सतारवादक विदुर महाजन

मी अनुवादित केलेले अमीरबाई कर्नाटकी हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अधून मधून वाचकांचे फोन येत असतात. वेगवेगळे अनुभव येतात. फोन केलेल्यांपैकी बरेचसे फोन, हे अमीरबाई यांची तसेच त्याकाळातील गाणी ऐकलेल्या वाचकांचे असतात. त्यांचा आठवणींना उजाळा मिळालेला असतो. मागच्या आठवड्यात विदुर महाजन यांचा असाच पुस्तकाबद्दल सांगायला फोन आला. मी त्यावेळेस ऑफिस मध्ये होतो. अगदी भरभरून बोलले, त्यांचा संदर्भ अमीरबाई यांच्या गाण्याकडे नव्हता, तर एका त्याकाळी स्त्रीने दिलेला परिस्थितीशी लढा हा होता, आणि त्यांना ते भावले होते. बोलण्याच्या ओघात, त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितले. ते सतारवादक आहेत. राहायला तळेगावात असतात. आणि पिंपळे सौदागर भागात(म्हणजे मी राहतो त्याच भागात) ते सतार शिकवायला आठवड्यातून एकदा येतात. त्यांनी पुस्तके देखील लिहिली आहेत हे त्यांच्याकडून समजले. मला त्यांनी भेटायला येण्याचे आमंत्रण देऊन आमचे त्यावेळचे संभाषण थांबले.

मला अतिशय उत्सुकता वाटली. त्यांच्याबद्दल जाणून घ्यावेसे वाटू लागले. विदुर महाजन हे नाव कुठेतरी ऐकल्याचे वाटू लागले. पुस्तकाच्या संदर्भात, की त्यांच्या सतार वादनाच्या संदर्भात, आठवेना. मी त्यांची तीन पुस्तके मागवली, जी आत्मकथनात्मक आहेत. त्यातून त्यांच्या आयुष्याचा आलेख, चढ-उतार, संघर्ष, जीवनाबद्दल असणारे प्रेम पदोपदी जाणवते. पहिले पुस्तके आहे मैत्र जीवाचे. जे त्यांनी लिहिले, जेव्हा त्यांचा तरुण मुलगा अपघातात दगावला. त्यानंतर त्यांनी ते दुःख कसे पचवले, आपले जीवित ध्येय कसे निश्चित्त केले. जे अतिशय प्रेरणादायी आहे. ते आहे २००९ चे. ग्रंथालीने प्रकाशित केलेले(माझे पुस्तक देखील ग्रंथालीचेच, त्यामुळे हा एक समान धागा) . आणि दोन आवृत्या निघाल्या त्याच्या. दुसरे पुस्तक त्यांचे २०१३ मधील, नाव शोधयात्रा. ह्यात त्यांनी आपल्या व्यवसायासंदर्भात आलेले अनुभव सांगितले आहेत. व्यवस्थेशी त्यांनी लढा कसा दिला, त्यातून ते कसे बाहेर आहे, सचोटीने कसा त्यांनी व्यवसाय केला, हे सर्व समजते. बाहेर येवून त्यांनी सतार जवळ केली आणि त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. तिसरे पुस्तक २०१५चे, नाव एका स्वरवेड्याची आनंदयात्रा. त्यात त्यांनी सतार, सतारवादन याबद्दल लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास याबद्दल लिहिले आहे. लोणावळ्याच्या कैवल्यधाम मध्ये कार्यक्रम करतात हे समजते, सतारवादन क्षेत्रात त्यांनी कसे आणि कुठले प्रयोग केले याची माहिती मिळते, जसे की कॉर्पोरेट क्षेत्रात मनुष्यबळ विभाग, जो महत्वाचा असतो, त्यांना प्रशिक्षण देण्याच्या वेगवेगळया पद्धती आहेत. त्यातील एक म्हणजे outbound learning किंवा experiential learning, ज्या बद्दल मी गरुडमाची संदर्भात मी लिहिले होते. त्या क्षेत्रात त्यांनी, आणि त्यांच्या मित्रांनी सतार वादनाचा उपयोग करून Tuckman’s model of team building(जे जुने आणि प्रसिद्ध मॉडेल आहे) याची सांगड घातली. आणखी त्यांची जे काही करायचे त्यात झोकून द्यायची वृत्ती दिसून येते. या तिसऱ्या पुस्तकातील एक वाक्य अतिशय आवडले, त्यात ते यशाची व्याख्या करतात. ते वाक्य असे आहे-‘ज्याच्याकडे पुरेसा वेळ, पैसा, आणि काम या तिन्ही गोष्टी आहेत, आणि ज्याला पुरेशा आहेत, म्हणजे किती, याचं प्रमाण नेमकं ठरवता येतं, तो यशस्वी’.

काही वर्षांपूर्वी मी संजय भास्कर जोशी यांचे ‘आहे कॉर्पोरेट तरी’ हे पुस्तक वाचले होते. त्यात त्यांनी चाळीशी मध्ये मोठी नोकरी सोडून, आपले छंद, आणि आवडींकडे(जसे साहित्य, वाचन, लेखन) या कडे लक्ष केंद्रित केले, याचे अनुभव कथन केले होते. विदुर महाजन यांची पुस्तके वाचल्यानंतर देखील मला तसेच वाटले. मुळात ते व्यावसायिक होते, म्हणजे, आजकाल ज्या बद्दल बरेच बोलले जाते, entrepreneurship, तसे ते होते. धडाडी, उत्कटता, सचोटी होती. काही कारणाने ते सर्व सोडून सतरीकडे ते वळले. त्यातही तशीच धडाडी, उत्कटता, सचोटी दाखवत त्यांनी आपल्या जीवनाची मार्गक्रमणा सुरु ठेवली आहे.

मला तळेगावाबद्दल आणखीनच आदर वाटू लागला आहे. माझे काही मित्र तळेगाव वडगाव भागात पूर्वी राहायचे, अधून मधून तेथे जायचो. संगीत क्षेत्रात थोडा रस घ्यायला सुरु केल्यानंतर केव्हातरी समजले की कलापिनी ही संस्था तेथे काम करते. उर्दू शायर मदहोश बिलग्रामी तळेगावात राहतात. त्यांना देखील भेटायला गेलो होतो, काही मित्रांसोबत. प्रसिद्ध लेखक, सह्याद्री मधील किल्ल्यांवर भटकणारे गो. नि. दांडेकर देखील तेथेच राहत. आता विदुर महाजन. हा सगळा लेखन प्रपंच मी त्यांना अजून न भेटताच केला आहे. पाहुयात केव्हा भेटणे जमते ते.

कालच मी माझ्या पुस्तकाच्या मूळ कन्नड लेखकाशी, रहमत तरीकेरी यांच्याशी विदुर महाजन यांच्याबद्दल बोललो. महाजन यांचे त्यांच्याशी संभाषण झाले होते. त्यांनादेखील देखील अतिशय छान वाटले. तर असे हे विदुर महाजन, जगण्याचा आनंद शिकवणारे. त्यांची पुस्तके जरूर वाचावी अशी आहेत. त्यांची पुस्तके वाचल्यानंतर मला उमजले की त्यांनी त्यादिवशी फोन करून माझ्या पुस्तकात आलेल्या अमीरबाईच्या जीवनाच्या लढ्याबद्दल मला अशी प्रतिक्रिया दिली ते.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जबरदस्त! लेख खूप आवडला. आता त्यांची पुस्तकं मिळवून वाचतो. आभार!

‘ज्याच्याकडे पुरेसा वेळ, पैसा, आणि काम या तिन्ही गोष्टी आहेत, आणि ज्याला पुरेशा आहेत, म्हणजे किती, याचं प्रमाण नेमकं ठरवता येतं, तो यशस्वी’

ये बात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+२

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पुस्तकांबद्द्ल आणि विदूर महाजनांबद्द्ल वाचलं होतं. ही पुस्तकं वाचनालयात मिळाली नाहीत त्यामुळे वाचली नाही गेली. वाचायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0