फुसके बार – २८ जानेवारी २०१६

फुसके बार – २८ जानेवारी २०१६
.
१) कालच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही प्रश्न पडले. डोक्यावर टोपी नसताना राष्ट्रगीताच्यावेळी झेंड्याला सॅल्युट करू नये, राष्ट्रगीत म्हणून झाल्यावर घोषणा देऊ नयेत असे काही नियम असल्याचे वाचले होते. हे नियम आता बदलले आहेत का? शिवाय लाउडस्पिकरवर किंवा वाद्यवृंदाद्वारे राष्ट्रगीत वाजवले असताना इतरांनी ते म्हणू नये असा काही नियम आहे काय?

२) बापलेकी या पुस्तकात दीपा गोवारीकरांनी त्यांच्या वडलांच्या रागाचा उल्लेख केला आहे. इतका रागीट स्वभाव की कुलुप उघडत नसेल, ते कुलपावरही रागवायचे. एखादे वाहिलेले फूल देवावर नीट बसत नसले, तर त्या फुलाचीही खैर नसे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान झालेल्या निवडणुकीमध्ये आचार्य अत्रेंनी आपल्या भाषणात सर्वांवर सडकून टीका केली; मात्र व्यासंगी आळतेकरांची गंगा कॉंग्रेसच्या गटारीतून वाहते आहे, हेही मतदारांनी लक्षात ठेवावे असे सांगितले. सी. डी. देशमुखांचा स्वत:चा संस्कृतचा अभ्यास एवढा, की तेही चर्चेच्या दरम्यान ‘एनी सुटेबल कोटेशन मिस्टर आळतेकर?’ असे त्यांना विचारायचे, एवढा व्यासंग.

मुलगी झाल्यावर तिला कर लागली आहे, तिची शांत करावी लागेल असे कोणी तरी सांगितल्यावर ‘मुलांच्या जन्माइतका दुसरा कुठला आनंद नसतो, शांत वगैरे करण्याचे काहीही कारण नाही’ हे याच वडलांनी ठणकावून सांगितले होते.

एकाच व्यक्तीचे असे विविध पैलू. मुळात बापलेकी हे पुस्तक म्हणजेच विविध लेकींच्या विविध अनुभवांचा मोठा ठेवा आहे. जरूर वाचा.

३) राज्यातील गडसंवर्धनाची जबाबदारी राज्यांकडे सोपवा, अशी फुसकुली उद्धव ठकवणारे यांनी सोडली आहे. ती जबाबदारी तशी सोपवली की सगळ्या गडांवर यांचे झेंडे व फ्लेक्स लागलेच म्हणून समजा.

४) ज्यांना कसलाही पुरस्कार मिळालेला नाही, त्यामुळे जे कशाचाच ‘वापसी’ करून निषेध करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी एक मार्ग: ज्याचा निषेध करायचा त्याच्यावर फेबुवर आलेल्या एखाद्या टिप्पणीवर आपण एखादा ’लाइक’ दिला असेल तर तो काढून घेणे. अर्थात त्यासाठी फेसबुकवर असणे गरजेचे.

५) द. भि. कुलकर्णी यांचे दु:खद निधन

अतिशय ऋजु व्यक्तिमत्व. अंभृणी हे त्यांच्या डीएसके विश्वमधील फ्लॅटला लागून असलेल्या बागेला त्यांनी दिलेले नाव. ज्ञानेश्वरीवर जीवापाड प्रेम. समोरचा कितीही विद्वान असो वा सामान्य असो, आपल्या विद्वत्तेचा टेंभा न मिरवता त्याच्या पातळीवर जाऊन बोलण्यामध्ये त्यांची हातोटी होती.

सिंहगड रोडवरील धायरीला जाण्याआधी डावीकडील एका रेस्टॉरंटच्या बाहेरील एका पानवाल्याकडून ते नियमित पान घेत असत. हॉर्न वाजवून गाडीची काच खाली केली की पानवाला त्यांचे खास पान आणून देई. त्याने दभिंना ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला पुन्हा का उभे राहू शकत नाहीत असे विचारून भंडावून सोडले होते. अशी कोणती निवडणूक अहे की माणूस पुन्हा लढवू शकत नाही याचे त्याला कोडे पडले होते. इतका मोठा लेखक माणून आपल्याकडून नियमितपणे पान विकत घेतो ही त्या पानवाल्याच्या लेखी मोठीच गोष्ट होती.

एका कार्यक्रमासाठी त्यांचा परिचय तयार करण्याचे काम माझ्याकडे होते. तयार झाल्यावर मी त्यांना ते लिखाण दाखवले. तर माझ्या लिखाणाच्या यादीतले काही कमी करायचे तर करा, पण मी अगदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून पीएचडीच्या मुलांना मार्गदर्शन करण्यापर्यंत म्हणजे सर्व पातळीवरील विद्यार्थ्यांना शिकवले आहे, हे त्यात आवर्जून लिहा असे त्यांनी सांगितले.

एका विद्वानाला व तसेच प्रेमळ व्यक्तीला श्रद्धांजली.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वारंवार सांगूनही योग्य ठिकाणी लेखन न केल्यामुळे धागा वाचनमात्र करण्यात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0