Syriaतले घर थकलेले... संन्यासी

"घर थकलेले... संन्यासी" ह्या कवितेच्या पहिल्या ३ शब्दातच ग्रेस यांनी सगळं सांगून टाकलं असावं! इतकी अर्थघन शब्दयोजना. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनेतला दोन शब्दांमधला तो जीवघेणा अंतराळ.... त्यात निर्वासितांचं अस्तित्वच नव्हे, तर "टांगणीला" लागलेल्या जीवाचा दाटलेला हुंदका आहे!

Syria देशातून गेली अनेक वर्ष ते चालताहेत. त्यांच्या मागे बॉम्बने विदीर्ण झालेल्या त्यांच्या गावांचा आक्रोश कानापर्यंत येऊ नये म्हणून कान आवळून बंद करून. त्यांची घरं जणू "थकलेली". कुणाची "थकबाकी" असते, कर्ज थकलेलं असतं तसं, घरासाठी वाट पाहणं त्यांच्या नशीबी आलेलं. आणि जीवाच्या भीतीने पायपीट करून करून ते ही थकलेले. त्यांना "गृहस्थ" कसं म्हणावं? जे घरदाराच्या पाशांमधून निकराने स्वतःला सोडवून निघालेले- ते संन्यासीच म्हंटले पाहिजेत.

आडोशाची "भिंतही खचते" तेव्हा आईच्या डोळ्यातलं नक्षत्र त्यांना आठवतं आहे.
५ वर्षांच्या ओमरान च्या शून्य नजरेमध्ये असेल का तेच नक्षत्र?
आई, जिच्या उबदार पंखांमागे निर्धास्त डोळे मिटून लपून जावं, आणि सगळ्या चिंता आपोआप विरून जावी, त्या आईचं घरटं, हे प्रत्येकाच्या मनात खोल रुतून बसलेलं एक सुरक्षित स्थान असतं. पाय कितीही भरकटले, तरी तिच्या डोळ्यातल्या नक्षत्राने वाट दाखवावी, आणि फिरून आपण आयुष्याच्या शेवटी का होईना, तिच्या कुशीत निजावं, अशी उर्मी दाटून येते.
पिलं चालू लागतात, पण त्यांची आईसुद्धा देशोधडीलाच लागलेली असते! सिरियन निर्वासितांबरोबर प्रवास करणार्‍या पत्रकरांनी त्याबद्द्ल कितीहि भरभरुन लिहिलं, तरी कमीच...

जवळजवळ २५०,००० नागरिकांचं घर हिरावून घेणारं हे कसलं जीवघेणं युद्ध? गेली ५ वर्ष सतत जाळणारं हे कुठलं "रखरखते ऊन"!
"पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळीमागे असतेच झऱ्याचे पाणी"
आयुष्य पाण्यासारखं पुढेपुढे वाहत जाताना, आपण ओंजळीत त्यातले दोन क्षणही सुखाने धरून ठेवू शकत नाही. प्रेमाची माणसं कालाधीन, तर कधी दुरावलेली... हातातून निसटून जातात. उलट प्रवाहाविरुद्ध पोहणारे जिगीषू निर्वासित, त्यांच्यातले किती पल्याड पोचू शकतात? एका बापाला मृत पोरासाठी अश्रू ढाळत न बसता, तसंच पुढेपुढे प्रवाहपतीत होऊन जावं लागतं. त्याचं जे पिलू वाहून गेलं, त्याला आठवलीच असेल ना आपली आई, त्या अंतिम क्षणांमध्ये?

"मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई" जर कधीकाळी ह्या वाटसरूंना आश्रय मिळाला, तरी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला "अंधार", ते अत्याचार, रक्तपात, बलात्कार, चिंधड्या - त्यांना विसरता येतील का कधी? घरासाठी रानोमाळ फिरणाऱ्या भटक्यांना जर घर कधीकाळी मिळालंच, तर ते हि पुन्हा नव्याने तिथे रुजतील. घरातल्या "अडगळीत" त्यांना सुरक्षित वाटूही लागेल. तो सवयीचा पसारा, "माझ्या" असणाऱ्या वस्तू, हौशीने जमवलेली भांडीकुंडी....... रोज रोज डोळ्यांना दिसल्या, कि जीवनाच्या सुरळितपणाचा क्षणिक दिलासाही मिळेल.

पण एकदा ज्यांनी आपलं घर उद्ध्वस्त होणं अनुभवलं आहे, त्यांना कायमच त्या "दरीतल्या वनराईचा" धसका लागून राहणार. ती भयाण वनराई, ते भटकेपण, कधी येऊन पुन्हा घर गिळंकृत करील? करील का? सगळीकडून ती आपल्या घरावर "हलके हलके" पुन्हा अतिक्रमणकरू लागलं आहे हा भास.... त्यातून त्यांची सुटका नाही.

तोवर घरात राहूनसुद्धा "घरपण" मात्र थकलेलं च राहील.

3
Your rating: None Average: 3 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

सुन्नी मुस्लिम सीरियन निर्वासितांच्या गाढवपणामुळे डोके उठले आहे.

इथे अमेरिकेत दोन सुन्नी मुस्लिम सीरियन निर्वासितांना गेली दोन वर्षे मदत करण्यात सहभागी होतो. पण त्यांच्या गाढवपणामुळे डोके उठले आहे. एकाने तीन मुली असताना "मुलगा" पाहिजे म्हणून परवा चौथे अपत्य निर्माण केले (नशिबाने ते "मुलगा " होते). नशिबाने त्याने टॅक्सीचा धंदा सुरु केला तो चालतो आहे. दुसरा (जो अर्थशास्त्रात पी एच डी आहे) गेली दोन वर्षे आपल्या बायको आणि तीन मुलांसह धर्मादाय मदतीवर जगतो आहे . मी सुचविलेल्या अनेक प्रकारच्या नोकऱ्या त्याने केल्या नाहीत, कारण त्या त्याच्या सीरियातल्या "स्टेटस" च्या खालच्या होत्या! त्याची मदत बंद करावी असे मी परवा मतदान केले आणि ते मान्य झाले.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

वेल्कम टु द रिअल वर्ल्ड.

वेल्कम टु द रिअल वर्ल्ड.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

फोटो

धन्यवाद! फोटो- काय म्हणू? हृदयाला भिडणारा आहे? की माणसाच्या जीवनाच्या अशाश्वततेत, अतर्क्यतेतच सौंदर्य दडलेलं आहे, असं म्हणू?

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

हा फोटो आठवला

1

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

सॉलिड! एकच नंबर फोटो आहे.

सॉलिड! एकच नंबर फोटो आहे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

+१

+१

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आभार!!

अाॅडेन खूप आवडतो, पण ही कविता माहिती नव्हती.

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

W. H Auden यांची Refugee

W. H Auden यांची Refugee Blues रेफ्युजींवरील अत्यंत करुण कविता कालच वाचनात आली.

अवांतराबद्दल क्षमस्व. प्लीज

अवांतराबद्दल क्षमस्व. प्लीज अन्य धाग्यावरती हलवा. मनातील छोटे मोठे प्रश्न वरतीही चालेल.

लिन्डा गुडमन

लिन्डा गुडमनचे पुस्तक तरुणपणी वाचले होते, तेव्हा गंमत म्हणून, पण नंतर तिने लिहिलेले "रिलेशन्शिप साईन्स" हे अधिक खोलात जाणारे आहे.
तुम्ही काढलेला गोल तक्ता तिने दाखवल्याप्रमाणे आहे.
माझा कुंडलीवर विश्वास आहे कि नाही, हे मलाच माहिती नाही. पण माणसाच्या मन कुठला ना कुठला "पॅटर्न" शोधत असतं, त्या दृष्टीने हे ठीक वाटतं.
तुमच्या मते सिरियावर आलेलं संकट अजून किती दिवस चालणार आहे मग?

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

तुमच्या मते सिरियावर आलेलं

तुमच्या मते सिरियावर आलेलं संकट अजून किती दिवस चालणार आहे मग?

माहीत नाही हो.
.
सनसाइन्स व लव्ह साइन्स मस्तच आहे. एक ललित म्हणुन वाचायला मला मजा आली. बाकी फक्त सूर्यरास फक्त चंद्र रास आदिमध्ये काही तथ्य नाही. एकंदर कुंडली महत्त्वाची.

सिरियावर आलेलं संकट अजून किती दिवस चालणार ?

एक रशिया सोडला तर दुसरा कोणताही पक्ष सीरियातील संघर्ष थांबवायच्या ताकदीचा नाही . पुतीनने प्रचंड सैन्य (25,000) उतरविल्यास महिन्याभरात आयसिसचा प्रश्न सुटेल, पण "मुक्त" भागावर राज्य कोण आणि कसे करणार हा प्रश्न त्याहून गहन आहे, त्यामुळे ओबामा सैन्य उतरवायला तयार नाही . एकंदरीत पाहता जसे शेजारच्या लेबनॉन मध्ये वीसएक वर्षे संघर्ष,हत्या,बॉम्ब हल्ले चालू होते तसेच काहीसे होईलसे दिसतंय. माणसे प्रचंड संख्येने मरत आहेत हे फार मोठे दुर्दैव.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

भीषण

भीषण हा शब्द देखील रामायणातल्या बिभीषणाइतका निरुपद्रवी वाटावा, अशा प्रकारचा विध्वंस त्या देशांत चालू आहे.
आणि सर्वात चीड येणारी गोष्ट ही आहे की हे संकट मानवनिर्मित आहे ! ज्यांनी हे घडवले आहे ते सुरक्षित अंतरावरुन संहार चालूच कसा राहील, याची काळजी घेत आहेत. झळ भलत्याच लोकांना पोचते आहे.

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

+१

आणि वर निर्वासितांवरून चाललेलं राजकारण!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सिरीया-कुंडली

लेखामधील भावना पोचल्या.याउप्पर काय बोलू. लेख आवडला म्हणायला जीभ कशी रेटावी?

(प्रतिसादातला उर्वरित भाग इथे हलवला आहे.)

कुंडली मांडण्याची गोल पद्धत

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)