फुसके बार – ०७ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – ०७ फेब्रुवारी २०१६
.

१) महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे प्रतिनिधी घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करत आहेत. ग्रामीण भागात त्यांची कनेक्शन्स देणे परवडणारे नाही, त्यामुळे ते शहरी भागात अधिकाधिक लोकांनी एलपीजीवरून नॅचरल गॅसकडे जावे याकरता प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात. एलपीजीचा तसाही तुटवडा असल्यामुळे शहरातून यामार्गाने उपलब्ध झालेली एलपीजी सिलिंडर्स ग्रामीण भागात पोहोचवणे सोपे होईल हा यामागचा हेतु असल्याचे सांगतात.

आमच्या शेजारच्यांपैकी एकाने मूलभूत शंका विचारली की आमच्यानंतर या गॅसचे जे बिल येत राहील त्याचे काय होणार? या प्रश्नावर त्या तरूण प्रतिनिधीला काय बोलावे ते सुचेना. मी विचारून सांगतो असे म्हणून त्याने वेळ मारून नेली.

२) माझ्याकडे दोन प्रकारच्या लिंबांची झाडे आहेत. एक बीपासून उगवलेले तर दुसरे दापोलीजवळच्या नर्सरीतून आणलेले. पहिल्या प्रकारच्या झाडाच्या फळाचा रंग बदलतो, त्यामुळे फळ पिकले की नाही कळायला अवघड जात नाही. दुस-याचे फळ मात्र अखेरपर्यंत हिरवे ते हिरवेच राहते. अगदी लिबलिबित होऊन झाडावरून पडेपर्यंत.

समोरचा माणूस वयपरत्वे कसा आहे याचा अंदाज घेतानाही अनेकदा अशी फसगत होते. केवळ केस किती पांढरे झालेत किंवा वयाचा अंदाज घेऊन एखाद्याला जोखणे अवघड असते. कधीकधी आपल्यापेक्षा वयाने अधिक असलेल्या व्यक्तीकडूनही अनपेक्षितपणे उमदी प्रतिक्रिया मिळते, तर एखाद्या तरूणाकडूनही जणु काही उद्याच जगबुडी आहे अशी.

३) मुरूडची दुर्घटना आणि चुकीचे प्रथमोपचार

कालच्या फुबामध्ये मुरूडच्या दुर्घटनेबद्दल लिहिले होते.

फेबुमित्र डॉ. पद्मनाभ केसकर यांचे या दुर्घटनेबद्दलचे निरीक्षण खाली दिले आहे. अशा प्रकरणांमध्ये जनतेकडे प्रथमोपचाराचे किमान ज्ञानही नसते, त्यामुळे ते करत असलेले प्रयत्न अपुरे पडतात, ही त्यांची व्यथा लक्षात घेण्यासारखी आहे.

“बुडालेल्या १४ जणांपैकी १० जण पहिल्या ५ ते १० मिनिटात पाण्याबाहेर काढले होते. तरी त्यांना वाचवता आले नाही कारण प्रथमोपचाराचे अज्ञा। TV वर व mobile वर जे फोटो पहिले त्यात बेशुद्ध मुलांच्या पाठीवर / पोटावर दाबून पाणी बाहेर काढताना दिसत होते. हि अतिशय चुकीची क्रिया आहे. यामुळे पोटातील पाणी वर येउन श्वासमार्गात जाऊन माणूस गुदमरून मरतो. जो माणूस जगणार असतो, तो मरण्याची शक्यता वाढते. या मुलांना फक्त श्वासमार्ग मोकळा करून CPR दिली असती तरी त्यातले निम्मे वाचले असते. गेली १० वर्षे मी Ruby Hall Clinic पुणे येथे EMS consultant म्हणून काम करत आहे. या छोट्या छोट्या गोष्टी डॉक्टरांना पण माहित नसतात. त्यांच्या साठी आम्ही EMERGENCY TREATMENT चे कोर्सेस घेतो. आजवर १०००० पेक्षा जास्ती डॉक्टरांना आम्ही ट्रेनिंग दिले आहे. मी स्वतः ५०० पेक्षा जास्ती First Aid ट्रेनिंग programmes community साठी म्हणून घेतले आहेत. त्यात शाळा, college, पोलिस, industrial workers या लोकांना आपत्तीत कशा पद्धतीने सामोरे जावे याचे सोपे वैद्यकीय ज्ञान त्यांना दिले. पण अशा घटना घडल्या कि आपले प्रयत्न किती अपुरे आहेत हे लक्षात येते.”

४) शैलेश गांधी हे माहिती अधिकारातले तज्ञ वकील वगैरे नाहीत, ते व्यवसायाने अभियंता होते, माहिती अधिकार असो अथवा त्यासंबंधीच्या कायदेशीर बाबीची माहिती त्यांनी स्वत: मेहनत घेऊन मिळवली, असे त्यांच्या मुलाखतीतून कळले.

परवा त्यांना टीव्हीवर विचारले की माहिती अधिकारातील कार्यकर्त्यांची संघटना बनवायचे काही जणांच्या मनात आहे. माझी सहज कल्पना अशी ते त्याचे स्वागत करतील. परंतु त्यांनी सांगितले की माहिती अधिकारात संघटना आली की त्याचा आत्मा हरवणार. पटण्यासारखे उत्तर आहे.

माहिती अधिकारासंबंधी सहकार्य, शंकानिरसन इतपत ठीकही आहे. तसे प्रयत्न चालू आहेतही. पुण्यात विवेक वेलणकर, विजय कुंभार यांच्यासारखे लोक या लष्करच्या भाकरी भाजतात. मात्र संघटना झाली की ज्या काही कार्यकर्त्यांवर माहिती अधिकाराच्या नावाखाली खंडणी वसुलीचे आरोप आताच होताना दिसतात, ते प्रकार राजरोस सुरू होण्याचा धोका वाटतो. शिवाय संघटना झाली तरी माहिती न पुरवल्याबद्दल सदर माहिती अधिका-यांना कोणत्याही प्रभावी शिक्षेची तरतूद नाही, त्यामुळे दबावगट म्हणून अशा संघटनेचा फार उपयोग होण्याचीही शक्यता नाही.

५) एअरलिफ्ट सिनेमा पाहिला. ब-याचशा गोष्टी हॉटेल रूवांडा या इंग्रजी सिनेमावरून घेतलेल्या दिसतात. त्या सिनेमाचा गाभा हुतूंच्या वंशविच्छेदाचा होता. येथे तसा काही विषय नसल्याने तेवढ्यापुरता फरक केला गेला आहे.

अक्षयकुमारला अभिनय करता येत नाही हे त्याने आधीही सिद्ध केले अाहे. हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. मात्र काही हिरॉइन्स पुन्हापुन्हा पाहून जशा आवडू लागतात, तसे त्याच्याबद्दलही झाले आहे. शिवाय ज्या प्रकारच्या भूमिका तो सध्या करतो आहे त्यामुळेही.

आधी त्याचे कुटुंब, मग त्याच्या कार्यालयातले लोक, मग अाजुबाजुचे लोक, शाळेतला कॅंप असे करत एक लाख सत्तर हजार भारतीय कसे जमतात हे कळले नाही. पण असो. शाहरूख व अलीकडच्या आमीरच्या सिनेमांपेक्षा त्याचे एकूण चांगले चालले आहे.