सूर्य - ३

याआधीचे भाग १, भाग २

सूर्याचे चुंबकीय क्षेत्र वायूमधे अडकलेले असते. त्याशिवाय सूर्याचे परिवलन (स्वतःभोवती फिरणे) differential rotation पद्धतीने होत असल्यामुळे सूर्याचे चुंबकीय क्षेत्र अस्ताव्यस्त होते. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या चक्राच्या अतिशय स्फोटक भागात सूर्याचे उल्लेख active sun असा होतो. या काळात (आणि इतःपरही) सौर डाग कसे तयार होतात हे आपण मागच्या भागात पाहिले. या भागात आपण चुंबकीय क्षेत्राचे इतर कोणते परिणाम दिसतात ते पाहू. सूर्याच्या पृष्ठभागावर आणि वातावरणात दिसणाऱ्या या घटना:

१. सौर ज्वाळा (flares)
२. सौर कमानी (prominence)
३. सौर चट्टे (flocculi)
सूर्याचे प्रभामंडळः
४. रंगावरण (chromosphere)
५. सौर किरीट (corona)
६. coronal mass ejection

यांपैकी सूर्याचे रंगावरण आणि किरीट हे दोन्ही सूर्याच्या वातावरणाचाच भाग आहेत, पण चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेनुसार त्यांचा आकार, आणि तिथे दिसणाऱ्या घटना बदलत रहातात म्हणून त्यांचा समावेश इथेच केला आहे. या सर्व घटना सूर्यावर नेहेमीच दिसत असतात पण चुंबकीय क्षेत्र प्रभावी असताना, साधारणतः दर ११ वर्षांनी यांचे प्रमाण वाढते.

सूर्याच्या पृष्ठभागावर चुंबकीय क्षेत्रामुळे होणारी 'वादळे' दिसतात त्यांना इंग्लिशमधे solar flares आणि मराठीत सौर ज्वाला असे म्हणता येईल. मागच्या भागात सूर्याच्या चुंबकीय बलरेषा ताणल्या जातात आणि तुटतात याची माहिती घेतली. या चुंबकीय बलरेषा कधीकधी सूर्याच्या पृष्ठभागाच्या बाहेर येतात आणि त्यांच्यात गुंतलेला सूर्यामधला तप्त वायूही बाहेर ओढला जातो. डाव्या बाजूला सौर ज्वाळेची मूव्ही आणि उजव्या बाजूला फोटो दाखवलेला आहे. अशा स्फोटसमान ज्वाळेतून सूर्याच्या संपूर्ण पृष्ठभागातून एका सेकंदात जेवढी ऊर्जा बाहेर पडते त्याच्या एक षष्ठांश एवढी ऊर्जा अतिशय छोट्या भागातून अगदी कमी काळासाठी बाहेर फेकली जाते. असे स्फोट साधारणतः सौर डागांच्या आसपासच दिसतात. सौर डागांच्या गडद भागात (umbra) सूर्याचे चुंबकीय क्षेत्र सर्वात प्रभावी असते आणि याची दिशा सूर्याच्या पृष्ठभागाला लंब, त्रिज्जा वाढवल्यास असेल तशी, असते. डागांच्या फिकट भागात (penumbra) चुंबकीय क्षेत्र गडद भागापेक्षा थोडे कमी शक्तीशाली आणि तिरक्या रेषेत होते. स्फोटातून जेव्हा इलेक्ट्रॉन्सना प्रचंड गती मिळते, तेव्हा असे फिरणारे इलेक्ट्रॉन्स चुंबकीय क्षेत्रालाही सामोरे जातात. चुंबकीय क्षेत्रात हलणाऱ्या भारित कणांमुळे विद्युतचुंबकीय लहरी मुक्त होतात. इलेक्ट्रॉन्सचा प्रचंड वेग आणि सौर डागांमधले चुंबकीय क्षेत्र प्रचंड शक्तीशाली असल्यामुळे तिथे क्ष-किरण (X-ray) आणि अतिनील प्रारणेही (ultraviolet radiation) तयार होतात. यांचा पृथ्वीच्या आयनावरणावर (ionosphere) परिणाम होतो. एएम रेडीओ स्टेशन्स, हौशी रेडीओ वापरकर्ते या आयनावरणाचा वापर परावर्तकासारखा करतात.

हा वायू परत सूर्याच्या पृष्ठभागापर्यंत गेला तर त्याचा कमानीसारखा आकार दिसतो; अशा घटनेला सौर कमान (prominence) असे म्हणतात. डाव्या बाजूच्या चित्रात अशीच एक सौर कमान आणि आकाराच्या तुलनेसाठी त्याच स्केलवर सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह, गुरू, दाखवलेला आहे. उजव्या बाजूलाही (दुसऱ्या) कमानीच्या दोन स्थिती दाखवल्या आहेत. सूर्यावर दिसणाऱ्या पांढऱ्या डागांना flocculi असे म्हणतात. सहसा कमानी आणि ज्वाळा जिथे असतात त्यांच्या आसपासच असे पांढरे चट्टे दिसतात. सूर्यावरच्या अशा स्फोटक घटनांमधून बाहेर पडणारा वायू कधीकधी एवढ्या जोरात बाहेर फेकला जातो की त्यातला बराचसा भाग सूर्याच्या गुरूत्वाकर्षाणातून निसटतो आणि सौरमालेच्या वातावरणाचा भाग बनून जातो. या बाहेर फेकल्या गेलेल्या वायूमधे फक्त हायड्रोजनचे अणूकेंद्र म्हणजेच प्रोटॉन्स असतात असंच नाही. या फेकल्या जाणाऱ्या प्लाझ्मामधे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि अल्पांशाने अल्फा कण (किंवा हेलियमचे अणूकेंद्र) सापडतात.३,४

अशा प्रकारचे फोटो काढण्यासाठी आपल्याला खग्रास सूर्यग्रहणापर्यंत थांबावे लागते. पण खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी, जमिनीवरून दिसण्याची शक्यता यांचा विचार करता सूर्यामधे घडणाऱ्या या घटनांच्या अभ्यासासाठी करोनोग्राफ हे उपकरण वापरले जाते. करोनोग्राफ वापरून कृत्रिमरित्या ग्रहण लावले जाऊन या घटनांचा अभ्यास करता येतो. वरची चित्रे पहाता आणखी एक गोष्ट लक्षात येईल की या चित्रांचा रंग साधारणतः एकसमान आहे. याचे कारण ही सर्व चित्रे Hα प्रकारचा फिल्टर वापरून काढली जातात. या फिल्टरमुळे ६५६ नॅनोमीटर्स एवढ्या तरंगलांबीचे किरण पकडले जातात आणि बाकीचे फिल्टर होतात. मानवी डोळ्यांना ४०० ते ७०० नॅनोमीटर तरंगलांबीचे किरण दिसतात. सूर्याच्या पृष्ठभागावरून इतर प्रकारचे किरणही बाहेर पडतात. ते किरण या फिल्टरमुळे अडवून फक्त Hα किंवा ६५६ नॅनोमीटर्स एवढ्या तरंगलांबीचे किरण कॅमेऱ्यापर्यंत पोहोचतात. सूर्यावरच्या या घटना (ज्वाळा, कमानी) या तरंगलांबीला सर्वात जास्त तेजस्वी असतात.

हे भारीत कण पृथ्वीपर्यंत येतात तेव्हा सरळ रेषेत प्रवास करतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे हे कण चुंबकीय ध्रुवांच्या दिशांना वळतात. पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव, भौगोलिक ध्रुवांच्या जवळच आहेत. तिथे हे कण पृष्ठभागाच्या दिशेने येतात आणि आयनावरण आणि त्याखाली असणाऱ्या नायट्रोजन, ऑक्सिजन इ. अणू-रेणूंशी त्यांची प्रक्रिया घडते. या कणांमधली ऊर्जा वातावरणातल्या नायट्रोजन, ऑक्सिजनमधले इलेक्ट्रॉन्स शोषून घेतात. काही वेळाने ही ऊर्जा पुन्हा बाहेर टाकतात आणि आपल्याला ध्रुव प्रदेशातून ऑरोरा (aurora, ध्रुवीय प्रकाश) नावाच अतिशय सुंदर प्रकार दिसतो. डाव्या बाजूच्या चित्रात अशाच एका ऑरोराचे चित्र दाखवले आहे. ऑक्सिजनमुळे हिरवा आणि काळपट लाल रंग दिसतो. नायट्रोजनमुळे ऑक्सिजनसारखेच रंग आणि शिवाय निळसर छटाही दिसते. सध्या सूर्याचा सक्रीय काळ सुरू असल्यामुळे सूर्यातून बऱ्याच अधिक प्रमाणात भारित कण बाहेर पडत आहेत. त्यामुळे सध्या असे ऑरोरा दिसण्याचे प्रमाण वाढलेले आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेतल्या अ‍ॅरिझोना राज्यातूनही एक क्षीण ऑरोरा बघितला गेला. साधारणतः फिनलंड, कॅनडा, न्यूझीलंड अशा चुंबकीय ध्रुवाच्या जवळच्या भागांतूनच ऑरोरा दिसतात.

अशा कणांपासून साधारणतः पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि वातावरणामुळे आपण सुरक्षित असतो. या कणांचा सर्वाधिक परिणाम कृत्रिम उपग्रहांवर होतो कारण ते या संरक्षक कवचांच्या बाहेर असतात. निदान पृथ्वीच्या सावलीत असेपर्यंत त्यांचे थोडेफार संरक्षण होते. अवकाशात फिरणार्‍या उपग्रहांचा ऊर्जास्रोत सौर ऊर्जा हाच असतो. अशा प्रकारचा एखादा स्फोट झाल्यावर प्रकाश आपल्यापर्यंत आठ मिनीटात पोहोचतो पण हे कण आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत दोन ते तीन दिवस लागतात. असे कण येत असताना उपग्रहांचे सोलर पॅनेल्स बंद करावे लागतात. सूर्यावरच्या स्फोटातून प्रचंड प्रमाणात कण बाहेर आल्यामुळे कॅनडातले एक पावर स्टेशन बंद पडले होते. सोलर मॅक्झिमा (मराठी?) काळात, विशेषतः ध्रुवीय प्रदेशात या कणांमुळे पावर ग्रिड्स, बिनतारी दळणवळण यांच्यावर परिणाम होऊ शकतो. अर्थात यामुळे जगबुडीची भीती वाटणे अगदी बिनबुडाचे आहे. थोडा काळ मोबाईल, उपग्रहाद्वारे दळणवळण बंद पडणे ही जगबुडीची व्याख्या नसावी.

विस्तारभयास्तव सूर्याचे प्रभामंडळ आणि त्यात घडणाऱ्या रोचक घटनांबद्दल पुढच्या भागात लिहीते.

सर्व फोटो आणि मूव्हीज आंतरजालावरून साभार. संदर्भ विकीपीडीया, लेक्चर नोट्स आणि arXive वरचे पेपर्स.

फूटनोट्सः

१. विद्युतचुंबकीय लहरींचा (electromagnetic radiation) प्रकार त्यांच्यात किती ऊर्जा आहे यावर ठरतो. आपल्या माहितीतल्या मायक्रोवेव्ह किरणांमधली ऊर्जा दृष्य किरणांपेक्षा बरीच कमी असते. अतिनील, क्ष किरण आणि गॅमा किरण दृष्य किरणांपेक्षा शक्तीशाली आहेत.
२. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून रेडीओ लहरी सर्व दिशांनी प्रसारित केल्या जातात. ज्या वरच्या दिशेला जातात त्या आयनावरणाच्या खालच्या थरातून परावर्तित होऊन परत पृष्ठभागापर्यंत पोहोचतात. त्यामुळे एएम रेडीओ स्टेशन्स एफेमपेक्षा जास्त लांबवर ऐकू येतात.
३. पृथ्वीचेही स्वतःचे चुंबकीय क्षेत्र आहे, जे पृथ्वीच्या केंद्राशी असणाऱ्या वितळलेल्या लोखंडामुळे टिकून रहाते. या चुंबकीय क्षेत्राचा उगमही सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रातूनच झालेला आहे असे मानले जाते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वैशिष्ट्यपूर्ण आणि बदलणारा आकार, पृथ्वीच्या स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्यातून आणि सौर वाऱ्यांमुळे बनतो.
४. सूर्याशिवाय इतर स्रोतांमधूनही असे कण पृथ्वीपर्यंत येतात ज्यांना वैश्विक किरण (cosmic rays) असे नाव आहे. सूर्यामधून येणाऱ्या कणांची ऊर्जा, दीर्घिकेतून येणाऱ्या कणांपेक्षा बरीच कमी असते.

पुढचा भागः सूर्य - ४

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

अदिती हा ही भाग प्रचंड आवडला.
लिखते राहो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

+१ गणपा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ससंदर्भ, मुद्देसुद तरीही अतिशय उत्तम भाषेत लिहिलेला उत्तम लेख! केवळ दर्जेदार!
लेखमाला रंगते आहेच, मात्र या भागात अश्या प्रकारच्या लेखनाचा फॉर्म नीट गवसला आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.
शिवाय चित्रे आणि त्यांची रचना आवडली ही भर घालतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही लेखमाला एकदम आवडली. खाली दिलेली वाक्य खटकली. पण ती आणखीन चांगली कशी लिहावी ते अजून सुचलेलं नाही.
"सूर्याचे चुंबकीय क्षेत्र वायूमधे अडकलेले असते."
"पण उपग्रहांचा ऊर्जास्रोत सौर ऊर्जेतच असतो."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"उपग्रहांना अवकाशात, कक्षेमधे स्थिर झाल्यावर सूर्याकडूनच ऊर्जा मिळते" हे वाक्य मराठी वाटतंय का?

पहिल्या वाक्याचं मराठीकरण सुचलेलं नाही. त्या वाक्यावर आधीही थोडा विचार केला, पण अधिक चांगलं सुचलं नाही.

आणखी एक चूक लक्षात आली आहे ती वरही दुरूस्त करते: सौर कमानीच्या डाव्या बाजूच्या चित्रात आकाराच्या तुलनेसाठी गुरू ग्रह त्याच स्केलवर दाखवलेला आहे, पृथ्वी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो..असच काहिसं... "उपग्रह अवकाशात, कक्षेमधे स्थिर झाल्यावर सौर ऊर्जेवरच चालतात." किंवा "उपग्रह अवकाशात, कक्षेमधे स्थिर झाल्यावर सौर ऊर्जेवरच अवलंबून असतात."
पहिलं वाक्य अवघड आहे नक्कीच. "अडकलेलं" पेक्षा "गुंतलेलं" म्हटलं तर कसं वाटेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋता, 'अडकणे'पेक्षा 'गुंतणे' हे क्रियापद अधिक चपखल वाटले. आता तेच वापरेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुरु दाखवला आहे त्याच्या खाली आणखीन एक बिंदु दिसतो आहे. ती पृथ्वी आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आकारांचा विचार करता शक्य आहे. ते माझ्या आधी लक्षातच आलं नव्हतं.
(मी चटकन हा फोटो पाहिला तेव्हा माझ्या स्क्रीनवर फार कचरा साठला आहे असा विचार केला होता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अतिशय सुरेख माहिती. हा ही भाग आवडला. क्लिष्ट माहिती सुगम करून मराठीत मांडण्याकरता घेतलेले कष्ट दिसून येत आहेत.
अवकाशातील घटनांबद्दल नेहमीच एक कुतूहल वाटत आलंय. तू लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

अदिती,

सौर लेखमालेतील हा भागही माहितीपूर्ण आणि सुरस आहे. आवडला.

मागच्या भागात सूर्याच्या चुंबकीय बलरेषा ताणल्या जातात आणि तुटतात याची माहिती घेतली.>>>>
चुंबकीय क्षेत्राचे ’कारण’ आणि ’कार्य’ हे दोन्हीही अधिक स्पष्ट करण्याची गरज आहे.

Active sun = सक्रिय सूर्य
Prominence = ठळक वैशिष्ट्य
Coronal mass ejection = किरीटीय वस्तुमान उत्सर्जन
Flares = उद्रेक / उसळी / भपके / प्रक्षोभ
Umbra = सावली
Penumbra = पडसावली

अशा स्फोटसमान ज्वाळेतून सूर्याच्या संपूर्ण पृष्ठभागातून एका सेकंदात जेवढी ऊर्जा बाहेर पडते त्याच्या एक षष्ठांश एवढी ऊर्जा अतिशय छोट्या भागातून अगदी कमी काळासाठी बाहेर फेकली जाते.>>>>>
ह्यात ’काळासाठी’ च्या ऐवजी ’काळात’ असे हवे आहे

चुंबकीय क्षेत्रात हलणाऱ्या भारित कणांमुळे >>>>
मुव्हिंग चार्जड पार्टिकल्स चा अनुवाद गतीमान भारित कण असा करावा

करोनोग्राफ = किरिटालेख

Hα – नावाचा संदर्भ आणि अर्थ दिला तर जास्त स्पष्टता येईल

या तरंगलांबीला सर्वात जास्त तेजस्वी असतात.>>>
तेजस्वी म्हणजे लांबीला कमी. म्हणजे कमी लांबीच्या असतात असे म्हणायचे आहे काय?

मॅक्झिमा / मिनिमा = कमाल आणि किमान परिमाणे/चलमूल्ये इत्यादी

लिखाण उद्बोधक आणि प्रेरक ठरत आहे. प्रेरणादायी लिखाणाकरता मनःपूर्वक अभिनंदन.
मालिकेच्या पुढील भागासाठी हार्दिक शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा विषय इंग्लिशमधून शिकल्यामुळे, आणि तत्संबंधी वाचनही इंग्लिशमधेच असल्यामुळे चटकन इंग्लिश वाक्यांचं मराठी भाषांतर होतं आणि ते लक्षातही येत नाही. बर्‍याच ठिकाणी भाषांतर हुकलेलं आहे हे मला आता जाणवतं आहे. यातल्या पुढच्या भाषांतरांबद्दल मला शंका आहेत.

Prominence = ठळक वैशिष्ट्य

Prominences कमानींच्या आकारांचे असतात. चुंबकीय रेषा आणि वायू यांची कमान दिसते त्यामुळे त्याचे शब्दशः भाषांतर मला पटले नाही.

Flares = उद्रेक / उसळी / भपके / प्रक्षोभ

याचा उल्लेख आधीच्या (विशेषतः ९० च्या दशकांत आलेल्या मोहन आपटेंच्या) पुस्तकांमधून सौर ज्वाळा असा उल्लेख असल्यामुळे आणि माझ्या ओळखीतल्या हौशी खगोलाभ्यासकांमधे निदान गेली वीसेक वर्ष हाच शब्द रूढ असल्यामुळे मी तोच शब्द वापरला. तसंही हे भाषांतर शब्दशः करण्याची आवश्यकता नाही.१,२

Umbra = सावली

सावली या शब्दातून गोंधळ होऊ शकतो. प्रकाश-छायेच्या संदर्भात गडद छाया आणि फिकट छाया हे शब्द (बहुदा) आमच्या विज्ञानाच्या पुस्तकांमधे होते. आता आठवत नाही. कॉलिंग मिहीर.

या तरंगलांबीला सर्वात जास्त तेजस्वी असतात.>>>
तेजस्वी म्हणजे लांबीला कमी. म्हणजे कमी लांबीच्या असतात असे म्हणायचे आहे काय?

नाही. एका विशिष्ट तरंगलांबी (आणि तिच्याशी संबंधित वारंवारितेला) तीव्रता (intensity) सर्वात जास्त असते. Luminosity आणि intensity हे आणखी दोन शब्दांची जोडगोळी ज्यांच्यात गोंधळ होतो.
या वाक्याचं भाषांतरही थोडं हुकलेलं आहे. "या तरंगलांबीला सूर्याच्या पृष्ठभागावरच्या कमानी, ज्वाळांची तीव्रता सर्वात जास्त असते." असं काहीसं थोडं बरं वाटतंय. पण आवडलेलं नाही.

१.विशेषतः विज्ञानात चूक म्हणतात येतील अशी अनेक नावं रूढ झाली आहेत. 'बिग बँग' हे नाव टवाळीच्या उद्देशाने वापरलं गेलं, जे आज सर्वमान्य आहे. 'Quasar' हे नाव गैरसमजातून रूढ झालं, पण ते ही सर्वमान्य आहे. Quasar च्या जागी QSO हे नाव काही ठिकाणी दिसतं (ते ही चूकच आहे), पण लिखाणात, बोलण्यात Quasar हेच नाव अधिक वापरात आहे.
२. अशी नावं अनेकदा स्थानिक लोककथा, संस्कृती, पुराणांमधून येतात. त्यामुळे त्यांचं शब्दशः भाषांतर खटकतं. आकाशात ८८ तारकासमूह आहेत, असं मानलं जातं. या तारकासमूहांच्या संदर्भात भारतीय दंतकथा आणि नावं ग्रीक कथा आणि नावांपेक्षा खूप वेगळे आहेत. आणि आकाशात दिसणारे आकार त्याहून फारच वेगळे दिसतात. आकाशातल्या आश्लेषा नक्षत्र ज्याला ग्रीक पुराणातल्या सापाचं नाव आहे (ते नाव विसरले) ते त्यांचं सापाचं तोंड; ते नागरी लिपीतल्या नवासारखं दिसतं. आम्ही तारे बघता, दाखवताना "तो मराठी नऊ आहे पहा, त्या दिशेला, ते त्या सापाचं तोंड" असं एकमेकांना दाखवतो.
धनू राशीतल्या ठळक तार्‍यांना रेषांनी जोडताना धनुष्यापेक्षा इंग्रज पूर्वी वापरायचे आणि हल्ली ट्रेन्समधले चहावाले वापरतात तसली चहाची किटलीच मला सहजतेने दिसते. किटली मूळची भारतीय नसली तरी आपल्याकडे सामावली गेली आहे, धनुष्यमात्र आपल्या दृष्टीआड होतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तत्संबंधी वाचनही इंग्लिशमधेच असल्यामुळे चटकन इंग्लिश वाक्यांचं मराठी भाषांतर होतं आणि ते लक्षातही येत नाही.>>>>>
अशाच वैशिष्ट्यांचे लिखाण आनंद घारे यांचेही आहे. मात्र त्यांचे 'पंपपुराण' तरीही वाचनीय आहे. सुरस आहे. मनोरंजक आणि माहितीपूर्णही आहे.
.
Prominences कमानींच्या आकारांचे असतात. चुंबकीय रेषा आणि वायू यांची कमान दिसते त्यामुळे त्याचे शब्दशः भाषांतर मला पटले नाही.>>>>
म्हणूनच मला "Prominences = कमानी" हेही शब्दशः भाषांतर पटले नव्हते. प्रत्यक्षातील आकार कमानीसारखे दिसतात ही माहिती मूळ शब्दात उपलब्ध नाही.
यामुळेच हे भाषांतर शब्दशः करण्याची आवश्यकता नाही, हे पटण्यासारखे आहे. वस्तुत: मराठीत याकरता प्रथमच अधिक अर्थपूर्ण शब्द "कमानी" वापरल्याखातर मी तुमचे अभिनंदन करेन.
.
आकाशात ८८ तारकासमूह आहेत, असं मानलं जातं. या तारकासमूहांच्या संदर्भात भारतीय दंतकथा आणि नावं ग्रीक कथा आणि नावांपेक्षा खूप वेगळे आहेत. >>>>>>
यांची नावे कशी बदलत गेली आणि मुळात ते आकार निरनिराळे का दिसतात, कसे बदलत जातात ह्याचे सुरेख विवरण मोहन आपटे ह्यांच्या 'कालगणना' ह्या पुस्तकात व्यवस्थित समजावून दिलेले मला स्मरते.
.
Brightness = Luminosity = तेजस्वीता, तीव्रता, प्रखरता, उजळपणा, एकाच त्रिमिती-कोनातील ऊर्जोत्सर्जनाचा दर (power, शक्ती)
Radiation Energy = प्रारणऊर्जा, वारंवारिता (पर्यायाने तरंगलांबी, ऊर्जा-पातळी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Brightness = Luminosity

नाही.

(निदान खगोलशास्त्राच्या संदर्भात) Luminosity म्हणजे अवकाशस्थ वस्तूमधून ठराविक काळात विद्युतचुंबकीय प्रारणांच्या रूपात, बाहेर पडणारी ऊर्जा. ठराविक वस्तूसाठी हा आकडा आपलं त्या वस्तूपासूनचं अंतर बदललं तरी बदलत नाही.
Brightness मात्र आपण त्या वस्तूमधलं अंतर यावर अवलंबून असतो.

मराठीकरण करताना माझी अडचण ही होते की वापराच्या भाषेत तीव्रता, प्रखरता, तेजस्विता हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. याची अनुक्रमे तांत्रिक इंग्लिशमधली भाषांतरं intensity, brightness, luminosity अशी असावीत.

विज्ञानासंदर्भात, विशेषतः भौतिकशास्त्राची चर्चा भारतीय भाषांपैकी बंगालीत होणं एकवेळ शक्य आहे. (अर्थात त्यांच्या बंगालीतल्या चर्चाही इंग्लिश शब्दांचा वापर असल्यामुळे मला बहुतांशी समजतात.) एवढ्या प्रमाणात मराठी भाषिक astronomers नसल्यामुळे सध्यातरी मराठीमधे या विषयामधे चर्चा शक्य आहे असं मला वाटत नाही. मराठी सॉफ्टवर इंजिनियर्स सापडतात पण भौतिकशास्त्राचा अभ्यास करणारे कमीच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाचायला जरा उशीरच झाला. मस्त झाला आहे हा लेख. आमच्या पुस्तकात प्रच्छाया आणि उपच्छाया असे शब्द होते.
आयनॉस्फिअरला मोहन आपटेंच्या पुस्तकात आयनगोल हा शब्द वाचला होता पण तो आवडला नव्हता. त्यापेक्षा स्थितांबर, तपांबर यांच्या धर्तीवर 'आयनांबर' किंवा वातावरण, जलावरण सारखे 'आयनावरण' चांगले वाटते.

अवांतरः 'कालगणना'मध्ये ८८ नक्षत्रांच्या नावे, आकार बदलण्याबद्दल माहिती दिसली नाही. बारा महिन्यांची नावे वेदकाळात काय होती याबद्दल माहिती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढचा लेख लिहीताना मराठी शब्दांसाठी आधी तुलाच संपर्क करते. मिहिर उर्फ चालताबोलता विज्ञानाचा शब्दकोष याचेही आभार. स्थितांबर, तपांबर हे शब्द मलाही माहित होते ... पण आता वय झालं.

अवांतराबद्दल: नक्षत्रे २७च आहेत. चंद्राच्या आकाशात दिसणार्‍या मार्गाचे २७ भाग केले आहेत ती नक्षत्रं. सूर्याच्या भासमान भ्रमणमार्गाचे १२ भाग म्हणजे राशी. हे दोन्ही मार्ग आकाशाच्या साधारण एकाच भागातून जातात त्यामुळे सव्वादोन नक्षत्रं = १ रास असेही म्हणता येते. भारतीय पद्धतीत नक्षत्र आली तर पाश्चात्यांनी राशी वापरल्या.
आकाशाच्या उरलेल्या भागाचेही जे काल्पनिक तुकडे केले आहेत ते इतर तारकासमूह. फलज्योतिषाशी याचा काही संबंध नसल्यामुळे हे तारकासमूह फारसे लोकप्रिय नाहीत. पण तरीही सप्तर्षी, कृत्तिका, देवयानी, ययाति असे ध्रुवतारा ओळखण्यासाठी वापरले जाणारे आणि संबंधित पौराणिक गोष्टींमधे जोडल्या गेलेल्या तारकासमूहांची नावं माहित असतात. देवयानी आणि ययाति तारकासमूह ध्रुवतारा ओळखण्यासाठी वापरत नाहीत, पण कृत्तिका, ययाति आणि देवयानी गोष्टीमधे एकत्रच येतात त्यामुळे ही नावंही कानावरून जाणं शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

८८ तारकासमूहच. त्यांना नक्षत्रे कसं काय म्हटलं मी कुणास ठाऊक! बाकी माहितीशी सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिनही भाग वाचले
ज्याच्या खगोलशास्राशी काहीहि संबंध नाही अशा लोकाना सहज समजतील अशा भाषेत लिहीण खरोखर अवघड आहे
हे शिवधनुष्य पेलल्याबद्दल डागदरबैँचे अभिनंदन

जाता जाता = अशीच असत्या टीचर अमुच्या
जाहलो असतो आम्हीही खगोलशास्रज्ञ;-)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

प्रत्येक लेखांक छान, शैली सुधारत चाललेली आहे.

*एक सूचना/विनंती : "सर्व फोटो आणि मूव्हीज आंतरजालावरून साभार." हे आभार फारच मोघम असल्यामुळे थोडेसे निरर्थक वातते. स्रोत सांगण्याचा आणखी एक हेतू असा असतो, की एखाद्या वाचकांला मूळ स्रोताचा अभ्यास करता यावा. "आंतरजालावरून साभार" म्हटले तर हा हेतू सुद्धा सफल होत नाही. खरे तर पुढचे वाक्य चांगले आहे : "संदर्भ विकीपीडीया, लेक्चर नोट्स आणि arXive वरचे पेपर्स." तेवढे पुरे. वाटल्यास "सर्व प्रकाशचित्रे प्रत-अधिकारमुक्त" असे म्हणता येईल (हे खरे असल्यास.)*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंतर प्रत्येक फोटोवर राईट क्लिक करून 'व्ह्यू इमेज' असा पर्याय निवडला तर फोटो कुठून घेतले आहेत हे यूआरेलवरून समजेल. पण ही माहिती न देण्याचं खास कारण नाही तसं न देण्याचंही खास समर्थनही नाहीच. ज्या चित्रांमधे बदल करून, (विशेषतः स्कीमॅटीक्स, कार्टून्स, आकृत्या अश्या प्रकारचे,) इथे वापरले आहेत त्यांचा स्रोत वेगळा लिहायला हवा हे मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे मला खरेच कठिण जाते.
उदाहरणार्थ पहिल्या चित्रफितीवर उजवी टिचकवून "व्ह्यू-इमेज" असे केले तर दिसणार्‍या निबंधाच्या जागी, त्याच पानावर फक्त ते चित्र दिसते. सध्यातरी मोझिला फायरफॉक्सवर "व्ह्यू इमेज इन सेपरेट टॅब" असा पर्याय नाही.
सूर्य (जवळ गुरु-पृथ्वी) या चित्रावर टिचकवता :
http://upload.wikimedia.org/wikipedia/en/3/39/Sun_earth_jupiter_whole_60...
परंतु या चित्रासोबत काहीच माहिती नाही, लेबल नाही, चित्र ज्या कोणाने आंतरजालावर चढवले, त्याची माहिती नाही. आता विकिपेडियामध्ये जाऊन काहीतरी शोधताही येईल, पण त्याची हायपरलिंक चित्रात नाही. हे चित्र ज्या डिरेक्टरीमध्ये आहे:
http://upload.wikimedia.org/wikipedia/en/3/39/
तिथे गेल्यास "फोरबिडन" असे पान दिसते.

फाईलचे नाव गूगलून पाहिल्यास हे विकीपान मिळते (आणि उघडते):
http://en.wikipedia.org/wiki/File:Sun_earth_jupiter_whole_600.jpg
येथे शेवटी कळते, की चित्राचा स्रोत Solar Dynamics Observatory आणि चित्र बनवणारी संस्था NASA Goddard Space Flight Center ही आहे.
पण तरी चित्राचे वर्णन देणारे लेबल नाही. या संस्थेने कुठल्या पानाच्या संदर्भात हे चित्र दिले आहे, ते सापडणे शक्य आहे, पण पुन्हा बरीच शोधाशोध करावी लागते.

विकीच्या आतल्या आत हे पान कुठे दिसते, ते खाली दिलेले आहे :
The following pages on the English Wikipedia link to this file (pages on other projects are not listed):
Solar prominence ()

गूगल शोधात तब्बल ८व्या पानावरती मूळ नासाचे एक पान मला सापडले :
http://geeked.gsfc.nasa.gov/?cat=93
तिथे शेवटी मला चित्राबद्दल ही माहिती सापडली :
My colleague Frank Reddy at Goddard Space Flight Center has kindly cooked up some quick illustrations to drive home the massive scale of that giant looping filament on the sun that everybody was oooing and ahhhing about in the blogpodcastotwittersphere ...
To make these images, Frank laid Earth and Jupiter along the filament. In the full-disk illustration, Earth is a mere 15 pixels in diameter! By the way, the Earth image is the famous Apollo 17 photo, much shrunken, and the Jupiter snapshot is from Cassini.
(नासाच्या फोटोचा पत्ता : http://geeked.gsfc.nasa.gov/wp-content/uploads/2010/12/sun_earth_jupiter...
हा दिला असता तरी संदर्भासह पान सापडणे कठिणच होते.)
थोडक्यात चित्र कसे बनवले, कोणी बनवले, आणि कुठल्या संदर्भात हे "कोलाज" मुळात बनवले गेले, त्याबद्दल मला हवी होती ती माहिती मिळाली.

काही का असेना, लेखिकेने हे संकेतस्थळ बघितले नसून वेगळ्या कुठल्या संकेतस्थळाच्या संदर्भात हे चित्र बघितले असणार असा माझा कयास आहे.
- - -

हे सर्व मी ३० मिनिटांत शोधले, (गूगलची आठ पाने तपासली, हे लक्षात ठेवावे) हे खरे आहे. एका दशकापूर्वी हे चित्र शोधायला मला काही महिने लागले असते, हेसुद्धा खरे आहे. म्हणजे मला धन्यही वाटायला पाहिजे. शोधाची सुरुवात उजव्या टिचकीने झाली, हेसुद्धा खरे आहे. पण तरी हे सापडायला हवे त्यापेक्षा कठिण आहे. कारण लेख लिहिताना ज्यातून पुरेसा कॉन्टेक्स्ट मिळेल असे संकेतस्थळ खचितच लेखिकेसमोर होते. ते स्थळ http://upload.wikimedia.org/wikipedia/en/3/39/Sun_earth_jupiter_whole_60... हे नव्हतेच, बहुधा. उलट मजकूर-लेबले असलेल्या कुठल्याशा स्थळावरून उजवी टिचकी वापरून लेखिकेने "अपलोड" संकेतस्थळ मिळवले असणार. मग समोर लेबल-लेखासह असलेले संकेतस्थळ देणे सोपे नसते का गेले? जर इतके कळले असते, की स्रोत-संदर्भ Solar prominence वरचे विकीपान आहे, तर तेवढे मला पुरले असते. (हे जर-तर असेच आहे. लेखिकेपुढचे मजकुरासह पान कुठले ते मला अजूनही ठाऊक नाही.)
- - -

वरील टिप्पणी पांढर्‍या ठशात होती. काळ्या ठशातला मजकूर त्या मानाने महत्त्वाचा होता. पण "उजवी टिचकी वापरायला सोपी आहे" ही कानउघडणी मला अपुरी . कारण मला उजवी टिचकी वापरून सहज अर्थपूर्ण स्रोत कळला नाही. अर्थात मला प्रक्रिया नीट माहीत नसेल - उजवी टिचकी वापरून कदाचित अतिशय सोप्या प्रकारे अर्थपूर्ण स्रोत-पान सुद्धा सापडू शकत असेल. तसे असेल, तर मला जरूर सांगावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रं कुठून मिळवली हे संदर्भ मी आळशीपणा सोडून द्यायला हवेत हे आधीच मान्य.

मी बरेच फोटो विकीपिडीयाच्या पानांवरून किंवा नासाच्या Goddard Space Center च्या संस्थळांवरून घेते. पण इमेज सर्च करून कदाचित अधिक लक्षवेधी फोटो मिळू शकतात, ते ही कधीमधी वापरते. यातले सगळेच फोटो लेख लिहीला/प्रकाशित केला तेव्हाच शोधले असे नसून विविध कारणांसाठी आधीच पॉप्युलर लिखाण केले होते तेव्हाच शोधले आहेत. त्यामुळे फोटोंचा स्रोत देण्याचा अधिकच आळस होता.

पुढच्या लेखापासून हा ही आळस झटकेन.

---

उजवी टिचकी मारून कंट्रोल्+व्ह्यू इमेज केल्यास निदान इमेज वेगळ्या टॅबमधे उघडते आणि मुळात आहोत त्या पानापासून आपण भरकटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख सुंदरच. हा भाग सर्वात जास्त आवडला.

>>आणि आपल्याला ध्रुव प्रदेशातून ऑरोरा (aurora, ध्रुवीय प्रकाश) नावाच अतिशय सुंदर प्रकार दिसतो.<<
ह्याच्या विश्लेषणासाठी अनेक धन्यवाद, हा ऑरोरा फारच सुंदर दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0