विश्वाचे आर्त - भाग १३ - 'आहे' आणि 'असावं'

गेल्या भागात आपण 'सामाजिक डार्विनवादा'बद्दल जाणून घेतलं. 'लायक असलेले टिकून राहातात' या निसर्गनियमाचं 'बळी तो कान पिळी' अशा समाजनियमात रूपांतर झाल्यामुळे 'जगण्यास नालायक असलेल्यांना पुनरुत्पादन करू देऊ नये' या स्वरूपाचा विचार पुढे आला. त्यातूनच अनेक अपंग, दुर्बळ लोकांची सक्तीची नसबंदी करण्यात आली. हिटलरने हेच तत्त्व वापरून ज्यू वंशाचा संपूर्ण निःपात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक जणांच्या मनात डार्विनवाद किंवा उत्क्रांतीवादाची सांगड हिटलर आणि त्याच्या नृशंस कृत्यांबरोबर केली जाते. उत्क्रांतीला विरोध करणारे अनेक जण 'हिटलर उत्क्रांतीवादी होता' असं सांगून उत्क्रांतीवादावर कलंक फासण्याचा प्रयत्न करतात. असा प्रयत्न करणं अर्थातच साफ चूक आहे. ही चूक नक्की कशी होते ते आपण या भागात समजावून घेऊ.

उत्क्रांतीवाद 'वापरणं' म्हणजे काय? इथे काहीसा असा युक्तिवाद होतो - 'उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार निसर्गात जे कमकुवत असतात ते नष्ट होतात. जे शक्तीमान असतात, किंवा जगायला लायक असतात तेच टिकतात. अर्थातच, दुर्बळ नष्ट व्हावे आणि सबळ टिकून राहावे ही निसर्गाचीच इच्छा आहे. त्यामुळे जे दुर्बळ आहेत त्यांना जगू देऊ नये. जगलेच तर किमान त्यांनी पुनरुत्पादन करून त्यांचा दुर्बळपणा पुढच्या पिढीत जाऊ देता कामा नये. यासाठी त्यांच्यावर लग्न करायला बंदी करावी. किंवा त्याहून उत्तम म्हणजे त्यांच्यावर सक्तीची नसबंदी करावी.'

वरची वाक्यं पुन्हा एकदा वाचून पाहा. त्यातली पहिली दोन ही नैसर्गिक निवडीतून होणाऱ्या उत्क्रांतीची सत्यं आहेत. तिसऱ्या वाक्यात 'निसर्गाची इच्छा' हा शब्दप्रयोग वापरून त्या वर्णनाला एका उच्च शक्तीच्या प्रेरणेचं अधिष्ठान आलेलं आहे. आणि त्यानंतर 'त्या इच्छेनुसार या या गोष्टी व्हाव्यात' अशा प्रकारची विधानं आहेत. म्हणजे सुरूवात वैज्ञानिक सत्यांपासून होते आणि त्यावरून नीतिमत्तेबद्दल, किंवा मनुष्याने काय करावं याबद्दल निष्कर्ष काढले गेलेले आहेत. 'काय आहे' पासून 'काय असावे' इथपर्यंतचा हा प्रवास आपल्या नकळत होतो. यातला फोलपणा लक्षात घेण्यासाठी उत्क्रांतीऐवजी गुरुत्वाकर्षण वापरून वरचाच युक्तिवाद मांडून पाहू.

'गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार निसर्गात ज्या गोष्टी वर असतात त्या अपरिहार्यपणे खाली खेचल्या जातात. आणि खाली असलेल्या वस्तू खालीच राहातात. अर्थातच, वरच्या गोष्टी खाली याव्यात आणि सर्वच गोष्टी खाली राहाव्यात ही निसर्गाचीच इच्छा आहे. त्यामुळे वरती कुठच्याच वस्तू ठेवू नयेत. जर काही वस्तू वर असतील तर किमान त्यांना खाली आणून ठेवावं. यासाठी वरच्या वस्तू खाली आणणारी यंत्रणा जगभर बनवायला हवी. डोंगरमाथ्यावरून दगड खाली उतरवून ते मोकळ्या मैदानात आणून ठेवावे.'

हे वाचताना या युक्तिवादातली विसंगती स्पष्ट होते. हो, वरच्या वस्तू खाली खेचल्या जातात खऱ्या. पण त्या खालीच असाव्यात अशी कोणाची इच्छा आहे? निसर्गात एखादी गोष्ट घडताना दिसते म्हणजे ती तशी घडावी, घडत राहावी अशी जबाबदारी माणसावर येत नाही. गुरुत्वाकर्षण हे एक नैसर्गिक बल आहे. ते आंधळेपणाने काम करतं. त्यामागे कोणाची इच्छा नाही. किंबहुना ते बल आहे म्हणून खरं तर वस्तू वरती नेण्यासाठी आणि तिथे त्या टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न घ्यावे लागतात. उत्क्रांतीबाबतही हेच म्हणता येतं. गुरुत्वाकर्षणाप्रमाणेच उत्क्रांतीतूनही नैतिक मूल्यं काढण्याची गरज नाही. निसर्गात नक्की काय घडतं हे उत्तम रीतीने समजावून सांगणारा तो सिद्धांत आहे. गुरुत्वाकर्षणाप्रमाणेच तो अनेक वेळा सत्यही सिद्ध झालेला आहे. याचा अर्थ असा नाही की मानवी समाजात काय घडायला हवं याबद्दल काही निष्कर्ष आपण त्यातून काढावा. सामाजिक डार्विनवाद पुढे करणारांनी हाच निष्कर्ष काढण्याची चूक केली. हिटलरने आपल्या स्वार्थासाठी म्हणा, आपल्या ज्यूद्वेषापायी म्हणा, सोयीस्करपणे हा निष्कर्ष वापरून ज्यूंची कत्तल केली. पण त्यामागे उत्क्रांतीवादाला दोष देणं योग्य नाही. उद्या कोणी माथेफिरू हुकुमशहाने, राज्यातल्या सर्व वरच्या वस्तू खाली आणून ठेवण्यासाठी त्याच्या हातची यंत्रणा राबवली तर त्यासाठी गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला दोषी धरण्याइतकंच ते निरर्थक आहे.

निसर्गात दिसणाऱ्या गोष्टींना आपण नैसर्गिक हा शब्द वापरतो. नैसर्गिक या शब्दाला इतरही छटा आहेत. जे जे काही सहजपणे येतं, जे बहुतेकांमध्ये दिसून येतं, अंगभूत गुणधर्म वगैरे वगैरे. नैसर्गिक म्हणजे काहीतरी चांगलं तर अनैसर्गिक म्हणजे काहीतरी विकृत, वाईट. त्यामुळे नैसर्गिक या शब्दातच एक हवेसेपणा, आदर्श असं काहीतरी आहे. प्राचीन काळापासून निसर्गाच्या वेगवेगळ्या भागांना देव मानण्याची प्रथा आहे. निसर्गाविषयी एक आदरयुक्त भीतीही आपल्या मनात असते. त्यामुळे निसर्गाला देवाच्या ठिकाणी ठेवून त्याच्या इच्छांना मान देण्यासाठी कल्पनेला फार ताण द्यावा लागत नाही. त्या स्वरूपाची मानसिकता आपल्यात आधीच तयार असते. यातून नैसर्गिक सत्य ते नैतिक नियम असा प्रवास होतो. या गोंधळाच्या प्रवासाला नॅचरॅलिस्टिक फॉलसी किंवा अपील टु नेचर असं म्हटलं जातं. दोन्हींचे अर्थ किंचित वेगळे असले तरी 'निसर्गात जे घडतं ते चांगलं किंवा स्वीकारार्ह, म्हणूनच नैतिकदृष्ट्या बंधनकारक असतं' ही भावना वापरून जे युक्तिवाद केले जातात, त्यांचं ते वर्णन आहे.

'मला गोड चव आवडते कारण तीतून मला आनंद मिळतो. हा आनंद मिळावा ही निसर्गाचीच इच्छा आहे, तेव्हा मी भरपूर साखर खावी.'
'हिंसेची प्रवृत्ती मनुष्यात नैसर्गिक आहे, त्यामुळे ती प्रवृत्ती वापरून जर कोणी कोणाला मारलं तर ते योग्यच समजलं जावं'
आपल्याला दिसणाऱ्या निसर्गनियमांचा विस्तार करून त्यातून नैतिक मूल्यं काढण्याची ही दोन उदाहरणं झाली. आपल्याला हे माहीत आहे की अतिरेकी गोड खाणं तब्येतीला चांगलं नाही. तसंच हिंसक प्रवृत्ती सर्वांमध्येच असल्या म्हणून त्यांचा वापर करणं समाजमान्य नाही. किंबहुना गुरुत्वाकर्षणाविरुद्ध बल वापरून वस्तू वर न्याव्या लागतात, त्याचप्रमाणे हिंसेच्या बाबतीतही काही विशिष्ट सामाजिक आणि मानसिक बल वापरून आपल्याला त्या प्रवृत्ती काबूत ठेवाव्या लागतात. गुरुत्वाकर्षणाविषयीच्या ज्ञानातूनच आपल्याला हे बल वापरण्याची गरज लक्षात येते. त्याचप्रमाणे मानवात हिंसक प्रवृत्ती आहेत या माहितीचा उपयोग त्यांना मोकाट सोडण्यासाठी नव्हे तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी करावा लागतो. 'काय आहे' वरून 'काय असावं' हे सरळसोटपणे ठरवून चालत नाही. किंबहुना 'काय आहे' यावरून 'हे असू नये, यासाठी काय प्रयत्न करावे' असा विचार करावा लागतो.

नैसर्गिकतेवरून नैतिकता ठरवण्यातून इतरही अनेक गोंधळ निर्माण होतात. विशेषतः लैंगिकतेच्या बाबतीत तर फारच गंभीर प्रश्न उभे राहातात. निसर्गतः मनुष्य किंवा इतर प्राणी हे एकपती/पत्नीव्रती असतात का? आत्तापर्यंत अनेक प्राण्यांमध्ये - ज्यांमध्ये एकाच जोडप्याने एकत्र राहाण्याची प्रथा आहे अशा प्राण्यांतही अनेक नर अनेक माद्यांशी संबंध ठेवताना आढळलेले आहेत. पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक एकपत्नीव्रत असतं, पण लैंगिक एकपत्नीव्रत नसतं. शास्त्रज्ञांनी जेव्हा अनेक पक्षी प्रजातींचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की १०% ते ४०% पिलं ही जोडप्यात नसलेल्या नरापासून झालेली असतात. मग माणसांचं काय? एकंदरीत सस्तन प्राण्यांमध्येच जोडप्याने राहाण्याची प्रथा कमी प्रमाणात - फक्त सुमारे ४% प्रजातींमध्ये असते. माणसामध्ये अनेकपत्नी प्राण्यांचे अनेक गुणधर्म दिसतात. सर्वच समाजात ज्यांना परवडतं अशांमध्ये अनेक लग्नं करण्याची प्रथा होतीच. अनेकपत्नीव्रती प्राण्यांत माद्यांपेक्षा नर मोठे असतात, माणसातही तेच दिसतं. तेव्हा माणूस हा नैसर्गिकरीत्या अनेकपत्नीव्रती आहे. मग ही प्रथा सर्वत्र असावी का? जोडप्याप्रमाणे राहाणाऱ्या प्राण्यांमध्ये जोडप्याबाहेर संबंध ठेवलेले पाहाण्यात येतात म्हणून माणसांमध्येही ते नैतिक ठरेल का? अर्थातच याची उत्तरं फक्त 'निसर्गात ते दिसून येतं' एवढ्या एकाच कारणावरून देता येत नाहीत. समलैंगिकतेबाबतही तेच. आत्तापर्यंतच्या नैतिकतेच्या कल्पनांमध्ये समलैंगिकता अनैसर्गिक, म्हणून त्याज्य ठरवलेली होती. पण आता आपल्याला इतर प्राण्यांतही समलैंगिकता दिसून येते. मग काय करायचं?

मुद्दा असा आहे की नैतिकता आणि नैसर्गिकता याचा 'केवळ नैसर्गिक म्हणून नैतिक' इतका सरळ संबंध लावता येत नाही. नैतिकतेचे नियम एक समाज म्हणून जगण्यासाठी आवश्यक आहेत. पण त्यासाठी निसर्गासारख्या कुठच्यातरी उच्च शक्तीच्या तथाकथित इच्छेचा आधार घेणं योग्य नाही. कारण निसर्गाला इच्छा नसते. निसर्ग केवळ असतो, आपल्या भवतालाला आणि आपल्याला सामावून घेत. ज्याला आपण निसर्गाचे नियम म्हणतो ते निसर्गाने घालून दिलेले नियम नाहीत, तर निसर्गाला नियंत्रित करणारे नियम आहेत. ते नियम हे अणुरेणूंच्या पातळीवर सुरू होतात, आणि लक्षावधी किलोमीटरच्या पातळीवरही लागू होतात. त्यांमध्ये आपपरभाव नाही, हेतू नाही. या नियमांनुसार काय आहे हे ठरतं. आणि जगण्यासाठी हे ज्ञान आवश्यक आहे. पण काय असावं हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा संकल्पनांच्या आधारावर ठरवावं लागतं. आणि त्यासाठी काय करावं हे सुजाण मानवी समाजाने ठरवायचं असतं.

(मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

वाचत आहे