फुसके बार – ०३ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – ०३ फेब्रुवारी २०१६
.

१) छगन भुजबळांच्या बाबतीत शरदरावांना पडलेले प्रश्न भलतेच गंमतशीर आहेत.
एकाच प्रकरणी तीन-तीनदा छापे कसे? त्यांना यामध्ये भुजबळ कुटुंबाला जाणूनबुजून टार्गेट केल्याचेही वाटत आहे. मागे याच पवारसाहेबांनी भुजबळांबरोबर आपल्यालाही अटक करा असे जाहिरपणे सांगितले होते. सरकारने पवारसाहेबांची ही इच्छा खरोखर पूर्ण करायला हवी होती.

भुजबळांनी त्यांच्या व्हॉट्सअपचा डीपी बदलल्याचीही बातमी झाली. पाठीत अनेक खंजीर खुपसले याचे एक रेखाचित्र होते. ते खंजीर कसले, धार नसलेले किचन नाईफ दिसतात.

आयुष्यभर मस्तवालपणा केल्यानंतर आता त्याची फ़ळे भोगावी लागण्याची निव्वळ सुरूवात झाली की लगेच या निलाज-यांना आपण मागासवर्गीय असल्याची आठवण येते व त्यामुळेच आपल्यावर आकसाने कारवाई होत असल्याचा कांगावा करावा लागतो, यातच काय ते समजावे.

२) आता ‘उघडा डोळे – बघा नीट’, नजिकच्या भविष्यात ‘उचला जीभ, लावा टाळ्याला’

एबीपी माझाची टॅगलाईन ‘उघडा डोळे – बघा नीट’ हीफार भडक आहे असे वाटते. ते यापेक्षा काही तरी चांगले शोधू शकले असते. या न्यायाने त्यांची पुढची टॅगलाईन ‘उचला जीभ, लावा टाळ्याला’ अशी असल्यास आश्चर्य वाटायला नको.

त्यांच्या रात्री दहाच्या बातम्या एक जोडपे अगदी शेजारी शेजारी बसून पाहते ही त्यांची स्वत:ची जाहिरात फारच मौजेची आहे.

३) ‘माझ्या बाबाना विचारा’ ही लोकसत्ताची सध्याची जाहिरात इतकी साधारण आहे, की त्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दलही तसा समज होईल याची भितीही त्यांना वाटत नाही का?

४) टीव्हीवर अशा जाहिराती चालू आहेत, की जाहिरात तयार करणा-यांची कीव वाटावी.

अॅमरॉन बॅटरीची काही आदिवासींबरोबरची जाहिरात दाखवतात. चांदीचा पत्रा पायाला गुंडाळून निखा-यावर नाचणे दाखवतात. कारण म्हणे या बॅटरीत चांदीचे काहीतरी असते. आता चांदी ही उष्णतेची उत्तम वाहक आहे हे लक्षात घेतले तर या जाहिरातीचा पाया कसा आहे हे सहज कळावे.

कधीकधी तर संशय येतो, की आपल्यालाच जाहिरात कळलेली नाही की काय!

५) १९८३मध्ये पंजाबचे डीआयजी अवतारसिंग अटवाल यांची सुवर्णमंदिरात दर्शन घेऊन आल्यावर तिथल्याच पाय-यांवर गोळ्या मारून हत्या करण्यात आली. हल्लेखोर सुवर्णमंदिरातून बाहेर आले व त्यांची हत्या करून पुन्हा मंदिरातच परत गेले.

त्या काळात भिंडरावालेची एवढी दहशत होती की कुठल्याही पोलिसाची आपल्या साहेबाचा मृतदेह हलवायची हिंमत झाली नाही. तो मृतदेह सुवर्णमंदिराच्या पाय-यांवर दोन तासांपेक्षा अधिक वेळ पडून होता.

अखेर कॉंग्रेसचे मुख्यमंत्री दरबारा सिंग यानी भिंडरावाले याला फोनवर ‘विनंती’ केली की पोलिसे अधिका-याचा मृतदेह हलवू द्यावा. तेव्हा कोठे तसे झाले.

याच अटवाल यांची पत्नी पुढे पंजाब राज्य सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गेली तर मुलगा पोलिसांमध्ये.

राजकारण्यांच्या क्षुद्र राजकारणापोटीच्या स्पर्धेत बळी शेकडोंपैकी एक. डीआयजी अवतार सिंग अटवाल.

अकाली दलाला पंजाबात राजकीय शह देण्यासाठी संजय गांधी व गृहमंत्री झैलसिंग यांनी शोधून काढलेले प्यादे व त्याला पाठिंबा इंदिरा गांधींचा.

कॉंग्रेसचे स्वत:चे मुख्यमंत्री दरबारासिंग यांनाही भिंडरावाले याच्यावर कारवाई करायची होती, पण ती रोखणारे होते झैलसिंग व त्याबद्दल काही न करणा-या होत्या स्वत: इंदिरा गांधी. एवढए होऊनही त्यानंतर इंदिरा गांधींनी काय करावे, तर दरबारा सिंग यांचे म्हणजे आपलेच सरकार बरखास्त केले.

एबीपी न्यूजच्या प्रधानमंत्री या मालिकेतील हा काही भाग.

भस्मासूराची पुराणातली कथा खरी असेल नसेल, येथे मात्र खरी झाली. फरक इतकाच, येथे हा भस्मासूर इतरही बरेच काही भस्म करून गेला.

६) पंजाबात दहशतवाद जोरावर होता त्याकाळातली ही बातमी. तेव्हा भारंभार टीव्ही वाहिन्या नव्हत्या. तरीही खोडसाळ बातम्या होत्याच. एक बातमी अशी होती की पंजाबात चित्रपट पाहून परत निघालेल्या तरूणाला अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केले. हा तरूण ‘लोडेड गन्स’ हा सिनेमा पाहून परतत होता.

उगाच जागा भरण्यासाठीच्या बातम्या असतात अशा स्वरूपाची बातमी इतक्या वर्षांनंतरही स्पष्ट आठवते.