हिमाचली पदार्थ - भटुरे (कणकीचे भटुरे)

भटुरे नाव ऐकल्यावर मैद्याचे छोले भटुरे आठवतील. पण हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात सक्रेणादेवीच्या मंदिराजवळ असलेल्या गावात भटुरे बनविण्यासाठी मैद्याच्या जागी कणकीचा वापर होतो. बहुतेक सकाळी नाश्त्यासाठी हे भटुरे केले जातात. या भटुरर्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे भटुरे तळून किंवा तव्यावर भाजून केले जातात. (भटुरे बनवितानाचे फोटो खाली दिलेले आहे, कुणाचा चेहरा दाखविणार नाही या अटीवर फोटो काढले होते). मैद्याच्या भटुरर्या सारखे हे भटुरे पण फुलतात. आपल्या मराठमोळ्या पोळी एवढे मोठे पण दुप्पट जाड नक्कीच असतात. आपण आपल्या पद्धतीने भटुर्यांचा आकार निश्चित करू शकतो. चित्रावरून भटुरे कसे बनतात याचा अंदाज घेता येईल.

भटुरे

साहित्य: एक पेला कणिक, अर्धी वाटी उडीत डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, आले १/२ इंच, लसूण १०-१२ पाकळ्या, मिरची २-३, अर्धा चमचा काळी मिरी, १/२ चमचा जीरा पावडर. स्वादासाठी *कोथिंबीर आणि मीठ. गोडे तेल आवश्यकतानुसार. हिमाचल मध्ये सरसोंचेच तेल वापरतात (*या भागात भाबरी नावाची झुडूपा सारखी वनस्पती असते. भाबरीला कढीपत्या सारखे छोटी-छोटी पाने असतात. भाबरीच्या पानांना एक प्रकारचा सुगंध असतो. भाबरीचा प्रयोग चटणी सारखा किंवा पकौडे इत्यादींचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. भाबरीच्या काळ्या रंगांच्या बियांचा हि वापर स्वादासाठी केला जातो. गावात खालेल्या भटूर्यात भाबरीच्या पानांचा आणि बियांचा वापर केला होता. शहरात भाबरी बाजारात मिळणार नाही. त्या जागी कोथिंबीर वापरता येईल).

कृती: उडीत डाळ आणि चणा डाळ, रात्रीच भिजवून ठेवायची. सकाळी कणिकत खमीर मिसळून कणकीला भरपूर मळावे किमान दहा एक मिनिटे. नंतर मळलेल्या कणकीला खमीर उठण्यासाठी एक ते दीड तास झाकून ठेवा.

सारण बनविण्यासाठी मिक्सरमध्ये, रात्र भर भिजलेली उडीत डाळ, चणा डाळ आले, लसूण, मिरची, काळी मिरी, जीरा पावडर टाकून जाडसर पिसून घ्या. स्वादानुसार मीठ. (पाटा-वरवांट्यावर जाडसर पिसल्या जाते). खाताना आल आणि लसणाच्या तुकड्यांचा स्वाद जिभेला आला होता.

कढईत तेल गरम झाल्यावर. कणकीच्या गोळ्यांची पारी करून त्यात सारण टाकून हाताने, किंवा पोळी सारखे लाटून भटुरा तैयार करून, मध्यम आचेवर तेलात तळून घ्या. ज्यांना तळलेले चालत नाही. एका तव्यावर थोडे तेल लाऊन मध्यम आचेवर वर भटूरे दोन्ही बाजूनी भाजून घ्या. हे भटुरे छोल्या सोबत खायला चांगले लागतात. (हे भटुरे डाळींएवजी पनीर इत्यादी टाकून हि आपण करू शकतो. सारणात काय टाकायचे हे सर्वस्व आपल्यावर आहे. कृतीत परंपरागत पद्धत दिली आहे).

तव्यावरचे भटुरे

माता सक्रेणादेवीचा फोटो

माता सक्रेणादेवी

सूचना: हिमाचली पदार्थांंचा प्रचार करण्यासाठी, हिमाचल सरकार, किंवा मंडीच्या जिल्ह्याधिकाऱ्या कडून कुठल्याही प्रकारचे मानधन मिळालेले नाही आहे. कृपया गैरसमज करू नये. जीभ दाखविणे

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

खमीरच्या प्रती, जाती वगैरे

'तुमच्याकडचे' माहीत नाही, परंतु 'आमच्याकडे' तरी ग्रोसरी ष्टोअरांतून 'बेकर्स यीस्ट' म्हणून जे काही मिळते, त्याच्या गेला बाजार दोन तरी वेगवेगळ्या प्रती मिळतात - एक 'रेग्युलर' ('अक्टिव ड्राय'), आणि दुसरे 'ऱ्यापिड राइझ'. (दुवा)

याव्यतिरिक्त वाइनमेकिंग यीस्ट हा वेगळाच प्रकार आहे, आणि त्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या जाती असतात, परंतु तो वेगळा विषय आहे. (वाइनमेकिंग यीस्ट ग्रोसरी ष्टोअरांतून मिळत नाही. त्याकरिता वाइनमेकिंग सप्लाइज़ ष्टोअराची वाट धरावी लागते, किंवा ईबे/अमेझॉनवरून मागवावे लागते.)

(बायकांना जी यीस्ट इन्फेक्शने (दुवा) होतात, तेदेखील यीस्ट बोले तो खमीरच, परंतु त्याचा ज़िक्र येथे अप्रस्तुत असल्याकारणाने मुद्दामच टाळलेला आहे. असो.)

फरक

'खमीर म्हणजे यीस्ट' हे उत्तर योग्य असलं तरी ब्रेडसाठी बाजारात मिळणारं यीस्ट आणि उत्तरेकडे वापरलं जाणारं खमीर यांतला मुख्य फरक म्हणजे खमीर स्लो अ‍ॅक्शन असतं. तर ब्रेडचं यीस्ट फास्ट अ‍ॅक्शन असतं. त्यामुळे ब्रेडसाठी बाजारातलं यीस्ट वापरून भिजवलेल्या पिठाचा गोळा दीड तासांत जितका फुगेल त्या मानानं खमीर घातलेला गोळा कमी फुगेल असा माझा अंदाज आहे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मस्त आहे पटाईत गुरुजी !!!

मस्त आहे पटाईत गुरुजी !!! करून बघणार

दोन प्रश्नः १. खमीर किती

दोन प्रश्नः
१. खमीर किती घ्यायचे?
२. एक पेला कणीक घेताना पेला किती मोठा? (३०० मिली वाला?)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.

धन्यवाद.

'खमीर' बोले तो...

...यीस्ट.

खमीर म्हणजे काय? ते भटुरे छान

खमीर म्हणजे काय?
ते भटुरे छान दिसत आहेत.