"मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा…."

"मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा…."

" आताशा वातावरण जरा छानच असू लागलय. दिवसा रिमझिम थंड वारा वाहतच असतो हल्ली. त्यातून जागरणाची सवय,अश्यातच आपण मल्हार रागावर आधारित असलेलं एक गाणं ऐकतो. पाऊस,थंड हवा, गडद रात्र,आपण एकटे राग मल्हार, उत्तम शब्द आणि आवाज… त्या आवाजाबद्दल काय बोलावं! तो आवाज, सीमेपलीकडचा आवाज… तो आवाज… ज्यानी दोन्ही, एकमेकांना वैरी समजणाऱ्या देशांतल्या तमाम " रसिक " जनतेला भुरळ वगैरे घातली, तो आवाज,ज्यानी लोकांना एक प्रकारचं वेडच लावलं, तो आवाज,ती मिठी छुरी "मेहदी हसन" नावाची.
विचार करता करता एका गंमतशीर विचारानी मला हसू आलं खरंतरं,या दोनही देशांचा कारभार जर गुलज़ार आणि मेहदी यांसारख्या अवलींकडे सोपवला तर?
दारू-गोळा,बॉम्ब,जाळपोळ यातून उठणारा धूर,भडका ,
या अवलींच्या शब्द आणि सुरांच्या सोनेरी क्षितिजात विलीन होईल का?( बा-लि-श, खूपच बालिश विचार )
तर असो.
मेहदी हसन 13 जून2012ला गेला. (आपण या "मोठ्या" लोकांना किती सहज अरे तुरे करतो ना,इतके जवळचे झालेले असतात ते म्हणूनच असावं नाहीतरी मेहदीनी गायलेल्याच गज़लेत तस्लिम फाज़ली म्हणतो,
"प्यार जब हद से बढ़ा सारे तकल्लुफ मिट गए,
आप से, फिर तुम हुए, फिर तू का कुनवाँ हो गए"...)

मी मेहदी ची पहिली गज़ल ऐकली होती ती वयाच्या ६-७ व्या वर्षी "अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबो में मिले …" तेव्हा यातलं समजलं काहीच नव्हतं. फ़क्त आवडलं होतं. तो आवाज तेव्हापासून मनाला स्पर्शून वगैरे गेला होता.
आज मेहदी हसन ला "गज़ल सम्राट " म्हणून सारं जग ओळखतय पण गज़ल गायकीतल्या या मातब्बरांनी,
त्याच्या सुरुवातीच्या काळात, सायकल,कार आणि ट्रक मेकॅनिक म्हणून काम केलंय. प्रचंड प्रमाणात आर्थिक अडचणी असतानाही मात्र त्याने रियाझ सोडला नाही. तो सतत सुरूच ठेवला.
आपल्या गायकीच्या सुरुवातीला त्याने रेडीओ वर काही ठुमऱ्या गायल्या. त्यातून पैसा मिळत गेलाच पण नावही होत गेलं.
शायरीची पहिल्यापासूनच आवड असणाऱ्या मेहदिनी मग गज़ल गायकीला सुरुवात केली. ६० च्या दशकात त्याने पाकिस्तानी सिनेमामध्येही गाणी गायली. मनाच्या गाभ्यापासून येणाऱ्या त्याच्या आवाजामुळे, ६०-७० च्या दशकात एकही अशी पाकिस्तानी फिल्म नव्हती कि ज्यात मेहदीनी गायलेल गाण नाहीये.
गेले काही दिवस मेहदी च्या "ज़िन्दगी में तो सभी प्यार किया करते हैं" ची मी परत एकदा पारायणं करतेय. त्याच्या इतर कुठल्याही गज़लेसारखीच ही सुद्धा एक अप्रतिम गज़ल. ही गज़ल ७० च्या दशकात आलेल्या 'अज़्मत' नावाच्या पाकिस्तानी फिल्म मध्ये हि होती. या गज़लेत एक कडव आहे

"तू मिला है तो ये एहसास हुआ है मुझको
ये मेरी उम्र मोहब्बत के लिए थोड़ी है
इक ज़रा सा गम-ए-दौरा का भी हक है जिसपर
मैंने वो सांस भी तेरे लिए रख छोड़ी है
मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा…"

काय हि भावना! किती उत्कट!! कशावरही, कुणावरही प्रेम करायला हे आयुष्य खरच पुरेसं नाहीये. आयुष्यातली अपार दुःख सोसून झाल्यावर शेवटच्या क्षणीसुद्धा, शेवटचा श्वासही आपल्या सर्वात प्रिय असणाऱ्या गोष्टीसाठी राखून ठेवावा.
आणि मृत्यू झाल्यावरही तिचीच आस बाळगावी.'मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा' … मेहदीच गज़लेवर असच तर प्रेम होतं की!
त्या सीमेपलीकडच्या सुरांच्या सम्राटाला मी रोज भेटायला जाते कोणत्याही आडकाठी शिवाय! नाहीतरी गुलज़ार म्हणालाच आहे की …

आँखों को वीसा नहीं लगता,
सपनो की सरहद नहीं होती
बंद आँखों से रोज़ मैं
सरहद पार चला जाता हूँ
मिलने "मेहदी हसन से"

जितकी मेहदी ला गज़ल प्रिय होती तितका मला मेहदी प्रिय आहे आणि म्हणूनच मी मेहदी ला म्हणेन...

"इक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझको रुलाने के लिए आ…"

~अवंती

(हे खरंतर लहानपणी, 2012 मध्ये लिहीलेलं आहे. काल मेहदी हसनच्या आठवणीत इथं डकवायचं होतं ते जरा उशीरानी डकवतेय)

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला. पण अजुन फुलवला असता तर असे वाटून गेले.
____

कुनवां म्हणजे सामीप्य, इन्टिमसी का?
शोधून सापडत नाही.
____

इक ज़रा सा गम-ए-दौरा का भी हक है जिसपर
मैंने वो सांस भी तेरे लिए रख छोड़ी है

खूपच छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0