कलिंगडाचे धोडक

उन्हाची झळ बसायला सुरुवात झाली की गारम गार काय काय खाता येईल ह्याचा विचार सतत चालू असतो. खादाडीची आवड असणाऱ्यांचा (माझ्यासारख्यांचा) जरा जास्तच.

त्यातलेच एक सर्वांचेच प्रिय कलिंगड. बाजारात गेल्यावर जड कलिंगड वाहून आणल्यावर ते कधी एकदा कापून मस्त गार करून खातो/ते असे प्रत्येकालाच होत असते. खर्र की नाही? पण मग त्याचा तो जाड जाड सालींचा पसारा उचलून टाकताना अर्धे पैसे वाया गेले म्हणून वाईट वाटत असेल तर आता मी त्यावर एक उपाय सांगते जो तुम्हाला नक्की आवडेल.

dhodak

१. किसणी घेऊन त्या सालींचा सगळा पांढरा गर किसून घ्या.

२. आता त्यात अर्धी वाटी नारळाचा चव + एक चमचा हिरव्या ओल्या मिरच्यांचे भरड + अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर + चवीपुरते मीठ आणि थोडीशी साखर घालून सगळे एकजीव करा.

३. आता त्यात मावेल इतका बारीक रवा (नसल्यास तांदळाचे पीठ चालेल पण रव्यामुळे कुरकुरीतपणा येतो तेव्हा शक्यतो रवाच) घाला. मावेल इतका म्हणजे हाताने मिश्रण उचलून तव्यावर थापता आले पाहिजे.

४. थालीपीठ करतो त्याप्रमाणे मध्यम आचेवर करावे. फरक इतकाच की थेट तव्यावर थापावे.

टीप -श्रावण महिन्यात बाजारात मोठी काकडी मिळते. तिचे पण अगदी असेच करावे. फक्त साले वापरू नयेत तर काकडी वापरावी. त्याला तवसोळी असे म्हणतात.

जातीचा डंका पिटायचा म्हणून नाही पण तरीही प्रत्येक पाकृचे वैशिष्ट्य आणि उगमस्थान असते म्हणून सांगते की हे सारस्वत घरांमध्ये खासकरून बनते. तुम्हाला आवड असल्यास खास सारस्वत पद्धतीच्या 'हटके' पाकृ मी लिहू शकेन.

फोटो चढवता आला नाही. कसा डकवू?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फोटो चढवता आला नाही. कसा डकवू?

गब्बरसिंग नावाच्या आयडी ला पाठवा, तो देइल फोटो चढवुन,

फोटो नाही, फोटोवर हार चढवण्यासाठी त्यांची मदत होऊ शकेल.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

फोटो चढवता आला. Smile

उल्का

रोचक!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मस्त दिसतंय ..

होय इथे अनेकांना आवड आहे. येऊ द्यात खास पाकृ!

कालच कलिंगड घरी आले आहे. अजून अर्धे आहे, त्याच्या सालींचं हे करून पाहतो

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी प्रत्येक वेळी या धाग्याचं शीर्षक कलिंगडाचे मोदक असंच वाचतोय.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

आता त्यात मावेल इतका बारीक रवा (नसल्यास तांदळाचे पीठ चालेल पण रव्यामुळे कुरकुरीतपणा येतो तेव्हा शक्यतो रवाच) घाला. मावेल इतका म्हणजे हाताने मिश्रण उचलून तव्यावर थापता आले पाहिजे.

काय हरकत नाही थत्तेचाचा, मोदक पाहिजे असेल तुम्हाला तर मोदक करा. ह्या स्टेप नंतर त्या गोळ्याला मोदकाचा आकार द्या आणि तळुन काढा , नाहीतर उकडवा उकडीच्या मोदकासारखे:-)

हे आणि तवसोळी मधल्या वेळचे पदार्थ म्हणून खायला आवडतात. पाणीदार अ‍ॅस्ट्रिंजंट घटक खूप आणि रवा गरजेपुरताच हे कॉम्बिनेशन सुचणारा माणूस हुशार असला पाहिजे असं माझं मत आहे Smile

>> खास सारस्वत पद्धतीच्या 'हटके' पाकृ मी लिहू शकेन.

नक्की लिहा. सारस्वत पद्धतीचा स्वयंपाक अतिशय आवडतो.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सारस्वत पद्धतीचा स्वयंपाक अतिशय आवडतो.

मला कोणी दुसर्‍यानी तयार गरम गरम हातात आणुन दिलेला कोणत्याही पद्धतीचा स्वयंपाक आवडतो.

ह्या प्रतिक्रियेत तुमचा ब्राह्मणद्वेष दिसतो. वाघमारेंच्या व्याखेनुसार "पुरोगामीपणा, सेक्यूलरिझम, समाजवाद, साम्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्यवाद आदींचा 'अंतिम पडाव' म्हणजे मनुवादाला म्हणजेच ब्राह्मणवादाला (आणि दुर्दैवाने म्हणजेच ब्राह्मणांना) विरोध". त्यामुळे ह्या एका प्रतिसादानं तुम्ही उपरोल्लेखित सर्व अपशब्दांच्या धनी झाला आहात.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हेच ते...
का चांगल्या धाग्याचा विचका करताय महाराज ?

माझा उद्धार भलत्याच धाग्यावर झालेला पाहून मजा वाटली. Smile

बाकी हे धोंडक ट्राय करून बघायला हवे.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

खास सारस्वत पद्धतीच्या 'हटके' पाकृ मी लिहू शकेन

यू आर मोष्ट वेलकम!

*********
आलं का आलं आलं?

तुम्हा सर्वान्च्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
सकारात्मक प्रतिसाद वाचुन हुरुप आला आहे. Smile
जरुर लिहिन.

उल्का

खास सारस्वत पद्धतीच्या 'हटके' पाकृ मी लिहू शकेन

नेकी और पूछ पूछ!

आमच्याकडे अजून काही दिवसांनी फार्मर्स मार्केटात दिसतील कलिंगडं. तेव्हा करून बघेन.
शंका आहे - थेट तव्यावर थापायचं तर तवा गार होईस्तोवर थांबायला लागेल. त्यापेक्षा डोसा किंवा घावनासारखं तव्यावर ओतत का नाहीत?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पार्चमेंट पेपरवर थोडे तेल लावून थापायची आणि मग तव्यावर उलटायची.
अशाच पद्धतीने केलेली काकडीची थालिपिठे एका मैत्रिणीला अलिकडेच स्वतःच्या हाताने खाऊ घातली होती तो हृदयद्रावक प्रसंग आठवला !

प्रसंग हृदयद्रावकच असणार खरा! काही द्रवांचा अंतर्भावही होता का जेवणात?

पार्चमेंट पेपरची आयडीया आवडली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगली पाकृ. आहे आहे आणि गडबडीत असतानाही पटकन करता येण्यासारखी आहे.

खास सारस्वत पद्धतीच्या 'हटके' पाकृ मी लिहू शकेन

अवश्य लिहा, एखादी धागा मालिकाच का नाही सुरु करत त्या निमित्ताने?

डोसा आणि घावन साठी पाण्याचा अंश वाढवावा लागेल व पीठ वापरावे लागेल.
मउ बनतील. तो एक वेगळा प्रकार होईल.
एकदा असे करून बघा. नाही जमले तर मग वेगवेगळे प्रयोग करायला हरकत नाही.
गरम तव्यावरच थापावे लागते.
फक्त थापताना आधी विस्तव मंद ठेवा. थापून झाल्यावर मग थोडा वाढवा.

उल्का

अगदी बरोबर. कीस करुन फ्रिज मधे ठेवला तर दोन दिवस राहु शकतो. मग आणखी वेळ वाचेल. Smile

उल्का

कालच धोडक करून पाहिले. अत्यंत उत्कृष्ट चव ! फारच आवडले.
एका मध्यम आकाराच्या कलिंगडाच्या सालगरातून तळव्याच्या आकाराची चार धोडकं तयार झाली. किसलेल्या गरात चिक्कार पाणी शिल्लक असते. त्यामुळे हलक्या हाताने अनेकदा पिळून काढला तरी रवा बराच घालायला लागला. अर्थात, त्यामुळे ऐवज वाढला नि अधिक खुसखुशितपणा आला ही जमेची व आनंदाची बाब. किंचित आलं ठेचून घातलं, हीच एक जास्तीची गोष्ट केली.

पाककृती दिल्याबद्दल तुम्हाला अनेक धन्यवाद !
ही आमची गुरुदक्षिणा -

कुणाचे हृदय द्रवले?
तुमच्या हातचे थालीपीठ स्वीकारून ते खाण्याचा योग आला म्हणून मैत्रिणीचे हृदय द्रवले का?
टीप. : वाचून थोडे अं ह. व्हायला झाले. (जालावर काही काळ विसरल्या गेलेल्या वाक्प्रचाराचे पुनरुज्जीवन करीत आहे.)

कलिंगडाचे खाल्ले नाही पण बाणेरातल्या "वे डाऊन साउथ" मधले काकडीचे दोड्डक ऑल टाईम फेवरीट!
खालच्या मेन्युतील किती पदार्थ सारस्वती आहेत?

image

मी थालीपीठ आणि तत्सम थापलेले पदार्थ केळीचे पान, हळदीचे पान, वगैरे अशा रुंद मोठ्या पानावर बनवतो. केळीच्या पानाचा योग्य तितका चौकोन कापून. हळदीची पाने लहान असल्यास एकापाशी एक थोडेसे वरखाली सरकावून. कर्दळीचे पान लहानपणी आईने वापरलेले बघितले आहे.
थालीपीठ थापून ते तव्यावर उलटे टाकल्यावर पान तसेच ठेवायचे. पानाखाली थालीपीठ छान शिजते, आणि पानाचा सुगंध थालीपीठाला येतो. थालीपीठ परतून/उलटून फिरवण्याआधी पान अलगद सोलून काढता येते.

धोडक हे नाव वाचल्या वाचल्या 'दोधक' नावाच्या वृत्ताची (भ भ भ गुरु गुरु) आठवण झाली आणि गेले दहा दिवस त्या वृत्ताची (अर्धवट आठवणारी) लक्षणओळ डोक्यात फिरत राहिली. त्यामुळे सारखी सारखी या वृत्तसदृश पदार्थाची आठवण होऊन खायची इच्छा होत होती. या कृतीत दिलेल्या 'साहित्या'पैकी रवा सोडून काहीही घरात मिळाले नाही. नारळाचा चव तर माझ्या घरात असणे/ तो मी करणे म्हणजे...हॅ हॅ हॅ. शिवाय या कृतीत प्रमाण दिलेले नसल्याने माझ्यासारख्या कुगरणीला भीती वाटणं साहजिक. पण 'पातळ पीठ तव्यावर ओतणे' ही कृती असलेल्या डोसासदृश पदार्थांऐवजी 'पीठ तव्यावर थापणे' ही कृती असलेले पदार्थ करायला सोपे असतात असा धीर स्वतःला देत आज सकाळी हा पदार्थ करण्याचा चंग बांधला. कलिंगडाऐवजी काकडीचा कीस, मिरच्यांऐवजी तिखट आणि जिरेपूड, रव्यात तांदळाच्या पिठाची भेसळ, नारळाच्या चवाऐवजी डेसीकेटेड कोकोनट प्रक्षिप्त करून केली एकदाची ही वृत्तबद्ध थालिपीठं. उलटताना काहीशी विदीर्ण झाली पण ते तुकडे वृत्तातील 'यति'मुळे झाले आहेत असं स्वतःला समजावलं. खायला काय फर्मास लागली हो! काकडीची गोडसर चव आणि रव्याचा कुरकुरीतपणा! वा वा!

आज करून पाहिले. उत्कृष्ट चव. गरमागरम अहाहा लागते!
सोबतीला मटक्यात लावलेले थंडगार दही घेतले होते. आमचं अ‍ॅडिशन म्हणजे फक्त जीरं कुटून लावले होते. आमच्या आकाशवाणीकडून "हे उपासालाही छाने की. रव्याऐवजी शिंगाड्याचे किंवा साबुदाण्याचे पीठ वापरून बघायचे. शिवाय तेले साबुदाणा थालीपिठांपेक्षा बरेच कमी पितेय!" अशी सुचना आली आहे. अर्थात पुढिल कलिंगडावर तो प्रयोग होईलच.

तोवर ही आमचीही गुरुदक्षिणा:

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डु प्र का टा आ

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चार्वीच्या विदीर्णतेचा धसका घेऊन मी रव्याबरोबर दोन चमचे तांदळाची पिठी घातली. जिरं, आलं, मिरची, साखर, मीठ. गर मात्र पिळून घेतला होता. (त्यातच भिजवल्यास मला तरी धोडके न करता धिरडीच करावी लागतील!) तव्यावर लावताना थोडी तारांबळ झाली नि आमची स्त्रीवादी धोडके परीघ सोडून स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची निपजली. म्हणून फोटू देत नाहीय. चव मात्र सुरेख! पुढच्या खेपेस खोबऱ्याबरोबर थोडे पांढरे तीळ घालणार आहे. ते काकडीच्या थालिपीठात छान लागतात, म्हणजे इथेही लागावेत.
अशा अजून पाकृ लिहाव्यात, अशी विनंती.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

तुम्ही धोडक करुन बघितले आणि ते आवडले हे वाचुन आनन्द झाला.
गुरुद़क्षिणा आवडली. Smile

उल्का

या धोडकाने क्रान्ती केलीये. एकतर अनेकांनी करून बघितले, शिवाय यामुळे वृत्ताची आठवण होऊन तो धागाही निघाला!
अजून येऊ दे असेच काही

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कातिलल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल!

आल्याची युक्ती मस्त आहे.

काल रात्री काकडीचे धोडक केले होते, रव्यामुळे जो खुसखुशीतपणा येतो तो फार आवडला. प्रचंड भूक लागलेली असल्याने फोटोपुरावा काढायला जमले नाही, आता पुढच्या वेळी कलिंगडाचे करून पाहीन. आमच्याकडे तांदळाचे पीठ घालून अशाच प्रकारे भोपळ्याचे थालिपीठ करतात, त्यातही आता रवा वापरून पाहीन.

रवा भाजून घायचा न ? मी आज करून बघते .

नाही. न भाजता वापरा.

उल्का

t

सोबत कवठाची चटणी आहे .
चव अफलातून होती . नवीन recipe शिकवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

अप्रतिम. कवठाची चटणी विसरलेच होते Sad कवठच विसरले होते.

गुरुदक्षिणा खाउन खाउन माझे वजन चान्ग्लेच वाढणार आहे. Smile
कवठाची चटणी कशी करतात बुवा? नाही खाल्ली कधी.
हे धोडक कैरीच्या ताज्या ताज्या लोणच्याबरोबर आहाहा लागते बर्र का.

उल्का

सर्वात कातील रंग आहे या धोडकाचा! लाल तिखट आणि/किंवा हळद घातलीये का?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लाल तिखट घातलंय. आणि उल्का ताईचा प्रतिसाद नंतर बघितला. तोपर्यंत भाजलेला रवा घातला होता. आणि २ पोह्याचे चमचे तांदूळ पिठी घातली .त्यामुळे पीठ मिळून आलं .

कवठाची चटणी -

कवठ फोडून त्याचा गर काढून घ्यायचा ,त्यात चवीनुसार गुळ ,जिरेपूड,लाल तिखट आणी मीठ मिसळायच . सगळं हातानीच कालवायच त्याशिवाय मजा नाही . कालवताना त्यातल्या शिरा आणि बिया काढून टाकायच्या . मला बिया आवडतात म्हणून ठेवल्या आहेत . पण त्या थोड्या कडू लागतात .

कवठाच्या चटणी बरोबर खूप छान नाही लागल . दह्याबरोबर मस्त लागत होतं .
कैरीच्या चटणी बरोबर खाउन बघेल नक्की.

नोन्द घेतली. Smile

उल्का

प्रतिसाद लिहायचा विसरुन गेले होते. आज अचानक आठवले.

सारस्वतांच्या अनेक उपजाती आहेत.

'सारस्वत संपूर्ण देशात (चारी दिशांना) विखुरलेले आहेत. पंजाबी, बंगाली मधे पण ही जात आढळते.' इति आंतर्जालीय स्त्रोत.

तुम्ही वर दिलेले पदार्थ हे नावावरून दक्षिणेकडचे वाटत आहेत. मी महाराष्ट्रातील असल्यामुळे विशेष माहिती नाही.
मात्र त्यातील नीर दोसा सद्दश आम्ही जो पदार्थ बनवतो त्याला घावन म्हणतो.

जाडे तान्दूळ ७-८ तास भिजवुन मग गंधासरखे बारिक वाटुन डोसे काढतात. जाळीदार असतात. बनवायला आणि हो खायला पण एकदम सोप्पे. ओल्या खोबर्याच्या लसणीच्या चटणीबरोबर खाल्ल्यास उत्तम.

उल्का

मात्र त्यातील नीर दोसा सद्दश आम्ही जो पदार्थ बनवतो त्याला घावन म्हणतो

घावन फक्त तांदळाच्या पिठाचे असते. नीर डोशात तांदळाच्या पिठासोबत, खोबरेदेखिल असते.

आता नील लोमस यांच्या मूळ प्रश्नाबाबत - डोश्याला मंगळूरी कोंकणीत पोळ्ळो असे म्हणतात. तेव्हा पोळ्ळो शब्द असलेले सगळे पदार्थ मंगळूरी सारस्वत म्हणायला हरकत नसावी!

मंगळूरी आणि कारवारी सुद्धा.
म्हणुनच मी म्हंटलय की दक्षिणेकडील सारस्वती पदार्थ. अगदीच स्पष्ट करायचे तर 'कोस्टल कर्नाटक'.

नीर डोशात खोबरे असते. मान्य.
आम्ही (कोकणातले मराठी सारस्वत) जे करतो त्यात खोबरे नसते हो. (माझ्या आजीची रेसिपी)
त्याला आम्ही तरी घावन म्हणतो नीर डोसा नाही म्हणत. Wink

पीठाचे करत असतील त्यालाही घावन म्हणत असतील. पण मला खरच नाही माहित.
मी दोन्ही खाल्ले आहेत. खोबर्या शिवायच जास्त आवडले. कदाचित लहान्पणापसुन तसे खाउन सवय असेल म्हणुनही असू शकेल.

मी मागच्या एका धाग्यात लिहिल्याप्रमाणे प्रांता गणिक आणि जाती प्रमाणे पदार्थ आणि नाव बदलत असावे.

उल्का

मी घावनांत काय वाट्टेल ती पीठं ढकलून देते; रवा, भाजणी, बेसन, नाचणीचं पीठ, कणीक, बाजरीचं पीठ यांपैकी. कधी हौस आणि चिक्कार टोमॅटो असतील तर त्यांची पातळ पेज करून तीही पीठात घालते. याला घावन सोडून इतर काही नाव असेल तर माहीत नाही. घरी, आई-वडील ३ तांदूळ-१ बेसन असे घावन करायचे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे सगळ्यात महत्वाचे.

कवठाची चटणी मिक्सरला लावली, की तिची वाट लागते पारच.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अगदी सहमत