कलेतील कर्मठपणा

(अस्ताद नावाचे वस्ताद या धाग्यावरच्या प्रतिसादांमधून चर्चा 'कलेतील कर्मठपणा' या विषयाकडे वळलेली दिसली. महत्त्वाचा व रोचक विषय असल्याने ती चर्चा वेगळी काढलेली आहे. चर्चेची सुरूवात नृत्यावरून झालेली असली तरी नव्याजुन्याची सांगड इतरही कलाप्रकारांमध्ये कमीजास्त दिसते का? त्या विशिष्ट प्रकाराला ती स्थिती पोषक/मारक आहे का? अशी चर्चा अपेक्षित आहे - ऐसीअक्षरे)

नवीन विषयाला हात घातल्याबद्द्ल आणि ऐसीअक्षरेच्या वाचकांना देबूजींची ओळख करून दिल्याबद्द्ल घन्यवाद!

समकालिन असणे ही फ़ॅशन नव्हती त्या काळात परंपरागत नृत्य प्रकारांना अस्ताद देबुंनी वाकवुन समकालिन नृत्य प्रकाराची बीजे रोवली. समकालिनपण येण्यामागे कलात्म कारणे असतात तेवढीच पारंपारिकतेतील ’पंडित’पणाची बंदिस्त चौकट कारणीभुत असते. धर्माची आणि त्या काळाला आणि कलाकाराला जवळची न वाटणारी कारणे असु शकतात. काळानुसार समाज बदलला तशी मानवी नात्यातले संबध पण बदलले. रामायण आणि महाभारतातल्या गोष्टींचा पुनर्शोध घेण्याची गरज त्यातुन निर्माण झाली.

हा परिच्छेद विशेष आवडला.

अस्ताद देबुंसारखा समकालीन कलाकार परंपरागत शैलीत आणि रुपात चालत आलेल्या नृत्य प्रकारांना ’समकालीन’ असण्या मागचा मुलस्त्रोत मानतात. याचा अर्थ, समकालीन असणे म्हंजे पारंपारिक नसणे नव्हे. पारंपारिकपणाचा, त्यातल्या दयान व्यवस्थांचे नीट आकलन करुन त्याकडे चिकीत्सक नजरेने पाहाणे यामधे समकालीन असण्याचे बल सामावलेले असते.

हे किती खरे आहे!

या लेखाच्या प्रतिक्रियांमधे अजूनही राधा-कृष्णांच्या पलिकडले प्रयोग होत नाहीत असे म्हटले आहे ते मात्र पटत नाही.
मुळात नवीन करण्याच्या ध्यासात जुने सगळे 'जुनाट' आहे हे मला पटत नाही. नव्या प्रयोगाकरता जुन्यावर wipe and erase ची कुर्‍हाड चालवणे गरजेचे आहे असे वाटत नाही.
शिवाय, एकाच कवीतेचा तीन वेगवेगळ्या कवींनी केलेला अनुवाद वाचताना ज्या प्रकारे प्रत्येक कवीचे स्वतंत्र भावविश्व त्यात डोकावते, तसेच वेगवेगळ्या नर्तकांनी सादर केलेल्या पारंपारीक रचनांच्या(उदा. घिसीपिटी(?) माखनचोरी अथवा कालियामर्दन) अभिव्यक्तींमधे फरक पडतो. यात गोष्ट माहितीच असते, पण ती कशी सांगितली आहे हे महत्त्वाचे ठरते, म्हणूनच कलाकाराचे कसब पणाला लागते. त्याशिवाय, माझ्या माहितीप्रमाणे अनेक कलाकार राधा-कृष्णाच्या पलिकडचे प्रयोग करत आहेत. बनारस घराण्याचे कथक नर्तक पं. गोपीकृष्णजी हे भरतनाट्यम आणि कथक दोन्ही नृत्यप्रकार जाणत होते, तद्नुसार त्यांची स्व्तःची नृत्यशैली विकास पावली(अगदी प्राथमिक तोड्यांमधले फुट्वर्कमधले बदल असोत, किंवा डाव्या आणि उजव्या अंगांचा विचार(विशेषतः चक्री घेताना) असो). त्यांच्या अनेक शिष्या(रेखा नाड्गौडा, मनिषा साठे) आणि त्यांची मुलगी शंपा, राधा कृष्णापलिकडचे प्रयोग करत आहेत. अनेक विदेशात स्थायीक झालेले कथक नर्तकही(सोनिया साब्री, पं. चित्तेश दास) असे प्रयोग करत आहेत. पं. चित्तेश दास यांच्या उपज या डोक्युमेंटरीची झलक इथे बघता येईल.

आजच्या जमान्यात वेणी-फणी करुन प्रियकराची वाट बघणारी विरहोत्कंठिता नायिका करताना त्याच्याशी रिलेट करता यायचंच नाही, फार हसू यायचं, होपलेस वाटायचं.

या पार्श्वभुमीवर २ वर्षांपूर्वी मनिषा साठे यांच्या शिष्येने अधुनिक तरुणी(मोबाईल फोन्, लॅपटॉप या अधुनिक उपरकरणांनी सुसज्जीत) रंगवली होती, त्याची आठवण झाली.

हे नवे प्रयोग आपल्याला 'दिसत' नसतील, तर दोष आपल्या दृष्टीचा आहे.

काळाप्रमाणे नव्या-जुन्याचा मनोहारी संगम व्हायलाच हवा आणि तो होतोच. मुळात भारतीय शास्त्रीय नृत्याचे तरी आपण बघतो आहोत हे मुळ रूप आहे का? कथकचेच उदाहरण घ्या.
'कथा कहे सो कथक कहलावे' या उक्तीप्रमाणे, कथक म्हणजे कथाकार. देवळात सादर व्हायचा हा प्रकार. पुढे मुघल राजवटीत याचे स्वरूप पार बदलले. भक्तीरसाची जागा शृंगाररसाने घेतली आणि ही नृत्यशैली जास्त 'दिलखेचक' करण्यात आली. वेगवान पदन्यास, चक्री, आकर्षक पोषाख, उर्दू अधवा पर्शीयन शव्द असे अनेक बदल झाले.
कथक हा मुळात एक एकल(solo) नृत्यप्रकार. आता मात्र तसे राहीले नाही. कुमुदिनी लाखिया यांच्याकडे या बदलाचे श्रेय दिले जाते.(त्यांनी काही काळ लखनौच्या महाराजजी घराण्याचे प्रसिद्घ नर्तक शंभू महाराज यांच्याकडे शिक्षण घेतले होते. एका मुलाखतीत शंभूजींनी या नव्या प्रयोगाबद्द्ल नाराजी व्यक्त केल्याचे आठवत आहे.) असो. बरेच अवांतर झाले!

काँटेमपररी हा नृत्यप्रकार व्यक्तिशः मलाही कोरडा वाटत आला आहे. बॅले, फ्लेमेंको, टॅंगो, कथक, ओडीसी सारख्या नृत्यप्रकारांमधले लास्य किंवा तरलता यांचा अभाव काँटेमपररी शैलीत जाणवतो. कदाचित हा माझा दोष असू शकेल,
(अवांतरः फ्लेमेंकोच्या उगमाबद्द्ल एक कथा अशीही सांगितली जाते, की त्याचे मूळ कथक्मधे आहे, जिप्सींनी कथक्नृत्यशैली स्पेनममधे नेली, ज्याचे रूपांतर फ्लेमेंकोमधे झाले.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

सानिया,
तुम्ही कथ्थक शिकला आहात काय?
'कथन करे सो कथ्थक कहावे' ही कथ्थक ची व्याख्या आहे हे प्रत्येक कथ्थक शिकणारीला पहिल्या परिक्षेच्या सिलॅबसमध्येच शिकवतात. मुद्दा तो नाहिये. मुद्दा हा आहे की सांगायच्या कथा ह्या पुराणातल्याच का असाव्यात? काही कथा असल्या पुराणातल्या तर असूदे, काही कथा या काळानुसार बदलू का नयेत. पुराणं असतीलही ग्रेट आणि सुरस, पण त्यातल्या बरयाचशा गोष्टी आऊटडेटेड आहेत. मीरेचं कृष्णाप्रती प्रेम दाखवायचंय, कृष्णाने कालियादमन कसं केलं, द्रौपदी हंबरडा फोडत गरागरा फिरत हस्तिनापूरमध्ये कडकडली हे दाखवायचंय, आय गेट इट, दशकानुदशके तेच? तुम्ही हे जे नवीन प्रयोग म्हटले आहेत ते ग्रेटच आहेत, वादच नाही पण त्याने नृत्याच्या मूळ साच्यात कितीसा फरक पडलाय. ही माणसं ग्रेट होण्याआधी, प्रयोग करण्याआधी कुठेतरी शिकली असतीलच ना, ती ह्याच जुन्या गोष्टी शिकलेली आहेत. मुद्दा हा आहे की मुळातच हा पॅटर्न का बदलू नये? एक्स या मुलीने आज कथ्थक शिकायचं ठरवलं तर तिला विष्णुस्तुति, शिवस्तुति, माखनचोरीपासूनच सुरुवात करावी लागेल. अभिव्यक्ती दाखवता येणं फक्त पुराणकालीन कथांमधून पॉसिबल आहे हे कोणी सांगीतलं? कथ्थक ची जयपूर, बनारस, लखनौ ही घराणी आहेत आणि त्यांच्यात जो असायचा तो प्रायमल फरक आहेच. जयपूर चक्रदार परन, बांट वर लक्ष देतात, लखनौ घराणं भक्ति रसावर तर बनारस हा दोहोंमधला ब्लेंड आहे. मुद्दा हा आहे की तो वर्षानुवर्षे तोच आहे. फ्लेक्झिबिलिटी नाही. जरा इकडेतिकडे झालं तर भुवया उंचावतात.
कला ही काळानुसार बदलली नाही की ती जुनाटच म्हणवली जाते.
मी स्वतः जयपूर घराण्याची नर्तिका आहे आणि कथ्थक शिकले की जगातलं कुठलंही नृत्य करता येतं हा माझा विश्वास आहे. पण मुळातूनच शिकताना (शिकल्यावर नव्हे) नाविन्याला, नव्या थीम्सला संधी असावी असं माझं म्हणणं होतं आणि राहिल. स्टिरीयोटायपिंग नको, हवं ते मांडायची संधी हवी. प्रोषितपताका, विरहोत्कंठिता नायिका पटत नाही म्हटल्यावर ती न करण्याची मुभा हवी, सक्ती नको.
देबूंच्या धाग्यावर अवांतर बरंच झालंय. आशुतोष, क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

मला वाटते की ही प्रस्तुत चर्चा अवांतर नव्हे तर मूळ विषयाशी निगडीतच आहे. कलेच्या क्षेत्रात परंपरागत आणि प्रयोगशील या दोन्हीना सारखेच महत्व आहे. एक प्रवाह मूळ साचा जतन करतो तर दुसरा प्रवाह मूळ साच्यापासून फारकत घेऊन नवीन मांडणी करतो. कलेचं शास्त्रीय शिक्षण मात्र नेहमी परंपरागत पद्धतीनेच होते यावर तुमचा आक्षेप दिसतो. पण जर शिकताना प्रस्थापितांकडूनच शिकून, प्रस्थापित शिक्षण पद्धतीतच रहायचे असेल तर मग त्यातील परंपरागत पद्धती, शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच उखडण्याची भाषा का करावी? भरतनाट्यम सारखा नृत्यप्रकार दोन हजार वर्षांपूर्वीपासून टिकून आहे तो कसा? तर तो मूळ स्वरूपात टिकवून ठेवण्याच्या द्रविडी कर्मठपणातूनच. त्यावर आधारीत समकालीन रचना किंवा त्याला अधिक काल-समर्पक बनविण्यासाठी केले गेलेले प्रयोग हे तितकेच महत्वाचे आहेत आणि तेच या कलेला पुढे नेतात. पण शिष्यावस्थेतच साचे मोडले जावेत असा आग्रह का? शिवाय भारतीय नृत्यकलेत अभिनयाला खूप महत्व आहे मग जरी विरहोत्कंठित नायिकेशी रिलेट करता येत नसेल तरी ‘अभिनय’ शिकायचा म्हणून ती नायिका आपल्याला जितकी चांगली रंगविता येते तेवढी रंगविणे हा ती कला शिकण्याचाच भाग होतो ना? असे केल्याने आपल्यातील निर्मितीक्षमता लुप्त होते असे आपल्याला वाटते का?
नृत्याच्या नव्हे पण संगीताच्या क्षेत्रात, एका अर्थाने प्रस्थापित शास्त्रीय संगीताच्या साच्यातून बाहेर जाऊन किशोरीताई आमोणकर शास्त्रीय संगीताच्या वैदिक उगमाकडे गेल्या, ज्याबद्दल त्या इथे बोलल्या आहेत; आता त्यांना प्रयोगशील म्हणायचं की परंपरागत?
व्यक्तिशः, मला बंडखोरी आवडते आणि त्यातून नवीन प्रवाह बनविणाऱ्या व्यक्तींबद्दल खूप आदर वाटतो पण माझा आक्षेप आहे तो एखादी गोष्ट कालबाह्य होतेय म्हणून त्याचा अभ्यासच न करण्याला. मी खूप म्हाताऱ्या माणसासारखं बोलते आहे असं वाटलं, तर मी खरचं म्हातारी व्हायला लागली आहे असं आधीच मान्य करून टाकते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक चर्चा! हा मुद्दा अवांतर नाही याशी सहमत. आशुतोष यांचे ऐसीवर स्वागत! त्यांनी मराठी नाटकाबद्दलही अधिक लिहावे ही विनंती.

काही असंबद्ध विचार:

कथकबद्दल तेवढे माहित नाही, पण भरतनाट्यमचा खूप जवळून संपर्क आल्याने याविषयाबद्दलची मणिकार्णिकाची कळकळ समजू शकते. चेन्नई बंगळूर मदुरई तर सोडून द्या पण पुण्यासारख्या शहरातही आज शेकडो मुली भरतनाट्यम शिकतात, सहा वर्षांनी अरंगेट्रम करतात, अरंगेट्रम झाल्यावर क्लास काढतात, मोठ्या क्लासांचे सामुहिक कार्यक्रम होतात, आणि तशीच गाडी पुढे. काही नर्तिका वेगवेगळ्या गुरूंकडून अनेक मार्गम शिकून त्यांच्या नाचात वैविध्य आणू पाहतात, पण "तेच तेच" हे मी अनेक नर्तिकांकडून ऐकले आहे. त्यांना मांडायचे विचार निराळे आणि नवीन असले तरी अभिनयाची भाषा ही शेवटी साचेबंद आहे असे काहींचे म्हणणे, तर ठराविक रस सोडून काही करू पाहिले तर ते कृत्रिम आणि वर म्हटल्याप्रमाणे उगीचच "आम्ही समकालीन आहोत" हे दर्शवण्यासाठी आहे असा अन्य नर्तिकांचा आणि प्रेक्षकांचाही प्रतिसाद असतो असे काहींचे म्हणणे. त्यामुळे नाविन्य आलेय ते बहुतेक मराठी पदांवर, भावगीतांवर बसविलेल्या अभिनयप्रधान पदमांतून. यात अगदी कृष्ण नायक नसला तरी नायक-नायिका असतातच. पण तरी, भरतनाट्यम शिकणार्‍या मुलींच्या गर्दीमुळे, आणि आजकालच्या सामुहिक अरंगेट्रमांमुळे प्रयोगशील कोरियोग्राफर्सना वाव आहे, अगदी नाही असे नाही: नृत्त प्रकारांने नवीन भूमितिक आकार, डांस-ड्रामाचे प्रयोग, अभिनयप्रधान प्रकारांमध्ये ही ग्रूप नाट्यातून गोष्ट अधिक विस्ताराने सांगायचा प्रयत्न - पारंपारिक अभिनयाला धरूनही हे सगळेच नवीन आहेत, आणि सोलो नर्तिकेने रसांचे केलेल्या अभिव्यक्तीपेक्षा निराळे वाटतात. खंडिता नायिकेचा एक मस्त वर्णम परवा परवाच प्रमद्वरा कित्तूर या नर्तिकेने बसवलेला पाहिला - ९ नर्तिकांनी तो सादर केला, आणि त्यात खेळकर, अगदी लोफर, प्लर्ट नायकाची भूमिका ही एरवीच्या "नाथा"पेक्षा वेगळी, फ्रेश वाटली. पण हे प्रेक्षक-सापेक्ष आहे याबद्दल दुमत नाही; कोणाला हे वरवरचे नाविन्य वाटू शकेलही.

परंपरा ही या "पारंपारिक" कलांमध्ये किती जुनी, आणि साचेबंदपणादेखील किती पारंपारिक आहे, ही गोष्ट दिसते तितकी सरळसोपी नसावी. पुन्हा भरतनाट्यमचेच उदाहरण द्यायचे झाले तर, आजचे चे अभिजात भरतनाट्यम आहे ते गेल्या शंभर दीडशे वर्षांमागे रुक्मिणी देवी अरुंडेल वगैरेंनी "सुधारलेले", "स्वच्छ" केलेले दासी अट्टम आहे. या आधी अधिक विखुरलेले, वैविध्य असलेले नाट्य राष्ट्रीय सांस्कृतिक आणि सामाजिक सुधारणांच्या उद्योगांतर्गत अधिक सिस्टेमॅटिक आणि नियमबद्ध, साचेबंदही केले गेले. याला बालसरस्वती आणि इतर नर्तिकांचा विरोधही होता. मध्यमवर्गात लोकप्रिय झाल्यावर (आणि एका दृष्टीने त्यांचे बाजारीकरण, मास क्लासेस द्वारा कॅप्स्यूलीकरण झाल्याने) या क्लासिकल फॉर्म्स अधिकच साचेबंद झाल्या आहेत का हा प्रश्न उद्भवतो. अशा वातावरणात "परंपरा" ही देखील फक्त ग्रहण केली जाते, तिच्याशी जिवंत नातं राहत नाही, त्यातून ऑर्गॅनिक प्रयोग निघणं आणि रिलेट करणं कठीणच होतं का? (अर्थत, या संदर्भात कुठल्याही पारंपारिक कलेत असे प्रश्न येऊ शकतात - शांता गोखलेंच्या त्या वर्षी कादंबरीतली शारदा गायिका आणि तिचे प्रयोग आठवले.) सुचेताताई चापेकरांच्या शष्टाब्धीपूर्ती निमित्त काही वर्षांपूर्वी परंपरा/प्रयोगशीलता याच विषयावर एक चर्चासत्र भरवलं होतं. त्यात बहुतेक सगळ्यांनीच नाविन्याच्या गरजेची बाजू मांडली, पण तिला जोडून स्पष्ट प्रयोगाची दिशा नव्हती, किंवा कुठल्याच "विचारप्रवाहा"चा पाया नव्हता. ती चर्चा ऐकून तेव्हाही असेच विस्कळित विचार सुचले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम, हा धागा वेगळा काढल्याबद्दल संपादकांचे आभार! यामुळे थोडेसे अघळ-पघळ लिहायला वाव मिळेल. मूळ धागा आणि त्यावरच्या प्रतिक्रिया यांचा विचार करता माझ्या मनात आलेले हे विचार.

कलेतील तंत्रांचा अभ्यास म्हणजे रूढार्थाने 'शिकणे'. पण खरे शिकणे यानंतरच सुरू होते, तंत्रं तर अवगत केली, आता ती वापरून वेगवेगळ्या शक्यता रंगमंचावर आणण्याचा प्रवास सुरू होतो. मुळात शिकणे आणि प्रयोग करणे हे एक अद्वैत आहे. शिकण्याचा तो एक वेगळा टप्पा आहे एवढच. आज साठीच्या आसपास असलेले हे गुरू जेव्हा या नवीन प्रयोगाद्वारे शिकत असतात, तेव्हा त्यांचे शिष्यही त्यांच्याबरोबर शिकत असतात, नवीन परंपरेचा हिस्सा होत असतात.

अभ्यासक्रमातदेखील अशा अनेक जागा असतात, जिथे नवीन प्रयोगांना वाव असतो. उदा. गाण्यावर आधारीत सादरीकरण(भावगीतांवर आधारीत सादरीकरण ही नवीन संकल्पना नाही, पण असे प्रयोग जास्त प्रमाणात होत असतील, तर ती नक्कीच आनंदाची बाब आहे.), गत्-भाव. मात्र याचा वापर करायला हवा.

रंगमंचावर कला सादर करणारा कलाकार हा तेव्हा कोणा एकाची भावावस्था साकारत असतो. हा कोणी एक- वर्तमान, भूत किंवा भविष्यातलाही असू शकतो. खरा किंवा कल्पनेतलाही असू शकतो. अशा वेळी, मला जे दिसते तेच मी साकारणार असे म्हटल्यास कलाकार आपल्याभोवती एक बंदिस्त चौकट आखून घेतो, असे मला वाटते.
पारंपारीक रचना कलाकाराला हा परकायाप्रवेश/अभिनय शिकवण्याचे एक साधन आहे.

अभ्यासक्रमात पारंपारीक रचना शिकवण्यामागे काय इतर कारणे असू शकतात? आपल्याला मिळालेल्या ठेव्यात इतरांना सहभागी करण्याची/तो ठेवा टिकवण्याची कळकळ तर नक्कीच, त्याशिवाय परिक्षापद्धती प्रमाणीत करण्याची गरज हेही एक कारण असावे.

मध्यमवर्गात लोकप्रिय झाल्यावर (आणि एका दृष्टीने त्याचे बाजारीकरण, मास क्लासेस द्वारा कॅप्स्यूलीकरण झाल्याने) या क्लासिकल फॉर्म्स अधिकच साचेबंद झाल्या आहेत का हा प्रश्न उद्भवतो. अशा वातावरणात "परंपरा" ही देखील फक्त ग्रहण केली जाते, तिच्याशी जिवंत नातं राहत नाही

सहमत. गुरूकुल पद्धती आता अस्तीत्वात नाही. आठवड्यातून काही तास केवळ क्लासला जाणे, मग इतर व्यवधानांमधे गुंतणे, यापरिस्थितीत 'आपण हे का आणि कशासाठी शिकतो आहोत' हे कळून मुलांपर्यंत पोचवण्याची जवाबदारी गुरूंशिवाय पालकांचीही आहे. कोवळ्या संस्कारक्षम वयात परंपरेशी निर्माण झालेलं नातं दिर्घकाळ टिकेल.

रूची आपण दिलेल्या दुव्याबद्द्ल आभार! मुलाखत ऐकली, आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्यात काही भर घालणं माझ्या क्षमतेच्या बाहेर असलं तरीही चर्चा वाचते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

‘कलेतील कर्मठपणा’ असे जरी या लिंकचे टायटल असले तरी ते ‘कलेतील समकालिनीयत’ विषयी आपण बोलतोय असं मला वाट्त.

कर्मठपणा समकालीनपणातसुध्दा असु शकतो, नाही?आजकाल किती ते कंटेम्पररी डान्स परफ़ोर्मंन्सेस पहावे लागतात जे विधीवत आपली शरीरं हलवत असतात. पण का हलवतोय? माहिती नसतं. असेच विधी पारंपारिक नृत्यप्रकारात इतकी घडतात की फ़क्त विधी म्हणजेच नृत्य असं वाटावं.

मी अस्तादांवरच्या लेखात म्हणालोय की समकालीन परंपरांकडे न बघता कसं होता येईल? बरेच समकालीन नृत्यकार निव्वळ प्रयोग करायचे म्हणुन करतात. काही महिन्यांचे, कधी-कधी काही दिवसांचे कलारिपायट्टुचे शिक्षण घेतले की ‘समकालीन’ व्हायला रिकामे!

हेच एका अरंगेत्रमला लागु. एक अरंगेत्रम झाले की गावाला शिकवायला चालु. आपण पहाल की गल्ली बोळात भरतनाट्यमचे इत्यादी वर्ग चालु. आता, पोरा-पोरींना वजनंही सांभाळायची असतात. मी अक्चुअल जेवताना, अक्चुअल रोमान्स करताना, अक्चुअल भांडताना काय करतो आणि इथं, रंगस्थळावर, काय काय डोळे हलताना दिसतायत? फ़ार बोअरिंग वाटतं. एक नृत्यप्रकार म्हणुन पहायला बरं वाटतं. पण मला पाह्यला येत नाही त्यात.

निव्वळ समकालीन कसं होता येईल? रेपर्टवायर तर परंपरेतच असतं. इथं मला असं नोंदवायचय की परंपरागत आणि समकालीन अशी दोन तुकड्यात विभागणी करता येणं कठीण असतं. आधी/नंतर ही काळाची भानगड असते. समकालीन दृष्टीकोन असतो. याअर्थाने, परंपरेत पण समकालीनीयत असु शकते. दुसर्या बाजुने पण. कानाला हात लावला की कुणी पारंपारिक होत नाही आणि पर्सनल एक्स्पिरिअन्सेस कुणी ‘एक्स्प्लोर’ करतोय म्हणुन कंटेपररी होत नाही.

अजुन एक:

वर सानिया म्हणतात त्याप्रमाणे ते खरच परकाया प्रवेश करायचे साधन असते? इथं अजुन एक, रचना(की रुप?) साधन असतं काय? मला असं वाटतं की व्यक्त करण्याला साधन म्हणता येणार नाही. ते रुप ऑरगॅनिक असते, नाही?

“कलेतील तंत्रांचा अभ्यास म्हणजे रूढार्थाने 'शिकणे'. पण खरे शिकणे यानंतरच सुरू होते, तंत्रं तर अवगत केली, आता ती वापरून वेगवेगळ्या शक्यता रंगमंचावर आणण्याचा प्रवास सुरू होतो.”

हे फ़ार तुकड्या तुकड्याने पहाण झाल अस वाटत. इथं मी निव्वळ नृत्याविषयी बोलत नाही तर कलेविषयी. मला वाटतं शिक्षण, तंत्र, अवगत करणे आणि त्यांचा रंगमंचावरचा प्रवास हे असे एकानंतर दुसरे असा प्रवास होत नसावा. निदान, मी तसे पहातोय. ती ऑरगॅनीक प्रक्रिया असावी. अजुन मोजकेपणाने बोलायचे झाले तर, नाटक लिहिताना नाटककार ते व्हिजुअलाइज करत असतो वा कादंबरी लिहिणारा ती वाचत असतो इत्यादी. एक अभंग मनात येतोय: “न लगती डोंगर चढावे।हळुच पाऊल पडावे॥” (कोण लिहिलाय आठवत नाही. सांगतो, कुणाला इंटरेस्ट असेल तर आठवुन.)

अभंगावरनं आठवलं:

आमच्या घरात आमचे स्वतःचे भजनी मंडळ असायचे. दर गुरुवारी, महाशिवरात्रीला, एकादश्यांना आमच्या भजनाच्या दुकानात भजन होत असे. जिथे भजन होत असे. त्याला भजनाचे दुकान म्हणतात. कारण, आजोबांनी सुरुवातीच्या काळात किराणामालाचे दुकान काढले आणि विठोबाच्या नादाने ते चालले नाही. दिवाळे निघाले. शेवटी त्यांना ते बंद करावे लागले आणि तिथं त्यांनी भजन करायचे सुरु केले. मग, शेती आणि भजन हा त्यांचा उद्योग झाला. आम्ही त्यांच्या बरोबर भजनाला जात असु. पहिले काही अभंग, मग विठोबाचा गजर, आणि त्यानंतर, त्यांचे एकदम सिरिअस अभंग सुरु होत असत. त्यात, गवळणी तर चिक्कार. आमच्या आजोबांची एक विशेष गवळण होती: परब्रह्म निष्काम तो या गौळीया घरी।वाक्या, वाळे, अंदु नवनीत चोरी॥ (बरेच वर्षे नामदेवाच्या या गवळणीचा अर्थच लागला नव्हता!) बड्या लोकांचे हे असे घनगंभीर अभंग झाले की मग माझ्या चुलत भावाची वेळ यायची. आणि तो, जनाबाईच्या गवळणी बाहेर काढायचा. आता त्या पण तशाच खतरनाक पण लडिवाळ. कॄष्णाला धरुन ती ओढायची, बांधायची, त्याला चोर म्हणायची वैगेरे. आजोबांच्या कपाळाला आठ्या पडायच्या. कसल्या उडत्या चाली. गम्मत म्हणजे, सुरपेटीवाले आजोबा पण जागे व्हायचे! आय मीन, ते पेटी वाजवताना झोपायचे. मधेच, काळी चार वर त्यांचे बोट राहायचे. मग आमच्यापैकी कोण तरी ‘हा...’ म्हणुन त्यांना जागे करायचे. (आम्हाला त्यवढचं काम जमायचं ) खरं, ते कधीही परत सुर पकडायला चुकायचे नाहीत. ‘असल्या उडत्या’ चालीच्या अभंगावर पेटी वाजवायची तर त्यांना विशेष जागं राहायला लागायचं. नंतर, आजोबांची चिडचिड जास्तच व्हायला लागायची. वयानं आवाज लागायचा नाही, ‘उडत्या चालीं’ ना साथ द्यायला यायची नाही, टाळांचे बोल वेगवेगळे असायचे, शब्दफ़ेक झुम दिशी असायची, त्यांना वेग असायचा. मग, जुने-नवे; परंपरांगत-मॉडर्न; असं काहीसं द्वंद्व व्हायचं. अर्थात, त्यांच्या सारखं शब्दांचं भान ‘मॉडर्न’ वाल्या भावाला नव्हतं आणि ‘मॉडर्न’ गती बरोबर त्यांना जुळवुन घेता आलं नाही. महत्वाचं म्हणजे, सुरपेटी वाजवणार्या आजोबांनी मात्र सगळ्यांशी जुळवुन घेतलं. ते परवा परवा पर्यंत-चौर्यांण्णव वर्षाचे होऊन विठुरायाकडे जाईपर्यंत- गात राहिले, वाजवत राहिले. त्या आधी आजोबा पण गेले. सारे ‘मॉडर्न’ आधीकचे मॉडर्न बनायला गेले. आता, भजनाचं दुकान कसंतरी उभय.

हा पण समकालीनीयतचा प्रवास वाटतो मला.

वरुन पुढे: आणि, अजुन एक

“यापरिस्थितीत 'आपण हे का आणि कशासाठी शिकतो आहोत' हे कळून मुलांपर्यंत पोचवण्याची जवाबदारी गुरूंशिवाय पालकांचीही आहे कोवळ्या संस्कारक्षम वयात परंपरेशी निर्माण झालेलं नातं दिर्घकाळ टिकेल." अशा विधानांबद्दल वेगवेगळ्या पातळ्यांवर मला नेहमीच आक्षेप असतो.

‘मुलांपर्यंत पोहचावचं’: आपण गृहित धरतोय की आपण पोहचवलं नाही तर त्यांच्या पर्यंत काही पोहचणार नाही.
‘संस्कारक्षम’ वय: ही काहीतरी नवीन कॅटेगरी आहे?
परंपरेशी नातं: परंपरा ही काही विशेष वेगळी बाब आहे? जी त्या मुलाच्या आयुष्याशी जोडली नाहीये?

खरं तर, या सार्या चर्चेनंतर बरेच विचार मनात येतायत. प्रामुख्याने, समकालिनपणाचे अनेक पदर दिसतायत. मला ते निव्वळ नृत्यापुरते किंवा कलेपुरते वाटत नाही तर आपल्या जीवन-धारणेचे ते मुद्दे वाटतात. आपण एखादा विचार का करतो, तो असाच का करतो आणि एखाद्या विशिष्ट रुपातुन अशाच रितीने का व्यक्त करु इच्छितो याबद्दल स्वत:कडे पहाण्याची याविषयी हे सारे असते असे तीव्रपणे जाणवतेय.

शेवटी: अजुन एक

रुची: अगदी मनापासुन आभार किशोरीताईची मुलाखत-लिंक दिल्याबद्दल. त्या शेवटी भुप रागातली ‘जबसे...प्रीत नवेली’ गातात ते म्हंजे देव-गाणंच की. आता दुसरी़कडे जाऊन आख्खी बंदिश ऐकली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आशुतोष, मूळ लेख आणि तू वर लिहिलेली आजोबांची गोष्ट व त्यातून तू मांडलेला मुद्दा अतिशय आवडला. तुझे अजून लिखाण वाचायला नक्कीच आवडेल.
हा चर्चाविषय खरचं 'कलेतील कर्मठपणा'पेक्षा अधिक व्यापक आहे आणि यातील मतप्रवाह सर्वच कलांच्या बाबतीत लागू होतात. पण मला वाटते की मध्यमवर्गीयांच्यातल्या लोकप्रियतेने वाढलेले मास क्लासेस ही काही कलेतील प्रायोगिकता कमी होण्याची मूळ कारणे नसावीत कारण कलेच्याच काय पण कोणत्याच क्षेत्रांत मूलभूत बदल घडवून आणण्याची क्षमता असणारे विरळाच असतात. एरवी सगळी एकामागोमाग एक चालणारी मेंढरे, त्यांच्याकडून काही काही महत्वाचे घडले जाण्याच्या शक्यता नसतातच; त्यामुळे ही मेंढरे किती आहेत आणि कोणाच्या मागे जाताहेत त्याने कलेच्या वर्तमानावर आणि भविष्यावर फारसा फरक पडत असेल असे वाटत नाही. वर उल्लेखलेल्या किशोरीबाईंच्या मुलाखतीकडे पहिले तर लक्षात येते की कालपरत्वे साचे बदलतच रहातात पण जेंव्हा एखादा 'जिनियस' खूप तपःचर्येनंतर काही असामान्य प्रयोग करतो तेंव्हाच नवीन प्रवाह बनू शकतो. मग ही मेंढरे या नवीन मार्गाने जायला लागतात आणि तरी ती नेहमी मेंढरेच राहतात. अगदी वास्तुविज्ञानातही 'फ्रँकलॉइड राइट' किंवा 'फ्रँक घेरी' वगैरे माणसे काहीतरी खरे मूलभूत वेगळे करतात आणि बाकीचे त्यांच्यातले 'थोडे हे' आणि 'थोडे हे' तुकडे गोळा करून नुसते ठोकळे उभे करतात. बहुसंख्यांत तेवढी ओरिजनॅलीटीच नसते आणि इतरांत तेवढे साचे मोडण्याचे धाडस नसते, पण या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय मूलभूत बदल होऊच शकत नाहीत, होतात त्या नुसत्या बदल करायला हवेत अश्या गप्पा. मला ज्यात खास रुची आहे त्या 'कुलीनरी आर्ट'(याला मराठी पर्यायी शब्द 'शाकापूपभक्तविकारक्रिया' असा सापडला!खीखीखी!) मधेही कोण्या एकाने अन्नाच्या थाळीचा चित्राच्या कॅनव्हास सारखा उपयोग करून लक्ष वेधून घेतल्यावर लागले सगळे प्लेटीवर फराटे मारून रंगकाम करायला! असल्या पोकळ प्रायोगिकतेपेक्षा, सरळ परंपरागत शैली वापरणारे पण आपल्या कलेत निपुण असलेले जास्त उजवे वाटतात. आता 'कुलीनरी आर्ट'ला कला मानायचे का यावर चर्चा होण्याआधीच स्पष्ट करते की मी केवळ शिक्के मारण्याच्या प्रक्रियेचे उदाहरण म्हणून लिहिले शिवाय ज्या विषयांत आपल्याला थोडीफार गती आहे त्यातली उदाहरणे पट्कन समोर दिसतात म्हणून.
याचा अर्थ असा नव्हे की एखाद्याला आखून दिलेल्या रस्त्यावरूनच जाऊन संवर्धनाचेच काम करायचे असेल तर त्याने ते करू नये. ओरिजनॅलीटी नसूनही मूळाशी जाऊन अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांचेही संवर्धनाचे योगदान कलेत असतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आशुतोष, समकालीन हा तांत्रिक शब्द वाटतो. त्याची साधारण व्याख्या देता येईल का?

मला वाटतं प्रश्न असा आहे की एखादी कला शिकायला सुरूवात केल्यापासून ते त्यातून काहीतरी भरीव आउटपुट निर्माण करेपर्यंतचा मार्ग घट्ट रुळांचा आहे की मोकळ्या मैदानातल्या पाऊलवाटांचा आहे? जर ही यंत्रणा निश्चल असेल तर त्यातून बाहेर पडणारे कलाकार, नवीन काही करण्याची शक्यता कमी आहे. त्यात जर हे रूळ गंजत असतील, कालबाह्य होत असतील, तर खरा प्रवास होईल का?

या प्रश्नांचं उत्तर वेगवेगळ्या कलांसाठी, परंपरांसाठी वेगळं आहे असं मला वाटतं. लेखन, काव्य हे एक टोक - साधा निबंध लिहिण्यापलिकडे कोणीच काही फारसं शिकवत नाही. लिहा हवं तसं. पूर्ण मोकळीक, काहीच पठडी नाही, वाटा नाहीत - त्यामुळे हे मोकळं मैदान आहे. खूप लोक शिरतात, बरेच मैदानातच इकडेतिकडे घुमतात, वेशीपलिकडे पोचणारे ऍब्सोल्यूट पातळीवर बरेच असतात आणि वेशीच्या बऱ्याच वेगवेगळ्या टोकांना ते पोचतात.

आधी दिलेल्या नृत्यकलेचं उदाहरण याच्या दुसऱ्या टोकाचं वाटतं. सगळ्यांनाच चालता येत असलं, आणि तोल सांभाळता येत असला तरी मुळातली ग्रेस व शिक्षणातून घोटवून सहज झालेलं लालित्य हे साधण्यासाठी फार लोक प्रयत्न करत नाहीत. जे आत शिरतात व थोडे पुढे जातात त्यांना जुन्याच कथा सांगायला शिकवलं जात असेल तर ते थोड्या प्रमाणात प्रगतीला मारक आहे. शिक्षणाची पद्धतीच जर ठाशीव असेल, तर वेगळं काही करून बघण्याची प्रवृत्ती कशी निर्माण होणार?

अगदी वास्तुविज्ञानातही 'फ्रँकलॉइड राइट' किंवा 'फ्रँक घेरी' वगैरे माणसे काहीतरी खरे मूलभूत वेगळे करतात

हे तितकं पटत नाही. पन्नास वर्षापूर्वीचा सर्वसाधारण वास्तुविशारद आणि आजचा सर्वसाधारण वास्तुविशारद यांच्या काम करण्याच्या पद्धतीत, हाताळलेल्या फॉर्म्समध्ये प्रचंड फरक असावा असा अंदाज आहे. काळाबरोबर बदलण्याची व त्या अनुरूप शिक्षणात बदल करण्याची प्रक्रिया आर्किटेक्चरमध्ये (च्यायला वास्तुशास्त्र हा शब्द पार बदनाम झाला आहे) अंगभूत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'फ्रँकलॉइड राइट' किंवा 'फ्रँक घेरी' या दोन वास्तुविज्ञानांचा काळ वेगवेगळा आहे.'फ्रँकलॉइड राइट'चा काळ हा पन्नास -साठ वर्षांपूर्वीचा होता आणि तो 'आधुनिक वास्तुविज्ञानाचा' एक मोठा भाग होता. फ्रँकलॉइड राइटने वास्तुविज्ञानाची कोणतीही पदवी संपादन केली नव्हती पण त्याच्या रचनांच्या वेगळेपणामुळे आणि creative genius कल्पनांमुळे तुम्ही म्हणता तसे आताचे विद्यार्थी त्याच्या रचना अभ्यासक्रमात शिकतात. ह्यावरून हेच सिद्ध होते की मूलभूत बदल वास्तुविज्ञानात आणण्यासाठी फ्रँकलॉइड राइटला कोणती पदवी घ्यावी लागली नाही, त्याच्या कल्पनांना तेंव्हा विरोधही भरपूर झाला पण एकदा त्या कल्पना प्रस्थापित झाल्यानंतर अभ्यासक्रमात समावेशित करण्यात आल्या आहेत. 'फ्रँक घेरी' हा अलीकडचा आर्किटेक्ट, ज्याला Diconstructive Architecture म्हणतात त्याचा एक मुख्य घटक. पुन्हा त्याच्या रचनांच्या मूलभूत वेगळेपणामुळेच तो नावरूपास आला. त्याचे बीलबाव इथले गुगनहाईम म्युझीयम तर १९९६ इतके अलीकडचे आहे. त्यामुळे मला वाटते हा तसा समकालीन आर्किटेक्टच आहे. ह्या दोन्ही आर्किटेक्टसनी वेगवेगळे फॉर्म्स वापरलेले असले किंवा ते वेगवेगळ्या काळात नावारूपाला आले असले तरी त्यांना मिळालेले महत्व त्यांच्या रचनेतल्या मूलभूत वेगळेपणाने आलेले आहे आणि असे वेगळेपण कोणत्याही काळात, कोणत्याही नवीन आर्किटेक्टला मिळविणे शक्य आहे ते त्याच्या स्वतःच्या criative genius मुळेच.

सिडने पॉयटिये ने Sketches of Frank Gehry नावाची एक सुरेख डॉक्युमेंटरी २००६ मध्ये बनविली होती. त्यात त्याच्या रचना, प्रेरणा, वेडेपणा यावर सुरेख विवेचन आहे आणि फ्रँक घेरीची विस्तृत मुलाखतही आहे. त्याचा ट्रेलर इथे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा वाचतो आहे. उद्बोधक आहे.

नृत्यामधे प्रयोगशीलता मारली जाते या विवेचनाबद्दल माझं निरीक्षण: एक गोष्ट खरी की कुठल्याही विशुद्ध शास्त्रीय कलेच्या व्यासपीठावर एकंदर यमनियमांना ओलांडून जाता येत नाही. सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा, आताच्या काळात उपलब्ध असलेली व्यासपीठे ही फक्त विशुद्ध कलेपुरतीच मर्यादित नाहीत. आपण सध्या फक्त नृत्याचं एक उदाहरण घेऊ.

नृत्याचा आनंद मी संगीताइतका घेतलेला नाही हे कबूल; पण माझ्या अनभ्यस्त नजरेलाही हे दिसतं की टिव्हीवर डान्स शोज होतात. या डान्स शोज मधे अर्थातच कंटेंपररी नृत्यांना केंद्राचे स्थान असते. त्यामधली प्रयोगशीलता , तरुण रक्ताच्या मुलामुलींनी भारतीय/पाश्चात्य शैलीच्या असंख्य प्रकारांमधे दाखवलेले प्राविण्य पाहून स्तिमित व्हायला होते. आता ही प्रयोगशीलता दिसते ती माझी नजर अनभ्यस्त आहे म्हणून का ? की या टीव्ही शोजच्या व्यासपीठांना कसलाच अर्थ किंवा मान्यता नाही ? जर तशी मान्यता नसेल तर सोनल मानसिंग सारख्या कथ्थक मधल्या , कुठल्याही मोजमापाने मोठ्या असलेल्या कलावंताने त्याची भरभरून स्तुती का केली असेल ? की हा फक्त पैशाचा खेळ आहे ? तसे असेल तर सोनल मानसिंग यांची विश्वासार्हता जमेस धरायची की नाही ?

असो. माझा सांगायचा मुद्दा इतकाच की, "प्रयोगशीलतेला वाव नाही" "मुस्कटदाबी होते" हे आर्ग्युमेंट खुलेपणाचा माहोल अवतरण्याच्या आधी मान्य होण्यासारखे होते. आता असेल असं वाटत नाही. मार्केट इकनॉमीने इथे नक्कीच काहीतरी असं केलंय की एकंदर अवडंबरवादी किंवा बुरसटलेल्या विचारांना कालबाह्य ठरवलं जावं. जे निव्वळ परंपरेला जखडून राहतात त्यांच्या कलेच्या आविष्कारावर तर परिणाम होतोच पण त्यांना मिळणारा वावही कमी होत जातो असं मला वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नुकतीच या कार्यक्रमाची माहिती मिळाली. मला जाणे शक्य नाही, पण इतर इच्छुकांनी जरूर लाभ घ्यावा आणि कार्यक्रम कसा झाला, ते इतरांना सांगावे. या धाग्यात भर घालण्यासारखे काही हाती लागेल अशी आशा आहे.

Avartan is a collaboration of four artists from four different disciplines: Dance, Tabla, Vocals and visual art. It’s a musical journey of Kathak, its origin in ancient Indian temples, its journey through the Mughal era, its reflection on the Indian cinema to contemporary experiments in music.

For tickets: 022-26402028
Tickets also available at Ravindra Natya Mandir and Maharashtra Watch Company
Ticket rates: Rs.100, 80 balcony 50.

Dances: ADITI BHAGWAT
Vocals: SAYLEE TALWALKAR
Jazz keyboards: MERLIN D’SOUZA
Tabla: PT. KALINATH MISHRA
Saxophone: RHYS SEBASTIAN
Harmonium: ATUL PHADKE
Sarangi: SANGEET MISHRA
Audio visuals: KAWA HATEF (New York)
Narration: MANAVA NAIK

Avartan is conceptualized by Aditi Bhagwat and directed by New York based filmmaker Kawa Hatef.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती भागवत या जयपूर घराण्याच्या कथक नर्तकी आहेत. जयपूर घराण्यातील पद्मश्री रोषन कुमारीजी यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतले. या आधी मी त्यांच्या आवर्तन या कार्यक्रमाबद्द्ल लिहिलं होतच. अमेरिकेच्या राज्यस्तरीय सांकृतिक विभागाने व न्यूयॉर्कमधील ‘बँग ओन अ कॅन’ या प्रसिद्ध संस्थेच्या एका उपशाखेने(‘फाउंड साउंड नेशन’) मिळून ‘वन बीट’ नावाचा एक फेलोशिप उपक्रम आखला आहे. या उपक्रमातल्या आपल्या सहभागाबद्द्लचे आपले अनुभव त्या इथे मांडतात.
http://www.kajalnaik.blogspot.com/2013/11/blog-post_29.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उद्बोधक चर्चा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

आज यांची एक मुलाखत बघत असताना अपरिहार्यपणे या धाग्याची आठवण झाली. "kathak just happened to me" असं प्रांजळपणे सांगणाऱ्या कुमीबेनचा कथक प्रवास रोचक आहे. वेगवेगळ्या शिक्षकांकडून वेगवेगळे नृत्यप्रकार शिकूनही शंभूमहाराजांनाच त्या आपले गुरू मानतात कारण इतरांनी केवळ नृत्याचं तांत्रिक ज्ञान दिलं; पण शंभूमहाराजांकडून शिकताना नृत्याचा आत्मा गवसला असे त्या म्हणतात.

कुमीबेन याच मुळात पारंपरिक गुरू नाहीत. आपल्या शिष्यांना त्या सांगतात, "मला सारखासारखा नमस्कार करू नका, प्रत्येक सादरीकरणापूर्वी माझ्या नावाचा उल्लेख नको; आपल्या भल्याबुऱ्याची जवाबदारी स्वतः घ्या." त्यांनी राधा-कृष्ण, शंकर-पार्वतींखेरीज अनेक समकालीन, अमूर्त रचना सादर केल्या. त्यांचे अनेक शिष्यही (अदिती मंगलदास, निरूपमा-राजेंद्र, प्रशांत शहा) हा वसा पुढे चालवत आहेत. त्यांचा स्फूर्तिदायक प्रवास इथे ऐकता येईल.

https://www.youtube.com/watch?v=6AfcnQisvNE

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा मजेदार पण हे सर्व नृत्यप्रकार कंटाळवाणे का असतात?
बाली बेटावरचे रामायण नृत्यनाटिका पाहिल्यावर ओलिम्पिक पाहिल्यावर रस्त्यावरचे डोंबारी खेळ पाहिल्यावर वाटते तसे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0