दुबळा

एका रात्रि असाच बसलो होतो सवयीने अंधारात

मोजत होतो,विचार करत होतो की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही

तसा हरलोच मी आयुष्यात….. मनाशीच म्हटलं

तेवढ्यात कोणीतरी आल्यासारखं वाटलं

प्रकाश पसरला, निळा आणि काळा किंवा असाच कुठल्यातरी रंगाचा,

बहुतेक 'तोच' आला असावा

चेहरा नव्हता दिसत, पण सर्वशक्तिमान अशा अस्तित्वाची जाणीव झाली त्याच्या ……कोणीतरी कानात कुजबुजावं तसा आवाज आला

"तस सगळच् आहे की रे!! कुठे काय कमी आहे?

अरे सगळ्यांना समान नाही बनवत मी ……..प्रत्येकाचा साचा निराळा प्रत्येकाचा पिंड वेगळा

तुला राजबिंडे रूप नसेल दिले पण चेहरा विद्रूप तर नाही ना बनवला?

बाहुत बळ नसेल दिलं पण पंगु तर नाही ना बनवला तुला?
तोंडात चांदीचा चमचा दिला नाही हे मान्य पण अनाथ तर नाही ना बनवला?

तुला जन्मतःच दुबळा बनवला खरा पण त्या दुबळेपणाशी लढण्याची शक्ती मीच दिली ना!!!!

भित्रा आहेसच तू पण भीती कशी लपवायची हे मीच शिकवलं तुला लक्षात आहे ना?

अनेक अपमान नामुश्कीचे प्रसंग ओढवले तरी इतरांचा अपमान न करण्याची प्रगल्भता देखील दुसऱ्या कोणीतरी दिली, असं तुला म्हणायचय का?

आणि अपमान सहन कुठवर करायचा याची मर्यादा आखुन देणारा कोण होता? सांग बरं?

जास्त विचार नको करू

आपलं आयुष्य आपण स्वतःच खेळायच असतं हे ठाऊक आहे ना तुला?

मी तर फ़क्त पंच आहे रे "

मी हताशपणे उत्तरलो,

" सगळ मान्य आहे रे बाबा सगळ मान्य!!!

पण तरीही

भित्रा, दुबळा म्हणवून घेत मोठा झालो

भीतीवर मात करण्यात वर्षे गेली

तसे मुळात सगळेच भित्रे पण माझी भीती वेशीवर टांगली गेली

शरीरयष्टि होतीच् तशी माझी फुंकर मारताच उडून जाइल अशी

तिनेच पोसले माझ्या भेदरटपणाला

नंतर नंतर चेहर्यावरपण आपोआप असेच भेदरलेले गोंधळलेले, भित्रट भाव येत गेले आणि लोकांचेही फावत गेले

मी घाबरत असलेल्या गोष्टीत भर पडत गेली

आणि लोकांचीही
करमणूक होत गेली

मला असमर्थ ठरवून मोकळ्या झालेल्या तथाकथित सामर्थ्यवान लोकांच्यातच वावरलो अणि नकळतपणे त्यांचा अहम् सुखावत गेलो

लोक माझ्याकडे बघुन फिदिफिदी हसताना माझा जन्मच त्यांनी मला हसाव म्हणून झालाय अशी स्वतः ची समजूत घातली मी

दुबळयाचा जन्मच छळून घेण्यासाठी असे म्हणत दुबळयांकडूनच छळुन घेतलं स्वतःला

स्वतःची कूवत सिद्ध करण्यासाठी लोकांनी माझ्या कमकुवतपणाचे
दाखले दिले तरीही गप्पच बसलो ना!!!!!!

माझ्यात काहीतरी आहे हे सिद्ध करण्यासाठी परिक्षेतील गुण सांगून मनाला दिलासा दिला

हेच माझे भोग हेच माझे आयुष्य असं म्हणत राहिलो जप केला याचा

पण हळू हळू मन बंड करून उठले

लोकांचे टोमणे टोचु लागले

अपमान खुपायला लागले

अगदीच पेटून उठलो असं नाही

पण जन्म माझा यासाठी नाही हे कळू लागलं मला

अन्याय, अपमान सहन करायचा नाही हे देखील कळलं

मी पराभूत असेन पण कमजोर नाही हे कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला मी

पण माझ्या या नव्या बंडखोरीचीदेखील हसून खिल्लीच उडवली गेली

हे हसण मात्र नाही सहन होत आता

राग येतो प्रचंड राग येतो

पण मी दुःख नाही करत आता……. भेसुर हसत बसतो

असुदेत

पण

पण तरीदेखील ,

मी कधी द्वेष नाही केला कुणाचा

कुणाच्या फजितिवर , अपयशावर हसलो नाही

कुणाच्या व्यंगावर बोट नाही ठेवले

कुणालाही माझ्यापेक्षा कमी नाही लेखले

कुणाचा मत्सर नाही केला ………इतरांच्या अपयशात माझे यश
नाही मानले मी!!!

आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी बाकीच्यांना कर्तृत्वहीन नाही ठरवले

मग का अजुन हे सर्व माझ्या वाट्याला??

माझे आयुष्य मी माझ्या परीने खेळले ना?

मग का हा दुबळेपणाचा कलंक माझ्या आयुष्याला?

सांग ना? बोल ना??"

तो हसून म्हणाला

" काय बोलू?

तू इतरांच्या अपयशात स्वत:चे यश मानणाऱ्यांपैकी नाहीस हे कबूल

पण इतरांच्या यशात आपले अपयश मानतोस की नाही?
खरं सांग.

इतरांच्या फजितिवर हसला नसशील पण हसणार्यांना थांबवलेस का कधी?

कुणाचा द्वेष नाहीस केला पण कुणी तुझी कीव करावी इथपर्यंत वेळ आणु दिलीसच ना?

कुणालाही कमी नाही लेखलेस ते का महितीये?

कारण उदया ते लोकही कदाचित तुला हरवून खोटं पाड़तील या भीतीने.

हे खराय की नाही?

राहता राहिला सवाल दुबळेपणाचा

वर नमूद केलेली लक्षणे दुबळे असण्याची साक्ष देत नाहीत का सांग मला

मनुष्याने सत्य स्वीकारले पाहिजे जितक्या लवकर तितकं चांगलं
तु कमकुवत असणे हे सत्य मी बदलू नाही शकत आता

त्याच्यावर मात करणे ही तुझी जबाबदारी

मोठमोठी स्वप्ने पाहतोस पण ती पूर्ण करण्यासाठी झटलास का कधी?

लोक तुझ्यावर हसत आलेत हा त्यांचा प्रश्न आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायचे की नाही हे तुझ्याच हातात आहे ना?

तू दुबळा आहेस आणि मीच तुला तसं बनवलय हे सत्य स्वीकार आता त्रागा नको करू"

थरथरत्या पण शांत आवाजात मी म्हणालो त्याला

" शेवटी तू ही तेच म्हणालास!!!

तुझे इतर सगळे युक्तिवाद मान्यच आहेत मला.

सर्वशक्तिमान तू ,

तुला माझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहीत
असणार हे जाणतो मी.

मला तुझ्याबद्दल नितांत आदर आहे श्रद्धा आहे तुझ्या शक्तीची जाणीव आहे

तरिपण सांगतो

जेंव्हा अंधाराच्या प्रेमात पडलो तेव्हाच बिगुल वाजला होता

आणि माझ्या आतून आलेल्या आवाजाने मला संदेश दिला होता

तोच संदेश आठवून तुला सांगतोय

तूच दिलेल्या दुबळेपणाच्या चिंधडया चिंधडया उडवींन मी

माझ्या संयमाला, सोशिकतेला दुर्बलता समजून अपमान करू पाहणाऱ्यांचे धिंडवड़े काढेन

मला लाचार सिद्ध करण्याच्या तयारीत असलेल्यांचा
बिमोड करण्यातच खर्च करेन माझे आयुष्य

हरलो तरी चालेल

संपलो तरी चालेल

पण आता

दुर्बलतेचे हे लांछन स्विकारणाऱ नाही.

मुळीच नाही

लक्षात ठेव

यापुढे काहीही झाले तरी

कुणाकडून दुर्बलम्हणवून घेणार नाही

तुझ्याकडूनदेखील नाही

काहीही होवो

दुर्बल म्हणवून घेणार नाही

दुर्बल म्हणवून घेणार नाही"

तो तथास्तु न म्हणता तसाच निघुन गेला अणि

पुन्हा खोलीत अंधार झाला

मी आकाशाकडे पाहात भेसुर हसत राहिलो

हसत राहिलो

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी कधी द्वेष नाही केला कुणाचा

कुणाच्या फजितिवर , अपयशावर हसलो नाही

कुणाच्या व्यंगावर बोट नाही ठेवले

कुणालाही माझ्यापेक्षा कमी नाही लेखले

कुणाचा मत्सर नाही केला ………इतरांच्या अपयशात माझे यश
नाही मानले मी!!!

आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी बाकीच्यांना कर्तृत्वहीन नाही ठरवले

छान आहे कविता!!!
पण, वरील सर्व दोष असले कीच लोक आपल्याला शक्तीवान समजतात. तेव्हा दुबळेपणाच बरा असे वाटते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको