पंखा

कविता-

निद्रिस्त खोलीत
फिरतोय पंखा डोक्यावर,
सगळं विसरलेलं तसच पडून आहे जागच्या जागीच,
ग्लासमधला शेवटच्या घोटाचे गाल
न पेटवलेल्या दिव्यांइतकेच गेलेत आत,
शोकांतिकेच्या कविता आज परत उठ्ल्यात सकाळ सकाळी,
आपल्याकडे अपेक्षेने बघत.
किंचित सगळं हललं असेल जाग्यावरून,
किंवा असेल उठला पोटशूळ ह्या पेपरात तरी
पायाखालून सरकलेल्या जमिनीविषयी,
खचित कोणी बोललं असेल काही गरजेचं,
उगाच,
न सांगण्यासारखं,
जे ऐकून कोणीतरी चालत जायचं थांबेल काही क्षण,
गरजेचं ऐकून कोसळेल जसं येत पाणी डोळ्यातून,
एव्हाना या प्रचंड पृथ्वीच्या पाठीवर सगळंच संपलय
नि सगळं सुरु झालय असं म्हणणारे हरवलेत,
लोखंडी काट्यांचा ठोका गंजक्या हवेची साल सोलून
वाहतोय आपल्या उंबऱ्यावर,
जगाच्या नकाशावर चालता येत नाही म्हणून
आपण आलो चालून या शहराच्या नकाशावरून,
बुटक्या इमारतींच्या लाळेतून
काढत काढत पाय सर केले खिसे भरायला रस्ते,
पुस्तकं धरून ठेवत होती पात्र घट्ट
अनेक लेखकांच्या हातांचे फुटले बांध,
जेव्हा आपण तयार केलेल्या आपल्याच अनेक आकृत्या
वाटत जाणार होतो आपण प्रत्येक वाटाड्याला.
हेलकावे खात येणाऱ्या फांद्या खिडकीतून आत
राहत होत्या सोबत आपल्या,
चंद्रप्रकाशाला फुटला होता घाम आपलं मनोगत ऐकून,
अनेकांनी प्रश्नांचे घरंदाज डाव मांडले गेले आपल्या पायरीवर,
हवं तसं मुडपून पाहतात आपल्याला.
आपण तसेच पडून राहिलो
घरातल्या सदाबहार चौकात,
जेव्हा आपण आपल्याच गोष्टी
सांगत होतो लोकांना वेगवेगळ्या,
वेगळ्या माणसांसारख्या,
सकाळनंतर,
झोपेमध्ये,
अधेमधे,
पाठवत होतो वेगळे सांगावे
आवरून वेगळे
प्रत्येक वेळी
त्याच प्रेयसीला
तिचा ठाव विचारत राहिलो चौकांना
डोळे परत आलेच नाहीत तिची पावलं शोधून
कि नाही आली फुलं परत झाडावर रस्त्यावरून.
पडलं स्वप्न ह्याच खोलीच्या झोपेत
हिच्याच अंधारात-
सावल्यांचा गळा कापून रात्र म्हणवणारा-
ह्याच गोष्टीच्या
कधी आधी,
कधी नंतर,
कमी अधिक,
कधी पूर्ण च्या आधी,
फिरल्या फरश्या पलंगाच्या सावल्यातून बाहेर,
या गोष्टींच्या घरी जाऊन आलेल्या पायाशी गोळा झाल्या,
आपण दिसत होतो आरशाच्या डोळ्यात पाणी आल्यावर अनेक लोकांसारखे,
जसं सांगितलं आपण तसं,
वेगळंवेगळं, हारवलेलो,
आपणच आपल्याला समोरासमोर,
अनेक नगर फिरून गेली आपल्या शरीरावरुन,
सोडत गेले माणसं चिठ्ठयांगत पंख्याखाली.
-
© निनाद पवार

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

सलाम!

ग्लासमधला शेवटच्या घोटाचे गाल
न पेटवलेल्या दिव्यांइतकेच गेलेत आत,

लोखंडी काट्यांचा ठोका गंजक्या हवेची साल सोलून
वाहतोय आपल्या उंबऱ्यावर,

बुटक्या इमारतींच्या लाळेतून
काढत काढत पाय सर केले खिसे भरायला रस्ते,

केवळ थोर! मानतो!

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

+१

येस्स्स!

नक्की काय झाले आहे ते समजले

नक्की काय झाले आहे ते समजले नाही Sad माझी मर्यादाच असणार. पण एक हताशपणाचा मूड जाणवतो.