खेळ

तरंगलांबीवर सवारी भरती
मन्मनातिल हे संदेश |
का ऐकशी कुणा धाडिशी
गूढ अगम्य हे आदेश ||

आयत्या बिळावरि बैसला जो
नागोबाही इथे रुजे |
आनंदल्या कानांमध्ये
रुमझुमते पैंजण वाजे ||

पैंजणांचा नादस्वर हा
कानाकानांमध्ये वेगळा |
मूढमनाच्या स्पंदनांमध्ये
का लागला षड्ज आगळा ||

षड्जाच्या त्या पाठिंब्यावर
एक सावली उमटे थेट |
सावलीतल्या राजकुमारी
आंदण मिळाले एकच बेट ||

बेटावरती एक कपाट
कपाटात त्या सांगाडे |
कपाटातल्या सांगाड्यांना
आपली वाटती परकी हाडे ||

हाडे कोराया बसलेले
गिधाडांचे मूक थवे |
मुर्दाडमेल्या मनामधुनिही
लचके तोडिती अजुनि नवे ||

लेपविलेल्या काचेवरती
इलेक्ट्रॉन्सचा खेळ रंगला |
स्वप्नपालवी निरखुनि बघता
भांबावुनि तो इथे दंगला ||

तापत्रयाने पोळविल्यावर
विठ्ठल तो आला आला |
श्वास-श्वास चिकटवताना
खेळ अचानक संपुनि गेला ||

field_vote: 
0
No votes yet