कांदा बटाटा रस्सा भाजी

पदार्थ
कांदे व बटाटे अर्धा किलो प्रत्येकी
फोडणीचे साहित्य
दोनशे ग्राम दाण्याचे कूट
दोनशे ग्राम सुके खोबरे (किसून)
लसूण वीस - तीस पाकळ्या

मार्गदर्शन
प्रथम कांदे बारीक पण उभट कापून घ्यावेत (डोसा भाजीत असतात तसे). बटाट्याच्या मोठ्या फोडी करून पाण्यात टाकाव्यात.
लसूण चांगली ठेचून घ्यावी.
तेल तापवून ते धुरावल्यावर त्यात मोहरी, हळद, ठेचलेली लसूण, व तिचा रंग थोडा बदलला की लाल तिखट घालावे. लसूण घातल्यावर ज्योत बारीक करावी.
त्यात चिरलेला कांदा घालून ज्योत मोठी करावी व भराभर हलवावे. कांदा रंग बदलू लागला की ज्योत बारीक करून त्यात दाण्याचे कूट व किसलेले खोबरे घालावे (निम्मे). आता सतत हलवणे गरजेचे आहे, अन्यथा सुके खोबरे / दाण्याचे कूट लगेच खाली लागते.
खोबरे आणि कूट तेल पाझरू लागले की बटाटा घालावा. ज्योत मोठी करून हा मसाला सर्व बटाट्याला लागेल अशा रीतीने हलवावे.
ज्योत बारीक करावी. एक पाण्याचा हबका मारावा आणि झाकण ठेवून वाफ आणावी. परत सर्व हलवून, गरज असल्यास पाण्याचा अजून एक हबका मारून, झाकण ठेवून वाफ आणावी. आता बटाटा होत आला असेल (उलथण्याने कोचून पहावे) तर उरलेले कूट आणि उरलेला कीस घालावा, थोडे कोमट पाणी (जितका रस्सा पाहिजे असेल त्या अंदाजाने) घालावे आणि रस्सा रटारटा शिजवावा. चवीनुसार मीठ घालावे.
यात लसूण, खोबरे आणि दाण्याचे कूट यांचे प्रमाण आपापल्या आवडीवर ठरते. लसणीचा ठसका जितका जास्त तितकी ती चव अस्सल. बारीक लसणीचे खरपूस तळले गेलेले तुकडे तरंगताना दिसणे म्हणजे त्या असलीपणाची परमावधी.
जितके जास्त खोबरे आणि कूट तितका त्यावर तवंग येतो. फार तिखट नको असल्यास परंतु तवंग लाल पाहिजे असल्यास काश्मिरी मिरच्यांचे तिखट वापरावे.

टीपा
* तैलजन्य पदार्थांचा सढळ वावर असलेला हा पदार्थ आहे याची परत एकदा जाणीव करून देण्यात येत आहे!
* या सोबत तेल लावलेली घडीची पोळी झकास लागते. यात कुस्करून घालण्यासाठी शिळी भाकरी असेल तर आनंद.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भाजी चविष्ट लागेल यात शंका नाही. पण रेसिपीतले शब्द खूप आवडले. धुरावणे, पाण्याचा हबका,कोचून बघणे इत्यादी.

चौकासभाऊंच्या रेसिप्या स्वयंपाक्याला सतत ऑन द टोज् ठेवतात असं निरीक्षण आहे. सगळं चिरा मसाल्यात दाबा आणि शिजवायला टाका असं शिंपल म्याटर सहसा नसतं.

*********
आलं का आलं आलं?

रस्सा रटारटा शिजवावा ROFL
पाकृ आवडली.
___
एक होती आजी
चिरत होती भाजी
भाजी चिरली खसाखसा
तांदुळ घेतला पसापसा
भात शिजला रटारटा
मुले जेवली मटामटा
मुले गेली खेळायला
धावायला अन पळायला
खेळून खेळून दमली
आजीजवळ झोपली.

व्वा! मलाही आवडली शब्दयोजना.

आज बनवतोच.

नाक्यावरच्या गावठी हाटिलातला पुरी भाजी सुकी अथवा पुरी झणझणीत रस्सा मला फार आवडतो.
तो रस्सा अगदी शिंपल म्याटरअसतंय.दाण्याचं कूट,खोबय्राचा कीस नसतोय तरीही बाह्यांना नाक पुसत ( तिखट असल्याने) खायला पावसाळ्यात अन थंडीत फार मजा येते.नंर एक चा.

मस्त झाला होता.

मजा आली.

मला या गाण्याची जास्ती चांगली आवॄत्ती माहित्ये;
एक होती आजी
चिरत होती भाजी
भाजी चिरता चिरता
भाजीतनं निघाली अळी
अळीने घेतला चावा
आजी म्हणाली धावा
मुलं आली धावून
अळी मारली पाहून
आजी लागली हसायला
मुलं लागली नाचायला !!

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आज करून बघण्याचा विचार आहे. काही वेळा रस्सा खाताना तो जास्त झणझणीत आणि गरम मसाला घालून मसालेदार केलेला पाहिला आहे. ती चवही आवडली होती.

वा! आवडली.

एक होती उ
तिला भेटली टु
दोघी गेल्या बाजाराला
भरपूर भाजी आणायला (या दोन ओळी मीटरमध्ये बसत नाहीत काहितरी वेगळे असावे पण आता विस्मरणात गेलेय. त्या बाजारात जाऊन कोणतीशी भाजी आणतात हे खरं Tongue)
धु बरे पट्टापटा
चिरु कशी खस्साखस्सा
शिजवु कशी रट्टारटा
खाऊ कशी मट्टामटा
निजु कशी डाव्या कुशी
पादु कशी ढुमदिशी! ROFL

हे माझ्या लहानपणीचं नि आता माझ्या मुलीचं आवडतं गाणं आहे.
याच्याही कित्येक व्हर्जन्स आहेत.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

OMG ! किती दिवसांनी हे गाणे ऐकले.

रस्सा रटारटा शिजवावा (लोळून हसत)

यात (लोळून वा अन्यथा) हसण्यासारखे असे नेमके काय आहे?

(किंबहुना, रस्सा - त्यातही कांद्याबटाट्याचा - हा 'रटारटा'व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे शिजूच कसा शकतो, असा प्रतिसवाल आहे.)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

एक होती उ
तिला भेटली टु

मूळ आवृत्ती 'तिला झाली टू' अशी आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

(पैकी, 'टू' ही 'नंबर वन' आणि 'नंबर टू' यांपैकी असावी. पुढील 'धू बरे पट्टापटा' या पंक्तीच्या सान्निध्यात ते सयुक्तिकही वाटते. Wink असो.)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

होय होय
एक होती ऊ तिला झाली टू
.
असेच ऐकले आहे.___
एक होती ऊ,
तिला झाली टू,
टू गेली बाजारात
तिला सापडला पैसा
आई आई या पैशाचं काय करु?
आई म्हणाली भाजी आण
.
भाजी चिरली खस्साखस्सा
.
.