गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या- कवि बी

कवि बी यांची "गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या" ही कविता आमच्या कुमारभारती पुस्तकात होती. अतिशय उच्च कविता म्हणुन ही माझ्या लक्षात रहाण्याचे कारण आईने अतिशय रसाळ शब्दात केलेले रसग्रहण. या कवितेला एक ठाशीव पार्श्वभूमी आहे जी की कवितेतून कविने उत्तम रीत्या उलगडत नेलेली आहे. बी यांच्या "चाफा बोलेना" कवितेतील अध्यात्माची डूब या कवितेतही जाणवते. किंबहुना हे अध्यात्मिक सौंदर्यच या कवितेचे काळीज आहे.
.
प्रसंग - एक गरीब घरची चिमुरडी आहे. ८-९ वर्षाची असेल आणि ती साध्या कपड्यात, कदाचित हळद-कुंकू समारंभास किंवा भोंडल्याला मैत्रिणीच्या घरी गेलेली असताना बहुतेक काहीतरी बिनसले आहे. आणि मानी मनाच्या या लहान मुलीच्या मनाला काही तरी फार लागले आहे. पण करते काय आणि कसेबसे अश्रू लपवुन, ती घरी तर आलेली आहे. पण घरात शिरताच तिचा बांध फुटला आहे आणि वडीलांना सर्व प्रसंग धुसूंमुसूं रडत, तिने सांगीतलेला आहे. कदचित ही आईवेगळी पोर आहे, कदाचित आई अंथरुणाला खिळलेली आहे काही का कारण असेना पण या बाळास समजाविण्याची जबाबदारी त्या दरीद्री पित्यावर येऊन ठेपली आहे.
.
आणि मग त्या समजूत घालण्याच्या प्रसंगामधुन ही कविता उमलत गेलेली आहे. चिमुकलीला वडील समजावतात त्यामध्ये त्यांच्या नाना युक्ती दिसून येतात तर कधी गंमती जंमतीच्या उपमा तर कधी दरीद्री बापाचे विदीर्ण हृदय दिसून येते, कधी आपल्या मुलीचे वाटणारे कौतुक समोर येते तर कधी प्रेमळ पित्याच्या अंतःकरणामधुन निघालेले आशीर्वादाचे बोल प्रकट होतात.
.

गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या | का ग गंगायमुनाहि या मिळाल्या |
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला |कोण माझ्या बोलले गोरटीला |

.
वडील गंमती गंमतीच्या उपमा देऊन तिला खेळकरपणे समजावु पहात आहेत. ते म्हणतात (मला वाटतं की गाईसारखे तुझे तेजस्वी, काळेभोर डोळे पाण्याने का बरं भरुन आले?), गालांवरुन गंगायमुना का गडे वाहू लागल्या? नाकांतून सू: सू: जे ऊष्ण वारे वहाताहेत त्यांमुळे आमच्या बछडीचे गाल म्हणजे जणू गुलाबी, लाल गोमटे काश्मीरी गुलाबच जणू सुकुन गेले आहेत. आणि मुलीच्या गालावरती रुळणारे मऊ केस म्हणजे जणू नंदनवनातील वेलीच आहेत. हे ऊष्ण वारे या वेलींना झोके देत आहेत. वडील म्हणतात - तू तर आपल्या दोन्हीकडच्या पितरांची चित्तचोरटी आहेस अशा माझ्या छबेलीला कोण करंटे ते घालून पाडून बोलले?
बरे असे गोड बोल ऐकून आता तरी हीने रडे थांबवावे ना? पण नायिकेला मैत्रिणीचे ते कटू बोलणे फारच जिव्हारी लागले आहे आणि चंद्रचांदणे, नक्षत्रमण्यांची दूडच जणू अशी तिची अश्रूमाळ अजुनी वहातच आहे. बाईंनी जमिनीवर लोळणच घेतलेली आहे. आणि मग या उत्पाताचे कारण वाचकांच्या लक्षात येते. कोणा श्रीमंत कुलीनांच्या पोरीने हिला "भिकारीण" म्हणुन चिडविले आहे.
.

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या |अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या |
गौर चैत्रींची तशा सजूनि येती |रेशमाची पोलकी छिटे लेती |
तुला 'लंकेच्या पार्वती' समान |पाहुनीया, होवोनि साभिमान |
काय त्यातिल बोलली एक कोण |'अहा ! - आली ही पहा - भिकारीण |

.
मग वडील अनेक सुंदर उपमा देऊन तिला समजावायचा प्रयत्न करतात. अगं रत्ने-सोने मातीतच जन्म घेते पण तुला माहीत आहे ना की ते राजाच्या वक्षी रुळत असते, कमळ नाही का चिखलात उगवते पण वसंतरऋतुत मिरविते. मग धूळीमध्ये जन्म झाला म्हणुन का रत्ने गारगोटी बनतात, चिखलात उगवल्याने कमल का भिकारी ठरते? मग आता सांग तू दरीद्री पित्याच्या घरी जन्मलीस म्हणुन तू का भिकारीण ठरणारेस? पण त्यांना काय माहीत की बालहट्टापुढे तर्काचे काय कोणाचेही काही चालत नाही. बालहट्ट जसा उगवतो तसा आपोआपच मावळावा लागतो.
आता हेही शस्त्र फोल ठरते आहे हे पाहून वडील म्हणतात शाळेतील मुली वाचाळच असतात बाई, कोणी वेड्यासारखं कठोर बोलून जातं पण तू तर शहाणी आहेस ना, मग काय लक्ष देतेस अशा वेड्या शब्दांकडे! पण अजुनही मुलीच्या रडण्याला, अश्रूंना खळ नाही. गरीबी जे सामंजस्य शिकवते, तडजोड शिकवते, ती अजुन ही लहानशी शिकलेली नाही. हे एक प्रकारी बरे म्हणावे की वाईट - असा प्रश्नच वाचकांपुढे ऊभा रहातो.
.

मुली असती शाळेतल्या चटोर |एकमेकीला बोलती कठोर |
चित्तात काय धरायाचे |शहाण्याने ते बोल वेडप्याचे |
.
पंकसंपर्के कमळ का भिकारी |धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी |
सूत्रसंगे सुमहार का भिकारी |कशी तूही मग मजमुळे भिकारी |

.
वडील तिच्या उज्जवल भविष्याची आशा तिला दाखवितात. आज पासून उद्याकडे लक्ष वेधायचा प्रयत्न करतात. जशी बाल्यावस्थेत असली तरी नदी ही सागरासच जऊन मिळते तद्वत तुझ्या रुपगुणांनी तुझे नशीब उजळणार आहे. गंगा-यमुना जेथे मिळतात तेथे सरस्वती आल्याशिवाय राहील का? तसेच तुझ्यमध्ये रुप-गुणांचा संगम आहे, अशावेळी तुझे नशीब, भाग्य उजळलयाविण कसे राहील?
पण या उद्याची त्या बालिकेस पर्वा काय? आजचे बोला. आज मला परकरपोलके नाही, मोत्याची माळ नाही, मला मैत्रिणी चिडवतात.... असा हा बालहट्ट चालूच रहातो.
.

बालसरिता विधुवल्लरीसमान |नशीबाची चढतीच तव कमान |
नारीरत्ने वीर असामान्य |याच येती उदयास मुलातून |
.
भेट गंगायमुनास होय जेथे |सरस्वतीही असणार सहज तेथे |
रुपसद्गुणसंगमी तुझ्या तैसे |भाग्यनिश्चित असणार ते अपेसे |

आता वडील अजुन एक युक्ती करतात. आता तिची स्तुती करुन, तिच्याकडे काय चांगलआहे, ती कशी वैभवशालीनी आहे हे समजावतात. प्रत्येकाला आपले अपत्य हे सौंदर्याची खाणाच वाटते आणि हे वडीलही त्या नियमास अपवाद नाहीत. त्यांच्या दृष्टीतून मुलीच्या गोंडसपणाची सफर कवि बी घडवुन आणतात. अगं तुझ्या पाणीदार डोळ्यातील तेज तर पहा, हिर्‍या-मोत्यांचे, पाचू-माणकांचे तेज त्यापुढे फिकुटले आहे. आणि तुझी खळी तर बघ जणू पाण्याला खळे पडून त्यात चंद्रचांदणे पडावे. तू स्वतः सौंदर्याची, गोंडसपणाची, लावण्याची खाणी आहेस तुझ्यापुढे कसली ती पत्रास कृत्रिम कपडे, दागिन्यांची!
.

नेत्रगोलातून बालकिरण येती |नाच तेजाचा तव मुखी करीती |
पाच माणिक आणखी हिरा मोती |गडे नेत्रा तव लव ना तुळो येती |
.
लाट उसळोनी जळी खळे व्हावे |त्यात चंद्राचे चांदणे पडावे |
तसे गाली हासता तुझ्या व्हावे |उचंबळुनी लावण्य वर वहावे |
.
गौरकृष्णादिक वर्ण आणि |त्यांच्या छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या |
सवे घेऊनी तनुवरी अद्भुतांचा |खेळ चाले लघु रंगदेवतेचा |
.
काय येथे भूषण भूषवावे |विविध वसने वा अधिक ते शोभवावे |

आणि मग अशा तिच्या सौंदर्यात तल्लीन झालेल्या कविमनाच्या वडीलांना आपल्या मुलीत पार्वती, आदिमाया न दिसावी तरच नवल. वडील अध्यात्मातील उपमा देत तिला नव्हे तर स्वतःलाच मग म्हणतात - सर्व कामनांची मुर्तिमंत रुप अशी आदिपुरुषाची जाया जी आदिमाया, तिला जसा सृष्टी घडविण्या-मोडण्याचा सोस, सृष्टीशृंगारात विलास करण्याची ओढ तशीच तर तू बाळी. तुझा हा हट्ट नवीन हट्ट का आहे! आदिमायेने नटण्यामुरडण्याचा जो हट्ट केला तोच हट्ट तूसुद्धा करते आहेस. फरक इतकाच की मूळमायेचे नटणे म्हणजे सृष्ट्यारंभ तर तुझे, चिमुरडीचे नटणे म्हणजे भरजरी परकर-पोलके. तुझा हा जगाच्या आदिपासून चालत आलेला स्वभाव त्यात बदल कसा व्हावा!
हे कडवे माझ्या मते कवितेचे हृदय आहे.आपल्या मुलीमध्ये पार्वतीचे रुप पहाणारे वडीलही धन्य आणि इतक्या सुंदर उपमेकरता त्यांची प्रेरणा बनणारी त्यांची कन्याही धन्य. केवढे हे पितृप्रेम!
.

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध |सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध |
त्याच हौसेतून जगद्रूप लेणे |प्राप्त झाले जीवास थोर पुण्य |
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही |असे मूळातचि आज नवी नाही |

.
पुढे वडीलांच्या हृदयातून कन्येकरता जी आशीर्वचने, जे आशीर्वाद निघाले ते वर्णनातीत आहेत. आदिपुरुष-आदिमाया यांच्या अध्यात्मिक चिंतनानंतर वडीलांचे मन साहजिकच भविष्यात ओढ घेते व ते विचार करु लागतात, आपली मुलगी कोण्या भाग्यवंताच्या घरी नांदेल आणि तो किती पुण्यवान असेल. या विचारातही इतकी उदात्तता आहे, आदर्शवाद आहे. कोण्या तपस्व्याच्या तपाचे फळ तू आहेस की कुणा पुण्यवंताचा स्वर्ग आहेस! कुण्या गुणवंताची कीर्ती म्हणुन तू मिरविणार आहेस का कुण्या वीरपुरषाची शक्ती होणार आहेस! दिसामासी तू मोठी होशील एक वेळ येईल मी कन्यादान करेन. कसा असेल तुझा भाग्यवान, पुण्यवान सहचर!
.

तोच बीजांकुर धरी तुझा हेतू |विलासाची होशील मोगरी तू |
तपःसिद्धीचा "समय" तपस्व्याचा |"भोग" भाग्याचा कुणा सभाग्याचा |
.
पुण्यवंताचा "स्वर्ग" की कुणाचा |मुकुट कीर्तीचा" कुण्या गुणीजनाचा |
"यशश्री: ही वा कुण्या महात्म्याची |धार कोण्या रणधीर कट्यारीची |
दिवसमासे घडवीतसे विधाता |तुला पाहुनी असे वाटते चित्ता |

.
पण वाचक जाणतातच या लहानगीला ना हे विचार कळतात ना तिला त्यात काही गम्य आहे. आता बहुते तिचे थैमान वाढले आहे, रडे अधिकच वाढले आहे. वडील परकर-पोलके, मोत्याची माळ देत तर नाहीतच आहेत उलट काहीतरी अगम्य भाषेत बोलत आहेत, हे पाहून तिच्या हट्टाने रौद्र रुप धरण्यास सुरुवात केली आहे. : )
.
त्यामुळे वडीलही अगदी जेरीस आलेले आहेत. कोणतीही मात्रा तिच्यापुढे चालत नाहीये.त्यामुळे वडील आता खोटी का होइना वचने देऊन रडे थांबविण्यास लागले आहेत."बाई ग! आणतो तुला मखमली पोलके, मोत्यांची कुडी, केसात घालायला सुवर्णफूल सग्गळं सग्गळं आणतो पण हा प्रलय आवर, हा अश्रूंचा पूर, हा थयथयाट थांबव. : )
.
पण आशवासन दिल्यावरती मग ते स्वतःच विचारात पडतात, आश्वासन तर दिले पण पूर्ण कसे करु? आपण तर पडलो दरिद्री, करंटे आपल्या पोटी अशी गुणी, सुंदर पोर देवाने द्यावीच कशाला? कशाला हे वैभव, दरीद्री वडीलांच्या घरी? आणि ते असे स्वतःला मनातल्या मनात दूषणे देऊ लागतात. व खिन्नतेने म्हणतात "थांब देवाच्या गावास जाऊन त्याला विचारतोच की कारे बाबा, अशी चेष्टा लावलीस. का इतकी गोड-गुणी पोर आमच्यासारख्या निर्धनाच्या ओटीत घातलीस?" मुलीचा आक्रोश पाहून वडीलांना मरणप्राय दु:ख होत आहे हेच या ओळींतून दिसून येते.
.

तुला घेइन पोलके मखमलीचे |कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे |
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी |परि आवरि हा प्रलय महाभारी |
.
प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे |कोड किंचित्‌ पुरविता न ये त्यांचे |
तदा बापाचे हृदय कसे होते |नये वदतां, अनुभवी जाणती ते |
.
देव देतो सद्गुणी बालकांना |काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना |
लांब त्याच्या गावास जाउनीया |गूढ घेतो हे त्यास पुसोनीया |

.
अशा निराशेच्या गर्तेत ते कोसळलेले आहेत आणि काय आश्चर्य मुलीचे रडे एकदम थांबते. हां हां म्हणता अवघी बालसृष्टी बदलून जाते. आता रडारडीचा, अश्रूंचा पावसाळा होता तो आता हास्याचे चांदणे पसरते. कारण काय तर तिला "गावाचे" नाव ऐकू येते. हां "गावाला जायचे" ही भाषा त्या बालिकेला चट्टकन समजते. म्हणजे एवढ्या उपमा, युक्ती, आशीर्वाद सर्व मुलीच्या कानी पडत होते.पण काहीही कळत नव्हते पण "गाव" हा शब्द चिमुरडीला बरोब्बर कळला. आपले वडील गावाला जाणार म्हणताच त्यांना घट्ट गळामिठी मारुन ती निरागस पोर म्हणते "मी पण येण्णार. मी पण येणार. कधी जायचं गावाला?" : )
हा विरोधाभास की वडील मरणाची भाषा करतात, निर्वाणीची भाषा करतात आणि काय आश्चर्य मुलीचे रडे एकदम थांबते. जे वडीलांना हवे ते साध्य होते. हे कवितेचे शिखर आहे.
.

"गावी जातो," ऐकता त्याच काली |पार बदलुनी ती बालसृष्टि गेली |
गळा घालुनि करपाश रेशमाचा | वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा |

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

गाइ पाण्यावर काय म्हणुनि आल्या?
कां ग गंगायमुनाहि या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोललें गोरटीला?

उष्ण वारे वाहती नासिकांत,
गुलाबाला सुकविती काश्मिरांत,
नंदनांतिल हलविती वल्लरींला,
कोण माझ्या बोललें छबेलीला?

शुभ्र नक्षत्रें चंद्र चांदण्यांची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे! भूईवर पडे गडबडून,
कां ग आला उत्पात हा घडून?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटें लेती.

तुला लंकेच्या पार्वती समान
पाहुनीयां, होवोनि साभिमान
काय त्यांतिल बोलली एक कोण
'अहा! - आली ही पहा- भिकारीण!'

मुली असती शाळेंतल्या चटोर;
एकमेकींला बोलती कठोर;
काय बाई! चित्तांत धरायाचे
शहाण्यानें ते शब्द वेडप्यांचे?

रत्न सोनें मातींत जन्म घेतें,
राजराजेश्वर निज शिरीं धरी तें;
कमळ होतें पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायातें.

पंकसंपर्कें कमळ का भिकारी?
धूलिसंसर्गें रत्न का भिकारी?
सूत्रसंगें सुमहार का भिकारी?
कशी तूंही मग मजमुळें भिकारी!

बालसरिता विधु वल्लरी समान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारि-रत्नें नरवीर असमान्य
याच येती उदयास मुलातूंन.

भेट गंगायमुनांस होय जेथें
सरस्वतिही असणार सहज तेथें;
रूपसद्गुणसंगमी तुझ्या तैसें,
भाग्य निश्चित असणार तें अपैसें.

नेत्रगोलांतुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखीं करती;
पाच माणिक आणखीं हिरा मोतीं
गडे! नेत्रां तव लव न तुळों येती.

लाट उसळोनी जळी खळें व्हावें,
त्यांत चंद्राचे चांदणे पडावें ;
तसे गालीं हासतां तुझ्या व्हावें,
उचंबळुनी लावण्य वर वहावे!

गौर कृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोंवळ्या सम वयाच्या
सवें घेऊनि तनुवरी अद्भुताचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा!

काय येथें भूषणें भूषवावें,
विशिध वसनें वा अधिक शोभवावें?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थलीं कृत्रिमाची!

खरें सारें! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टिश्रृंगारें नित्य नटायाची.

त्याच हौसेंतुन जगद्रूप लेणें
प्राप्त झालें जीवास थोर पुण्यें;
विश्वभूषण सौंदर्य-लालसा ही
असे मूळांतचि, आज नवी नाहीं!

नारि मायेचें रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तूं!

तपःसिद्धीचा समय तपस्व्याचा,
भोग भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा स्वर्ग की कुणाचा
मुकुट किर्तीचा कुण्या गुणिजनाचा

यशःश्री वा ही कुणा महात्म्याची
धार कोण्या रणधीर कट्यारीची;
दिवसमासें घडवीतसे विधाता
तुला पाहुनि वाटतें असें चित्ता!

तुला घेइन पोलकें मखमलीचें,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचें,
हौस बाई! पुरवीन तुझी सारो
परी आवरि हा प्रलय महाभारी!

ढगें मळकट झांकोनि चंद्रिकेला,
तिच्या केलें उद्विग्न चांदण्याला;
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट!

प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे
कोड किंचित् पुरवितां न ये त्यांचे;
तदा बापाचें हृदय कसें होतें,
नये वदतां, अनुभवी जाणतीं तें!

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा!
प्राप्त होतां परि हे असे प्रसंग
हृदय होतें हदरोनिया दुभंग!

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनि आम्हांस करंट्यांना?
लांब त्यांच्या गावास जाउनीया
गूढ घेतों हें त्यांस पुसोनीयां!

" गांवि जातों" ऐकतां त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली!
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येतें मी" पोर अज्ञ वाचा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

वा! २-३ कडवी अधिक आहेत तर. शेअर केल्याबद्दल, धन्यवाद अवंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाळेत अशा आम्हाला शिकवणाय्रा बाई असत्या तर------?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile आमच्या काही काही बाई खूप छान शिकवायच्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाया?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बाईंना बाया म्हणायला कसंतरीच वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही कविता वाचनात आली होती आणि आवडलीही होती पण पहिली ओळ आणि 'विभाविमला आपटे प्रधानांच्या' या दोनच ओळी ध्यानात राहिल्या होत्या. कोणीही दोन बहिणी अथवा मैत्रिणी ऐटीत चालताना दिसल्या की आमच्या घरी 'त्या बघ विभाविमला जाताहेत' असे थोडेसे कौतुकाने, थोडेसे थट्टेने म्हणण्याची पद्धत होती. हा संदर्भ या कवितेशी जोडला गेलेला आहे माझ्या मनात. आज पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या. कविताही सुंदर आणि रसग्रहणही तितकेच सुंदर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद राही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अप्रतिम कविता आणि तेवढेच अप्रतिम रसग्रहण.
.
शुचिमामी मराठीची मास्तरीण का नाही झाली?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही रे बाबा. या रसग्रहणाची कितीतरी विविध अंगे असतील अजुन. मला कुठे जमायला. हां मात्र एखाद्या भाषेत एम ए केलं असतं तर असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१११.. अप्रतिम कविता आणि तेवढेच अप्रतिम रसग्रहण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता फार सुरेख उलगडली आहेस. कवितेबाहेरचं जरा... मुलीचं दुखावलं जाणं बापालाच जास्त लागतं. आई "त्यात काय एवढं रडायचं?" म्हणून कामाला लागली असेल. Wink

प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे
कोड किंचित् पुरवितां न ये त्यांचे;
तदा बापाचें हृदय कसें होतें,
नये वदतां, अनुभवी जाणतीं तें!

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा!
प्राप्त होतां परि हे असे प्रसंग
हृदय होतें हदरोनिया दुभंग!

किती चटका लावणार्^या ओळी आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस्स्स. आईला हजार कामं धामं असतात्च. अर्थात असे नाही की वडीलांना काम नसते परंतु लेक ही वडीलांनाच धार्जिण असते (बरेचदा. अपवाद असतीलच.).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आई "त्यात काय एवढं रडायचं?" म्हणून कामाला लागली असेल.

किंवा, आई गचकलेली असू शकेल काय? कदाचित तिला जन्म देतानाच? आणि मग बाप तिचा एकट्यानेच सांभाळ करत असेल काय?

.........

तो काळ लक्षात घेता हे फारसे अनकॉमन नसावे. किंबहुना, त्या काळात चित्रपट कदाचित जास्त बनत नसतीलही, परंतु गेला बाजार कथा-कवितांकरिता फॉर्म्युला १अ बनण्याइतके तर नक्कीच कॉमन असावे.

१अ त्या काळाचे सोडा. हा फॉर्म्युला अगदी परवापरवापर्यंत पॉप्युलर होता. (कोणाला 'माहेरची साडी' आठवतोय?)

प्रॉम्प्टली दुसरे लग्न न करता किंवा गेला बाजार तुरंत अंगवस्त्र, नाटकशाळा वगैरे भानगडींत न पडता. वस्तुतः, तो काळ लक्षात घेता त्याचे तसे करणे हेही तितकेसे अनकॉमन न ठरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता मनाला भावली. अश्याच सुरेख कवितांचा आस्वाद मिळत राहावा हि अपेक्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तत्कालीन प्रसिद्ध अशा ४९ कवींच्या काव्यांचा एक संग्रह संपादक दिनकर गंगाधर केळकर ('कवि अज्ञातवासी' ह्या नावाने प्रसिद्ध असे कवि आणि राजा केळकर संग्रहालयाचे प्रवर्तक) ह्यांनी 'श्रीमहाराष्ट्र शारदा' ह्या नावाने १९२३ साली प्रसिद्ध केला होता. (तत्कालीन मूल्य दीड रुपया!) त्यात नारायण मुरलीधर गुप्ते (Bee- जन्म १८७२) अशा शीर्षकाखाली 'माझी कन्या' अशा नावाने ही कविता छापली आहे. सर्व कविता वर सदस्या अवंती ह्यांनी दिल्याप्रमाणेच आहे. पुस्तकामध्ये कवितेचे मूळ शीर्षक 'माझी कन्या' ह्या प्रकारे दाखविले आहे. कवि बी ह्यांच्या समोरच ते तसे दिलेले असल्याने तेच मूळचे शीर्षक आहे असे म्हणता येईल. 'गाइ पाण्यावर काय म्हणुनि आल्या' हे थोडे कमी गद्य असे शीर्षक तिला नंतर कोठेतरी चिकटलेले असावे.

ह्या काव्यसंग्रहातील ही कविता वाचतांना एक विशेष बाब माझ्या लक्षामध्ये आली. कवितेमधील

तपःसिद्धीचा 'समय' तपस्व्याचा,
'भोग' भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा 'स्वर्ग' की कुणाचा
'मुकुट' कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा
'यशःश्री' वा ही कुणा महात्म्याची
धार कोण्या रणधीर कट्यारीची;
दिवसमासें घडवीतसे विधाता
तुला पाहुनि वाटतें असें चित्ता!

ह्या दोन कडव्यांतील वर दर्शविलेले ५ शब्द '---' असे अवतरणात दाखवून त्यांना काही विशेष अर्थ आहे असे सूचित केलेले दिसते. ह्याचे कारण आणि त्यामागची गर्भित सूचना काय असावी ते मात्र कळत नाही. कदाचित कवीच्या संपर्कातील काही घटना वा व्यक्ति ह्यांच्या सूचना देणे हा हेतु असू शकेल.

कवि बी ह्यांचे त्रोटक जीवनवृत्त आणि त्यांच्या बेचाळीस कविता ह्या ब्लॉगमध्ये पाहता येतील. तेथेहि वरील कवितेचे नाव 'माझी कन्या' असेच आहे. तेथेच बी ह्यांची दुसरी प्रसिद्ध कविता 'चाफा' हीहि दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(तत्कालीन मूल्य दीड रुपया!)

भलताच महाग छंद की हो!

1923चा विदा माझ्याकडे नाही, पण 1935च्या आसपास आजोबा कारकुनाच्या नोकरीला लागले तेव्हा त्यांना अठरा रुपये पगार होता. त्याही हिशोबाने पगाराच्या 8.33% किमतीचं एकच पुस्तक ही मोठी खरेदी असणार!

त्याकाळी गावाबाहेर असलेल्या घराचं भाडं तीन रुपये, काही आणे, पै होतं. चार रुपये धरू. घरभाड्याच्या ~40% किमतीचं पुस्तक!

...आणि आपण आज मराठी पुस्तकं महाग असण्याबद्दल रडतो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्याही हिशोबाने पगाराच्या 8.33% किमतीचं एकच पुस्तक ही मोठी खरेदी असणार!

पगाराच्या ८.३३%च ना? तेही मासिक पगाराच्या! आय मीन, वार्षिक पगाराच्या ५०% किंमत असलेली एखादी चीजवस्तू जर सामान्य मध्यमवर्गीयास सहज परवडू शकते, तर त्यापुढे मासिक पगाराच्या ८.३३% म्हणजे किस झाड की पत्ती!

त्या काळात पुस्तके ५ वर्षांच्या सुलभ मासिक हप्त्यांवर विकत घेण्याची सुविधा नव्हती काय?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कविता सुन्दर आहे आणि त्याचे रसग्रहणही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सई

मागे मिपावर कुणीतरी जुन्या कवितांची लिंक दिली होती.

माझे वडील देखील अधून मधून त्यांच्या काळच्या जुन्या कविता म्हणत असतात. त्यांच्या आवडीची कविता म्हणजे
"शर आला तो, धावुनि आला काळ विव्हळला श्रावणबाळ"

खरेच जुन्या कविता, जुनी मराठी गाणी म्हणजे खजिनाच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला "श्रावणमासी हर्ष मानसी" फार आवडते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रानपाखरा रोज सकाळि येसि माझ्या घरा
गाणे गाउनी मला उठविसी मित्र जीवाचा खरा
शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी
सतेज डोळे चमचम करीती रत्ने जणु गोजिरी||१||

पाय चिमुकले, पंख चिमुकले देह तुझा सानुला
अफाट आभाळातुन कैसे उडता येते तुला
रात्र संपता डोंगर चढुनि वर येतो भास्कर
तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर||२||

वाट चालुनि संध्याकाळि रवि सोडि अंबरा
आणि तूही मग पंख उभारुन जासी अपुल्या घरा
सूर्यासंगे जासी येसी सदाकदा का बरे
शेजारी आहेत काय रे परस्परांची घरे||३||

देह एवढा अपाय तुजला करील कोणी इथे
म्हणुनी का तुज रवीबरोबर माय तुझी धाडीते
सांगतोस का तिला कसा हा छानदार बंगला
होते का रे कधी आठवण माझी सखया तुला||४||

तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी
नेशील का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवुनी पंखावरी
माय तुझी येइल सूर्यही येइल भेटायला
मजाच होईल सख्या पाखरा नेई एकदा मला||५||

- गोपीनाथ्
++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आम्रवृक्ष

आम्रा! तरु दिसती या शतशा वनात
नाही तुजसम दुजा गमते मनात
आहेत की गुण तुझे उपयुक्त मोठे
नाही तयांस तुलना भुवनात कोठे||१||

आहेत पल्लव तुझे शुभकार्यचिन्हे
संतोषती जनमने बघता विखिन्ने|
अन्यात हा गुण पहा तीळमात्र नाही
वंदु नये मग तरो, तुज का जनाही||२||

उष्णी दमोनि तवसन्निध ये प्रवासी
छाया तुझी प्रथम दे सुख बा तयासी|
त्यानंतरे अमृततुल्य तुझ्या फलाही
होते अमूप सुख, कोण म्हणेल नाही|३||

सर्वी समानपण केवळ मूर्तीमंत
ठायी तुझ्या वसतसे गुण हा पसंत्
की कोकिळी अधिक लोभ उणा न काकी
वाखाणितात गुण हा सुर सर्व नाकी||४||

कोणाकडुन उपकार कधी न घेणे
जे देववेल सुख ते इतरास देणे
या वर्तना बघुनि साधुही लाजताती
की भक्ती ते करुनि मुक्तीस मागताति||५||

ज्या ईश्वरे जनु दिले तुज भूमीलोकी
त्याची अशीच निरपेक्ष कृती विलोकी
बापातले वळण पूर्ण मुलात आले,
आश्चर्य हे तरुवरा! वद काय झाले||६||
- विनायक कोंडदेव ओक
++++++++++++++++++++++++++++++++++++++

फूलामध्ये फूल बाई जाईचे
यशोदेचे मूल नवलाईचे|
जाईचा बांधू झोपाळा,
बसवु त्यावर गोपाळा|
या टोकाहुन त्या टोका,
या त्याला देऊ झोका|
झोका भिडु दे आभाळा,
भुरळ पडु दे चंद्राला|
चांदणे निळसर कृष्णाचे,
पारणे साऱ्या तृष्णांचे|
सुख हे मिळु दे त्रैलोका,
ये बाई, दे बाई, दे झोका|
फूलामध्ये फूल बाई जाईचे
यशोदेचे मूल नवलाईचे|
- बा भ बोरकर्
+++++++++++++++++++++++++++++++++++

सृष्टीचे चमत्कार

वैशाखमासी प्रतिवर्षी येती, आकाशमार्गी नवमेघपंक्ती|
नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा||१||

पेरुनिया ते मण धान्य एक, खंडीस घे शेतकरी अनेक|
पुष्पे फळे देति तरु कसे रे, हे सृष्टिचे कौतुक होय सारे||२||

ऋतू वसन्तादिक येती जाती,तैसेची तेही दिन आणिक राती|
अचूक चाले क्रम जो असा रे, हे सृष्टिचे कौतुक जाण सारे||३||

पाणी पहा मेघ पितात खारे,देती परि गोड फिरुन सारे|
तेणेचि होय हा सुकाळ लोकी,हे सृष्टिचे कौतुक बा विलोकी||४||

ते तापले डोंगर उष्ण्काळि,पाने तृणे वाळुनि शुष्क झाली|
तथापि तेथे जळ गार वाहे, झऱ्यातुनि कौतुक थोर बा हे||५||

वठोनि गेल्या तरुलागी पाणी, घालावया जात ना रानी कोणी|
वसंती ते पालवतात सारे, हे सृष्टीचे कौतुक होय बा रे||६||
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

स्मशान असावे दोन हाकांवर - मनाच्याही
पावलांना सराव असावा त्याच्या सांगाताचा
विशेषतः: सायंकाळी
बसावे शिमिटाच्या थंडगार सोप्यावर
उमगून घेत त्याचे इंगित
उत्तरायण वाऱ्यात स्नान करीत
वडाच्या झडणाऱ्या पानांच्या मुकाट तालावर
जिवाच्या पंखानी हिंडून सारे भस्मनील आकाश
नि:संग होऊन यावे आद्याच्या निवांतात
उत्कट रसरशीत करीत
अनासक्तीच्या पानवळाने क्षण न क्षण
उगवत्या नक्षत्रांसारखे
निकटतम आस्वाद्य
चेतवून पाहाव्या गेलेल्या जिवलगांच्या
जिवंत झालेल्या जागत्या चिता
आणि स्वतः:चीही
ज्वालांच्या रुद्रतांडवात नटेश्वराचे ध्यान करीत
स्वतः:च प्रार्थनेची ज्वाला होऊन
कपाळी चंद्राची कोर उटी होईपर्यंत
आणि शरीरकेळीचे थरथरते लवलवीत हिरवे पान
उगवत्या जीवनाला प्रेरणेचे खत होण्यासाठी
- बा भ बोरकर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पावस देखि रहीम मन, कोइल साधे मौन.
अब दादुर वक्ता भए, हमको पूछे कौन...
पावसाळ्यात कोकीळा मौन पाळते कारण ती वेळ बेडकांच्या कर्कश्श उच्चारवाची असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! सुरेख . आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पावस देखि रहीम मन, कोइल साधे मौन.
अब दादुर वक्ता भए, हमको पूछे कौन...
पावसाळ्यात कोकीळा मौन पाळते कारण ती वेळ बेडकांच्या कर्कश्श उच्चारवाची असते.

मस्त परीक्षण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आचार्य अत्रे यांच्या कऱ्हेचे पाणीमध्ये एक अख्खे प्रकरण कवी बी यांच्यावर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्युच्च कविता.
आणि खूप छान रसग्रहण. आम्हाला दहावीला नाईक सर होते मराठी शिकवायला. ते धडे, कविता यांच्यातील भावनाकल्लोळ इतका उच्चप्रकारे मांडीत कि सारा वर्ग रोमांचित झालेला असे.
==============================
या कवितेत लहानगीला समजावण्याचे सारे सामान्य, व्यवहार्य प्रयत्न सुरुवातीला आलेले आहेत. पण जेव्हा समस्या सुटतच नाही आणि असह्यतेने मनुष्य तुटतो तेव्हा तो "ईश्वराकडे जाण्याची" तीव्र इच्छा मनी आणून वेळ मारून नेतो. मृत्यूची वांछा होणे या अवस्थेपलिकडे मनुष्य दु:खि होऊ शकत नाही. पण कवितेतला पिता इतका अभागी आहे कि तो जेव्हा ही इच्छा आपण कोठे आहोत याचे भान ठेऊन योग्य शब्दांत व्यक्त करतो तेव्हा तेच शब्द, तिच पराकोटीच्या निराशेतून आलेली इच्छा नकळत त्याची चिमूरडीही तिच्या मुखातून बोलून जाते. तिचे ते शब्द ऐकल्यानंतर त्या पित्यानं स्वत:स कसं सावरलं असेल ते ईश्वर जाणो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अतिशय सुंदर्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता खूप सुंदर आहे. खूप आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कु. विभा आपटे आणि कु. विमला प्रधान यांची आगळीक काहीही असो, परंतु कवीला त्यांच्याबद्दल इतकी का बरे खुन्नस असावी, की त्याने कोल्ड प्रिंटात नावे घेऊन त्यांची अशी जाहीरपणे बदनामी करावी? मग भले ती बदनामी 'त्या कित्ती कित्ती वैट्ट्ट, वैट्ट्ट, वैट्ट्ट, वैट्ट्ट, वैट्ट्ट, वैट्ट्ट, दुष्ष्ष्ट!!! आहेत! आपण त्यांची घरे उन्हात बांधू, हं!'-छापाची असली, तरीही.

(आयला! खिशात नाही दमडा, साधे पोरीला जरा बरे कपडे घ्यायची नाही ऐपत, नि म्हणे लोकांची उन्हात का होईना, पण घरे बांधतोय! कवि गवंडी किंवा बांधकाम मजूर आहे काय? थोडक्यात, गब्बरचा क्लासिकल फडतूस! असला कवि उदरनिर्वाहाकरिता डालडा जरी विकत असेल, तरीही मला आश्चर्य वाटणार नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आणि रसग्रहण दोन्हीही भावलं. आभार शुचि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वर्गाच्या तेजोगर्भी, बाळे ती खेळत होती|
वत्सलता प्रभुरायाची, जोजवी तयां निजहाती|
झुलवी त्या पाळणिया, छायामय मधुरजनी ती|
मोत्यांचे घालुनी पाणी, स्वर्गंगा त्यांना नहाणी|
लडिवाळ बाळे तान्ही, देवाची आवडती ती| ................ कविबाळे खेळत होती||१||

बैसुनी सूर्यकिरणात, सोन्याच्या कारंज्यांनी|
कधी जलदजाल खुलवावे, स्वर्गिय जादुने त्यांनी|
कधी चन्द्रकला खुलवावी, ज्योत्स्नेचे जाल वोणोनी|
शांतीचा करुनी पावा, कधी रात्री सूर धरावा|
नक्षत्रलोक डुलवावा, सौंदर्ये उधळीत होती| ................ कविबाळे खेळत होती||२||

एकदा सडा संध्येचा, शिंपुनी महोत्सव केला|
बनविले बीन ओढोनी, कोवळ्या सूर्यकिरणाला|
ते वाद्य वाजवायाला, बाळांचा मेळा आला|
ते संध्यगिरी बहुवर्णी, छायामय त्या निर्झरिणी|
टाकिल्या क्षणी व्यापोनी, परिसाया देवही येती| ................ कविबाळे खेळत होती||३||

वाद्याचा ये झंकार, एकेक जसा उदयाला|
एकेक सृष्टीचे फूल, लागे हो उमलायाला|
निस्तब्ध मूक गगनाला, निमॅषातच मोहर आला|
आनंद गडे आनंद - गाण्याचा एकच छंद|
हो चोहीकडे गोविंद, ये रंगनाथ संगिती| ................ कविबाळे खेळत होती||४||

परि आला तीव्र विषारी, हा न कळे कुठचा वारा|
कंपित हो एकाएकी का दिव्य देश हा सारा|
बाळांचे गळले हात, बीनेच्या तुटल्या तारा|
ती स्वप्नसृष्टी जळाली, गाण्याची तार गळाली|
काजळी चढे वरखाली, झाली हो माती माती | ................ कविबाळे खेळत होती||५||

त्या खोल भूमीगर्तेत, अंधार खळाळत होते|
मोहाचे जालीम वीष, बेभान करी सकळाते|
वायुसह तिव्र विषारी, अंधुकता पसरित येते
वाफारा तो लागोनी, ती दिव्य बालके तान्ही|
कळमळूनी पंचप्राणी, कोसळूनी खाली येती| ................ कविबाळे खेळत होती||६||

कडकडला गगनी तारा, ढासळला भूवर आला|
स्वर्गिय तेज मालवुनी,पाषाण क्षणार्धी झाला|
हा प्रभाव या जगताचा, दोषावे यात कुणाला|
स्वर्गाचे ते शृंगार, प्रेमाचे मौक्तिकहार्|
गाठिता जडाचे दार, जाडतेने वेष्टित होती| ................ कविबाळे खेळत होती||७||

काळाच्या आवर्तात, भोवंडुनी गिरके घ्यावे|
चाचपता अंधारात, ठेचाळुनी विव्हळ व्हावे|
जे जिवीत या जगतीचे, ते त्यांस कसे मानावे|
जीवास आग लागोनी, तळमळती माशावाणी|
स्मरुनी ती पूर्वकहाणी, फोडितात टाहो चित्ती| ................ कविबाळे खेळत होती||८||

परि त्याच दीर्घ किंकाळ्या, ठरतात जगाची गाणी|
निश्वास आत जे कढती, ती स्फूर्ती लोक हा मानी|
संतप्त अश्रूमालेला, गणितात कल्पनाश्रेणी|
गौरविते विश्व कविंना, जग सर्व डोलवी माना|
परि मुग्ध मधुर आत्म्याना, त्या काय बोचते चित्ती| ................ कविबाळे खेळत होती||९||

- बालकवि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पावस देखि रहीम मन, कोइल साधे मौन.
अब दादुर वक्ता भए, हमको पूछे कौन...
पावसाळ्यात कोकीळा मौन पाळते कारण ती वेळ बेडकांच्या कर्कश्श उच्चारवाची असते.