लख्ख प्रकाश निर्मळ...

एखादी संस्था समाजासाठी खूप काही करत असेल पण त्याच वेळेला तिची पडद्यामागे काही कृष्णकृत्ये चालू असतील तर मग अशा वेळेला काय करावं? ‘त्या कृष्कृत्यांचा मागोवा घेत त्या संस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा? की ती संस्था जे काही चांगलं करत आहे ते पाहून तिच्या उर्वरित कृष्णकृत्यांकडे कानाडोळा करावा?’ असा यक्षप्रश्न नेहमीच कोणत्याही विचारीजनापुढे उभा असतो. पण दुर्दैवाने शंभरपैकी नव्याण्णव किंवा त्याही पेक्षा जास्त वेळेस असे विचारीजन मात्र दुसरा पर्याय निवडताना दिसतात. हाच प्रश्न मार्टी बॅरॉन पुढेही उभा होता. मग त्याने काय केलं? हे जर समजून घ्यायचं असेल तर ‘स्पॉटलाईट’ हा चित्रपट पाहावा लागेल. या चित्रपटाला यंदाचा ‘ऑस्कर’ पुरस्कार आहे बर. याच वर्षी ‘लिओनार्डो डी कॅप्रिओ’ या गुणी अभिनेत्याला ‘द रेव्ह्नंट’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘ऑस्कर’ मिळाला. चांगलंच आहे ते...पण दुर्दैवाने आपल्या देशात याच गोष्टीची जास्त दखल घेण्यात आली. व्यक्तिपूजा हि ज्यांच्या जनुकांतच आहे अशा भारतीयांना ‘लिओनार्डो’च आकर्षण ‘स्पॉटलाईट’ या ‘टीम वर्क’ पेक्षा जास्त वाटल्यास नवल नाही पण म्हणून यातून ‘स्पॉटलाईट’कडे दुर्लक्ष होता कामा नये. हे सांगण्यासाठी हा लेखप्रपंच. तर मग या ‘स्पॉटलाईट’ मध्ये आहे तरी काय?
‘द बोस्टन ग्लोब’ हे अमेरिकेतील एक वृत्तपत्र. २००२ सालची पार्श्वभूमी. मार्टी बॅरोन हा ‘संपादक’ म्हणून या वृत्तपत्रात नुकताच रुजू होतो. याच दरम्यान बोस्टन मध्ये एका गोष्टीची अत्यंत दबक्या आवाजात चर्चा सुरु असते. ती गोष्ट म्हणजे चर्चच्या पाद्र्यांकडून (प्रिस्ट) होणारं लहान मुला-मुलींचं लैंगिक शोषण. हि चर्चा मार्टीचं लक्ष वेधून घेते. मग तो आपली ‘स्पॉटलाईट’ ही चार पत्रकारांची टीम या प्रश्नाचा मागोवा घेण्यासाठी नेमतो. हा शोध सुरु होतो तो अशा प्रकारच्या शोषणाला बळी पडलेल्या ‘फील सॅव्हीयानो’ या व्यक्तीपासून आणी जस-जसा हा शोध पुढे सरकतो तस-तसं डोळे विस्फारणारी अनेक सत्यं पुढे येतात. यातून हे सर्व पत्रकार या निष्कर्षाप्रत येतात की हा प्रश्न वाटतो तितका उथळ नाही तर या लैंगिक शोषणाची पाळंमूळं अनेक राष्ट्रांमध्येच नव्हे तर थेट व्हॅटिकन पर्यंतही पोहोचलेली असू शकतात. त्यांचा हा शोधप्रवास खरोखरच प्रेक्षणीय आणि थक्क करणारा आहे. त्यात या पत्रकारांनी जीव ओतून केलेलं काम नजरेत भरतं. खरतर ‘कार्डीनल बर्नार्ड लॉ’ हे तेथील प्रमुख धर्मगुरू या सर्वाबाबत जाणून असतात पण केवळ काही भ्रष्ट पाद्र्यांसाठी संपूर्ण चर्चवर चिखलफेक होऊ नये असा त्यांचा युक्तिवाद असतो. ते एकदा मार्टीला भेटायला बोलावतात आणी म्हणतात की, “मी नेहमीच वृत्तपत्रांच्या कार्यामुळे प्रभावित होतो, पण मार्टी एक गोष्ट लक्षात ठेव की शहराची प्रगती तेव्हाच होते जेव्हा त्या शहरातील मोठ्या संस्था (म्हणजेच राज्यव्यवस्था-धर्मसंस्था-प्रसारमाध्यमे) एकदिलाने काम करतात. तेव्हा माझ्याकडून जी काय मदत हवी असेल ती निःसंकोचपणे माग.”त्यावर मार्टीने अतिशय शांतपणे दिलेलं उत्तर खरतर त्या धर्मगुरुसाठी कानाखाली जाळ काढल्यापेक्षाही जास्त वेदनादायक होतं. मार्टी म्हणतो की, “व्यक्तिशः मी असं मानतो की वृत्तपत्रांना जर त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर त्यांनी ‘एकला चालो रे’ हीच भूमिका घ्यायला हवी.”
पुढे जाऊन ही शोधमोहीम जेव्हा अधिक व्यापक बनते तेव्हा अनेक सुप्त कंगोरे समोर येतात.त्यापैकी महत्वाचा म्हणजे मॅक्लिश नामक एक विधिज्ञ. तो चर्चसाठी काम करत असतो. बाललैंगिक शोषणाची जी जी प्रकरणं चव्हाट्यावर येतील त्यांना न्यायालयाबाहेर थोपवून धरणं आणी गुपचूप समेट घडवून आणणं, हे त्याच काम. पण खरतर तो हे सगळं केवळ व्यवसाय म्हणून करत असतो. त्याचीसुद्धा आंतरिक इच्छा या ‘भ्रष्ट व्यवस्थेला सर्वांपुढे उघडं करावं’ अशीच असते. त्याने याआधी तसा प्रयत्नही केलेला असतो पण कोणाचीही साथ न लाभल्याने तो फोल ठरतो. मॅक्लिश सारखे इतरही काही लोक या चित्रपटात भेटतील की ज्यांनी स्वतःच्या चारित्र्यहननाच्या भीतीपोटी किंवा आत्मविश्वासाच्या अभावापायी असे प्रयत्न अर्ध्यावरच सोडलेले असतात. ‘स्पॉटलाईट’ची टीम या सर्वांना एकत्र आणते आणी मग काय घडतं ते चित्रपटातच पाहा.
संपूर्ण चित्रपटात कुठेही आदळ-आपट नाही, भावना भडकवणारी विधानं नाहीत. ना मार्टी विकला जात ना त्याचे सहकारी. इतकच कशाला तर आपल्याविरुद्ध काही शिजतंय याची कल्पना असतानाही मार्टीला चर्चकडून ना धमक्यांचे फोन येत ना त्याच्यावर जीवघेणे हल्ले होतं. त्याला फितवण्याचं काम मात्र जोरात सुरु असतं. हे सगळचं मला नवीन होतं. हा चित्रपट ऑस्करला पात्र ठरायला त्याचा आशय जितका महत्वाचा होता तितकचं महत्वाचं होतं ते म्हणजे वास्तववादी चित्रण. ही ‘सत्यकथा’ पडद्यावर दाखवताना कुठेही कृत्रिम वाटली नाही. जे घडलं आणी जसं घडलं तसचं ते दाखवण्यात आलं.
पण याच्याही पलीकडे जाऊन जी गोष्ट मनाला भावते ती म्हणजे मार्टीचं तत्त्वज्ञान. खरतर ‘द बोस्टन ग्लोब’ कडे अगदी सुरुवातीस १३ दोषी धर्मगुरूंची नाव आणी त्यांच्या विषयीच्या कथा उपलब्ध होत्या पण तरीही मार्टी हे सगळं प्रकाशित करायला नकार देतो. तो म्हणतो की, “यातून फारफार तर १३ धर्मगुरूंना शिक्षा होईल, चर्च जनतेची माफी मागेल आणी मागच्या दाराने हाच खेळ अव्याहतपणे सुरु राहील. तेव्हा तुम्ही मला हे सिद्ध करून दाखवा की हि व्यवस्था भ्रष्ट आहे. जे काही चालू आहे ते अत्यंत पद्धतशीरपणे आणी व्यवस्थेच्या प्रमुखांच्या आशीर्वादाने सुरु आहे. लक्षात ठेवा आपण व्यवस्थेच्या विरोधात आहोत, व्यक्तींच्या नव्हे.” त्याचा हा सल्ला त्याच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्षात आणला आणी त्यांनी चर्चमधील लैंगिक शोषणाची जगभरातील साखळी सिद्ध केली आणी तब्बल ६०० पेक्षाही जास्त पीडितांच्या कथा ‘द बोस्टन ग्लोब’ ने प्रकाशित केल्या. या साखळीत भारतातील ओल्लूर या केरळमधील ठिकाणाचाहि समावेश आहे.
‘द बोस्टन ग्लोब’ने त्यांचा पहिला लेख जानेवारी २००२ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केला. म्हणजेच ९/११ चा हल्ला होऊन उणेपुरे दोन महिनेही झाले नव्हते. अमेरिकेने इतके दिवस ज्या इस्लामी दहशतवादाला खतपाणी घातलं तोच आता त्यांच्या अंगणात फुगडी घालत होता. त्या ९/११ तारखेपर्यंत फक्त निष्पाप भारतीयच या दहशतवादाचे बळी ठरत होते पण कोणीही ते गांभीर्याने घेत नव्हतं. आंतरराष्ट्रीय राजकारणाची समीकरणं मुळासकट बदलणारी हि घटना दुर्दैवाने ख्रिस्चनांमधील उजव्या शक्तींनाही पाठबळ देणारी ठरली. अमेरिकेतील काही उजव्या शक्ती तर या ९/११ च्या घटनेला उघडपणे क्रुसेड अर्थात धर्मयुद्ध म्हणत होत्या. एकंदरीतच धार्मिक उन्मादाचा हा काळ...आणी अशा स्फोटक वातावरणात त्याच उजव्या शक्तींच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगण्याचं जे धाडस ‘मार्टी’ने दाखवलं त्याला तोड नाही. निर्भीड पत्रकारितेची जी काही मोजकी उदाहरणं या जगाच्या इतिहासात दिली जातात त्यात ‘स्पॉटलाईट’च नाव नक्कीच वर असेल यात शंका नाही. याचीच पावती म्हणून मार्टी बॅरॉन ला ‘पुलित्झर’ हा पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान मिळाला.
हा चित्रपट अनेक अर्थाने महत्वाचा आहे. मनोरंजनाच्या पलीकडेही खूप काही असलेला ‘स्पॉटलाईट’ म्हणूनच मला खूप आवडला. मग हा चित्रपट कोणी पाहावा?
माझ्या मते सर्वांनीच...जे जे लोक भ्रष्ट व्यवस्थेविरोधात लढत आहेत अशांना हा चित्रपट लढण्याची उर्मी,शक्ती देईल, ज्यांना लढण्याची इच्छा आहे पण अजूनही जे ‘बघ्या’च्याच भूमिकेत आहेत अशांना हा चित्रपट ‘आपणसुद्धा काहीतरी करू शकतो’ हा आत्मविश्वास देईल आणि जे निराशावादी आहेत त्यांना हा चित्रपट ‘व्यवस्था बदलली जाऊ शकते’ असा आशावाद देईल.
‘काय करणार कलियुग आहे’ अशी नपुंसक भूमिका घेण्यापेक्षा भोवतालच्या काळ्याकुट्ट भ्रष्ट व्यवस्थेतील हा लख्ख-निर्मळ प्रकाश असलेला ‘स्पॉटलाईट’ एकदा तरी बघाच...
ता.क.- सध्या मार्टी बॅरॉन ‘द बोस्टन ग्लोब’ मध्ये नाही. त्याने हे वृत्तपत्र सोडून चार-एक वर्ष झाली असतील. पण या वृत्तपत्राने ‘डोनाल्ड ट्रम्प’ या वावदुकावर विरोधात जे काही लिहिलंय ते प्रचंडच धुमाकूळ घालतंय. मार्टी नसला तरी अशा देशविघातक उजव्या शक्तींना रोखण्याचं त्यांचं काम असच चालू आहे. आपली वृत्तपत्रे-प्रसारमाध्यमे यांचा आदर्श कधी घेणार कुणास ठावूक???

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुरेख समीक्षा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इधर आ ऐ सितमगर हुनर आजमांएंगे , तु तीर आजमां हम जिगर आजमांएंगे.