“उभारू आपण गुढी!”

( हल्ली जमाना आहे ‘एक्स्चेंज ऑफर’चा! अशीच एक ऑफर येते ‘रिडेवलपमेंट’ची.
जुन्या इमारतीच्या बदल्यात नवी कोरी दणकट इमारत! मग काय?
जुन्या पिढीची 'जिवाची घालमेल'. नव्या पिढीची 'उत्साही लगबग'.
पण, त्या जुन्या इमारतीला काय बरे सांगायचे असावे? )

तरुण होते मी पूर्वी जेव्हा
गृहलक्ष्मी आली घरी तेव्हा

अजून ऐकू येतात मला
पैंजण आणि घुंगुर वाळा

पाककलेला बहर आला
अन्नपूर्णेचा वसा वाहिला

तिची लगबग, तिची ऐट
लटके रुसवे फुगवे कैक

सुखदु:खांच्या हिंदोळ्यावर
बनली ती सोशिक, कणखर

केले साजिरे अनेक सोहळे
कोडकौतुके पुरवी डोहाळे

मायेचा तो पदर पसरुनी
नातवंडाना ती कवेत घेई

संध्याछाया जशी पसरत जाई
कातरवेळी मन उदास होई

नवी पिढी आणि नवे विचार
पिकले पान मात्र नाही तयार

थकली काया, थकले डोळे
आठवणींचे तिज येती उमाळे

पण तिला कसे हे कळत नाही?
की थकले नाही का आता मीही

हाडे झाली माझी खिळखिळी
कधी तुटतील हा नेम नाही

येऊ देत की माझीही नवी पिढी
चल बघू, उभारू आपण गुढी!

– उल्का कडले

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)