"नाही" चा महिमा!

विश्वासघात त्याचाच केला जातो जो विश्वास ठेवतो. म्हणून जास्त आणि पटकन कुणावर विश्वास ठेवत जाऊ नका. इमोशनल ब्लॅकमेल त्यालाच केले जाते जो इमोशनल असतो. म्हणून आजच्या जगात जास्त इमोशनल राहून चालत नाही. भिडस्त राहून सुद्धा चालत नाही. नाहीतर भिडस्त माणसाचा सर्वात प्रथम बळी जातो. तुम्ही दाबले जाल तर दुनिया तुम्हाला आणखी दाबेल. आजकालच्या जगात जो सगळ्यांचा मनाचा विचार करतो त्याच्या मनाचा विचार कुणीच करत नाही. जो सगळ्यांच्या स्वभावाला सांभाळून घेतो, त्याच्या स्वभावाला मात्र कुणीच सांभाळताना दिसत नाही. अशा व्यक्तीला दुखवणे आपला हक्कच आहे असे लोक मानतात कारण अशा व्यक्तीला गृहीत धरले जाते. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला खूश ठेवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही मात्र नेहमी नाखूष राहाल कारण सगळ्यांना खूश ठेवूनही शेवटी त्यापैकी कुणी तुम्हाला चांगले म्हणेलच याची शाश्वती देता येत नाही. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकत नाहीत. तसा तुम्ही प्रयत्न करण्या आधी हे तर तपासा की तो प्रत्येक जण तुमच्या अपेक्षेला कितपत किंमत देत आहे? किंवा तुमच्याही काहीतरी अपेक्षा असतील हा तरी विचार समोरचा करतोय का? हे तरी तपासा! तसेच प्रत्येक व्यक्तीच्या सगळ्याच अपेक्षा सुदधा तुम्ही पूर्ण करू शकत नाहीत. करूही नका! नाहीतर ९ अपेक्षा पूर्ण केल्या आणि १० वी अपेक्षा पूर्ण नाही केली तर आधी केलेल्या ९ चांगल्या कामांवर पाणी फेरले जाते आणि एक अपेक्षा पूर्ण केली नाही म्हणून तुमची बदनामी होते. तुम्हीच नेहमी सगळ्यांचे ऐकून घेता? तुमचे मात्र कुणीही ऐकून घेत नाही? तर मग तुम्ही सुद्धा ऐकून घेणे थांबवा कारण संवाद किंवा वाद किंवा चर्चा आपण त्यालाच म्हणतो ज्यात सगळ्यांना समान बोलण्याचा हक्क आणि संधी मिळते. पूर्ण चर्चेत फक्त एकच जण बोलत राहिला तर त्याला विचार लादणे असे म्हणता येईल. हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू असताना तुमच्याकडून फक्त कर्तव्याची अपेक्षा केली जात असेल आणि तुमचा हक्क हिरावून घेतला जात असेल तर असे कर्तव्य करून काहीही उपयोग नाही. अपेक्षा, मनाचा विचार करणे, स्वभाव सांभाळणे, हक्क, कर्तव्य, संवाद, वाद, विश्वास या सगळ्या गोष्टी एकतर्फी नसतात. जर त्या एकतर्फी झाल्या तर तो सपशेल अन्याय ठरतो आणि त्याला काहीही अर्थ राहात नाही. त्यामुळे वेळोवेळी "नाही" म्हणायला शिका. आपण जर कुणालाच कशासाठीच नाही म्हणू शकत नसलो तर नियती सुद्धा आपल्याला "नाही" म्हणेल, आपल्यावर हसेल आणि आपल्यावर प्रसन्न न होता नाराज होऊन निघून जाईल. इतरांना नाही म्हणायला शिकताना इतरांकडून आलेले "नाही" सुद्धा स्वीकारायला शिका. या सगळ्या गोष्टी जश्या नातेसंबंधात लागू होतात तशाच त्या समाजात मित्र, शेजारी, ओळखीचे लोक यांचेशी वागताना तसेच काही प्रमाणात आपल्या ऑफिसबाबत, काम करतांना सुद्धा थोड्या फार प्रमाणात आणि फरकाने लागू होतात.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

उपयुक्त विचार आहेत. आजच्या काळात नेहमी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/