पूर्वज-वि. ग. कानेटकर

आज सकाळी वर्तमानपत्रात प्रसिद्ध साहित्यिक वि. ग. कानेटकर यांचे निधन झाल्याचे वाचले. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे पूर्वज हे पुस्तक वाचून ही समीक्षा लिहिली होती. ती येथे देत आहे.

मला गतकालाबद्दल आकर्षण आहे. मी सारखा इतिहासात डोकावत असतो. प्रत्येक गोष्टीची सुरुवात कशी झाली, त्या गोष्टीचा इतिहास काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या दृष्टीने माझी नजर शोधक तयार झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. माझा हा ब्लॉगदेखील बऱ्याचदा आठवणी, स्मरण, जुन्या काळातील गोष्टी याविषयांच्या अवती भोवती असतो. किल्ल्यावरील पदभ्रमण त्यातूनच सुरु झाले. आणि त्यातूनच मला गोहरबाई कर्नाटकी, अमीरबाई कर्नाटकी यांच्या बद्दल समजले, आणि त्याची परिणीती मी कन्नड मधील अमीरबाई यांचे चरित्र मराठीत आणले. गेल्या शे-दीडशे वर्षातील मराठी नाटक, साहित्य, त्याकाळातील लोकांचे जीवन याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी येथे ६५० पेक्षा जास्त संस्थाने होती. त्याचा आणि व्यक्तींचा सुटा अथवा एकत्रित इतिहास कुठे उपलब्ध नाही. चिं वि जोशी यांच्या काही पुस्तकातून काही वर्णन येत राहते. असेच गतकालातील व्यक्तीबद्दलचे कथारूप ललित लेखन असलेले पुस्तक नुकतेच हाती लागले, त्याचे नाव पूर्वज, आणि लेखक आहेत वि ग कानिटकर.

ह्या छोट्याश्या कथासंग्रहात सात कथा आहेत. मराठी नाटकाचे जनक विष्णुदास भावे, सर्कसवाले विष्णुपंत छत्रे, साहित्यिक हरिभाऊ आपटे, संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध नट गणपतराव जोशी, मिरजेचे संस्थानिक पंतप्रतिनिधी परशुरामभाऊ पटवर्धन, गायक भास्करराव बखले, रावसाहेब मंडलिक या सात व्यक्तींच्या जीवनातील काही विशिष्ट घटनांवर आधारित या कथा आहेत. यातील बऱ्याच जणांची चरित्रे, आत्मचरित्र आधी प्रसिद्ध झाली आहेत. ज्यांनी ती वाचली आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती असते. असे असले तरी या कथा वाचनीय ठरतात. पुस्तकाचे शीर्षक तर समर्पक आहे. पूर्वीच्या काळातील व्यक्तींच्याबद्दल माहिती, गोष्टी त्यात आहेत. ह्या सात कथांबद्दल थोडेसे.

सांगलीचे विष्णुदास भावे हे मराठी नाटकाचे जनक. पहिल्या वाहिल्या नाटकाच्या पडद्यामागची ही कहाणी ही कथा साग्रसंगीत सांगते. त्याकाळी असलेल्या प्रथेनुसार नाटकात काम करणाऱ्याला, तसेच त्यात स्त्री-वेश घेण्याराला समजणे वाळीत टाकत असत. त्यामुळे आलेले पेल्यातील वादळ कसे चतुराईने सांगलीच्या राजाने शमवले हे ही कथा मजेशीर पणे सांगते. ह्या कथेच्या नट्यात्मकतेमुळे ही छानशी एकांकिका होवू शकते असे मला वाटते.

सर्कसवाले विष्णुपंत छत्रे हे देखील सांगलीचेच. त्यांनीच भारतात सर्कस सर्वप्रथम सुरु केली. त्याबद्दल ही कथा आहे. छत्रे यांच्या अंगी असलेली धडाडी, धैर्य, आपल्या स्वप्नांचा पाठपुरवा करण्याची जिद्द ह्याचे दर्शन ह्या कथेमधून होते.

साहित्यिक हरिभाऊ आपटे यांच्या संबंधी कथा येते ती त्यांच्या मेव्हणे गोविंदराव कानिटकर यांनी केलेल्या रवींद्रनाथांच्या गीतांजली काव्यसंग्रहाच्या मराठी भाषांतराच्या संदर्भात. हरिभाऊना त्यांचे भाषांतर पसंत नव्हते. पण त्यांना ते सांगावे कसे हा पेच पडलेला. त्यातच त्यांनी दुसऱ्याने केलेल्या भाषांतराला प्रस्तावना लिहिलेली होती. गोविंदरावांना हे समजल्यावर त्यांचा पारा चढला. त्यातच त्यांच्या पत्नी काशीबाई ह्या हरिभाऊ आपटे विशेष स्नेह. त्यांची मधल्यामधे झालेली ससेहोलपट, ह्या सगळ्या नाट्यावर ही कथा आधारित आहे. काशीबाई कानिटकर ह्या मराठीतील आद्य स्त्री कादंबरीकार. त्यांचे सरोजिनी बाबर यांनी लिहिलेले चरित्र आहे, त्यात ह्याचे काही तपशील मिळतात हे पाहणे मनोरंजक ठरेल.

प्रसिद्ध नट गणपतराव जोशी यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल ही गोष्ट आहे. मला तर ही वाचताना नटसम्राट नाटकाची आणि सिनेमाची आठवण होत होती. त्या दोन्हीत हा भाग नाही, पण एकूणच रंगभूमी वरील प्रसिद् नटाच्या शेवटच्या दिवसात त्याची मनोवस्था कशी झाली आहे, हे समजते.

मिरज संस्थानाचे पंतप्रतिनिधी परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या जीवनातील दुसरा विवाह, आणि त्याबाबतचे संधीसाधू लोकांचे राजकारण प्रसंग आला, त्याच्या ही रोचक कथा आहे. संस्थानिकांच्या स्वैराचाराबद्दल त्यात त्यांनी विस्तृत लिहिले आहे.

गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्या उमेदीच्या काळातील प्रसंगावर ही कथा आधारित आहे. वडिलांचा रोष पत्करून गायन शिकायला घरातून बडोद्यास पळून गेलेले. तेथून ते अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाटक मंडळीत स्त्री-भूमिका करायला म्हणून मुंबईत आले. तेथे त्याचे नाटक पाहून आणि गाणे ऐकून, त्याच्या वडिलांच्या मतामध्ये परिवर्तन होते. हे सर्व ह्या कथेमध्ये आले आहे.

रावसाहेब मंडलिक हे समाजसुधारक होते, त्याबद्दल विशेष माहिती मला नव्हती. ती या कथेमुळे कळली. त्यांनी मुंबईत नेटिव्ह ओपिनियन(Native Opinion) नावाचे वर्तमान पत्र सुरु केले होते. त्यांच्यावर दुसऱ्या विवाहाचा दबाव येत होता, तो त्यांनी कसा दृढनिश्चयाने मोडून काढला या बद्दल समजते. त्यांच्या बद्दल थोडा शोध घेतला तेव्हा गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेल्या भरारी या त्यांच्यावरच्या पुस्तकाचा शोध लागला.

या सर्व कथा जरी कथा म्हणून असल्या तरी त्यांनी प्रस्तावनेत म्हटल्या प्रमाणे माहिती असलेल्या चरित्रावरून त्या बेतलेल्या आहेत, तसेच तपशीलात नाट्य आणण्यासाठी विपर्यस्त बदल केलेले नाहीत. कथा वाचताना जर इतिहास जर थोडाफार माहिती असेल तर संदर्भ समजायला सोपे जाते असे मला वाटते. मी वि ग कानिटकर यांच्या इतर पुस्तकांचा शोध घेतला, तर त्यांचा ह्याच विषयावरील अजून एक कथा संग्रह आहे. त्याचे नाव आणखी पूर्वज. त्यातही गतकाळातील आणखी ७ व्यक्तींच्या संदर्भात कथारूप ललित लेखन आहे. प्रसिद्ध इतिहासकार वि का राजवाडे, तारा गाणारीण, दादोबा पांडुरंग, बापूजी कुलकर्णी, दुसरा बाजीराव, शारदा गद्रे आणि सातवे ह रा पांगारकर. यातील तर मला राजवाडे आणि बाजीराव सोडून इतरांबद्दल माहितीच नाही. पुस्तक मिळवून वाचायला हवे केव्हा तरी.

ताजा कलम: हा ब्लॉग लिहिल्यानंतर काही मह्निन्यातच मला दिवाण जरमानी दास यांचे संस्थानिकांवरील पुस्तक मिळाले, त्याबद्दलदेखील मी ब्लॉगवर येथे लिहिले आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वि.ग.कानेटकरांच्या साहित्याची ओळख ठीक ठाक आहे.
ह.रा. पांगारकर हे कदाचित ल. रा. (लक्ष्मण रामचंद्र) पांगारकर असावेत. हे संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. सुप्रसिद्ध 'भक्तिमार्गप्रदीप' हे भक्तिपर ओव्या, अभंग, स्तोत्रांचे संकलित पुस्तक त्यांचेच. त्यांचे दासबोधाचे सटीक सार्थ प्रकाशनही प्रसिद्ध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो का..हे माहीत नव्हते...पुस्तकात तरी ह. रा. पांगारकर असेच दिले आहे...तेथेही चुकीचे असण्याची शक्यता आहे. मी देखील विकिपीडिया पहिले, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ल. रा. पांगारकर असावेत.

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

पुस्तकाची ओळख छान आहे.
"विपर्यस्त" - हा शब्द ऐकून युगे लोटली होती. खूपच छान वाटलं हा शब्द वाचलयावरती. जुने मैत्र सापडल्यासारखे वाटले. अनवट मराठी शब्द आवर्जुन लिहीले पाहीजेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा! छान दाद आहे ही. माझा मीच विचार करू लागलो की हा शब्द कसा काय सुचला मला...मी नेहमीचा 'विपरीत' असा शब्द वापरू शकलो असतो...उत्तर कठीण आहे देणे. तुमचा मुद्दा देखील बरोबर आहे...जुन्या,विस्मरणात गेलेल्या शब्दांबद्दल...धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

होय "विपर्यास" हा शब्द आपण वापरु शकला असता.
मला वाटतं "विपर्यास" वरुन "विपर्यस्त" आला आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'विपरीत' हे विशेषण 'वि+परि+इ' (उलट जाणे) ह्या धातूपासून बनले आहे. 'विपर्यस्त' आणि 'विपर्यास' हे शब्द अनुक्रमे विशेषण आणि नाम ह्या प्रकारांचे आहेत आणि त्यांचे मूळ
'वि+परि+अस्' (उलट असणे) ह्या धातूमध्ये आहे. ज्याचा विपर्यास झालेला आहे ते विपर्यस्त. विकास झाला आहे ते विकसित, नाश झालेला आहे ते नष्ट ही समान्तर उदाहरणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां काहीतरी चूकीचे वाटत होते. मी वाचलेला जुना शब्द "विपर्यास" हा आहे.
इथे शब्दांचे मूळ सविस्तर मांडल्याबद्दल धन्यवाद कोल्हटकर जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी वि ग कानिटकर यांच्या इतर पुस्तकांचा शोध घेतला, तर त्यांचा ह्याच विषयावरील अजून एक कथा संग्रह आहे. त्याचे नाव आणखी पूर्वज. त्यातही गतकाळातील आणखी ७ व्यक्तींच्या संदर्भात कथारूप ललित लेखन आहे. प्रसिद्ध इतिहासकार वि का राजवाडे, तारा गाणारीण, दादोबा पांडुरंग, बापूजी कुलकर्णी, दुसरा बाजीराव, शारदा गद्रे आणि सातवे ह रा पांगारकर. यातील तर मला राजवाडे आणि बाजीराव सोडून इतरांबद्दल माहितीच नाही. पुस्तक मिळवून वाचायला हवे केव्हा तरी.

जबरदस्त! लेख आवडला.

एक अवांतर प्रश्नः ही पुस्तकं तुम्ही कुठून मिळवता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
बॉईस प्लेड वेल.

धन्यवाद! पुस्तकं कुठून मिळवता असे विचारले आहे तुम्ही, ज्याचे तिरके उत्तर 'शोधा म्हणजे सापडेल' असे असू शकते! पण मी तसे देणार नाही. पुण्यात पुस्तकांच्या दुकानातून, प्रदर्शनातून, तसेच बुकगंगा वरही मिळतात, काही जुन्या पुस्तकांचे देखील विक्रेते आहेत, अप्पा बळवंत चौकात तेथे देखील मिळतात. आता हे पुस्तक किती रुपयाला असेल असे वाटते? फक्त २० रुपये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

नाही, माझा प्रश्न विचारायला चुकला.

समजा, तुम्हाला 1902 साली प्रकाशित झालेलं क्षयझ पुस्तक हवं आहे. ते पुस्तक अबक दुकानात आहे हे कसं कळतं?

की अबक आणि तत्सम दुकानात वारंवार फेऱ्या घालूनच हे साध्य होतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
बॉईस प्लेड वेल.

नाही समजत...तोच तर मोठा यक्षप्रश्न आहे, शोधावेच लागते. आता सध्या मला प्रभाकर पाध्ये यांची काही पुस्तके हवी आहेत, ती कुठेच मिळत नाही. त्यांचे तोकोनामा हे जपान प्रवास वर्णन वाचत होतो मध्ये. त्यात त्यांच्या इतर पुस्तकांची यादी दिली आहे. त्यातील काही हवी आहेत. प्रकाशकाकडे देखील विचारले. असेच ते केव्हा तरी शोधता, शोधता हाती लागू शकेल. अबक, कखग दुकानात, आंतरजालावर, इत्यादी ठिकाणी धुंडाळावे लागतेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com