पोकेमॉन गो : 20 वर्षांची तपश्चर्या

आज पोकेमॉन गो (Pokemon Go) या मोबाइल फोनवरच्या गेमने जगात धमाल उडवून दिली आहे. 7 जुलै 2016 साली, म्हणजे अगदी अलीकडेच रिलिज झालेल्या या गेमने जगातील सगळी रेकॉर्डस तोडली आहेत. केवळ एका रात्रीत हा गेम प्रचंड लोकप्रीय झाला व जगभर याच्यावर लोकांच्या उड्या पडू लागल्या. केवळ पहिल्या आठवड्यातच 10 लाखांच्या वर लोकांनी हा गेम डाऊनलोड करून त्याने ट्विटर, फेसबूक, स्नॅपचार्ट, इन्टाग्रॅम व वॉटसअपचे रेकॉर्ड तोडले व 600 कोटी डॉलर्सची कमाई केली. हा गेम चालत खेळायचा गेम आहे. या गेमने लोकांना एवढे वेड लावले आहे की एरवी अजीबात न चालणारी माणसे या गेमच्या निमीत्ताने मैलोंमैल चालायला लागली.
जॉन हॅन्कल याच्या डोक्यातून या कल्पनेचा उगम झाला. तो स्वतः एमबीए असून अनेक मोठ्या मोठ्या पोस्टवर त्याने काम केले आहे. पण 'पोकेमान गो' हा ओव्हरनाईट जगभर प्रसिद्ध हेणार्या् गेममागे त्याची 20 वर्षांची तपश्चर्या व अथक परिश्रम कारणीभूत आहेत. एकुण 10 टप्प्यांध्ये या गेमचा विकास करण्यात आला. ते टप्पे असे आहेत.
टप्पा 1
1996 साली, कॉलेज मध्ये शिकत असतानाच जॉनने 'मेरिडियन 59' नावाचा गेम बनवला. हा जगातला पहीला एमएमओ (मॅसिव्हली मल्टिप्लेयर ऑन लाईन गेम) होता. त्याने हा गेम 3डीओ कंपनीला विकला व जगाच्या नकाशाचे डिजिटल मध्ये रुपांतर करण्याच्या छंदाला वाहून घेतले.
टप्पा 2
2000 साली जॉनने 'किहोल' ही प्रणाली सादर केली. या मुळे नकाशे व एरियल फोटोग्राफी लिंक करता येऊ लागले. त्याने जगाचा पहीला ऑन लाइन जीपीएस लिंक्ड 3 डी नकाशा तयार केला.
टप्पा-3
2004 मध्ये गुगलने किहोल विकत घेतली व जॉनच्या सहाय्याने ज्याला हल्ली 'गुगल अर्थ' म्हणून ओळखले जाते ती प्रणाली विकसीत केली. त्याचवेळी जॉनच्या मनात जीपीस प्रणालीवर आधारीत कॉम्युटर गेम बनवण्याची कल्पना येऊ लागली.
टप्पा-4
2004 ते 2010 या काळात जॉनने गुगलमध्ये काम केले. त्याने गुगल मॅप व गुगल स्ट्रीट व्हू या प्रणाली विकसीत केल्या. त्याचवेळी त्याने आपली टीम बनवायला सुरवात केली जी पुढे पोकेमान गो साठी काम करणार होती.
टप्पा-5
2010 साली जॉनने 'निऍन्टिक लॅब' (Niantic Labs) या स्टार्ट अप कंपनीची गुगलच्या सहाय्याने स्थापना केली. नकाशावर गेम लेयर तयार करण्यासाठी या कंपनीची स्थापना झाली. जॉन सांगतो की 'निऍन्टीक' हे एका जुन्या जहाजाचे नांव आहे, जे गोल्ड रशच्या काळात सॅन फ्रॅन्सिस्कोला आले होते. वादळामूळे व इतर काही कारणांमूळे हे जहाज सॅनफ्रॅन्सिकोच्या किनार्याशवर रूतून बसले. अशी अनेक जहासजे रुतुन बसली. सॅनफ्रॅन्सिस्को शहर हे या रुतुन बसलेल्या जहाजांवर वसले व उभे राहीले आहे.
टप्पा-6
2012 साली जॉनने निऍन्टिकचा पहिला जिओ बेस्ड एमएमओ 'इन्ग्रेस' तयार केला. या विषयी जॉन सांगतो, ' इनग्रेसमध्ये जगातल्या सर्वात उंच भागापसून तुमच्या सेलफोनपर्यंत पोचण्याची क्षमता असते. असे काहीतरी करावे हे माझे स्वप्न होते व गुगल मध्ये काम करत असताना घरून ऑफीसमध्ये येताना व परत घरी जाताना मी सतत याचा विचार करत असे. माझी खात्री होती की आमच्याकडे जो जिओ डाटा उपलब्ध आहे त्याचा वापर करून एक जबरदस्त गेम बनवता येईल. माझ्या लक्षात आले होते की दिवसेंदीवस फोन पॉवरफुल होत चालले आहेत. सेलफोन, मोबाईल फोन व स्मार्टफोन वापरणार्यांकच्या संख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इंटरनेटच्या सर्व सुविधा आता स्मार्टफोममध्ये उपलब्ध होत आहेत. या सर्वांचा उपयोग करून एक रिअल वर्ल्ड ऍडव्हेन्चर बेस असा सुरेख गेम तयार करता येईल असे मला वाटत होते.'
टप्पा-7
2014 मध्ये गुगल व पोकोमान कंपनीने एकत्र येऊन एप्रिल फुल जोक तयार केला. या मध्ये लोकांना पोकेमानची कॅरॅक्टर्स गुगल मॅपवर पहाता यायची. ही कल्पना अत्यंत लोकप्रीय ठरली व या कल्पनेवर आधारीत गेम बनवण्याची कल्पना जॉनच्या मनात आली.
टप्पा-8
जॉनने इन्ग्रेस गेम वापरून इन्ग्रेसच्या युजर्सने जे मिटींग पॉईन्टस तयार केले होते त्याचा वापर करून पोकेमान गो हा गेम तयार करायचे ठरवले. जे मिटींग पॉइन्टस सर्वात जास्त लोकप्रीय होते ते पोकेमान गो मधले पोकेस्टॉप्स व जीम्स झाले. यावर जॉनचे म्हणणे आहे,
'पोकेस्टॉप्स हे युजर्सने सुचवलेली ठिकाणे आहेत. आम्ही जवळ जवळ अडीच वर्षे या लोकांचा अभ्यास करत होतो व इन्ग्रेस गेम कुठे कुठे जाऊन खेळणे त्यांना आवडते हे बघत होतो. त्यातील बरिसशी ठिकाणे रिमोट आहेत. उत्तर धृव व अंटार्टीकामध्ये पण याची पोर्टल आहेत. बरीचशी पोर्टल या दोन धृवांच्या मध्ये आहेत.'
टप्पा-9
डिसेंबर 2015 ते फेब्रुवारी 2016 या काळात जॉनने पोकेमान गो गेम 2016 मध्ये लॉन्च करण्यासाठी 25 मिलियन डॉलर्सचा फायनान्स उभा केला. यामध्ये गुगल, निनतेन्डो, पोकेमान कंपनी यांनी पण गुंतवणूक केली आहे.
टप्पा-10
6 जुलै 2016 रोजी जॉन आणि त्याच्या टिमने पोकेमान गो हा गेम अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्युझिलंडमध्ये लॉन्च केला. गेम लॉन्च केल्यावर एक आठवड्याच्या आतच कंपनीच्या शेअरची किंमत दुपीपेक्षा जास्तीने वर गेली. दररोज 2 मिलियन डॉलर्सचे उत्पन्न मिळते आहे तर जॉन हॅन्कलच्या संपत्तीमध्ये कित्येक पटीने वाढ झाली आहे.
तात्पर्य
कल्पना. मग ती कोणतीही असो, आधी छोट्या स्वरुपातच असते. केवळ एक किंवा दोन वाक्यांमध्ये सांगता येईल एवढी छोटी असते. मग ती कल्पना बरोबर आहे का चुकीची आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, व्यवहार्य आहे का अव्यवहार्य आहे, लोकांना आवडेल अशी आहे का न आवडणारी आहे या गोष्टी नंतरच्या आहेत. कल्पना सुचणे महत्वाचे असते. अनेकांना अनेक कल्पना सुचत पण असतात. पण अनेकांना या कल्पना साध्या, दळिद्री, मुर्खपणाच्या, येडपटपणाच्या किंवा फारच स्वप्नाळू वाटत असतात. 'याला कोण विचारणार? असे कधी होते का? मग याआधी कोणी असे का केले नाही?' यासारखे 'नकारात्मक प्रश्न विचारून या कल्पना मारल्या तरी जातात किंवा बाजुला फेकल्या तरी जातात. फारच थोडे लोक या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एखादी कल्पना प्रत्यक्षात उतरवणे यालाच 'इनोव्हेशन' म्हणतात. आपल्याकडे कल्पनांचा सुकाळ आहे. 'जुगाड टेक्नॉलॉजी' हे याचे उदाहरण आहे. पण 'इनोव्हेशन' चा दुष्काळ आहे.
जॉन हॅन्कलने कॉप्युटर गेमची एक कल्पना डोक्यात आणली. पण ही कल्पना कोणत्या स्वरुपात प्रत्यक्षात येईल याची त्याला कल्पना नव्हती. पण तो प्रयत्न करत गेला. प्रत्येक टप्यामध्ये त्याला नवीन ताकद, नवीन टीम मेम्बर्स व नवीन कल्पना मिळत गेल्या. प्रत्येक वेळी आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रीत करत गेला.
ओव्हरनाईट सक्सेस मिळवण्यासाठी त्याला 20 वर्षांची तपश्चर्या करावी लागली.
त्यामूळे तुमच्या डोक्यात एखादी कल्पना आली असेल तर ती फेकुन देऊ नका. ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करता येईल ते बघा. अनेक टप्यांमध्ये या कल्पनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक टप्यात नवीन शक्ती, नवीन माणसे. नवीन नशीब मिळवण्याचा प्रयत्न करा. कोणास ठाऊक तुमची पण कल्पना एक दिवशी क्लिक होईल, तुमचे पण नशीब फळफळेल. प्रयंत्नांती परमेश्वर या म्हणीवर विश्वास ठेवा.
जॉनने हेच केले.
आता तुम्ही काय करायचे हे तुमचे तुम्ही ठरवायचे नाही का?

(श्री. रवीन्दर सिंग यांच्या सौजन्याने) उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
*पूर्वानुमतीने पुनर्प्रकाशित

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

छान माहिती ... धन्यवाद ... आज

छान माहिती ... धन्यवाद ... आज रात्री मुलांना वाचून दाखवतो....आणि क्लासच्या फेसबुक पेज वर पण टाकतो