इंटिमेट डेथ- आयुष्याचा सांगाती

टीप: हे जवळजवळ दोन वर्षांपूर्वी लिहले होते. आज सहज सापडले म्हणून अप्लोड करते आहे.

इंटिमेट डेथ- आयुष्याचा सांगाती.

मरणातून जगायला शिकता येईल का? अगदी शाळेत असल्यापासून मृत्यूबद्दलाची वचने व मराठीच्या पुस्तकातील गूढ गुंजनात्मक कवितांमुळे मृत्यू म्हणजे एक अनाकलनीय, चर्चा न करण्याची बाब आहे असा एक ग्रह होता. हा गहन विषय फक्त तत्ववेत्ते किंवा ज्येष्ठ नागरिकांचा आहे. आपल्याला त्यात काय कळणार असेही वाटले. 'एक होता कार्व्हर', 'लीझ माईट्नर', 'भगीरथाचे वारस' यांसारखी विचार प्रवर्तक पुस्तके लिहिणाऱ्या वीणा गवाणकर यांनी अनुवाद केलेले हे पुस्तक वाचायला घेतले अन इतके आवडले की २-३ दिवसांत कामाला जाता-येता बस प्रवासात वाचून संपवले. मूळ लेखिका डॉ. मारी डी हेनेझल ह्या पेशाने मानस शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी पॅरिसमधल्या पहिल्या पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये बऱ्याच कर्करोगी व एडसग्रस्तांसोबत सात वर्षे जो संवाद साधला व अनेक मृत्यू अगदी जवळून पाहिले. त्यामधून त्यांना मृत्यूसारख्या जीवनातील सर्वांत समृद्ध, उच्च अशा अनुभवाचे दर्शन झाले. त्याचीच ही कहाणी! डॉ. मारी यांनी अगदी गलितगात्र, मरणोन्मुख अन काही तर मूक बधीर अशा लोकांशी कसा बरे संवाद साधला? आणि त्यांच्या मरणातून डॉ. मारी व त्यांचे सहकारी काय बरं शिकले? ह्या रुग्णांच्या केसेसचे हृदयस्पर्शी संकलन ह्या पुस्तकात असून फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा मित्रां ह्यांची प्रस्तावना ह्या पुस्तकास लाभलेली आहे. हे पुस्तक २२ भाषांमध्ये भाषांतरीत झालेले असून एकट्या फ्रांसमध्ये त्याच्या ७००,००० प्रती खपलेल्या आहेत. असे हे गाजलेले पुस्तक मराठी वाचकांपर्यंत आणण्यात वीणा गवाणकर यशस्वी झालेल्या आहेत.

पॅलिएटिव्ह केअर युनिट म्हणजे कर्करोग, एडस व इतर जीवघेण्या रुग्णांसाठी असलेले नर्सिंग होम. इतर रुग्णालये आणि वैद्यकशास्त्र जेव्हा हात टेकतात आणि रुग्णाला घरी ठेवणेही अशक्य होते. तेव्हा त्यांना ह्या केंद्रात दाखल केले जाते. इथे मृत्यू पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत आणि इच्छामरणही देत नाहीत. केवळ उरलेले दिवस शक्य तेवढे सुसह्य कसे करता येतील, रोग्याचे मानसिक संतुलन कसे राखता येईल त्याचा प्रयत्न केला जातो. इथे आलेल्या पॉल, पॅट्रीक, डॅनियल, मार्सेल अशा अनेक तरुण-वयस्क, मरणोंमुख माणसांच्या गोष्टी या पुस्तकात आहेत. ही माणसे काही आठवड्यांत किंवा महिन्यांत मरतात. पण आपल्याला आपले मरण दिसते आहे, आपल्या मुलांना किंवा आई-वडिलांना काय वाटेल, किती दु:ख होईल या विचाराने ती पिचलेली असतात. ह्या माणसांना सत्याला सामोरे जाण्याची त्यांची हिंमत नसते. उदा. पॉल सारखा तरुण! आपण समलिंगी आहोत ही बाब त्याने आई-वडिलांना सांगितलेली नसते. अशा वेळी डॉ. मारी व तेथील सहकारी त्यांना प्रेमाचा, मदतीचा हात पुढॆ करतात. त्या बाप-लेकांत उशीरा का होईना पॉलच्या मृत्यू आधी संवाद साधण्याचे काम डॉ. मारी करतात. रुग्णाने किती वेळा ओकारी केली अन कितीदा बिछाना खराब केला ते मोजत न बसता हसतमुखाने अंतिम घटकेपर्यंत साथ देणाऱ्या परिचारिका व मदतनीस हे ह्या केंद्राचे वैशिष्ट्य. अर्थात ही सारी मंडळीसुद्धा माणसेच असतात. त्यांनासुद्धा हे काम करतांना मानसिक ताण पडणे साहजिक आहे. पण डॉ. मारी व इतर कार्यकर्ते रोज सकाळी एकत्र कॉफ़ीपान करतात. आपले अनुभव एकमेकांना सांगतात. यातून एखाद्या कठिण रुग्णाला कसे वागवायचे ह्यावर उपाय शोधले जातात.

डॉ. मारी मात्र इतके मोठे कार्य करूनसुद्धा विनयाने लिहितात की "मृत्युसंदर्भात मला अजूनही फार काही समजत नाही." पण यामुळे त्यांना मिळालेली सुख-दु:खं, श्वसन या सारख्या आपोआप होणाऱ्या क्रियाही त्या अधिक सजगतेने व जाणीवपूर्वक जगतात. रुग्णांच्या मृत्यूतून त्या जगायचं कसं ते शोधू पाहतात. आपल्याकडे नसलेल्या वस्तूबद्दल रडण्यापेक्षा असलेल्या गोष्टी आंनदाने अनुभवायला शिकतात. नुसत्या स्पर्शातून आणि आलिंगनातून मरायला टेकलेल्या माणसाला चैतन्याची जाणीव करून देतात. ह्या पुस्तकातील मला आवडलेले तीन महत्त्वाचे मुद्दे म्हणजे, आपण आणि आपले नातलग सर्वच कधीतरी मरणार आहोत; माणसांबद्दल आपण मते करून ठेवतो पण मरता मरता त्यांच्या वृत्तीत फरक पडत असतो; आणि तिसरा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शारिरिक क्लेष जरी कमी करता आले नाहीत तरी बोलून किंवा स्पर्शातून मी कुणाचं तरी दु:ख कमी करू शकते!

पुस्तक वाचतांना मला माझ्या शंभर वर्षांच्या आजे-सासूबाईंची सारखी आठवण येत होती. वरवर पाहता असे वाटे की यांना काही संवेदना नाहीत. नैसर्गिक विधी समजत नव्हते. अशा वेळी कामाला ठेवलेल्या बाया काम उरकायचं म्हणून आपली स्वच्छता करत. पण केव्हातरी घरच्यांनी जरा मनापासून आंघोळ घातली किंवा पुसले की त्यांचा चेहरा प्रसन्न वाटे. येता-जाता जरा काही बोलले तर त्यांना बरे वाटे. कित्येकदा आम्हांला त्यांच्या बरोबर काय बोलावे हेच कळत नसे. आता हे पुस्तक वाचल्यावर कळते आहे की त्यांच्याशी कशावर बोलतो आहोत त्या विषयाला काही महत्त्व नसते. कुणीतरी "मला विचारतंय" एव्हढंसुद्धा त्यांना पुरे होतं. डॉ. मारी यांच्या केंद्रात अशा स्पर्शाला व संवादाला खूप महत्त्व आहे.

वृद्धाश्रमात आणि एडसच्या करुणालयात समाजसेवेसाठी माझे विद्यार्थी जात असतात. दर वेळी काय कार्यक्रम करावा असा प्रश्न पडतो. भाषेची अडचण येते. आता मला कळले की नुसतं जाऊन भेटलं तरी त्यांना आनंद होतो. ते रुग्ण दर शनिवारी वेळ झाली की वाट बघत असतात. एकंदरीत वृद्ध, गलितगात्र व्यक्तींकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलायला ह्या पुस्तकाची थोडीफार मदत झाली. अर्थात भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात, जिथे कित्येक गरीब स्त्री-पुरुष दारिद्र्य रेषेखाली शेवटच्या घटका मोजत असतील. त्यांना तर साधे अन्नसुद्धा मिळत नसेल. त्या माणसांनी मृत्यूला कसे सामोरे जावे? ह्या बाबत या पुस्तकात फारशी माहिती मिळत नाही. मात्र अशी पॅलिएटिव्ह केअर युनिटस शहरात काढणं शक्य आहे. इच्छामरणाचा हक्क कायदेशीर करण्यापेक्षा मरणाऱ्याला अशी मदत देणं हे माणुसकीला धरून असेल.

मृत्यूसारखा अगाध विषय गोष्टीरूपाने, सत्यकथांमधून पटवण्याचा हा अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे- तोही धर्म किंवा श्रद्धा यांचा फारसा आधार न घेता केलेला! डॉ. मारी डी हेनेझेल यांचे हे माणुसकीने ओतप्रोत भरलेले कार्य वीणाताईंनी मनापासून अनुवादित केलेले आहे. त्यांची भाषा सोपी-सुलभ आहे. यातील पात्रे जरी फ्रेंच असली तरी ही "घर-घरकी कहानी" आहे. अशी माणसे तुम्हा-आम्हाला कुठे न कुठे भेटतातच. तरुण-वयस्क, निरोगी-रुग्ण या सर्वांनाच यातून शिकण्यासारखे आहे. विशेषत: वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना तर हे अतिशय प्रेरणादायी पुस्तक आहे.

गौरी दाभोळकर

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

आपल्याच नातलगानी येऊन बोललं अंग पुसलं की त्यांचा चेहरा तजेलदार दिसतो.इकडे आपल्याकडे अशीच सुश्रुषा केली जाते घरीच.सर्वच रुग्ण पांढय्राशुभ्र स्टरलाइझ्ट वातावरणात नसतात त्यामुळे मारीची संशोधनाची गरज लागत नाही शेवटचा काळ रुग्ण कसा काढतात ते पहायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> मात्र अशी पॅलिएटिव्ह केअर युनिटस शहरात काढणं शक्य आहे. इच्छामरणाचा हक्क कायदेशीर करण्यापेक्षा मरणाऱ्याला अशी मदत देणं हे माणुसकीला धरून असेल.

ह्या दोहोंत मला अंतर्विरोध दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

मृत्यू! त्याच्या सारखं भयाण सत्य आणि त्याचा सामना सगळेच करत असतो. रोज. दर श्वासागणिक.
पण ज्यांना त्याच्या आगमनाची चाहुल लागते त्याच्या मनाची घालमेल, घरच्यांची/मैत्राची असहायता, शेवटाच्या क्षणापर्यंत प्रबळ रहाणारी जीवनेच्छा इत्यादीमुळे अशा व्यक्ती आणि त्यांचे अशा गोष्टींना सामोरे जाण्याची तर्‍हा याचे अनेक रंग नि रंगछटा आहेत. कित्येक चित्रकार, शिल्पकार, चित्रपट निर्माते/दिग्दर्शक, लेखक, कवी अशा अनेक कलाकारांना ही स्थिती नेहमीच भुरळ पाडते.

अशा मृत्यूच्या गुहेतून लिहिलेले हे पुस्तक मराठीत आणणे हे महत्त्वाचे काम आहे. त्याबद्दल गवाणकरांचे आभार! (इथे माहिती दिल्याबद्दल गौरीताई तुमचेही आभार!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुस्तक परिचय आवडला. तुला आवडलेला पुस्तकातला एखाद-दुसरा उतारा इथे टंकता येईल का? (एक-दोन उतारे टंकल्यामुळे कॉपीराईटची अडचण येणार नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिंक दिली आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

पुस्तक परिचय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओळख आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0