फुसके बार – ०८ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – ०८ फेब्रुवारी २०१६
.

१) हेल्मेटसक्ती १

प्रसिद्ध पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट. त्यांचे मित्र प्रदीप निफाडकर यांनी नुकतीच त्यांची मुलगी अपघातात गमावली. याचा संदर्भ या पोस्टमध्ये आहे. त्यांच्या आवाहनाचा मेसेज काही महिन्यांपासून व्हॉट्सअपवर फिरत आहे. आपल्या पाहण्यातही आला असेल. बर्दापूरकरांची पोस्ट खाली. त्यात त्यांनी त्यांचा स्वत:चा अनुभवही सांगितला आहे.

“पुणेकरांना कळकळीचं आवाहन..दोन्ही कर जोडून विनंती !

हेल्मेट वापरणं का महत्वाचं आहे हे नीट समजून घ्या, विनाकारण राजकारण्यांच्या नादी लागू नका हे कळकळीचं आवाहन आहे, विनंती आहे .
माझे कवीमित्र प्रदीप निफाडकर, या संदर्भात जे काही सांगत आहेत त्यामागे असणाऱ्या एका पित्याच्या विदीर्ण भावना आणि त्यासोबत असणारं भग्न मातृहृदय जाणून घ्या.

मी अजूनही प्रदीपला भेटण्याची हिम्मत करू शकलेलो नाही आणि एकदा फोनवर बोलण्याच्या प्रयत्न केला तर नि:शब्द झालो इतकं त्याचं ते दु:ख कल्पनेतही सहन होणारं नाही ; असा प्रसंग स्वप्नातही कोणा मात्या-पित्याच्या वाट्याला न येवो...

जेव्हा, आपलं रक्तांमासांचं-जीवाभावाचं नातं असलेलं कोणी अचानक मृत्यूच्या नावाच्या अज्ञात प्रदेशात निघून जातं तेव्हा होते कवेत न मावणारी वेदना आणि उरात कायम भळभळती जखम..ते एकदा काय असते ते
नीट-शांतपणे-सावधचित्ती उमजून घ्या.

हेल्मेट असल्यानं माझा जावई नुकताच एका मोठ्या अपघातातून बालंबाल बचावल्यानं आम्ही सर्वांनीच सोडलेला सुटकेचा भला मोठा निश्वास कदाचित कोणाला ऐकू आला नसेल पण, त्या अपघातानंतर जावयाच्या स्पर्शातून तो मला जाणवला; त्याचा तो सुस्कारा काळजाचा ठोका चुकवणारा आणि भरल्या डोळ्यांनी लेकीनं मारलेली मिठी अंगावर कांटा उभा करणारी होती.

प्रदीप निफाडकरच्या भावना म्हणून प्लीज..प्लीज..प्लीज..प्लीज समजून घ्या आणि हेल्मेटला विरोध सोडा, हे कळकळीचं आवाहन आहे, दोन्ही कर जोडून आमची विनंती आहे.

-मंगला आणि प्रवीण"

२) हेल्मेटसक्ती २

स्वत: निफाडकरांचे आवाहन त्यांच्या फेबु वॉलवरून.

“आज पुण्यात हेल्मेट विरोधी मोर्चा निघणार आहे कृपया आपण कुणी त्यात सहभागी होऊ नका. माझी कळकळीची विनंती आहे. जे मोर्चा काढणार आहेत, त्या बांधवांनाही विनंती आहे मोर्चा काढू नका. हेल्मेट सक्ती करा आणि (चांगल्या) रस्त्याबाबत आपण आंदोलन करू. मी त्यात पुढे राहीन पण हेल्मेट प्रत्येकाला घालू द्या. विनंती आहे पहा.

३) हेल्मेटसक्ती ३

राज ठकवणारे यांनी अलीकडे केलेले एकतरी समंजसपणाचे विधान दाखवा व एक लाख रूपये मिळवा असे म्हणण्यासारखी परिस्थिती आली आहे.
यावेळी ते हेल्मेटसक्तीच्या निर्णयावरून दिशाभूल करत आहेत. भाजपवाल्यांनी तेव्हाही विरोध केला होता, आताही करत आहेत. तेही चुकीचे आहे. पण भाजपवाल्यांचा विरोध चुकीचा म्हणून मुळात सक्ती चुकीची कशी? हायवेवर जर वेग फार असेल तर कारमध्ये सीटबेल्ट घातलेल्यांचेही रक्षण होईल की नाही शंका असते, तर हेल्मेट घातलेल्या दुचाकीवालल्यांचा प्रश्नच नाही. तेव्हा हेल्मेटसक्तीच्या संदर्भात उठसुट हायवेची उदाहरणे नकोत. दहा-पंधराचा वेग असेल तर मागचे चार चाकी वाहनही त्याचे वेगाने जाईल असे गृहित धरले तरी त्याच्या धक्क्यानेही दुचाकीवाला रस्त्यावर पडू शकतो. इतर सर्वांपेक्षा डोक्याला झालेल्या इजेवरील उपाय अवघड/अशक्य असतो. शिवाय गावातल्या रस्त्यांवरही वेग नेहमीच ताशी दहा-पंधरा असतो हे समजणे चुकीचे आहे. सिग्नल सुटल्यावरचा बाजीराव रोड, कर्वे रोड, सिंहगड रोड, लक्ष्मी रोड, लॉ कॉलेजरोडवरच्या वाहतुकीचा वेग ठकवणारे महाशयांनी पहावा आणि मग डायलॉगबाजी करावी.

हेल्मेटसक्ती ही हेल्मेट बनवणा-या ठराविक उद्योजकांच्या हितासाठी आहे ही ठकवणारे साहेबांची बतावणी म्हणजे तर हद्द अहे. मुळात ठकवणारे हेही या व्यवसायात उतरू शकतात आणि कोट्यवधी-अब्जावधी रूपये मिळवू शकतात. त्यांना कोणी थांबवलेले आहे? पण कमीत कमी असे बिनडोक आरोप तरी नकोत.

तेव्हा या राजकारण्यांच्या नादाला न लागता कायदा आपल्या हिताकरता आहे हे लक्षात घेतले तर अधिक शिंगे न फुटू देता हेल्मेट परिधान करणेच योग्य आहे.

एकदा ठरवले आहे ना की सिग्नल पाळायला हवेत, तर न पाळल्यास शिक्षा होते की नाही? की तेथेही म्हणणार माझ्या सिग्नल तोडण्यामुळे कोणाला इजा झाली आहे का? कोणीही समोरून येत नसताना मी मला सिग्नल मिळेपर्यंत का थांबावे?

तेव्हा हेल्मेटसक्तीच्या विरोधातील लोकांची अशी पूर्ण नियमभंगाची किंवा काही बाबतीतील म्हणजे सिलेक्टीव्ह नियमभंगाची वृत्ती आहे. दुसरे काही नाही. ‘आमचे डोके आहे, आम्ही काहीही करू’ हा देखील असाच बेजबाबदारपणा आहे. डोके फुटल्यावर कलिंगडाचा गर कसा दिसतो तसे दिसते, हे एकदा या ‘आमचे डोके’वाल्यांना दाखवा आणि मग हे फुटलेले कलिंगड तुमचे असेल तर तुमच्या मुलांना व कुटुंबाला चालेल का किंवा तुझ्या मुलाचे असेल तर तुला चालेल का हे विचारा आणि तरीही चालत असेल तर मग हे लोक कोणतीही हद्द गाठू शकतील. पण कुठल्याही परिस्थितीत या ठकवणारेंच्या व इतर राजकारण्यांच्या नादाला लागू नये. तसेही प्रत्येकवेळी मेंदू फुटण्याचीच गरज नसते, आतल्या आत काही इजा झाली तरी जन्माचे नुकसान होऊ शकते हेही विसरायला नको.

तेव्हा एकच विनंती. तुमचा जीव तुमच्या एकट्याचा नाही. अगदी बेवारशी असाल, तरी तुमचा जीव आमच्यासाठी मौल्यवान आहे. हेल्मेट वापरा.

४) हेल्मेटसक्ती ४

आमच्या शेजा-यांपैकी एकांनी त्यांचा मुलगा गमावला. १८-१९चा. दुचाकीवरून जाताना (फार वेग नसताना) पडून त्याच्या डोक्याला मार लागून नऊ महिने कोमामध्ये होता. अखेर तो गेलाच. आता डोळ्यातले अश्रु थोडे आटल्यावर त्याची आई सर्वांना, विशेषत: त्याच्या वयोगटातला जो मुलगा भेटेल त्याला कळकळीने सांगते आहे, अपघातात हातपाय मोडले असते, तरी काही दिवसांत त्यांचा मुलगा घरी आला असता. हेल्मेट नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली. तुम्ही मात्र हेल्मेटशिवाय रस्त्यावर जाऊ नका. अगदी दोन मिनिटांचे काम असले तरी.

आणखी काय करू शकते ती माता?

५) सायना नेहवालच्या कारकिर्दीवर सिनेमा काढायचा ठरले तर मला तिची भूमिका करायला आवडेल असे दीपिका पदुकोणेने म्हटल्याचे वाचले.

मेरी कोमची भूमिका केली प्रियांका चोप्राने. ती ब-यापैकी जमली तरी पण बरेच काही कमी पडते आहे हे जाणवत होते. त्यात तिच्या कौशल्यापेक्षा कॅमे-याची कमाल अधिक होती.

हॉलिडे या सिनेमामध्ये सोनाक्षी सिन्हाने बॉक्सर किती पेदरट असू शकतो हे दाखवले.

चक दे इंडियामध्येही काही जणी प्रत्यक्ष हॉकी खेळाडु असल्या तरी त्यातही कॅमे-याची कमाल अधिक होती.

सध्या एका हिंदी मालिकेची जाहिरात चालू आहे त्यामध्ये एक मुलगी क्रिकेटर दाखवली आहे, पण हातात बॅट नीट धरता येण्याची मूलभूत अटही तिला लागू नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर दीपिका सायनाच्या भुमिकेचे सोने करेल हे निश्चित. सिनेमाची घोषणा करा रे कोणी तरी.