कॅनडाची थंडी – स्टँडअप स्क्रिप्ट

ऑक्टोबर २०१४ मध्ये मी पहिल्यांदा स्टँडअप केलं होतं. त्याची स्क्रिप्ट आणि विडीयो टाकत आहे. कृपया टिप्पणी करावी. माझे मराठी एवढे चांगले नाही, पण विनोदी लिखाणाची आवड आहे. आणि कॉमेडी सुधारण्याची इच्छा आहे.

पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर काही मांडतोय आणि लग्नानंतर तर एवढं बोलण्याची ही पहिलीच वेळ, त्यामुळे जरा सांभाळून घ्या. इथे नवीन येणाऱ्यांना इथली थंडी हे काय प्रकरण आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न. काय? तुम्ही घरी चालला? जुने लोकं पण ऐकू शकतात. मला वाटलं अकोळकर काका घरी चालले कि काय. एकतर कुठल्याही विषयावर बोलायला माझ्या नावापुढे डॉक्टरचा डॉ किंवा प्राध्यापक चा प्रा नाही आणि दुसरं म्हणजे थंडी हा काय बोलण्याचा विषय नाही, तो सोसण्याचा विषय आहे. "कोकणात लागणारा घाट" "बायकोचा डोक्याला ताप" ह्या गोष्टी जशा सांगून समजत नाहीत तशीच इथली थंडी. ती भोगावी लागते. देवाने म्हणे १०-१२ काश्मीर कच्चे खाल्ले तेव्हा कुठे विन्निपेग निर्माण केले, खरं खोटं देवालाच माहीत. मी तर असंही ऐकलंय कि इथली लोकं म्हणे भर जानेवारीत महाबळेश्वरला वैगेरे जाऊन उकडतंय म्हणून उघडे नाचतात.

बरं इथल्या लोकांना तुम्ही इथल्या थंडीबद्दल विचारलं तर त्याचं उत्तर सध्या कुठला मोसम सुरुय यावर अवलंबून असतं. म्हणजे समजा कि डिसेंबर नुकताच सुरु झालाय आणि तुम्ही थंडीचे १-२ चटके सहन केलेले असतात. अशावेळी तुम्ही एखाद्या गोऱ्याला ते सांगत असता कि इथली थंडी किती कडक आहे वैगेरे. त्याचावर त्या गोऱ्याचे जे काही हाव-भाव, प्रतिक्रिया, हास्य असतं ते या एका expression मध्ये सामावलेलं असतं. याचा अर्थ - ही थंडी म्हणजे काहीच नाही, किस झाड कि पत्ती. उलट ही लोकं पुढे तुम्हाला हे सांगायला लागतात कि इथली थंडी ते कशे एन्जॉय करतायत. आपण आ वासून ते ऐकत असतो. मग ते तुम्ही कधी snowboarding वैगेरे केलंय का ते विचारतात. वास्तविक snowboarding ही काय भानगड आहे हे तुमच्या लक्षात आलेलं नसतं, तुम्हाला खरंतर मुंबईतल्या लोकल ट्रेनची आणि तिथल्या घामाची आठवण येत असते. पण एव्हाना गोरा रंगात आलेला असतो आणि तुम्हाला त्याच्या उत्साहाचा फुगा फोडायचा नसतो. आपल्या देशी लोकांची एक सवय असते, आपण उगीचच दुसऱ्याच्या भावना दुखावत नाही. म्हणून तुम्हीही "what is snowboarding" वैगेरे गिळून "oh yeah nice" सारखी वाक्ये सोडून देता. तो तुम्हाला सांगत असतो कि snowboarding मध्ये त्याची बायका-पोरंही कशी त्याला साथ देतात, आणि त्याचा अख्खा परिवार कसा बर्फावर संसार थाटून सुखाने नांदतायत, त्यावर तुमचं सवयीप्रमाणे "wow, good good" वैगेरे चालूच असतं. पुढे जर तो म्हटला कि snowboarding मध्ये त्याची बायका-पोरं त्याला उलटं लटकवून मिरचीची धुरी देतात, तर त्यावरही तुम्ही "oh, nice" वैगेरेच म्हणाल.

याउलट, म्हणजे जर तुम्ही जून महिन्यात वैगेरे थंडीवर चर्चा सुरु केलीत तर ते तुमच्याकडे अशा काही नजरेने पाहतात कि - समजा तुम्ही प्रतिभा जगतापला विचारलंत कि, काय गं बाई, तू विनयशी लग्न करायच्या आधी त्याच्यात पाहिलंस तरी काय? नाही, आमचं असं बिलकुल म्हणणं नाही कि विनयच्यात पाहण्यासारखं काही नाही. उलट आम्हाला असं म्हणायचंय कि त्याच्या अनेक खुबींपैकी तुला नेमकं काय आवडलं म्हणून तू त्याला होकार दिलास. आणि त्यावर ती जर म्हणाली कि - त्याची हेअरस्टाईल. तेव्हा तुम्ही तिला ज्या नजरेनं बघाल. same त्याच नजरेने हे लोकं तुम्हाला बघतात - कि तुम्ही भारतासारख्या उष्ण ठिकाणाहून मरायला इथं आलाच कशाला. तुम्ही त्यांना म्हणत असता - बाबा रे, इथली थंडी कितीही कडक असली तरी भारतातल्या भ्रष्टाचारापेक्षा जरा कमीच झोंबते. पण हे मनात, आपल्या लोकांचं बरचसं मनातच असतं. आता मात्र थंडीला अनुसरून त्यांचे हाव-भाव काहीसे असे असतात. आधीच्या पेक्षा अगदी उलट. इथली थंडी उजव्या सोंडेच्या गणपतीसारखी किती कडक आहे वैगेरे सांगायला सुरुवात करतात. त्यांचं म्हणणं असं असतं कि ते इथे स्थायिक असल्यामुळे त्यांच्यासमोर इथे राहण्यावाचून पर्याय नाही. पण तुम्ही इथे का आलात असा उभा सवाल करून ते तुम्हाला आडवं करतात. आणि मग त्याच्यावर हॅ हॅ हॅ करून चक्क हसायला लागतात ओ. हे हॅ हॅ हॅ आपल्याला उद्देशून असतं का स्वतःला उद्देशून का थंडीला उद्देशून असतं हे कळत नाही त्यामुळे आपण हसायचं का नाही हा एक पेच असतो. मग आणखी काहीतरी १-२ वाक्य बोलतात आणि पुन्हा हॅ हॅ हॅ. ह्या लोकांचं हे हॅ हॅ हॅ प्रकरण फार चालतं. दर २-३ वाक्यांनी एखादं हॅ हॅ हॅ. मग आपणही काहीतरी बोलायचं आणि एखादं हॅ हॅ हॅ फेकून मारायचं. बरं हे हॅ हॅ हॅ कुठेही चालतं. म्हणजे आपल्याकडे कसं बऱ्याच गोष्टींना बंधन असतं, कुठे काय बोलावं कुठे काय बोलू नये, तसं ह्या हॅ हॅ हॅ चं नसतं.

मला एक किस्सा आठवतोय - मी US ला नवीनच आलो होतो आणि क्रिसमस जवळ आला होता. मी माझ्या बॉसला सहज विचारलं कि नाताळच्या सुट्टीत पोरा-बाळांना घेऊन गावी जाणार आहे काय. मला वाटलं आपल्यात कसा कोकणी माणूस कितीही पाउस असला तरी न चुकता गणपतीला गावी जातो, तशातला काहीसा क्रिसमसचा प्रकार असावा. त्यावर तो म्हटला त्याचा दरवर्षी क्रिसमसचा प्रोग्राम ठरलेला असतो. तिथून ४ तास दूर गावी तो त्याच्या आईला भेटतो, आणि २ तास दूर बापाला भेटतो. आई एकीकडे आणि बाप दुसरीकडे. एकतर आपल्याकडे अशा गोष्टी घडत नाहीत, घडल्याच तर चार चौघात कोण त्या बोलत नाही आणि बोललेच तर सांगणारा आणि ऐकणारे कुणीतरी खपल्यासारखे गंभीर चेहरा करून उभे असतात. त्यामुळे इथे कसे वागावे हे मला कळेना राव. पण इथे हा पठ्ठ्या स्वतःच हॅ हॅ हॅ करायला लागला. मग मी पण हॅ हॅ हॅ. सांगायचा मुद्दा असा कि हा हॅ हॅ हॅ कुठेही खपतो. बरं हा हॅ हॅ हॅ राज ठाकरेच्या acting सारखा दिलखुलास असतो अशातलाही भाग नाही, हा म्हणजे उद्धव ठाकरेच्या थोबाडासारखा अगदीच निर्विकार असतो. तुम्ही मनात म्हणत असाल - हा लेकाचा आज काही जिवंत घरी जात नाही…पण घाबरू नका मला काही या दोघांच्या समर्थकांना भिण्याचं कारण नाही. कारण राजचे समर्थक "राज ठाकरेची acting" यातला उपरोध समजण्यापलीकडे गेलेत आणि उद्धवचे जे काही २-४-५ समर्थक आहेत ते सगळे मातोश्रीलाच असतात. त्यामुळे राहता राहिला प्रश्न विनयचाच, त्याला काय तुम्ही सांभाळून घ्यालच.

पण खरं सांगू का - मघाशी सांगितल्याप्रमाणे थंडीची खरी मजा त्यावर बोलण्यात नसते, ती असते अनुभवण्यात. प्रसंग असा असतो कि तुम्ही नवीनच आलेले असता. आपण लगेज मधून जी सगळ्यात मोठ्ठी बॅग आणतो ती टाटा नॅनो साठी थोडी लहान पडते म्हणून कार घेऊन यायचा संबंध नसतो. इथं कार घेतलेली नसते. जानेवारी चालू असतो, संध्याकाळचे पाच वाजलेले असतात आणि तुम्ही त्या मठ्ठ काळोखात बसची वाट बघत थंडीत उभे असता. snow shoes, socks, long johns म्हणजे वरच्या पँटच्या आत घालायची ती एक पँट असते, jeans असतेच, वर innerwear, टी-शर्ट, स्वेटर, double layer jacket, touque म्हणजे इथली माकड टोपी, मफ़्लर, mittens म्हणजे हातातले gloves अशा नाना शास्त्रांनी तुम्ही थंडीशी झुंज देत असता. तुमच्या नाकाने शरणागती पत्करलेली असते आणि हाताची बोटे त्या दिशेला चाललेली असतात.

electronic बोर्डवर तुमची बस ७ मिनिटांनी येईल असे दिसत असते. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वाल्यांचा प्रामाणिकपणाशी जो संबंध आहे तोच त्या display चा आणि खरोखर लागणाऱ्या वेळेचा असतो. दर ५ सेकंदानी तुम्ही आकडा कमी झाला का ते बघत असता. एखादी displayवर नसलेली आणि एखादी नंतर असलेली बस येउन जाते. सुरुवातीला जरा उत्साह असतो तेव्हा तुम्ही इकडे तिकडे येरझऱ्या मारता. मग शेवटी वैतागून तुम्ही शांत चित्तानी एका ठिकाणी उभे राहता - मुंबईतल्या चाळीतला माणूस common संडासासमोर जसा उभा राहतो तसेच. बऱ्याच लोकांना जुने दिवस आठवले वाटतं, काहींना थंडीचे आणि काहींना चाळीतले…काहींना दोन्ही. ७ तपासारखी वाटणारी ती ७ मिनिटे निघून जातात आणि शेवटी तुमची बस "due" दाखवत असते. आता तुम्ही जितक्या लांब दिसेल तितक्या लांब पर्यंत बस दिसते का ते बघत असता. बसवर असलेल्या electronic display सारखं काहीतरी लांब दिसत असतं म्हणून तुम्ही खुश होता. जरा जवळ आल्यावर कळतं कि ती बसच आहे म्हणून तुम्ही आणखी खुश होता. पण त्यावर इमाने इतबारे "sorry, not in service" असं लिहिलेलं असतं. आपल्याकडे असतो तसा - बस डेपोला जाणार, नीचे उतरो – असा दम नाही. आता पुन्हा तुम्ही electronic बोर्डवर बघता पण तुमची बस "due" मधून गायब झालेली असते त्यामुळे ती किती वेळात येईल तेही सांगता येत नसतं. आता परिस्थिती अशी असते कि - समजा तुम्ही इथेच गोठून मेलात आणि यम तुमचे प्राण न्यायला आला आणि त्याने तुम्हाला तुमची शेवटची इच्छा विचारली तर चटकन तुम्ही "बाथरुमला जायचंय" असंच सांगाल. हा विचार सुरु असतानाच बस येते. पास आत कुठेतरी असतो त्यामुळे पास काढायला तुम्ही gloves काढता आणि नेमका अशावेळी बराच वेळ दाबून धरलेला शेंबूड चौथ्यांदा वाट काढून बाहेर येत असतो. आधी ३ वेळा तुम्ही तो gloves नी पुसलेला असतो हे सांगायला नको.

ह्या सगळ्या गोंधळात कसेबसे तुम्ही बसमध्ये चढता. एरवी रिकामी असलेली बस वेळ झाल्याने भरलेली असते. heater चालू असल्याने आता मात्र उकडायला लागते. बॅग सांभाळत तुम्ही मफ्लर आणि touque काढायला घेता इतक्यात gloves खाली चिखलात पडतो. हो, इथे थंडीत बसमध्ये चांगलाच चिखल असतो याची होतकरू विन्निपेगकरांनी नोंद घ्यावी. शेवटी उतरून चपाक चपाक करत तुम्ही घरी पोचता आणि थंडीला नावं ठेवत मढवलेली वस्त्रं काढू लागता.

पण एक मात्र आहे कि घरात heater असल्यामुळे बरीच सोय होते आणि रात्री मोठ्या असल्यामुळे झोपसुद्धा चांगली लागते. मला तीच झोप आता काहींच्या चेहऱ्यावर दिसू लागलीय. ही झोप थंडीमुळे किंवा रामभाऊचा चहा न मिळाल्यामुळे नसून मी बोलायचं थांबवावं यामुळे आहे हेही कळतंय. त्यामुळे मी बोलायचं थांबवावं हे कळतंय. पण जाता जाता एकच सांगेन - भारतात थंड पाण्याने अंघोळ करत असल्याचा अभिमान घेऊन येणारे इथल्या थंडीत आडवे होतात. याउलट ह्या थंडीला कोप झालेल्या देवीप्रमाणे वागवणारे बऱ्यापैकी तारून नेतात. कसे करायचे हे तुम्हीच ठरवा…

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

व्हिडिओ नाही पाहिला पण लेख वाचून सांगतो.भारताशी डिस्कनेक्ट होऊन विनोद करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

more context pls.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

इकडच्या घटना ,व्यक्ती यांची तुलना गाळून अपेक्षित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इकडच्या घटना ,व्यक्ती यांची तुलना गाळून अपेक्षित.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी लक्षात ठेवेन. इकडचे लोकं अॅडजस्ट करण्यात पटाईत असतात, त्यामुळे कृपया यावेळी थोडं अॅडजस्ट करून वाचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

छानच पण त्या शेंबडाच्या उल्लेखाने याईक्स झाले Sad
पण ओव्हरॉल छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. तो माझ्या बायकोला पण खटकला होता. पण मी म्हंटलं आपण रोजच्या बोलण्यात वापरत नाही असा शब्द वापरला तर एखादा पंच फुटेल. पण नाहीच फुटला Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

लग्नानंतर तर एवढं बोलण्याची ही पहिलीच वेळ, त्यामुळे जरा सांभाळून घ्या.

ROFLROFL
.

पुढे जर तो म्हटला कि snowboarding मध्ये त्याची बायका-पोरं त्याला उलटं लटकवून मिरचीची धुरी देतात, तर त्यावरही तुम्ही "oh, nice" वैगेरेच म्हणाल.

हे त्रिवार सत्य आहे मी तर मला अ‍ॅक्सेंट कळला नाही तरी ओह रियली, ओह ओके वगैरे उद्गारत बसते.
.

दर २-३ वाक्यांनी एखादं हॅ हॅ हॅ.

हे त्रिवार सत्य आहे.
.

एकतर आपल्याकडे अशा गोष्टी घडत नाहीत, घडल्याच तर चार चौघात कोण त्या बोलत नाही आणि बोललेच तर सांगणारा आणि ऐकणारे कुणीतरी खपल्यासारखे गंभीर चेहरा करून उभे असतात.

ROFLROFL
.

कारण राजचे समर्थक "राज ठाकरेची acting" यातला उपरोध समजण्यापलीकडे गेलेत आणि उद्धवचे जे काही २-४-५ समर्थक आहेत ते सगळे मातोश्रीलाच असतात. त्यामुळे राहता राहिला प्रश्न विनयचाच, त्याला काय तुम्ही सांभाळून घ्यालच.

Biggrin ते जगताप, अकोळकर काका वगैरे लोक मस्त पेरलेत Smile
.

पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वाल्यांचा प्रामाणिकपणाशी जो संबंध आहे तोच त्या display चा आणि खरोखर लागणाऱ्या वेळेचा असतो.

हाण्ण!!! खुसखुशीत!
.

समजा तुम्ही इथेच गोठून मेलात आणि यम तुमचे प्राण न्यायला आला आणि त्याने तुम्हाला तुमची शेवटची इच्छा विचारली तर चटकन तुम्ही "बाथरुमला जायचंय" असंच सांगाल.

खी: खी: ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकीचं नंतर. पण 'सुरुय' असं स्क्रिप्टमध्ये लिहिण्याबद्दल आभार. पुस्तकी भाषा वाचून वाचून कंटाळा येतो.

'मठ्ठ काळोख' हे वर्णन आवडलं. अगदी टेक्सासात राहत असूनही.

भारतीय संदर्भ गाळून भारतीयांसमोर आणि भारतीय भाषेत विनोद करणं कठीण वाटतं; मी असा निर्णय मुद्दाम घेणार नाही. आपसूक झालं तर झालं. पण मुंबईच्या चाळींचं वर्णन थोडं कालविसंगत वाटतं. मुंबईतल्या बहुतांश चाळी पाडून तिथे मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. त्यापेक्षा लोकलमधून बाहेर पडून घरी पोहोचेपर्यंत, किंवा मुंबईतल्या पावसाचे उल्लेख सध्यातरी चालून जातील. (अजून काही दशकांत हे विनोद कालबाह्य ठरवेत अशी आशा आहे.)

गोरे लोक बऱ्यापैकी अंगमेहेनतीची कामं करतात; बाहेर खेळायला, फिरायला जातात. आपण भारतीय बरेच घरबशे असतो. ह्या विषयावरही लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. हे माझं पाहिलं स्टँटअप बऱ्यापैकी मोठी मोठी वाक्य वापरून लिहिलेलं होतं. मला स्वतःला काही वाक्य फार आवडलेली. पण त्या विनोदांवर लोकं तेवढे नाही हसले. आणि काही काही विनोद अगदीच फिलर टाईप होते, जागा भरायला टाकलेले. तिथं लोकं मस्त हसले. मला असं जाणवलं कि लोकांना आपले हलकं-फुलके टाईप जोकच आवडतात.

मी बाकीचे पण स्क्रिप्ट्स टाकेन. अजून काही विषय आहेत डोक्यात, त्याच्यावर पण चर्चा करायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

मला स्वतःला काही वाक्य फार आवडलेली. पण त्या विनोदांवर लोकं तेवढे नाही हसले.

काही विनोद मोठ्याने हसू येण्यासारखे नसतात. काही विनोद तरल असतात; कधी वाक्यं विनोदी असतात असं नाही, त्यांतलं वर्णन अंगावर येतं म्हणूनही आवडतं. शिवाय व्यक्तिगत आवडीनिवडींचा भागही असतोच. जास्त लोकांसमोर सादर कराल तेव्हा लोकांना साधारणपणे काय आवडतंय, काय नाही हे लक्षात येईल.

इतरही स्क्रिप्ट्स जरूर प्रकाशित करा. त्यांचे व्हिडीओ असतील तर आणखी उत्तम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>भारतीय संदर्भ गाळून भारतीयांसमोर आणि भारतीय भाषेत विनोद करणं कठीण वाटतं>>
दोनचार महिन्यांसाठी गेलेल्यांसाठी ठीक आहे पण काही वर्षं तिकडेच असणार्यांना त्या राजकारणींच्या बोलण्याचालण्याचं सोयरंसुतक अजिबात उरत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>गोरे लोक बऱ्यापैकी अंगमेहेनतीची कामं करतात; बाहेर खेळायला, फिरायला जातात. आपण भारतीय बरेच घरबशे असतो. ह्या विषयावरही लिहा.>>
हेच बरोबर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0