राग झुकिनी

सर्वप्रथम एका परदेशात शिक्षणासाठी जावं. तिथे विद्यापीठाच्या निवासस्थानी राहावं. तिथल्या मैत्रांसोबत स्वयंपाकघरात सांस्कृतिक देवाणघेवाण करावी. (या वाक्याचे दोन अर्थ निघतायत का? हॉय? उत्तम! तेच अपेक्षित होतं.) काकडीसारख्या दिसणाऱ्या भाज्या सांस्कृतिक देवाणघेवाणीत महत्त्वाच्या ठरतात. (दोन अर्थ? येस्स!!) परदेशात जाईस्तोवर स्वयंपाकघराशी संबंध ठेवलेले नसले तरीही काही इलाज नसल्यागत, शेवटी चुकल्या भुकेल्यांनी वेळेस केळ्याने भूक शमवली तरीही भाज्या खाण्याला पर्याय नसतो. मग स्थानिक सहविद्यार्थ्यांपैकी गाडी बाळगणारं एखादं निरागस, गोंडस सावज पकडावं. त्यांच्याबरोबर दुकानात जाऊन भाज्यांसमोर उभं राहावं. काकडीसारखी दिसणारी एखादी भाजी उचलावी आणि “ई, तुमच्या काकड्या किती विचित्र दिसतात. आमच्या आकाराने लहान असल्या तरी जास्त चांगल्या दिसतात”, असं म्हणावं.

अर्थात आपली अक्कल निघायची तयारी ठेवली पाहिजे. “ही काकडी नाही. हे कूर्जेट आहे.” निरागस आणि गोंडसांपैकी एक. “कूर्जेट? झुकिनी म्हणतात त्याला.” निरागस आणि गोंडस #२. आपण शांतपणाचा आव आणत त्या #१ आणि #२ यांच्या भाषिक भांडणाकडे (चेहेऱ्यावर त्या काकडीचाच भाव आणून) बघावं. शांतपणा इतरांच्या स्वादानुसार. फार जास्त शांतपणा असेल तर भांडण फार वेळ चालत नाही; (आठवा, फोडणीला तेल ठराविक तापमानापर्यंत तापलेलं लागतं.) शांतपणा जास्त झाला तर भांडणकर्त्यांना शंका येते, भांडण चटकन संपतं आणि आपल्याला बघण्यातला आनंद फार मिळत नाही. (आठवा, फोडणीचं तेल फार तापलं तर हिंग जळतो.) शिकायला परदेशात जाताना आपली सांस्कृतिक प्रगती होणार आहे पण करून घेण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे याचं भान सुटू नये. शिक्षणाला नुकतीच सुरुवात झालेली आहे, आपली काकडी शेवटी आपल्याच हातात आहे, हे लक्षात ठेवावं! (पुन्हा दोन अर्थ. च्यायला, मला माझ्या लेखनाचं डब्बल मानधन का मिळू नये!)

भांडण संपल्यावर अर्थातच आपल्यावर दोन घेण्याचीही वेळ येते. (म्हणजे झुकिन्या नाही, तर टोमणे) तयार असावं. “तुमच्याकडे नाही मिळत ही भाजी?” असा प्रश्न तीच-ती काकडीचा आव आणणारी भाजी आपल्या डोळ्यांसमोर नाचवत आपल्याला विचारला जातो. “हो असते की! त्याला शिराळं का घोसाळं म्हणतात. घरी विचारून सांगेन. आमच्याकडे गौरीला यांची भजी करतात…” असं नॉस्टॅल्जिक बोलत सुटावं. मात्र बोलण्याला स्मरणरंजनी, रडकी कळा आणण्यापेक्षा “आमच्या देशात शेणसुद्धा कसं स्वच्छ-सेप्टिक असतं” अशा थाटात बोलावं. आणि त्यासाठी त्या घोसाळ्याची भजी आवडत असण्याचीही बिलकुल गरज नसते. मला तर ती भयंकर तळकट आणि विळविळीत लागायची. शिराळं, घोसाळ्यातले ळ, घ असे उच्चार आले की फिरंगी लोक हार मानतात. जितम्‌, जितम्‌, जितम्‌!

(सध्याच्या) घरी आल्यावर दोन-चार दिवसांनी (भारतातल्या) घरी फोन झाल्यावर “कूर्जेट म्हणजे शिराळं का घोसाळं?” असा प्रश्न घरातल्या समस्त स्त्रीवर्गाला विचारावा. कूर्जेट हे प्रकरण कसं दिसतं या पलिकडे आपल्याला माहिती नसते, हे स्वयंशिक्षण झाल्यावर “जाऊ दे, मी शोधेन इंटरनेटवर” असं म्हणून विषय बदलावा.

मग मराठी संस्थळांवर यावं. तिथे उगाच उनाडत सुटावं. कुठेतरी बिनकामाचं उनाडताना, “मला शेपूची भाजी आवडते फारच” असं लिहून टाकावं. (भाजी खरोखर आवडायची गरज नाही. आपलं खरं नाव काय हे लोक जिथे तपासून घेत नाहीत तिथे शेपूची भाजी आवडते का, हे तपासायला कोणाला वेळ आहे? आपल्याला कितीही वाटत असलं की आपण विश्वाच्या केंद्रस्थानी आहोत, तरीही तसं नसतं.) शेपू, वांगं, घोसाळं, करटुलं, कारलं या भाज्या पोलरायझिंग असतात, अँडी वॉरहॉलची चित्रं किंवा गेलाबाजार मन्या जोशीच्या कवितांसारख्या. एकतर तुम्हाला त्या आवडतात किंवा आवडत नाहीत. भेंडी किंवा घेवड्यासारखं नाही, अमकी पाककृती असेल तर मला चालते, ताजी भाजी असेल तरच खावीशी वाटते, असा गिळगिळीत प्रकार नाही. पोलरायझिंग भाज्या आवडणारे लोक या भाज्यांबद्दल अस्मिता बाळगतात. हां, तर “मला शेपूची भाजी फारच आवडते” असं जाहीर करून टाकायचं. तिथे एक छोटं शेपू-युद्ध होतं. त्यातून पोलरायझिंग तरीही उपेक्षित भाज्यांबद्दल चर्चा सुरू होते. भाज्यांची थोडी गंमतच आहे हं! एरवी पोलरायझिंग विषय निघाला की धो-धो प्रतिसाद येतात, मोदी वि. इतर, उजवे वि. इतर, भगवे वि. इतर अशा पोलरायझिंग मारामाऱ्या किती पेटतात. पण पोलरायझेशन करणाऱ्या गोष्टी भाज्या असल्या की ग्लॅमर कमी होतं. पण तरीही कोणीतरी निरागस बकरे गळाला लागतात आणि ते झुकिनीचा विषय काढतात.

ही आली आपली सम. झुकिनी! अशा वेळेस आपण आपलं घोडं पुढे दामटवावं. “तुम्ही झुकिनी कशी बनवता?” असा प्रश्न विचारावा. त्या विचारणेतून पाककृती मिळते. त्यावर सुरुवातीला समाधान मानावं. काळ-वेळ बघून आपणही झुकिनीची भाजी बनवावी. ती पाककृती सोपीच आहे -

फोडणीसाठी तेल गरम करत ठेवावं. एकीकडे झुकिन्या किसून घ्याव्यात. मी दोन लोकांसाठी मध्यम आकाराच्या तीन घेतल्या... झुकिन्या! त्या चटकन किसून होतात. साली सोलायची गरज नाही. फोडणीत मोहरी, जिरं, हिंग, हळद, वेळेत सापडल्यास लसणाच्या फूल ना फुलाच्या पाकळ्या (ठेचून किंवा बारीक चिरून किंवा अशाच) घालाव्यात. (लसणीची मात्र सालं काढावीत.) त्यावर झुकिनी ओतून द्यावी. पातेल्यावर झाकण ठेवावं. गॅस अगदी बारीक.

गॅस बारीक केल्यामुळे झुकिनीला पाणी सुटतं. पण आपल्याला अतिशय मौलिक वेळ मिळतो. या वेळात उत्क्रांती, चार मराठी संस्थळांपैकी बरं कोण, मल्ल्याच्या कर्जाचं काय होणार अशा विषयांवर चर्चा कराव्यात. अनभ्यस्त मतं ठोकून द्यावीत. (विचार करून लिहिण्याएवढा वेळ मिळत नाही, त्यामुळे अनभ्यस्त मतंच गरजेची. चर्चेत चमचा ढवळण्यापेक्षा) मध्येच जाऊन भाजीत चमचा ढवळून यावा, म्हणजे झुकिनी किती शिजल्ये याचा अंदाज येतो. मग झुकिनीत बेसन, थालिपीठ भाजणी यांपैकी काहीतरी किंवा दोन्ही घालावं. आपापल्या आवडीनुसार मीठ. सगळं ढवळावं. आणि सोयीनुसार गॅस बंद करावा. गॅस बंद केल्यावर वरून लिंबू पिळावं, चिरलेली कोथिंबीर भरपूर प्रमाणात पसरावी. म्हणजे भाजीचा गोळा झालेला असला तरीही आपला चुकारपणा ढळढळीतपणे झाकला जातो.

झुकिनीला स्वतःची फार चव नसते. त्यामुळे बेसन, थालिपीठ भाजणीची चवच अधिक लागते. मात्र झुकिनीचा किंचित क्रंची पोत तोंडात जाणवतो. ते खावं.

तुम्हाला भारतीय अस्मिता असतील तर ते चमच्याने खा. पाश्चात्य अस्मिता असतील तर भाजी काट्याने खा. अस्मिता नसतील तर हात बरबटून खा. भाजी कशीही झालेली असली तरीही तुमच्या परदेशी मैत्रांसमोर ती उत्कृष्ट झाली असल्याची अॅक्टिंग करत खा. ही भारतात कशी डेलिकसी आहे, आणि आईकडून कशी शिकले, तिचा हात भाजला तेव्हा तिला मी कसा प्रेमाने चिमटा विकत घेऊन दिला वगैरे लोणकढ्या ठेवून द्या. (हॅवेल्सची जाहिरात बघितल्ये ना? थापा आणि सृजनशीलता यांच्यात उलुसाच फरक असतो.) त्यांना ती भाजी आवडो न आवडो, भारताच्या एका कोपऱ्यातली, रेस्टॉरंटात न मिळणारी, अस्सल पाककृती खाल्ल्याचं सांस्कृतिक समाधान त्यांना मिळालं पाहिजे. ताजी भाजी काय, कोणीही खातात!

पुढच्या वेळेस हाच राग पुन्हा आळवला तर फोटो दाखवेन. अशा रीतीने समेवरच ही पाककृती संपवत आहे.

(ता.क. - भाजी केल्याचं पाककृती देणाऱ्यांना सांगा. पाककृती आवडली असं सांगा. आणि मुख्य प्रश्न विचारून टाका. “झुकिनीला मराठीत काय म्हणतात?”)

4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

राग झुकिनी

मी अमेरिकेत १९६५ आलो तेव्हा मलाहि हाच प्रश्न पडला होता. प्रथम झुकीनी काकडी म्हणून घेतल्याचे आठवते. अमेरिकेत आता ५० वर्षे आहे पण कूर्जेट हा शब्द व ते झुकिनिचे नाव असल्याचे प्रथमच कळले.

दुसरी गोष्टः भाजीऐवजी त्याची भजी आपल्याकडच्या घोसाळ्याच्या भज्यासारखी होतात. मला आवडतात.

गावरान

या लेखात किती विनोद करायचे

या लेखात किती विनोद करायचे राहिले याची आता जणीव होत आहे. अमुक आणि राही हे जुनेजाणतेच, पण सतलज तू ही!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि फेस्बूक वर काय लिहाल?

मस्त लेख. आवडला.

तुम्ही अमेरिकेत अजुन मुरल्या असाल तर फेसबुक वर लगेच फोटो टाकाल-

crunchy zukini saute with whole grain mix and fresh cilantro-- Super food after one hour of refreshing Yoga!

वरती अजुन एक लोण्कढी टाका-
missed fresh garden vegetables from my mom's kitchen garden

भय्याकडुन घेतली कि किचन गार्डन, कोण बघयला येतेय?

पण असे लिहिले की झाले की नाही पोलिटिकल कर्रेक्ट!!! जळफळाट इतर देशी जनतेचा!

सतलज

मग

मग ग्रेपफ्रूट म्हणजे मराठीत काय? आणि कवठ - त्याचं ईंग्रजी रूप? मरो ते. काही का म्हणेनात त्याला? कवठाची आंबटगोड चटणी आठवून निष्कारण जीभ तेव्हढी चाळवली Sad

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

पपनसाला इंग्रजीत काय

पपनसाला इंग्रजीत काय म्हणतात

पोमेलो.

मस्त ललीत आहे. फारच आवडलं.

मस्त ललीत आहे. फारच आवडलं.
___
ऑलिव्ह गार्डन मध्ये फ्राईड झुकिनी फार छान मिळते. ते सगळं चीझट चीझट खाल्ल्यावर ही खमंग भजी आवडते.

मला पपनस म्हणजे पपई वाटे

मला पपनस म्हणजे पपई वाटे Sad

लोल

मलाही त्याच संदर्भात हे फळ माहीत आहे.

मतभेद

उलटपक्षी कूर्जेटला अमेरिकन मराठीत झुकिनी म्हणतात, अशी आमची प्रामाणिक समजूत होती.

असो चालायचेच.

तळकोकणात काही ठिकाणी त्याला

तळकोकणात काही ठिकाणी त्याला तोरंजन असही म्हणतात ..

धन्यवाद! आमी अननस आन पपनस

धन्यवाद! आमी अननस आन पपनस येकच समजत होतो.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बातापि आणि काय? बांग्ला नाव

बातापि आणि काय? बांग्ला नाव आहे का? आयदर वे, माहिती नव्हते. (स्माईल)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हो तर!

हो तर!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बॅटमॅन

बहुधा पपनस = बातापि

अश्लील

इइइ...तुम्ही सारे प्रवासी घडीचे वाचलं असेलच.

जयवंत दळवींच्या एका पुस्तकात

जयवंत दळवींच्या एका पुस्तकात उल्लेख वाचला होता याचा. जरा अश्लील अर्थाने.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अस्साच

अस्साच धागा बिकिनीवरही येईल का?
डब्बल मानधनाची भरपूर शक्यता.
ही लालूच किंवा आमिष नाही. बिकिनीसाठी कशाला लागतंय मेलं ते आमिष किंवा मेली ती लालूच, म्हणा?

फळभाजी

फळभाजी किंवा भाजीफळ.

पपनस हे साधारण संत्र्यासारखं

पपनस हे साधारण संत्र्यासारखं दिसणारं पण संत्र्याहून पाचपट मोठं फळ असतं. त्याच्या फोडी संत्र्याहून कोरड्या आणि गुलाबी रंगाच्या पाकळ्यांनी भरलेल्या असतात. चवीला तुरट-आंबट-गोड लागतं. साखर मिसळल्याशिवाय खाणं अशक्य. कोकणात मिळतं. साधारणपणे गणपतीच्या दिवसांत.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बेसिक शंका

अननस आणि पपनस यांत फरक काय?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

झुकिनीवाला चाहिये..

समेवर येण्यापूर्वीच्या काकडआरतीमुळे 'झुकिनीवाला चाहिये' असं शीर्षक हवं नै? डब्बल मानधनाच्या मागणीचा प्रचार असा शीर्षकापासूनच का नको?(जीभ दाखवत)

आणि मुख्य प्रश्न विचारून टाका. “झुकिनीला मराठीत काय म्हणतात?”
...............ठीक. झुकिनी हे फळ आहे की भाजी ?

मेघनातैंनी खुद्द अदितीमैडमना

मेघनातैंनी खुद्द अदितीमैडमना 'मानधन मिळणार नाही' असं म्हटल्यावर इथे कॅटफाइट होणार की काय या आशेने डोळे टवकारले.

खमंग झुकीनी

(दात काढत) फोटो पाहिजेत!

“झुकिनीला मराठीत काय म्हणतात?”

सोपं आहे, कूर्जेट!

आमच्याकडे आलेल्या असताना मातोश्रींनी एकदा बाजारातून (काकडी समजून) झुकीनी आणून त्याची खमंग झुकीनी केली होती; "अगं पण ही काकडी नाही" असे सांगण्याकडे साफ दुर्लक्ष करून. नंतर खाताना मात्र "नसेना का काकडी, पण अशीही चांगली लागतेय की नाही?" असे ऐकवले गेले होते पण चव खरेच बरी लागली होती. आता मीदेखिल कधीकधी तशी बनविते, लिंबू थोडं जास्त पिळून.

केळफुलाला इंग्रजीत काय

केळफुलाला इंग्रजीत काय म्हणतात?

(डब्बल मानधन शक्य नाही. म्हणून डब्बल प्रतिसाद देण्यात आला आहे. गोड मानून घ्यावा.)

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पपनसाला इंग्रजीत काय म्हणतात?

पपनसाला इंग्रजीत काय म्हणतात?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन