करुन बघायची मला उत्सुकता होती. एकदा कधीतरी जिम जॉईन केले होते तिथे ते नसल्याने योग आला नाही. आता एरोबिक्स मागे पडून जिकडेतिकडे झुम्बा नामक एक प्रकार बोकाळलेला आहे. एरोबिक्स नाही तर नाही हा झुम्बा प्रकार कधी करायला मिळतो याची मी आतुरतेने वाट पहात होते.अखेर जमलंच !

पेपरात एका सोयीस्कर ठिकाणी फक्त तीन दिवसाच्या फुक्कट झुम्बा वर्कशॉपची जाहिरात पाहिली.तीन दिवस आणि एक तास रोज हे प्रकरण झेपतंय की नाही हे बघायची नामी संधी होती.यावेळी नक्की जायचंच असं ठरवलं. चौकशीसाठी फोन केल्यावर इंग्लिश भाषेतला मध कानात ठिपकू लागला.मी नेहेमीच्या चिकाटीने मराठीत दगडफेक सुरु केली. इंग्लिश उच्चारातल्या मराठीतून फक्त दोनच सूचना मिळाल्या.बूट आणि सूट (म्हणजे सलवार सूट वगैरे) घालून या. वर्कशॉप फुकट असूनही झुम्बोत्सुक प्राणी वेळेवर फिरकतील तर शप्पथ ! मला ५० पैशात भरपूर दुधीहलवा या एका व्यंगचित्राची आठवण झाली. दुधीहलव्याची जाहिरात पाहून आलेला मनुष्य ,दोरीला बांधलेला दुधी हाताने झोका देऊन हलवत बसल्याचे चित्र होते.लोकांना फुकटातही भरपूर व्यायाम नकोच असतो.

मी सर्वात आधी पोचल्याने,पंचविशीतल्या सुबक ठेंगणीने माझे गोड स्वागत केले.ही संधी साधून , मला हे झुम्बा प्रकरण जमेल का, अशी शंका तिला विचारली. झुम्बाचा शोध एका चाळीशीतल्या कोलंबियन कोरिओग्राफर 'अल्बर्टो बेतो पेरेझ 'याने लावल्याचे तिने सांगितले. झुम्बा माझ्या वयाच्या लोकांसाठी उत्तम असल्याचे सांगून तिने माझा उत्साह वाढवला.लोकांची फारशी वाट न पाहता तिने लगेच वर्कशॉप सुरु केले."धिस इज नॉट अ डान्सक्लास ओके ? धिस इस एक्सरसाईज विथ म्युझिक ! "असे बजावून नंतरच्या दोन दिवसातही ती याची आठवण करुन देत असे. मी एक इंटरनॅशनल झुम्बा इन्स्ट्रक्टर असल्याचे तिने सांगताच,आम्ही जागतिक दर्जाचे काहीतरी नवीन शिकताहोत याचं वैश्विक भान आल्याने एकदम गोड झिणझिण्याच आल्या गडे !

ढँणकन इंग्रजी गाणे ,"आयाम अ मटीरिअल गर्ल" लावून सुहास्यवदनाने, ती सुबक ठेंगणी अंगात हाडं नसल्यागत विद्युल्लतेप्रमाणे लचकूमुर्डू लागली.तिच्या स्टेप्स आम्हाला बघत असतानाच फॉलो करायच्या होत्या म्हणे. संगीताच्या ठेक्यावर मान डोलावण्याखेरीज कुठलीही जाहीर, सर्वांगीण कृती केलेली नसल्याने, तिने ताशी ६० किमी वेगाने केलेले द्रुतगती, अंगविक्षेप, भयचकित होऊन मी ताशी १० किमीच्या ठाय लयीत करायचा क्षीण प्रयत्न करू लागले.हळूहळू फुकट्या झुम्बोत्सुकांची गर्दी वाढली आणि येणारे बरेच लोकं माझ्यापेक्षाही ऑकवर्ड हातपाय फेकताना पाहून माझा कॉन्फीडन्स वृद्धिंगत होऊ लागला.गतीसुद्धा वाढली.३/४ मिनिटाच्या प्रत्येक गाण्यानंतर २/३ मिनिटांचा ब्रेक घेऊन टाळ्यांचा कडकडाट करताना वॉव ,ग्रेट म्हणत आपली आपणच लाल करायची होती.'तू केंटी (घंटी)बिग बेन दी... सारा लंडन ठुमकदा, चिटीयां कलाईयां वे' ही गाणी रोज अनिवार्य वाजणार होती.

किंचित विश्रांती आणि पाण्याचे दोन घोट घेऊन मग 'चिटीयां कलाईयां वें 'या अनाकलनीय हिंदी (!) गाण्यावर, हातावर मुंग्या चढताहेत, किंवा अंगाला खाज सुटतेहे असे हातवारे करत नॉनस्टॉप कंबरड लचकवत रहायचं होतं.एका हाताने नळ सोडल्याची एक्शन करत दुसऱ्या हाताने बल्ब फिरवून बसवायचा होता.एक गाण संपून आपलीच लाल केल्यावर मग, 'मन उधाण वाऱ्याचे' या मराठी गाण्यावर आम्हाला नृत्यसदृश व्यायाम करायचा आहे हे समजताच मला अगदी गलबलून येऊ लागलं.या गाण्याच्या तालावर मनातलं उधाण,आपल्याला सतत पिसागत हलकं वाटताहे असे अलगद उड्या मारून दर्शवायचे होते. तेंव्हा लोकांच्या लोखंडी पिसं असल्यागत मारलेल्या दणादण उड्यांनी जमीन खचू लागली. एकूण ५/६ गाणी झाल्यावर कूल डाऊन यानेकी दीर्घश्वसन करुन त्यादिवशीचे सत्रावसान झाले.

पहिल्या दिवशी अंदाजे ४० स्त्रिया आणि दोन पुरुष आले होते.दुसऱ्या दिवशी गर्दी थोडी कमी झाली होती.एका पुरुष सदस्याने, एक ढूप्प्प, आंबटषौकी प्रेक्षक आणला होता. त्याला सुबक ठेंगणीने, पार्टीसिपेशन करायचे नसल्यास प्लीज इथे बसू नका म्हणत नम्रपणे बाहेरचा रस्ता दाखवला. नयनसुखापासून वंचित होत्साता तो निघून गेला. पहिल्या दिवशीच्या झुम्बानुभवाने कोणाला काही त्रास होतोय का असे सुबक ठेंगणीने विचारले. दैनंदिन जीवनात मी इतके हातवारे करत नसल्याने नुसते हात दुखताहेत सांगितले. खरं म्हणजे हायबरनेशन मोडमध्ये असलेले बरेच स्नायू वेदनेतून आपले अस्तित्व दर्शवत होते. नुकत्याच वाचलेल्या एका पुस्तकातले वाक्य मला आठवले," वेदनेचे हे वैशिष्ट्य आहे की ती जाणवली पाहिजे हीच तिची मागणी असते " .
वेदनेसहित आम्ही आनंदाने पुन्हा धुमशान करुन घाम गाळला. शेवटच्या दिवशी आपण कुठली थीम करुया हा प्रश्न तिने आम्हाला विचारला. ज्याचे उत्तर फक्त तिलाच माहीत होते.मग सालसा थीम करुया, तुम्ही स्कर्ट घालून या अशी सूचना तिने स्त्रियांना दिली.माझ्यासकट बऱ्याच जणींनी ते शक्य नसल्याचे सांगितले.उगा पाय अडकून पडलो तर फुक्कटच वर्कशॉप चांगलंच महागात पडलं असत.

सालसा नृत्याच्या काही पदन्यासातून शेवटच्या दिवशीचा व्यायाम साजरा करायचा होता. जोड्या जुळवून प्रत्येकाला पार्टनर सोबत पावले टाकायची होती.' कह दु तुम्हे या चूप रहूं' , हे गेल्या तीन दिवसात ऐकलेलं एकमात्र जुनं गाण लावून आम्ही सालसा नामक प्रकार करायचा क्षीण प्रयत्न सुरु ठेवला.एक तर बहुतेकांना स्वतःला सांभाळणे कठीण होते. त्यात सुबक ठेंगणीकडे बघत जोडीने पावलं टाकणं म्हणजे अपेक्षेचा कडेलोट होता. धोकादायक वाटलेल्या स्टेप्स टाळून मी कित्ती जीवाला राखायाच ते राखलं बै ! डावा हात आणि उजवा पाय उचलायचा की जो हात तोच पाय उचलायचा याचा संभ्रम कायम राहिला.कुठल्याही प्रकारे केलं तरी ते भीषण दिसणार होतं.जाहीर कार्यक्रम करायचा प्रश्न नव्हताच त्यामुळे जमेल तितकेच करावे याचे ज्ञान तात्काळ झाले आणि कैवल्याच पिठूर चांदण पडल. एक/ दोन हळुवार गाण्यांवर ज्या सावकाश हालचाली करायच्या होत्या त्यात बहुतेकांना यश आल्याने शेवटी एकदम आनंदी आनंद गडे झाला.

झुम्बाचे सशुल्क क्लासेस तिथेच दोन दिवसांनी सुरु होणार होते. या तीन दिवसात मला मजा आली यात काहीच शंका नाही. परंतु ती व्यायाम करुन घाम गाळल्याने जे हॅपी हार्मोन्स तयार होतात त्यामुळे आली की, माझ्यात एरवीही हॅपी हार्मोन्सचं प्राबल्य असत त्याने मी मजेत होते ते अजून उमजत नाहीये. मला रोज कर्कश्श गाणी लावून डान्स कम व्यायाम करायला आवडेल का? हा माझ्या चहाचा कप आहे की रुचीपालट म्हणूनच ठीक आहे याचा तपास मोसाद या नंबर एक गुप्तहेर संघटनेकडे दिला आहे.
त्याचा निकाल येईपर्यंत रोजच्या प्रभातफेरीचा जयजयकार असो !

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

हे लिहून बरेच उपकार केलेत. अजून चारशे वर्षांनी तुमच्यावर सिनेमा निघेल तेव्हा त्या काळच्या प्रियंका आणि दीपिका तुमच्या नावाने कंबर उडवतील.

हो, माहित्ये उसंत सखू ही एकच स्त्री आहे. पण That Obscure Object of Desire मध्ये जसं एकाच बाईचं काम दोन स्त्रियांनी केलंय आणि शिवाय नाच केलाय तसा उसंत सखूच्या सिनेमातही दोघीदोघींनी का नाच करू नये?

एवढं बोलून मी आपली रजा घेऊन पळते ... सखूबाईंचा मार परवडणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोंचिता अफलातून नाचली आहे त्यात मला आठवले. :love:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका हाताने नळ सोडल्याची एक्शन करत दुसऱ्या हाताने बल्ब फिरवून बसवायचा होता.

एवढ्या सुंदर अॅक्शन केल्यात, आणि साधा व्हिड्यो नाही टाकलात?

उगा पाय अडकून पडलो तर फुक्कटच वर्कशॉप चांगलंच महागात पडलं असत.

इथे काहीतरी घोटाळा होतोय. अहो, पाय अडकून पडू इतका लांब स्कर्ट नसतो सालसासाठी घालायचा. आणि आखूड स्कर्ट घालून पडायला झालं तर वर्कशॉप इतरांना कोणाला स्वस्त पडेल का असा प्रश्नही माझ्या ट्रॅकबॉटमला अडकून पडला. (म्हणजे प्रश्न मला पडला, ट्रॅकबॉटमला नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फुकट वर्कशॉपसाठी नवीन स्कर्ट विकत आणायचा ? माझ्याकडे उपलब्ध स्कर्ट लांबलचक आहे. ज्या तुरळक स्त्रिया स्कर्ट घालून आल्या ते लांबलचक होते आणि आधीच काही येत नाही त्यात स्कर्टमुळे अवघडलेल्या होत्या.मी स्कर्ट न घातल्याने मला माझंच खूप कौतुक वाटत होतं यु नो Blum 3 ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉव! शॅल वी डान्स मिस सखू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अह्हा!!! झकास लिवलंय

आता सखुबै डॅन्स करणार या विचाराने डोळ्यांसमोर बल्ब फिरला! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा सखूबाई...मी गेले कित्येक दिवस माझ्या झुम्बा क्लासबद्दल लिवायचं म्हणतेय! पण तुमी झ्याकच लिवलंय. त्याबद्दल अभिनंदन!
मला तर बाई प्रभातफ़ेरीपेक्षा हे मस्तच वाटतं. आमच्या मास्तराचे वय माझ्या वयाच्या अर्धे आहे. माझ्या व्यायामापेक्षा त्याचा नाच बघण्यात क्लासची फ़ी वसूल होते. तो इतक्या दमाने, बेता-बेताने आम्हां बायकांना शिकवतो की शिक्षक म्हणून मी त्याला मानते. सालसा आता जमायला लागलाय पण बॉलीवूड्ची सर कशालाच नाही!
आमची बरीचशी गाणी स्पॅनिश असली तरी मधूनच बॉलीवूड्ची फर्माईश होते. त्यातील मला आवडणारी काही गाणी इथे दिल्याशिवाय राहवत नाही.
'तू केंटी (घंटी)बिग बेन दी’
’लुंगी डान्स’
’छ्मकछ्ल्लो’
’साडीसे फॉलका कभी मॅच किया रे’
’फ़ेविकॉल’

एकंदरीत, आठवड्यातून दोनदा होणारा झुम्बा ही माझ्या जीवनातील एक आनंददायी गोष्ट आहे हे नक्की. शरीर आणि मन दोघांनाही व्यायाम होतो. तुम्ही जरुर जॉईन करा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

मोसादचा निकाल फेवरेबल येईल अशी आशा आहे Smile .मलापण आठवड्यातून २/३ वेळा करायला काही हरकत नाही असं कधीकधी वाटतं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा सॅक्यूबाई, डॅन्स अॅवडला टुमचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL हाहाहा प्रचंड इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स देणारा आणि स्वतःचा स्टॅमिना तोंडावर स्वच्छपणे फेकणारा हा प्रकार आहे Smile एकदा - दोनदाच केला. मग हिंमतच होईना.

बरेच लोकं माझ्यापेक्षाही ऑकवर्ड हातपाय फेकताना पाहून माझा कॉन्फीडन्स वृद्धिंगत होऊ लागला.

ROFL हे त्रिवार खरे आहे. असेच होते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही ही हि!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

आमच्या एक्सबॉक्सवर झुंबा आहे. तिथे लंडन ठुमकदा मिळतं का पहायला पाहिजे! (हे गाणं आम्ही सखूबाईंच्या कृपेने आजच पाहिले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

नुसतं वाचायला येऊन हीहीही नाही चालणार पार्टीसिपेशन हवं.
नळ आणि बल्ब रेसपी अचूक.प्रत्येक मराठी लग्नात जेवायला पंजाबी पदार्थ आणि रात्री बँन्क्वेट हॅालमधून दहा वाजता बाहेर काढण्याअगोदर या 'नळ सोड दी' छाप गाण्यावर कंबर बारीक लचकणारी आहे हे दाखवणाय्रा गाण्यावर चार नाच व्हावेच लागतात. ( गौरिहारपुजन हा विधि वधुच्या सोन्याच्या बांगड्यांचे डिजाइन दाखवण्यासाठी असतो या चालीवर वाचावे. )

चीनमध्ये ज्येष्ट नागरिकांचा ( ८५+) जपानी पंखा घेऊन हातवारे करण्याचा ( तासाला फारतर दहा अॅक्शन्स ) नाच पार्कात सकाळी चालतो.फारच चांगला व्यायाम प्रकार आहे.इकडे सकाळी सहाचा गजर म्हणून पार्काजवळचे राहणाय्रांचा हास्यक्लब वीसेक वर्षे चालू आहे.त्यात शेवटी वाघाने ओरबाडण्याच्या अॅक्शनची सर्वजण वाट पहात असतात.त्या निमित्ताने काल्पनिक सूड उगवता येत असेल घरांतल्या त्रासदायक सासूसुनांवर.झुम्बा पोहोचला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0