मी आणि माझी चित्रकला - हौशी चित्रकारांसाठीचा धागा

लहानपणी माझी चित्रकला चांगली होती ह्याला प्राथमिक शाळेतले निकालपत्र ह्याशिवाय दुसरा पुरावा नाही. माध्यमिक शाळेतला चित्रकलेचा तास हा केवळ ह्याच कारणासाठी आठवतो कि एक तर तो सलग दोन तास असत असे आणि दुसरे म्हणजे इतर तासांच्या तुलने निवांत असे, म्हणजे हे दोन तास चित्रकले व्यतिरिक्त काहीही केलं तरी चालत असे.

माझ्या आईची चित्रकला खूप चांगली ( म्हणजे फक्त माझ्यापेक्षा चांगली असं नाही तर बहुतांश लोकांपेक्षा चांगली (स्माईल) ) तिने काढलेली जलरंग आणि पेन्सिलशेडींग ची चित्रं हा वेगळ्या धाग्याचा विषय होवू शकेल. त्यामुळे आणि मला एकंदर कलाकुसर आणि रंगसंगतीची जाण आहे असं तिला वाटल्यामुळे तिने मला एक-दोनदा चित्रकलेच्या ईलिमेण्टरि , वगैरे परीक्षांना बसण्याबद्दल सुचवले होते. पण मला माझी चित्रकलेतली एकंदर गती (?) माहिती असल्याने , मी त्याऐवजी इंग्रजी आणि हिंदीच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठांच्या परीक्षा देणं प्रेफर केलं !! चित्रकलेच्या पेपर मध्ये मी चित्रांपेक्षा कल्पकतेवर जास्ती भर देत असे . उदाहरणार्थ माझा आवडता प्राणी असा विषय असेल तर कुत्रा काढण्याची हिम्मत नसल्याने ( किंवा काढला तरी तो कुत्रा आहे हे परीक्षकांना कळेल ह्याची खात्री नसल्याने) मी मासा किंवा हत्ती असा काढायला ( आणि ओळखायला ) सोप्पा प्राणी काढत असे . अर्थात पेपर चित्रकलेचा असल्याने कल्पकतेला मार्क नव्हते . शाळेत चित्रकला आणि शारीरिक शिक्षण ह्या विषयांमुळे माझी टक्केवारी खाली जायची . असो.

कोल्हापुरात आईचा चित्रकार मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप होता , ते लोकेशनवर जाऊन जलरंग चित्रकला करत. आईची चित्र किंवा एकंदरीतच चित्र आवडत असली तरी आपण पण चित्र काढावीत असं कधी वाटलंच नाही . आणि ह्या बाबतीत मी बाबांवर गेलीये असं समजून आईनेही कधी माझ्यावर चित्रकला फोर्स केली नाही .

मधल्या काळात इथे लिहिण्यासारखं विशेष काही झालं नाही.

लग्नानंतर पहिल्यांदाच आई-बाबा माझ्याकडे एक दीड महिन्यासाठी आले होते. कॅलिफोर्नियातला हिवाळाही त्यांना थंड वाटत होता . शिवाय संध्याकाळी ४ वाजता अंधार होत असल्याने बाहेर फिरण्यावर अजूनच मर्यादा.
मग एक दिवस मी आईला घेवून michaels मध्ये गेले आणि रंग, कुंचले आणि मुख्य म्हणजे कॅनवास विकत आणले.
भारतात आईची नेहमी एक तक्रार असायची कि निवांत चित्र काढायला सलग असा वेळच मिळत नाही . "जरा चित्र सुरु केलं कि बेल तरी वाजते किंवा बाबांना तेव्हाच काहीतरी विचारायचं/ सांगायचं असतं किंवा कोणाचा फोनच तरी येतो! सुट्टी असली तरी माझा असा वेळच नसतो . " ( अवतरणचिन्हातली वाक्यं आईची . स्पेसिफिकली, बरेच दिवस नवीन चित्र नाही का काढलस ह्या प्रश्नाचं उत्तर).

तर मी तिला सांगितलं, इथे तुला कोणी डिस्टर्ब करणारं नाही तू निवांत चित्र काढत आणि रंगवत बस . त्या स्टे मध्ये तिने काढलेली, रंगवलेली चित्र आणि इतरही वस्तू हा परत वेगळ्या धाग्याचा विषय होईल . पण मग परत जाताना तिच्याकडे फारशी जागा नसतानाही मी उरलेले रंग आणि कॅनवास तिला न्यायला लावले . मी कधी जन्मात चित्र काढणार नाही आणि ते रंग उगीचच वाळून जातील त्यापेक्षा आईने नेलेले बरे असा माझा विचार होता.

नंतर एका ऑक्टोबरमध्ये मला एका रीट्रीटला जावं लागलं. तिथे एका activity मध्ये आम्हाला एक ८बाय १२ चा कॅनवास आणि रंग साहित्य देवून सांगितलं कि तुमच्या संशोधना बद्दल सांगणारं चित्र काढा ( represent your research through art) . माझ्या प्रोफेसरनि सोयीस्करपणे ते रंग आणि कॅनवास माझ्याकडे सरकवून दिले आणि मग मी पण सरसावून चित्र काढलं. ते हे :

1

हे चित्रकलेच्या दृष्टीने काही फार भारी चित्र नसलं तरी माझ्या डोक्यात जसं होतं तसं उतरलं म्हणून मला खूप आवडलं . अजून एक गोष्ट ह्या चित्रामुळे झाली ती म्हणजे आपल्याला चित्र काढायला आवडतं असा एक शोध माझा मलाच लागला !!

आमच्या गावात वाईन आणि रंग असे क्लासेस चालू असतात . दोन किंवा तीन तासात वाईन पीत पीत चित्र काढायचं आणि प्रशिक्षक , रंग, कॅनवास आणि वाईन हे सगळं ते क्लासवाले पुरवतात. काही दिवसांपूर्वी जोडप्यांनी अशा क्लासला जाण्याचं फॅड आलेलं मला माहिती होतं.

मग seattle हून परत आल्यावर मी नवर्याच्या मागे लागले की आपण अशा क्लासमध्ये चित्र काढायला जाऊ. त्याला आत्तापर्यंत माहिती झालय कि मला असं अचानक काहीतरी हॉबी निर्माण होते आणि काही वेळाने ती अदृश्य पण होते . त्यामुळे तोही "हो जाऊ. कुठे जायचं , तू बघ ऑन -लाईन." म्हणून मी कितपत खोल पाण्यात आहे ते बघत होता . (कारण जनरली मला हे ऑन -लाईन शोधणं , बुक करणं वगैरे खूप जीवावर येतं आणि मी ते टाळत असते .) तर माझ्यावर पेंटिंगचा अंमल असल्याने मी येल्पवर रिव्यू बघून चांगला क्लास शोधला मग ग्रुपऑन वर त्या क्लासच कुपोनसुद्धा शोधलं. पण एवढं करून झालं असं कि त्या क्लासच्या कॅलेंडर मध्ये त्या महिन्यात असलेलं एकही चित्र आम्हाला पसंद पडेना . शिवाय दोघांनी एकच चित्र करून परत एकाच घरात दोन एकसारखी चित्रं नको असं पण वाटायला लागलं. मला तर चित्र काढायचंच होतं.
त्यावर उपाय म्हणून आम्ही घरीच वाईन आणि रंग करायचं ठरवलं. कशाप्रकारचं चित्र काढायचं ते आधीच ठरवलं. मग रंग-कुंचले , कॅनवास ( आणि मुख्य म्हणजे वाईन (जीभ दाखवत) ) आणून घरीच चित्रं काढलं. हा आमचा वीकेंड चा उद्योग. दोन कॅनवास मी आणि दोन नवर्यानी केलेत :

2

हे झालं ऑक्टोबर मध्ये. नंतर नेहमीप्रमाणे आणि as expected माझी चित्र काढायची लहर गेली . नाही म्हणायला मधल्या सुट्टीत किंवा दोन तासांच्या मधल्या वेळात काही चित्र / रेखाटन माझ्या फाईल मध्ये आकाराला येत होती.. पण एकंदरीत चित्रकलेची पॉवर गेल्यासारखं झालेलं.

मग मागच्या वर्षी मस्त कलंदर ह्यांनी मधुबनी चित्रकलेची ओळख करून दिली. प्रिंट काढायच्या कागदावर एक-दोन रेखाटनं काढून बघितल्यावर परत माझी चित्रकलेची पॉवर आली आणि मग ६बाय ८ च्या छोट्या कॅनवास च्या टाइल्सवर मी तीन मधुबनी चित्रं काढली :

31

32

33

मग दोन कॅनवास उरले आणि मधुबनी करण्याइतकी चिकाटी नसल्याने सोप्पी चित्र करू म्हणून मग हा गणपती आणि विठोबा. ह्या चित्रात केवळ रंग-काम मी केलं . गणपती आणि विठोबाचा आकार पेन्सिलने नवर्याने काढून दिला.

4

5

आणि मग हे असच टीव्ही बघत बघत एकीकडे केलं.

6

झालं . आत्ता एवढंच . मागच्या वर्षी खूप सारी झेनटँगल प्रकारची चित्रं काढली , त्यांचे फोटो प्रतिसादातून देईन.
पण त्याआधी बाकीच्या हौशी आणि इतरही चित्रकारांनी आपापले चित्रकलेचे अनुभव आणि चित्रं टाकायला सुरूवात करावी ही विनंती.

4
Your rating: None Average: 4 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

Pune to pay tribute to

Pune to pay tribute to Vincent Van Gogh

Pune, 26 July: Paying a tribute to the popular post-impressionist painter, Vincent Van Gogh on his 126th death anniversary, Dream a Painting, a unique art studio and digital art e-commerce website is organising a unique exhibition. Based on the life of this great Dutch painter, the exhibition titled as ‘Vincent Van Gogh – the genius’ will be free and open to all from July 29th to July 31st between morning 10:30am & evening 8:00pm at The Ravi Paranjape Art Gallery, near Model Colony Post Office, Shivaji Nagar.

The exhibition will be inaugurated on Friday, 29th July at 5:45pm by Sunil Vanarase, Head of Pune IT Park where Ravi Paranjape, a very senior and acclaimed Indian artist will also pay his tribute by taking the art lovers through an Art-Walk between 6:00pm and 7:00pm. Addition to this, Dream A Painting will also host few interesting programs which will be based on the paintings and life of Van Gogh.

On 30th July between 6.30pm to 7.30pm Ravi Paranjape will deliver an Art-Talk on Van Gogh’s most famous and critically acclaimed painting ‘Starry Night’.

On the last day that is 31st July between 6.30pm to 7.30pm there would be a screening of a documentary on the life of Vincent Van Gogh produced by BBC and Australian Network Television.

This exhibition will not only be an interesting & entertaining affair but will also educate the art lovers of Pune about the legend and his immense talent.

Registration is necessary for the Art-Talk & Documentary Screening. Interested art lovers can register themselves on the spot at the venue or can visit on www.dreamapainting.com ordreamapainting@gmail.com for online registration.

मैं तो पिया से नैना लगा आयी रे..

Documentary screening साठी

Documentary screening साठी प्रत्येकी 200rs ticket आहे.

मैं तो पिया से नैना लगा आयी रे..

अशा गोष्टीसाठी तरी माणसाने

अशा गोष्टीसाठी तरी माणसाने मोठ्या गावात राहावे. Sad
मस्त.

म्हणजे वॅन गॉ ची ओरिजिनल

म्हणजे वॅन गॉ ची ओरिजिनल चित्रं आणणार आहेत??? लयच भारी.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

ओरिजिनल नाय ओ.. ओरिजिनल सारखं

ओरिजिनल नाय ओ.. ओरिजिनल सारखं दिसतं. प्रिंटिंगची टेक्निक वेगळी असते बहुतेक. रंग, स्ट्रोक्स हुबेहुब दिसतात. ओरिजिनल शक्य तरी आहे का आणणं?

मैं तो पिया से नैना लगा आयी रे..

अगदी जवळ जाऊन बघितल्याशिवाय

अगदी जवळ जाऊन बघितल्याशिवाय पेंटिंग आणि प्रिंटिंग यातला फरक कळणार नाही असे इको सॉलव्हन्ट प्रिंटर आहेत. डायरेत्त कॅनव्हास वर प्रिंट होते. कित्येक आर्टिस्ट आजकाल आमच्याकडून कॅनव्हासवर लाईट कलरामध्ये कंप्युटराईज्ड इमेज प्रिंट करून घेतात, नंतर त्यावर अकरेलीक थापतात. बरेच इंटेरिअर डेकोरेटर अशा इमेज रिप्रिन्ट करून खपवतात.

कित्येक आर्टिस्ट आजकाल

कित्येक आर्टिस्ट आजकाल आमच्याकडून कॅनव्हासवर लाईट कलरामध्ये कंप्युटराईज्ड इमेज प्रिंट करून घेतात, नंतर त्यावर अकरेलीक थापतात.

काय गरिबी आहे!

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

+1.. गरिबी

+1.. गरिबी

मैं तो पिया से नैना लगा आयी रे..

चित्रकलेसाठी थोक मधे सामान

चित्रकलेसाठी थोक मधे सामान घ्यायचं असेल तर पुण्यात स्वस्तात कुठे मिळेल? मला acrylic colours, ब्रश, drawing sheets, स्केचबुक, पॅलेट असं बरंच सामान घ्यायचं आहे. रंगांच्या मोठ्या (१२०ml) ट्युब्स हव्यात.

मैं तो पिया से नैना लगा आयी रे..

रविवार पेठेत.

रविवार पेठेत.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

रविवार पेठेत नेमकं कुठलं

रविवार पेठेत नेमकं कुठलं दुकान? मला फक्त पुरोहित स्वीट्सचं दुकान आणि ती गल्ली माहित आहे Sad

मैं तो पिया से नैना लगा आयी रे..

गेल्या भारतवारीत मी रवीवार

गेल्या भारतवारीत मी रवीवार पेठेत जाऊन आलेले. मस्त वाटलं होतं. ती ट्रीप विसरताच येत नाही.

सगळ्यांची चित्रे आवडली. सुंदर

सगळ्यांची चित्रे आवडली. सुंदर काढली आहेत. मीही नुकतीच चित्रे काढायला सुरुवात केलीये. acrylic रंग वापरुन केलेले हे bookmarks.

मैं तो पिया से नैना लगा आयी रे..

मला उजवीकडचा अधिक आवडला.

मला उजवीकडचा अधिक आवडला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला ढग म्हणजे बुढ्ढीके बाल

मला ढग म्हणजे बुढ्ढीके बाल किंवा आईस क्रीम सारखे डिलिशिअस (या शब्दाची सर स्वादिष्ट ला नाही) वाटले.

शुचि आणि आदिती, खूप खूप

शुचि आणि आदिती, खूप खूप धन्यवाद. Innocent

मैं तो पिया से नैना लगा आयी रे..

वा! फारच सुंदर. तो चिटुकला

वा! फारच सुंदर. तो चिटुकला पक्षी, ढग, डहाळ्या सर्वच किती गोड आहे.

सुरेख

सुरेख! सगळीच चित्र आवडली.

+१

असंच म्हणतो. टॅलेंटवाली लोकं आहेत ऐसीवर!

ऐसीची बदनामी थांबवा

ऐसीची बदनामी थांबवा (लोळून हसत)

आं?

यात बदनामी काय आहे?

(अतिअज्ञानी) बॅटमॅन.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

अरे विनोद होता तो. कॉफी जास्त

अरे विनोद होता तो. कॉफी जास्त झाल्याने केलेला विनोद.

बरोबर

विनोद होता तो.

बरोबर. समजवावा लागेस्तोवर तो प्रतिसाद विनोदीच होता.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(No subject)

(स्माईल)

साखर जास्त झाली असती तर

साखर जास्त झाली असती तर अक्षय्य झाला असता. (डोळा मारत)

खी खी खी.

खी खी खी. (डोळा मारत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

सर्वच

सर्वच चित्रे आवडली. फक्त स्दद्फ्सफ्स्दफ्... या आय.डी. ने एक क्षण भांबावलो. पण नंतर लगेचच लक्षांत आले.

कुकरची मोठी शिट्टी येण्याआगोदर जे आवाज येतात तसं वाटलं.

पूर्वी एक, 'श्याम तेरे कितने नाम' नांवाचा चित्रपट आला होता, त्याची आठवण झाली.

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

(No subject)

(लोळून हसत) (लोळून हसत)

धन्यवाद ! :)

सर्वाना एकत्रित धन्यवाद !

-सिद्धि

मासा फार आवडला.

मासा फार आवडला.
___
गणेश व विठुराया तर फारच आवडले.

सर्वच चित्रे आवडली. झेनटँगल

सर्वच चित्रे आवडली. झेनटँगल प्रकारची चित्रं बघायची आहेत, लवकर टाका.

अनाहूत सुखाचे अनाहत नाद..

सर्वच चित्र भारी आली आहेत

सर्वच चित्र भारी आली आहेत लेखातली आणि प्रतिसादांतली.बुद्धी आणि कर्तबगारीवरचं संशोधन दिसतंय.त्याची दोरी हातातच आहे.खरंतर लखोटा/ बटवा उघडण्याच्या दोय्रा आहेत. फणस कापणारा मल्लु आणि पार्किंगमधली होडीसगद्धा आवडली.गणपती, विठोबावगैरे देवता आल्या चित्रात की भाविकपणा डोकं वर काढतो आणि चित्रकारीबद्दल बोलता येत नाही.पारिजातकही मस्त फुलं उधळतोय.

सिद्धी, मला तुझ्या

सिद्धी, मला तुझ्या संशोधनाबद्दल काढलेलं चित्र आवडलं. खरंतर, ते चित्र बघून तू नक्की कोणत्या विषयावत संशोधन करतेस ह्याबद्दल कुतूहलही वाढलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

न्यूरल सिग्नल प्रोसेसिंग

न्यूरल सिग्नल प्रोसेसिंग मध्ये काम करते. ते चित्र काढलं तेव्हा कॉर्टिकल सिग्नल्स वरून बोटांची / तळहाताची हालचाल प्रेडिक्ट करण्याचं काम करत होते. म्हणून मेंदू आणि हात ... तिथे असणाऱ्या एका पिटुकल्या मुलीचा हात ट्रेस केलाय . ते पांढऱ्या दोऱ्या दिसतायत ते सिग्नल्स आहेत .. माझ्या नवशिकेपणामुळे जरा बोथट झाले (दात काढत)
आणि मल्टी- डायमेन्शनल सिग्नल्स असल्याने टेन्सर काढलाय बाजूला ..

-सिद्धि

दोऱ्यांचे पाय.

तू ज्याला पांढऱ्या दोऱ्या म्हणत्येस ते मला बहुदा पाय वाटले. पण त्यामुळे तू काय सांगणारं चित्र काढलंस ह्याच्या अर्थात फार फरक पडला असं वाटत नाही. टेन्सर हा मला रुबिक्स क्यूब वाटला. मी अर्थ लावला तो साधारण मेंदूत हाता-पायांच्या बोटांच्या हालचालींनी संदेशवहन कसं होत असेल ह्याचं सिम्युलेशन अशा छापाचा. रुबिक्स क्यूब सोडवताना हात कसे हालतील ह्याचा अभ्यास करत असशील म्हणून तो चितारला.

ढोबळमानाने फार निराळा अर्थ लावला नाही तर.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्वा

एकापेक्षा एक मस्त चित्रं! (अ‍ाणि नबांचे प्रतिसाद.)

आणी हे जरा इलस्ट्रेटिव्ह

आणी हे जरा इलस्ट्रेटिव्ह टाइपचे. पोस्टर कलरमध्ये केलेले. साइज १८ बाय १२.
g

जबर्दस्त आहे एक्दम. मस्तच.

जबर्दस्त आहे एक्दम. मस्तच.

गणपती, मिरवणुकीतले लोकं ,

गणपती, मिरवणुकीतले लोकं , पताका , सूर्य सगळंच भारी. हे कसं काढलं ? म्हणजे आधी रेखाटन करून मग रंग दिले की आधी केवळ आउटलाईन करून मग रंग दिले आणि मग बारीक कलाकुसर वरून केली ?
अजून एक प्रश्न - बारीक नक्षीकाम ब्रशने केलं की मार्कर ने ?

परत एकदा मोठं करून बघितलं चित्रं .. रंगसंगतीमुळे गणपतीचं देवत्व आणि बाकीच्यांचं सामान्यत्व जास्ती जाणवतंय ! मस्त .

-सिद्धि

एका जाहिरातीसाठी केलेले

एका जाहिरातीसाठी केलेले इल्सट्रेशन असल्याने आधी वेगवेगले कॉम्पोझिशन्स करून पाहिले. एक ए
रफ फायनल झाले तेव्हा पेन्सिलने आऊटलाईन्स काढून प्लेन कलर्स भरले. गणपतीला मास्क केले. नंतर त्याचे कलर भरले. परत मास्क करून ब्लॅक चे काम सर्वात शेवटी. सर्व काम ब्रशने. मार्कर्स नाही. टोटल वेळ: 6 तास.

अप्रतीम! अतिसुंदर!

अप्रतीम! अतिसुंदर!

अग्निमकरांची सम्राज्ञी

सुंदर

सावकार गणपती दिसतोय (स्माईल)

मला मंडईचा वाटला

मला मंडईचा वाटला

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मंडईचा ह्म्म्म ... पण

मंडईचा ह्म्म्म ... पण पायापाशी सिद्धी (सिद्धीगणपतीतील सिद्धी) दाखविल्याशिवाय शिवाय तो अपूर्ण आहे. मंडईचा म्हटले की दोघे येतात डोळ्यासमोर.

.
.
वेडी झाले
http://www.hindustantimes.com/rf/image_size_800x600/HT/p2/2015/09/26/Pictures/sabudana-sabudana-mohankumar-september-gangurde-thousand-rangoli_e678d6fa-646a-11e5-b95f-5445df9fcc89.JPG

जबरदस्त!

जबरदस्त!

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

फारच भारी आहे, काय डीटेलिंग

फारच भारी आहे, काय डीटेलिंग आहे. ग्रेट

गणपती एक नंबर आहे अभिजित ..

गणपती एक नंबर आहे अभिजित ..

detailing साठी खूप patience

detailing साठी खूप patience लागतो . भारी अभिजित .

+१११११११११११११११११११११११

लैच.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

कार्टून्स

हे मी काढलेले व्यंगचित्र. 'व्हेज खाटीक'. (डोळा मारत)
हातानेच काढतो कागदावर, रंग मात्र फोटोशॉपमध्ये भरतो.
bua

मस्त. तुमच्या हाताला वळण आणि

मस्त. तुमच्या हाताला वळण आणि वजन छान आहे. हे चित्र कागदावर आधी काढून स्कॅन केल्यासारखं वाटत नाही. सरळ कॉंप्युटरवरच काढल्यासारखं वाटतं. त्यामुळे आणखीच कौतुक वाटलं. काही स्केचपॅड-पेन वगैरे यंत्रं वापरली का?

स्केच पॅड वगैरे वापरलेत पण

स्केच पॅड वगैरे वापरलेत पण कॅलिग्राफी साठी. चित्रे पेन नाहीतर ब्रशनेच काढतो आणि स्कॅन करतो.

क्या बात है सर. फेसबुकवर

क्या बात है सर.

फेसबुकवर तुमची रीसेंट कलाकृती पाहिली. कधीतरी येक छोटेसे फटूशॉपिंग कन्त्राट देईन म्हणतो मीही. (डोळा मारत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हेहेहेहेहे. कालचे

हेहेहेहेहे.
कालचे गिरिजास्वामी पाहिलेत वाट्टं? (डोळा मारत)
कधीही द्या असाइनमेंट सुपारी. वाजवू

येस्सार पक्का!

येस्सार पक्का!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मस्त चित्र आहेत सिद्धी

मस्त चित्र आहेत सिद्धी

सिद्धी ,चित्र खूप छान आहेत

सिद्धी ,चित्र खूप छान आहेत .. मला ते झाडाचं चित्र खूप आवडलं .

हा माझा प्रयत्न

t

धन्यवाद सखी .. मस्तंय हे पण

धन्यवाद सखी .. मस्तंय हे पण चित्रं . माध्यम काय आहे?

-सिद्धि

स्टॅडलर च्या पेंसिल्स आहेत

स्टॅडलर च्या पेंसिल्स आहेत आणि नंतर काही ठिकाणी ओला ब्रश फिरवला आहे .त्यामुळे वॉटर color एफ्फेक्ट आला आहे .

राइट, हे परफेक्त आहे ल्युना

राइट, हे परफेक्त आहे ल्युना पेन्सिलने तंत्र. चित्र पण भारीच

धन्यवाद अभ्या ,शुचि आणि

धन्यवाद अभ्या ,शुचि आणि सिद्धी

सुंदर.

सुंदर.

माझे आजोबा उत्तम चित्रं

माझे आजोबा उत्तम चित्रं काढायचे. वेळ, जागा, माध्यम वगैरेची फिकीर न करता on the fly स्केचेस करायचे. अकौंटंट झालो नसतो तर पोलीस चित्रकार झालो असतो असं ते नेहेमी म्हणायचे. त्यांच्या तालमीत तयार झालेली पोरंही (काका, आत्या, बाबा) छान चित्रं काढतात. त्यांनी 'देऊ' केलेल्या गोष्टींपैकी ही कला मात्र माझ्या अंगावरून वाहून गेली.

शाळेतही फार टिपिकल पद्धतीने चित्रकला शिकवली. त्या म्याडम आणि त्यांचा शिष्यगण अतिशय घिपि चित्र काढायचा. प्रयोग वगैरे केला की म्याडम डोले वटारून बघायच्या. वर्गात एकाने झाडाच्या चित्रात शाळेत मुबलक असलेल्या निलगिरीच्या झाडाची सालं खोडाच्या जागी चिकटवली. म्याडमला पटंना. हळूहळू ते डब्बल तास बंक करून 'ऑक्टोबर ओव्हर' वगैरे रोमहर्षक खेळ खेळायला लागलो, आणि स्वतःपुरता स्वतंत्र झालो. (डोळा मारत)

दोनेक वर्षांपूर्वी चित्र काढायची सणक कुठूनशी आली. रंगात खेळायला लय मजा येते असा शोध लागला.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

ह्म्म्म्म हेरिडिटरी दिसतय.

ह्म्म्म्म हेरिडिटरी दिसतय. माझी ज्योतिषाची आवडही तशीच आहे. आईच्या बाबांकडुन आलेली.

(No subject)

X

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

भारी !!! जलरंग माध्यम सर्वात

भारी !!! जलरंग माध्यम सर्वात अवघड वाटतं मला . रंग कमी आणि पाणीच जास्त वापरून शेड्स करतात म्हणे. चित्रात पाणी आणि पाण्यातली हलती सावली मस्त जमलीये .

-सिद्धि

@आबा

चंदर-सु

!

छान काढता हो चित्र!

(आणि तुम्हाला परवानगी लागते?)

...फक्त एकच शंका

नाही, खुसपट काढण्याचा इरादा नाही. आधी म्हटल्याप्रमाणे, चित्र छान आहे, रंगसंगती नयनाल्हाददायक आहे, चित्र एकंदरीत आकर्षक आहे, आणि मुख्य म्हणजे, आतापावेतो या धाग्यावर डकविलेल्या चित्रांपैकी हे एकमेव चित्र मला - मला! - समजले. आणि म्हणूनच अपील झाले. पण म्हणूनच शंकादेखील आली.

बोले तो, चित्रातील होडी. पात्राच्या मध्याच्या बर्‍यापैकी जवळ खुंटाळ्याला बांधलेली दिसते. मात्र, होडीत (किंवा जवळपाससुद्धा) कोणीही नाही. नाही म्हणजे, माझी काहीच हरकत नाही; हा सर्वस्वी त्या होडीच्या चालकाचा नि मालकाचा प्रश्न आहे. चालकाला समजा वाटले, की संध्याकाळी घरी परतण्यापूर्वी होडी नदीच्या मध्यावर पार्क करावी, तर (जोवर मालक हरकत घेत नाही तोवर) ती त्याची मर्जी. (आणि चालकच जर मालक असेल, तर मालकाच्या हरकतीचा प्रश्नच मिटला.) शेवटी लोकशाही आहे. तेव्हा तो प्रश्न नाही.

प्रश्न एवढाच आहे, की होडी पार्क केल्यानंतर तेथून तो घरी कसा जात असेल? दुसर्‍या एखाद्या होडीवाल्याकडून लिफ्ट मागत असेल, की पोहून जात असेल? नि परत दुसर्‍या दिवशी काय? परत कोणी लिफ्ट देतेय काय म्हणून वाट पाहायची, की होडीपर्यंत पुन्हा पोहत जाऊन ओलेचिंब होऊन निथळत्या कपड्यांनिशी होडीत शिरायचे? नाही म्हणजे, होडीपासून/पर्यंत चालत जायला नदीचे पाणी लकडीपुलाखालून वाहणार्‍या ('पूर' न आलेल्या) मुठेइतके उथळ असेलसे वाटत नाही, बर्‍यापैकी खोल वाटते, म्हणून हे कुतूहल, इतकेच. असो.

----------

किमानपक्षी, अशी निदान माझी तरी समजूत आहे. (चूभूद्याघ्या.)

बाकीची सामान्यतः आपल्या नजरेच्या गाळण्यातून ऑपॉप फिल्टर होतात. आणि तशी ती यावेळीसुद्धा झाली!

ओहोटी?

आबा, चित्र आवडलं.

ओहोटीच्या वेळेस नाव बांधून नावाडी कुठेतरी गेली असेल. नबांचे प्रश्न बघून मला एका प्रदर्शनात आलेला भयभीषण अनुभव आठवला. आमच्याकडे भारतातून पाहुणे आले होते. त्यांच्यातल्या स्त्रियांना कलेची हौस आहे म्हणून ह्यूस्टनच्या चित्रसंग्रहालयात घेऊन गेलो. तेव्हा तिथे जॉन सिंगर सार्जंटच्या चित्रांचं प्रदर्शन आलं होतं. मला त्याची खाणीत काढलेली जलरंगांतली चित्रं बघण्याची विशेष हौस होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीला थोडी तैलरंगांतली चित्रं होती, इटलीमधल्या कोणत्याशा बागेत काढलेली. एक पाहुणी आणि मी शेजारी शेजारी उभ्या राहून ही तैलरंगांतली चित्रं बघत होतो. मी ती चित्रं पाहताना इटलीतल्या वसंत ऋतूची कल्पना करून बघत होते. अचानक प्रश्न आला -

कला-हौशी पाहुणी - ही चित्रं इथे कशी आणतात?
मी - क्रेटमध्ये घालून आणत असतील.
कहौपा - ती इथे आणायचं कोण ठरवतं?
मी - ह्या संस्थेचे प्रमुख ठरवत असतील.
कहौपा - ह्या चित्रांच्या फ्रेम्स खूप महाग वाटतात. त्याचा खर्च कोण करत असेल?
मी - रात्री हॉटेलात पोहोचल्यावर गूगल करून पाहा.
कहौपा - आम्ही जहांगीरमध्ये एक प्रदर्शन बघायला गेलो होतो. तिथल्या चित्रांच्या फ्रेम्सचा खर्च खूप होतो म्हणून मला माझ्या चित्रांचं काय करायचं ...
मी - आपण रात्री हॉटेलात पोहोचल्यावर ह्या विषयाबद्दल बोलायचं का?

सुदैवाने ह्या कलाहौशी पाहुणीने माझ्या शेजारी उभं राहूनच चित्रं बघायचा हट्ट ह्या वाक्यानंतर सोडून दिला. मी सुखेनैव इटलीतला वसंत ऋतू आणि तेव्हाच्या खाणकामगारांचं आयुष्य ह्यांचा त्या चित्रांसोबत विचार करू शकले. असो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.