नाईट शिफ्ट

आयटीमधली नोकरी म्हणजे डोक्याला ताप असतो. आयटीशिवाय असलेल्या व्यक्तिंना तर ही नोकरी म्हणजे स्वर्ग वाटतो. त्यांना असे वाटते की नुसते बसून तर काम असते. अन सोई सुविधा, तगडा पगार आदींबाबत तर फारच मोठे गैरसमज पसरले आहेत. मान्य आहे की इतर इंडस्ट्रीजपेक्षा येथे जास्त पगारपाणी असतो, पण तो काही सर्व आयटी प्रोफेशनल्सला असू शकत नाही, किंवा सर्व प्रोफेशनल्सची कंपनीदेखील जास्त पगार देणारी नसते. अन हा जास्त पगार म्हणजे फुकट असत नाही. त्या बदल्यात कंपन्या कामेदेखील करवून घेतात. सर्व ठिकाणी कामाची परिस्थिती आनंददायक असतेच असे नाही. असो.

असो अशासाठी की माझी गोष्ट भलतीकडेच वाहवत चालली होती. उगाचच आयटी, नॉनआयटी, जास्त पगार, कमी पगार आदींवर चर्चा होवून ती वादात रूपांतरीत व्हायची. म्हणून असो.

तर मंडळी मी तुम्हाला माझी खाजगी गोष्ट सांगत होतो. अहो ही आमची नाईट शिफ्ट हो. फार वैताग असतो नाईट शिफ्ट म्हणजे. तुम्हाला सांगून समजणार नाही. नाईट शिफ्टचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागेल तुम्हाला. अन आयटीमधली नाईट शिफ्ट मेकॅनिकल इंडस्ट्रीजमधल्या नाईट शिफ्टपेक्षा सर्व अर्थाने निराळी असते. कामाची वेळ एकतर दुसर्‍या देशांच्या हिशोबाने तयार केलेली असते. म्हणजे युके शिफ्ट, युएस शिफ्ट असल्या शिफ्ट असतात. म्हणजे इतर लोकं ढाराढूर झोपतात तेव्हा आमच्यातले काही जण भुतासारखे कंपनीच्या गाडीची वाट पाहत चौकात उभे असतात तर आमच्यातले काही लोकं कंपनीच्या गाडीतून गल्लोगल्ली सांडत असतात. काही जण झोपायची तयारी करतात तर काही जण जागण्याची, काही जण जेवणाची (दुपार की रात्र??) तयारी करतात. बरं हे (दुष्ट)चक्र पुन्हा काही दिवसांनी बदलणार असतं हो. म्हणजे एखाद्याची युके शिफ्ट बदलून युएस शिफ्ट होणार असते किंवा एखाद्याची सेकंड शिफ्ट बदलून मॉर्नींग किंवा नाईट शिफ्ट होणार असते. याशिफ्ट बदलाच्या सत्रामुळे घरच्यांकडे (किंवा बाहेरच्यांकडेही!) वेळ देता येत नाही. सगळीकडे वेळेची अ‍ॅडजेस्टमेंट करावी लागते. पुन्हा असो. कारण हा ही विषय माझ्या गोष्टीचा नव्हता.

तर मंडळी, कालपर्यंत गेल्या महिनाभरापासून मी नाईट शिफ्ट करत होतो. बरं आमचा एक प्रोजेक्ट गो लाईव्ह होणार असल्याने जबाबदारीचे काम होते. त्यामुळे खरोखरच्या कामात गुंतलो होतो. शिफ्टच्या वेळेपेक्षा दोन एक तास लवकरच घरातून निघावे लागत होते. कामावरून येण्याची वेळदेखील निश्चित नव्हती. म्हणजे रात्री दहाच्या सुमारास निघून सकाळी साडेसातला कंपनीतून निघावे लागे. कधी कधी कंपनीतून निघण्याचे सकाळचे साडेआठही होत. घरची मंडळी (म्हणजे आमची सौ. हो!) फारच वैतागली होती. एकतर नविनच लग्न झालेले त्यात बंगलूरू सारखे अनोळखी भाषा असलेले शहर. घरातली तशी कामे काही नव्हती पण मुख्य कारण म्हणजे माझी सोबत तिला मिळत नव्हती. आता नविनच लग्न झालेल्या जोडप्याला विरह अन त्यातही रात्रीचा एकटेपणा म्हणजे काय असेल याचा ज्याने त्याने आपआपल्या अनुभवावरून विचार करावा. तिची मानसिक स्थिती मला समजत होती पण मी तरी काय करू शकत होतो. काहीतरी टाईमपास व्हावा आणि तिच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून दोन एक ठिकाणी सांगितलेही होते. पण आता लगेचच काही तिच्या नोकरीचे काम होणार नव्हते. नाही म्हणायला ती कलाकुसरीची कामे घरातच करत होती. शिवणकामात तर एखाद्या फॅशन डिझायनरच्या तोंडात मारावी अशी कला तिच्या हातात होती. तिचे पंजाबी ड्रेसेस, ब्लाऊजेस, बाजूच्या लहान मुलांचे कपडे ती हौसेखातर घरी दिवसभर शिवत बसे. पण कदाचित रात्री एकटी ती वैतागत असावी.

कारण गेल्या पंधरा एक दिवसापासून तिची घरातली धुसफुस वाढली होती. माझ्या नाईट शिफ्टच्या वेळेचे अन ती कधी बदलेल याची काही शक्यता नव्हती. बरे, नाईट करून मी शारिरीक अन मानसिक थकलेलो असल्याने दुसर्‍या दिवशी दिवसभर काहीच 'कामाचा' रहायचो नाही. एकदोन वेळा तिने शिलाई मशीन चालवली पण आवाज होतो म्हणून मी तिला ती मशीन बंद करायला लावली. मला डिस्टर्बन्स नको म्हणून टिव्ही देखील ती म्युट करून पहायची. मलाही पुर्ण दिवस झोपून काढावा लागायचा इतका शारिरीक थकवा आलेला असायचा. काही काम नाही की कोठे फिरणे नाही. बहूदा त्यामुळेच ती वैतागली असावी असा मी समज झाला.

आता कालचीच गोष्ट. मी सकाळी घरी साडेआठला पोहोचलो. रात्री आमचा प्रोजेक्ट संपल्याने मला मोकळीक मिळाली होती आणि पुढच्या पंधरवड्यात माझी शिफ्ट बदलून फार क्वचित मिळणारी जनरल शिफ्ट झाली होती. कामाचा ताण कमी करण्यासाठी मी शनिवार रविवार जोडून तीन दिवस रजादेखील मंजूर करून घेतली होती. आज जरा खुशीतच सकाळी घरी आलो. आल्याआल्या बायकोला चहा करण्यासा सांगितले. जनरली नाईट करून आल्यानंतर झोप उडू नये म्हणून मी चहा कधीच घेत नसे. आज मात्र मी चक्क चहा टाकण्यास सांगितले. आता दिवसा झोप घेण्याची गरज नव्हती. मस्तपैकी नविन लग्न झालेल्या जोडप्याचे फुलपांखरी दिवस (अन रात्रीही!) अनुभवता येईल असा माझ्या मनात विश्वास आला होता. मन आनंदाने उचंबळत होते.

"अग, एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला", चहा घेतल्यानंतर मी तिला बोललो.

"काय?" तिने थोड्या नाराजीनेच पण चेहेर्‍यावर तसा भाव न दाखवता विचारले.

"अगं, माझी नाईट शिफ्ट आज संपली. आता चारएक दिवस चांगली विश्रांती घेवून मग दिवसाच्या शिफ्टमध्ये कामावर जाणार आहे", मी मनातले मांडे मनात खात मोठ्या आनंदाने चित्कारलो.

"काय!" ती पण आनंदाने मोठ्या आवाजात उद्गारली.

माझ्या मनात जे काही रंगीत संगीत विचार येत होते तसलेच विचार तिच्याही मनात असावेत हे समजून माझ्या मनाला अगदी बरे वाटले. माझ्य मन आनंदाने उचंबळून आले. एखादा जलप्रपात जलाने ओतप्रोत भरून जसा वाहवेल अन कड्यांवरून कोसळत नदीच्या मिलनाकडे धावेल तसे माझे मन त्याच विचारांच्या दिशेने धावू लागले. (प्रसिध्द लेखकांसारखे किंवा कविंसारखे असलेच हळूवार, तरल विचार माझ्या मनी उमटू लागले. पण मी काही लेखक किंवा कवी नाही.)

"खरंच तुलाही आनंद झालाय?" मी साध्या सरळ माणसासारखा अ-साहित्यीक प्रश्न तिला विचारला.

"खुप बरं वाटलं मला...."

ती पुढे काय बोलते ते ऐकण्यासाठी माझे प्राण कानाशी आले.

".... बरं झालं तुमची नाईट शिफ्ट संपली ते. फार वैतागले होते मी त्या नाईट शिफ्टला. दिवसभर तुमची झोप झोप. काम नाही की काही नाही. माझी घरातली कामे किती अडली होती. आता मी मनमोकळेपणे शिलाई मशीन चालवू शकेल. माझ्या चार नव्या साड्यांवरचे ब्लाउजेस शिवायचे बाकी आहेत. शेजारचे दोन तिन कपडेही शिवायचे आहेत. झालंच तर घरातली भांडी डबे पण धुवायचे आहेत. सगळी कामे आवराआवर करायची आहेत मला. बरं झालं ते तुमची नाईट शिफ्ट संपली ते."

तिचे ते बोलणे ऐकून माझ्या मनातला निर्झर पावसाळा संपल्यानंतर लगेचच हिवाळ्याच्या सुरूवातीलाच सुकावा तसा सुकला हे काय मी तुम्हाला सांगावं का?

डिस्क्लेमर: कथेतील व्यक्ती, घटना, प्रसंग, ठिकाण लेखकाचे असतीलच असे नाही. त्या घटना, प्रसंग, ठिकाणांत तुम्ही स्वत: त्यातील पात्र असल्याचीही कल्पना करू शकतात.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हाहा!!! मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0